सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

विकास कामे मुदतीत पूर्ण करा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या सूचना

जिल्हा परिषदेकडील विकास कामे व विविध योजनांचा पालकमंत्र्यांकडून आढावा सांगली दि. 11 ( जि.मा.का.) :- जिल्हा परिषद मार्फत ग्रामस्तरापर्यंत विविध विकास कामे राबविली जातात. विकासकामे करताना ती वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी योग्य नियोजन करून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमधून प्राप्त निधी विहित मुदतीत खर्च होईल याची दक्षता संबधित विभागांनी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिल्या. जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारी विविध विकास कामे व योजनांचा आढावा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज घेतला. जिल्हा परिषदेच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या बैठकीस खासदार संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषद विभाग प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले, ज्या विकास कामांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत त्याची माहिती द्यावी, या प्रस्तावांचा पाठपुरावा केला जाईल. तसेच ज्या कामांना स्थगिती दिली आहे त्याची माहिती देण्यात यावी. अंगणवाडी बांधकामाचा आढावा घेऊन पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले, जागे अभावी ज्या अंगणवाडीच्या बांधकामामध्ये अडचण येत आहे याबाबत सुधारित प्रस्ताव करून यासाठी मंजूर निधी खर्च करावा. जल जीवन मिशन अंतर्गत होणारी कामे प्राधान्याने व्हावीत. ग्रापंचायतस्तरावर मंजूर कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबत ग्रामपंचायत विभागाने नियोजन करावे. यासाठी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांची बैठक घेऊन कामांचा आढावा घ्यावा. १५ व्या वित्त आयोगातील निधीही वेळेत खर्च करावा अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या. बैठकीत बांधकाम, समाजकल्याण, कृषी, पाणी पुरवठा व स्वच्छता, महिला व बालकल्याण, समाज कल्याण, आरोग्य, पशूसंवर्धन, शिक्षण आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान भव योजनेतंर्गत लाभार्थीना अभा कार्ड तसेच त्यांना एक महिन्याच्या औषधाचे किट वितरण, महिला बाल विकास विभागाकडे नियुक्ती मिळालेल्या अंगणवाडी मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश आणि माझी कन्या भाग्यश्री योजनेतून पात्र लाभार्थीस अनुदान वितरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा