गुरुवार, १४ सप्टेंबर, २०२३

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याजपरतावा योजनेतून केशव मिसाळ यांची तेल उत्पादन व्यवसायात भरारी

मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ विविध योजना राबवत आहे. या योजनांचा लाभ घेऊन अनेकांनी आपली प्रगती साधली आहे. आटपाडी तालुक्यातील केशव मिसाळ त्यापैकीच एक. केशव मिसाळ यांचे गाव दिघंची असून, त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांची ५ एकर शेती आहे. घरी वडील व पत्नी आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्री. मिसाळ यांची नोकरीपेक्षा व्यवसाय करण्याची प्रबळ इच्छा व जिद्द होती. २००७ पासून ते विषमुक्त अन्न या चळवळीमध्ये काम करत असल्याने सेंद्रिय शेती व शेतीपूरक व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले. भारतात खाद्यतेलाचे उत्पादन मागणीपेक्षा कमी आहे. त्यामुळे भेसळमुक्त खाद्यतेलासाठी माणदेश ग्रामोद्योग या नावाने त्यांनी लाकडी घाण्याचे तेल व्यवसाय २०१६ साली सुरू केला. त्यासाठी १५ लाख रूपयांचे स्वभांडवल त्यांनी विविध माध्यमातून उभा केले. व्यवसाय आकारास येत असतानाच केशव मिसाळ यांनी व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. श्री. मिसाळ यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची माहिती मिळाली. महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या संवाद मेळाव्यास उपस्थित राहून त्यांनी महामंडळाच्या योजनांची सर्व माहिती घेतली. याबाबत केशव मिसाळ म्हणाले, मी व्यवसाय वाढीसाठी बाबासाहेब देशमुख बँक लिमिटेड, आटपाडीकडून गेल्या वर्षी दहा लाख रूपयांचे कर्ज घेतले. आज माझ्याकडे तेल निर्मितीसाठी २ व तेलबिया फोडण्यासाठी २ अशी एकूण ४ यंत्रे आहेत. मदतीसाठी एक कामगारही आहे. महिन्याला ५०० लिटर तेलाचे उत्पादन केले जाते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून मी व्यवसाय वाढवू शकलो. यासाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून मला संपूर्ण सहकार्य मिळाले. आज मी घेतलेल्या कर्जाचा व्याज परतावा नियमितपणे सुरू आहे. आतापर्यंत महामंडळाकडून 1 लाख 16 हजार 166 रूपये इतका व्याज परतावा करण्यात आला आहे. विषमुक्त अन्न, रोगमुक्त भारत या संकल्पनेचा त्यांच्यावर प्रभाव आहे. त्यातून ते शेतीही सेंद्रिय पद्धतीने करतात. त्यांच्या घाण्यात सेंद्रिय तेल तयार व्हावे, यासाठी परिसरातील शेतकरी गटांना ते सेंद्रिय तेलबिया पुरवठा करतात. त्या सेंद्रिय तेलबियांची खरेदी अधिक दराने करतात. केशव मिसाळ यांच्या व्यवसाय भरभराटीसाठी व्याज परतावा योजना मदतीची ठरली आहे. संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा