बुधवार, २५ जानेवारी, २०२३

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते ध्वजारोहण

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले, उपजिल्हाधिकारी ‍किरण कुलकर्णी, अरविंद लाटकर, अजय नष्टे, मोहिनी चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी एम. बी. बोरकर, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. 00000

प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

- पेठ नाका - सांगली रस्त्याच्या 41 किलोमीटर लांबीच्या कामासाठी 860 कोटी रूपये निधी मंजूर - जत तालुक्यातील 65 गावातील सिंचनाच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यात येणार - म्हैसाळ पाणी योजना सोलरवर चालविण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : सबका साथ सबका विकास हे घोषवाक्य घेवून सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना शासन राबवित आहे. सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द असल्याची ग्वाही कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. राष्ट्रध्वजास सलामी देवून राष्ट्रगीत म्हणण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा नंदिनी आवडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अपर पोलीस आंचल दलाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिपक चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने आदि मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, लोकांच्या कल्याणासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये विविध विभागातील रिक्त पदांवर भरती, वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेंतर्गत 10 हजार रुपयांचा आर्थिक लाभ, सलोखा योजना, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य, दिव्यांग कल्याण यासह विविध सिंचन प्रकल्पांना गती अशा अनेक महत्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शासन काम करीत असून जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या 56 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 205 कोटी पेक्षा अधिक अनुदान वितरीत करून दिवाळीची भेट देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 24 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले असून त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 4 लाखाहून अधिक शेतकरी लाभार्थी आहेत. यामध्ये सॉफ्टवेअर मध्ये वैयक्तिक माहिती पूर्ण केलेल्या 2 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 45 कोटी पेक्षा जास्त रूपयांचा 11 वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. तर 70 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना 12 व्या हप्त्याचे 14 कोटीहून अधिक रूपये वितरीत करण्यात आले आहेत. उर्वरीत शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सन 2024 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे शासनाचे धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून 22 हजाराहून अधिक घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यामध्ये 62 टक्क्याहून अधिक घरकुले पुर्ण झालेली असून उर्वरीत घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. राज्य पुरस्कृत योजनांमधून 8 हजाराहून अधिक घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. 6 हजाराहून अधिक इतकी घरकुले पूर्ण झालेली आहेत. तर 2 हजार पेक्षा जास्त घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यात अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून यामध्ये अनेक वर्षापासून मागणी होत असलेल्या पेठ नाका - सांगली या कामाचा समावेश असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, या रस्त्याच्या 41 किलोमीटर लांबीच्या कामासाठी 860 कोटी रूपये निधी मंजूर केला आहे. या कामाचे उद्या भूमिपूजन होत आहे. त्याचबरोबर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे कामही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा शासनाचा निर्धार आहे. विशेषत: जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी देण्यासाठी म्हैसाळ विस्तारीत योजनेतील वर्षानुवर्ष प्रलंबीत असलेली कामे आपल्या सरकारने तीन महिन्यात गतीमान केली आहेत. या योजनेतील कामांसाठी 981 कोटी रूपयांची निविदा नुकतीच प्रसिध्द करण्यात आली आहे. यामुळे जत तालुक्यातील 65 गावातील सिंचनाच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यात येणार आहे. म्हैसाळ पाणी योजना सोलरवर चालविण्यासाठी केंद्र शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे वीज बिलाचा प्रश्न सुटणार आहे. दर्जेदार शिक्षण व आरोग्य प्रत्येक नागरिकाचा हक्क असून सरकार व जिल्हा प्रशासन त्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आरोग्यासाठी 59 कोटीहून अधिक रूपये तरतूद केली आहे. शिक्षणासाठी डीपीडीसीसह विविध माध्यमातून 34 कोटीहून अधिक रूपये खर्च करण्यात येणार आहे. सांगली जिल्हा परिषदेने मॉडेल स्कूल, स्मार्ट पीएचसी, स्मार्ट अंगणवाडी यासारखे राज्याला आदर्श होतील असे उपक्रम राबविले आहेत. ही सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने प्रशंसनीय बाब आहे. या व्यतिरीक्त जिल्ह्यात मिरज येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलसाठीच्या 275 कोटी रूपये मंजूर झाले आहेत व महिला रूग्णालयाचा विषय आपण मार्गी लावत आहोत. त्याच्या प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही लवकरच पूर्ण होत आहे. ‍ जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 416 कोटी 64 लाखाच्या प्रारूप आराखड्याला डीपीडीसीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये 140 कोटी 84 लाख रूपये इतक्या वाढीव अतिरीक्त निधीची मागणी करण्यात आली असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, हा निधी विविध यंत्रणांच्या मार्फत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यात उद्योग, व्यापार, निर्यात यांना चालना देण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये विमानतळ करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पुणे - मिरज रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेसाठी भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण झाली असून रेल्वे लाईनचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. या रेल्वेलाईनमुळे रेल्वे वाहतूक वेगवान होणार असून याचा शेतकरी, व्यापारी, नोकरदार यासह सर्वसामान्यांना गतीमान प्रवासाची सोय होणार आहे. आपले सरकार शेतकरी, सर्वसामान्य माणूस यांना केंद्रबिंदू मानून काम करीत आहे आणि यापुढेही करीत राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते शहिद शिपाई रोमित चव्हाण यांच्या आई वैशाली चव्हाण आणि लान्स नायक विनोद माने यांना शौर्याच्या सन्मानार्थ ताम्रपट देवन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा गौरव, शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉ. खाडे यांनी परेड निरीक्षण केले. यावेळी विविध पथक प्रमुखांनी पालकमंत्री डॉ. खाडे यांना मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनात सांगली पोलीस दल, आरसीबी पथक, सशस्त्र पोलीस पथक, महिला पोलीस पथक, होमगार्ड, वाहतूक विभाग, महाराष्ट्र सुरक्षा बल, अग्नीशमन दल, पंचक्रोशी विद्यानिकेतन निमणी, आयडीएल स्मार्ट स्कूल मिरज व मार्टिन इंग्लीश स्कूल या शाळेंचे पथक, पोलीस दल बँड पथक, दंगल ‍विरोधी पथक, श्वान पथक, निर्भया पथक वाहन, डायल 112 वाहन, फॉरेन्सीक लॅब वाहन, बॉम्ब शोधक पथक वाहन, जेल कैदी पथक वाहन, ॲम्बुलन्स वाहन, अग्नीशमन वाहन, पत्रकार ‍दिपक चव्हाण यांचा मतदार जागृतीपर ‍चित्ररथ आदिंनी सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. खाडे हाती तिरंगा घेवून सहभागी झाले. या कार्यक्रमात पोतदार स्कूल सांगली, गुजराती हायस्कूल सांगली, सिटी हायस्कूल सांगली, क.भ. दामाणी हायस्कूल सांगली, सुंदराबाई दडगे हायस्कूल सांगली, आप्पासाहेब बिरनाळे स्कूल सांगली, प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला, रा.स. कन्या प्रशाला सांगली, नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम आणि ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला सांगली च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. 00000

संविधान स्तंभाचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. संविधान स्तंभ लोकार्पण समारंभास महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, जिल्हाज नियोजन अधिकारी सरीता यादव आदि मान्यवर उपस्थित होते. संविधान स्तंभ बनविण्यासाठी ५२५ किलो ब्राँझ मटेरियलचा वापर करण्यात आला असून स्तंभाच्या मॉडेलला कला संचालनालयाची मान्यता घेण्यात आली आहे. संविधान स्तंभाची उंची ५ फूट असून आणि व्यास अडीच फूटाचा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमानंतर मिरज येथील परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महापालिका आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 21 हजार वह्यांचे वितरण पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. 00000

मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 25 (जि.मा.का.) :- मतदार नोंदणी करण्यासाठी ऑनलाईल प्रणाली सुरु करण्यात आली आहे. मतदार नोंदणीसाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले आपल्या अँडरॉईड मोबाईलव्दारे घरबसल्या ऑनलाईन प्रणालीव्दारे मतदार नोंदणी करू शकतात. मतदार नोंदणीसाठी युवकांनी ऑनलाईन प्रणालीचा वापर करुन मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृतीसाठी स्टेशन चौक सांगली येथून सायकल रॅली व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी एम. बी. बोरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, सांगली अपर तहसिलदार डॉ. अर्चना पाटील, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदान करण्याचा हक्क मिळतो. मतदार नोंदणीसाठी आपल्या अँडरॉईड मोबाईलवर Voter Helpline App डाऊनलोड करून त्यावर फॉर्म नं. 6 भरून व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट केल्यानंतर आपणास आपोआप मतदार ओळखपत्र मिळते. तसेच nvsp.in या वेबसाईटवरही फॉर्म नं 6 भरून मतदार नोंदणी करू शकतो. या शिवाय प्रत्यक्ष तहसिल कार्यालयामध्ये जावूनही मतदार नोंदणी करता येते. जिल्ह्यात 18 ते 19 वर्षे वयोगटातील जवळपास 80 हजार युवक आहेत. यामधील फक्त 26 टक्के लोकांनी मतदार नोंदणी केलेली आहे. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी ती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. प्रारंभी मतदार जागृतीवर पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी उपस्थितांना मतदार दिनाची शपथ देवून सायकल रॅली व प्रभात फेरीस हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅली व प्रभात फेरीची सुरूवात करण्यात आली. सायकल रॅली स्टेशन चौकापासून राम मंदिर मार्गे पुष्कराज चौक ते परत स्टेशन चौक अशी काढण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक अपर तहसिलदार डॉ. अर्चना पाटील यांनी केले. या कार्यक्रमात एनसीसी व एनएसएस, स्काऊट गाईडचे विद्यार्थी, चंपाबेन वालचंद शहा, कस्तुरबाई वालचंद कॉलेज, गणपतराव आरवाडे हायस्कूल, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, कै. ग.रा. पुरोहित कन्या प्रशाला सांगली आदि शाळा महाविद्यालयातील विद्याथी, प्राध्यापक, शिक्षक, निवडणूक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. 000000

मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

कामगार मंडळाकडील क्रीडा सुविधांचा कामगार खेळाडूंनी लाभ घ्यावा - कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 24 (जि.मा.का.) : कामगार खेळाडूंना अधिक चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यास कामगार मंडळ प्राधान्य देत आहे. कामगार मंडळाच्या क्रीडा सुविधांचा लाभ कामगार खेळाडूंनी घ्यावा, असे आवाहन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय कामगार कब्बडी स्पर्धा मुंबई तेथे होत आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास सांगली येथून कामगार मंत्री डॉ. खाडे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली. निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले, जिल्हा सूचना अधिकारी यासीन सय्यद यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कबड्डी स्पर्धा उद्घाटन सोहळा समारंभासाठी मुंबई येथे आमदार कालिदास कोळंबकर, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिती वेद-सिंगल, अपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, कॅनरा बँकेचे मुख्य महाप्रबंधक पी. संतोष यांच्यासह मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे मान्यवर पदाधिकारी कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित होते. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना प्रथमतः शुभेच्छा दिल्या. कामगार मंत्री डॉ. खाडे म्हणाले, कामगारांचे जीवनमान उंचावावे त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी शिवणवर्ग, शिशु मंदिर, ग्रंथालय अभ्यासिका, व्यायामशाळा, टेबल टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, जलतरण तलाव अशा सुविधा पुरविण्यात येतात. याबरोबरच कामगार नाट्य स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा, भजन स्पर्धा, समर्गीत व स्फूर्ती गीत स्पर्धा, साहित्य संमेलन ही आयोजित केली जातात. या सर्व स्पर्धा व उपक्रमामुळे कामगारांच्या मध्ये आत्मविश्वास वाढतो. त्यांना नवीन ओळख मिळते, असे डॉ. खाडे म्हणाले. कामगार खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मंडळ नेहमीच पुढाकार घेते. कामगार मंडळामार्फत जुलै 2021 मध्ये महाकल्याण क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रबोधिनीतर्फे मागील वर्षी दोन वेळा अंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धा आणि दोन वेळा राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १ हजार १५६ खेळाडूंनी सहभाग घेतला. पाँडेचेरी येथे झालेल्या नॅशनल रँकिंग चॅम्पियनशिप-2021 स्पर्धेत महाकल्याण क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी टेबल टेनिस खेळात सुवर्ण आणि कास्य पदके मिळवली आहेत ही अभिमानाची बाब आहे. तसेच इंदोर व चितोडगड येथे आयोजित स्पर्धेत ही स्पर्धकांनी सुवर्ण रौप्य आणि कास्य पदकांची कमाई केली असल्याचे कामगार मंत्री डॉ. खाडे यावेळी म्हणाले. या राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेत 110 संघांनी सहभाग घेतला असून यामधे 60 संघ महिलांचे आहेत. स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे कामगार मंत्री डॉ. खाडे म्हणाले. आमदार कोळंबकर यांनी स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच आपणास या स्पर्धेच्या शुभारंभ कार्यक्रमास आमंत्रित केल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद दिले. खेळाडूंनी उचित ध्येय गाठण्यासाठी जिद्द सोडू नये, खेळत रहा, कौशल्य दाखवा, असे आवाहन कॅनरा बँकेचे मुख्य महाप्रबंधक पी. संतोष यांनी केले. कामगार विभागाने चांगल्या स्पर्धा आयोजित केल्या असल्याबद्दल कामगार विभागाचे त्यांनी अभिनंदन केले. ०००००

शनिवार, २१ जानेवारी, २०२३

शहीद जयसिंग भगत यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

शहीद जवान जयसिंग भगत अनंतात विलीन शहीद जवान भगत यांच्या पार्थिवावर पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण सांगली दि. 21 (जि.मा.का.) : सैन्य दलात सियाचीन येथे सेवा बजावत असताना सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर भगत शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज खानापूर येथे सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी तर चिफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्या वतीने सुभेदार मेजर समीर नालबंद यांनी शहीद जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. खानापूर ते गोरेवाडी रस्त्यावरील भगत मळा येथे शहीद जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैनिकी व पोलीस जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. यावेळी उपस्थित सर्वांनी साश्रू नयनांनी शहीद जयसिंग भगत यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, नगराध्यक्ष डॉ.उदयसिंह हजारे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी विटा संतोष भोर, तहसिलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, माजी आमदार सदाशिव पाटील तसेच खानापूर परिसरातील मान्यवर पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर भगत हे सियाचीन ग्लेशियर येथील फॉरवर्ड पोस्टवर युद्ध जन्य परिस्थितीत तैनात असताना अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे त्यांना १५ जानेवारी रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून कमांड हॉस्पिटल चंदीगड येथे विशेष हेलिकॉप्टरने आणण्यात आले होते. परंतु त्यांची 20 जानेवारी रोजी प्राणज्योत मावळली. त्यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणण्यात आले व पुढे ॲम्बुलन्सने त्यांच्या गावी खानापूर येथे आज 21 जानेवारी रोजी आणण्यात आले. खानापूर येथे शहिद जयसिंग भगत यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवून खानापूर शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली व सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खानापूर शहर अमर रहे…. अमर रहे ….. शहिद जयसिंग भगत अमर रहे … या घोषणांनी दुमदुमून गेले. अंत्यसंस्कारासाठी मराठा इंन्फट्री सेंटर बेळगाव येथून सुभेदार मेजर समीर नालबंद व 15 सैनिक आले होते. शहिद जयसिंग भगत यांच्या पश्चात पत्नी रूपाली, तीन मुली, एक मुलगा, वडील असे कुटुंबीय आहे. शहिद जयसिंग भगत यांच्या कुटुंबाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांत्वन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शहिद जवान जयसिंग भगत यांच्या कुटुंबाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले व धीर दिला. 00000

बुधवार, १८ जानेवारी, २०२३

राष्ट्रीय लोक अदालत 11 फेब्रुवारीला

सांगली दि. 18 (जि. मा. का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष तथा प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कि. नरडेले यांनी दिली. जिल्हा न्यायालय सांगली व सर्व तालुका न्यायालयात या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोक अदालतीमध्ये जिल्हा न्यायालय सांगली व सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, कौटुंबिक वादासंबंधीची, कामगार वादाची, भू-संपादनाची, मोटार अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक हिंसाचाराची, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम 138 खालील प्रकरणे, जिल्हा ग्राहक मंचासमोरील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणात बॅंक, दूरसंचार, वीज बिल, घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे ठेवता येणार आहेत. तरी पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून प्रकरणे तडजोडीने मिटविण्याबाबत लाभ घ्यावा ,असे आवाहनही श्री. नरडेले यांनी केले आहे. ००००००

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना गहू व तांदूळाचे मोफत वितरण

सांगली दि. 18 (जि. मा. का.) : अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना दि. 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत अनुज्ञेय असलेल्या गहू व तांदूळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत अंत्योदय अन्न योजनेचे 1 लाख 18 हजार 23 लाभार्थी व प्राधान्य कुटूंब योजनेचे 16 लाख 14 हजार 240 लाभार्थी अशा एकूण 17 लाख 32 हजार 263 पात्र लाभार्थ्यांना गहू 3769.1 मेट्रीक टन व 5602.1 मेट्रीक टन तांदूळ मोफत धान्य वाटपाचा लाभ मिळणार आहे. या धान्यापोटी लाभार्थ्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही, असेही श्री. बारकुल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 00000

जिल्हास्तरीय रोजगार मेळावा 25 जानेवारीला

सांगली दि. 18 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात पहिल्या प्लेसमेंट ड्राईव्हचे व जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन बुधवार दि. 25 जानेवारी 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली येथे करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात 65 पदांची भरती करण्यात येणार आहे, असे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी कळविले आहे. रोजगार मेळाव्यामध्ये सांगली जिल्ह्यातील वेस्टर्न प्रेसिकॉस्ट प्रा. लि., रोटाडाईन टुल्स प्रा लि., इत्यादी विविध नामवंत कंपन्यानी सहभाग नोंदवला असून यामध्ये वेस्टर्न प्रेसिकॉस्ट प्रा. लि., एमआयडीसी, कुपवाड यांनी इलेक्ट्रीशियन 10, मेंटनन्स 10, सुपरवायझर 10, हेल्पर 20 अशी एकूण 50 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार आयटीआय, डिप्लोमा आयटीआय - इलेक्ट्रीशियन, फिटर, डीएमई व हेल्पर पदासाठी इ. 10 वी व 12 वी पास असावा. तसेच रोटाडाईन प्रिसीजन इंजिनिअरींग प्रा. लि, एमआयडीसी मिरज यांनी प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोल 1, वेंडर डेव्हलपमेंट 1, क्वालिटी लाईन इन्स्पेक्टर 3, सी.एन.सी. ॲण्ड व्हीएमसी ॲण्ड ग्राईंडींग ऑपरेटर 10 अशी 15 पदे भरण्यात येणार असून या पदासाठी आयटीआय - सी.एन.सी. /व्हीएमसी, ग्राईंडर व डिप्लोमा, बी.ई. मेकॅनिकल व डीएमई, अशी शैक्षणीक पात्रता आहे. या जागेसाठी पात्र उमेदवारांनी hpps://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करुनच प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दि. 25 जानेवारी 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, विजयनगर, सांगली येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे. 00000

मंगळवार, १७ जानेवारी, २०२३

आंतरराष्ट्रीय पौष्टिक ‍तृणधान्य वर्ष : जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मान्यवरांचे अनोख्या पध्दतीने स्वागत

सांगली दि. 17 (जि. मा. का.) : सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक ‍तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. यानिमित्ताने कृषि विभागामार्फत प्रचार आणि प्रसिध्दी केली जात आहे. प्रचार आणि प्रसिध्दीचा एक भाग म्हणून नुकत्याच झालेल्या सांगली जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्री, खासदार आणि उपस्थित आमदार महोदयांना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याहस्ते पौष्टिक तृणधान्याचा लोगो असलेल्या बॅग मध्ये जत तालुक्यातील माडग्याळची देशी बाजरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, बाजरीची बिस्किटे, माडग्याची बोरे, गुळपोळी देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. मकर संक्रांती पूर्वी कृषी विभागाने हा एक वेगळ्या प्रकारचा वान सर्वांना दिला तसेच पौष्टीक तृणधान्याचे महत्व पटवून देण्याबाबत घोषवाक्य असलेले पोस्टर व मिलेट ऑफ मंथ संकल्पनेनुसार जानेवारी महिना बाजरी पिकासाठी समर्पित असून बाजरी पिकाच्या माहिती पत्रकाव्दारे पौष्टिक तृण धान्याचा प्रचार - प्रसिध्दी करण्यात आली. कृषि विभागाने केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कौतुक केले. 00000

पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण जाहीर

सांगली दि. 17 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील 10 पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे - पंचायत समिती मिरज - अनुसूचित जाती (महिला), पंचायत समिती शिराळा व पंचायत समिती खानापूर-विटा - नागरिकांचा मागास प्रवर्ग, पंचायत समिती पलूस - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), पंचायत समिती कवठेमहांकाळ, कडेगाव आणि तासगाव - सर्वसाधारण (महिला) आणि आटपाडी, जत, वाळवा या पंचायत समित्यांचे सभापती पद सर्वसाधारण गटासाठी सोडतीव्दारे आरक्षित करण्यात आले. ‍ कु. बिंदू बसवराज हंडगी या बालिकेच्या हस्ते ‍चिठ्ठ्या उचलून आरक्षण सोडत काढण्यात आली. 00000

म्हैसाळ योजनेचे 20 जानेवारी पासून आवर्तन सुरू करा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 17 (जि. मा. का.) : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पिकांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी म्हैसाळ योजनेतून दि. 20 जानेवारी 2023 पासून पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिल्या. म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता श्री. रासनकर उपस्थित होते. म्हैसाळ योजनेतून पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी प्राप्त झाली असल्याचे जलसंपदा विभागामार्फत सांगण्यात आले. जे लाभार्थी शेतकरी थकीत पाणीपट्टी व चालू आवर्तनाकरीता आगाऊ पाणीपट्टी भरतील अशा शेतकऱ्यांना योजना चालू झाल्यानंतर प्रथम प्राधान्याने पाणी देण्यात येईल. तरी योजना चालू करण्याकरीता लाभक्षेत्रातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पाणी मागणी अर्ज व पाणीपट्टी भरून सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा ‍विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर मांजाच्या निर्मिती, विक्री व वापरास मनाई

सांगली दि. 13 (जि. मा. का.) : मकर संक्रांत सण दि. 14 जानेवारी 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. या सणावेळी पतंग उडविले जातात. पतंग उडविण्याकरीता नायलॉन मांजाचा वापर केला जातो. नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविल्याने वन्य पशु, पक्ष्यांच्या जीवीतास धोका होत असल्यामुळे जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री आणि वापरास मनाई केली आहे. हा आदेश दि. 14 जानेवारी 2023 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 15 जानेवारी 2023 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 साठी 416 कोटी 64 लाखाच्या प्रारूप आराखड्यास मान्यता - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी मार्च पूर्वी खर्च करा सांगली दि. 13 (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 साठी 416 कोटी 64 लाखाच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तर सन 2022-23 मधील मंजूर नियतव्यय यंत्रणांनी 31 मार्च पूर्वी शंभर टक्के खर्च करावा, असे निर्देश कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाली. यावेळी खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाज कल्याण सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांच्यासह कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 प्रारूप आराखडा (सर्वसाधारण) करीता 331 कोटी 82 लाख रूपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरिता 83 कोटी 81 लाख रूपये व आदिवासी घटक कार्यक्रमाकरीता 1 कोटी 1 लाख रूपये असे एकूण 416 कोटी 64 लाख रूपये नियतव्ययाची मर्यादा शासनाकडून देण्यात आली होती. त्यानुसार एकूण 416 कोटी 64 लाख रूपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. दि. 28 जानेवारी 2023 रोजी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत जिल्ह्यासाठी 112 कोटी 84 लाख रूपये इतक्या वाढीव निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी बैठकीत सांगितले. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, सन २०२३-२४ च्या प्रारूप आराखड्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी ३६ कोटी, कोरोना उद्भवल्यास त्यावरील खर्च भागविण्यासाठी ३० कोटी आणि लम्पी चर्मरोग औषधोपचारासाठी 2 कोटीचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. प्रारूप आराखड्यातील निधी जिल्ह्यातील सर्व कार्यान्वीत यंत्रणांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 (सर्वसाधारण) करीता 364 कोटी रूपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरीता 83 कोटी 81 लाख रूपये व आदिवासी घटक कार्यक्रमाकरीता 1 कोटी 1 लाख रूपये असे एकूण 448 कोटी 82 लाख रूपये नियतव्यय मंजूर आहे. माहे डिसेंबर 2022 अखेर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मध्ये शासनाकडून एकूण 255 कोटी 28 लाख रूपये इतका निधी प्राप्त झाला आहे. यामधील 51 कोटी 72 लाख रूपये इतका निधी खर्च झाला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त झालेला संपूर्ण निधी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च करण्यासाठी यंत्रणांनी नियोजन करावे, असे निर्देश कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या. याबाबत पालकमंत्री डॉ. खाडे यांनी लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचना आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेली निवेदने यावर यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या. वन विभागाकडील रस्त्याच्या कामाबाबत पालकमंत्री महोदयांनी एक विशेष बैठक घ्यावी अशी मागणी आमदार महोदयांनी केली. याबाबत येत्या सोमवारी बैठक घेतली जाईल, असे पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले. या बैठकीस वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित राहतील असेही ते म्हणाले. ग्रामीण भागात विषारी सर्प दंश रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास या रुग्णांवरील उपचारासाठी शासकीय रुग्णालयाकडून औषधे पुरविण्याबाबत चर्चा होवून राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी जी अतिक्रमणे झाली आहेत ती संबंधित विभागानी तातडीने काढून घ्यावीत, असे निर्देश पालकमंत्री डॉ. खाडे यानी बैठकीत दिले. तसेच आटपाडी नगरपंचायत झाल्यानंतर शेंडगेवाडी गावाबाबत शासन निर्णय होईपर्यंत या गावातील ग्रामस्थांना हवे असणारे सर्व प्रकारचे दाखले बनपुरी ग्रामपंचायतीमार्फत दिले जावेत, असे आदेश पालकमंत्री डॉ. खाडे यांनी संबंधीत यंत्रणांना दिले. शासकीय वसतिगृहातील मुलांना तातडीने अनुदान मिळावे यासाठी समाज कल्याण विभागाने येत्या आठ दिवसात निधी वर्ग करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यात 39 कोटी 65 लाख रूपये रक्कमेची एकूण 50 स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र करण्यास तसेच 500 स्मार्ट अंगणवाडी करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, मिरज मेडीकल कॉलेज करीता MRI मशीन खरेदी करण्यासाठी 16 कोटी रूपये रकमेस मान्यता देण्यात आली आहे. मिरज मेडिकल कॉलेज येथे 600 कि. वॅट क्षमतेचे पारेषण संलग्न सौर प्रकल्प आस्थापित करण्यासाठी 3 कोटी 81 लाख रूपये रकमेच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. लम्पी आजारावर प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी 1 कोटी 86 लाख रूपये रकमेच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या जलनि:सारण विभागाकरीता अत्याधुनिक पध्दतीचा मॅन होल मधील गाळ काढण्यासाठी प्रायोगिक तत्वावर रोबोट खरेदी करण्यासाठी 40 लाख रूपये रकमेच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले. 00000

अमृत महाआवास अभियानातील पुरस्काराचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते वितरण

सांगली दि. 13 (जि. मा. का.) : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात आलेल्या अमृत महाआवास अभियान ग्रामीण 2021-22 पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात कामगार मंत्री आणि पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते करण्यात आले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, प्रकल्प संचालक दिपक चव्हाण यांच्यासह गटविकास अधिकारी व पुरस्कार विजेते उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक कवठेमहांकाळ तालुका, द्वितीय क्रमांक खानापूर तालुका, तृतीय क्रमांक आटपाडी तालुका यांना वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक खानापूर तालुक्यातील हिवरे ग्रामपंचायत, द्वितीय क्रमांक शिराळा तालुक्यातील पाडळेवाडी ग्रामपंचायत, तृतीय क्रमांक शिराळा तालुक्यातील येळापुर ग्रामपंचायत यांना वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कारामध्ये खानापूर तालुक्यातील लेंगरे जिल्हा परिषद गट, द्वितीय क्रमांक मिरज तालुक्यातील आरग जिल्हा परिषद गट, तृतीय क्रमांक वाळवा तालुक्यातील चिकुर्डे जिल्हा परिषद गट यांना वितरित करण्यात आला. राज्य पुरस्कृत योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक शिराळा तालुका, द्वितीय क्रमांक खानापुर व कवठेमहांकाळ यांना विभागून व तृतीय क्रमांक पलुस तालुका यांना वितरित करण्यात आला. ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव, द्वितीय क्रमांक कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी, तृतीय क्रमांक खानापुर तालुक्यातील आळसंद यांना वितरित करण्यात आला. ग्रामीण सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्करामध्ये प्रथम क्रमांक खानापुर तालक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गट, द्वितीय क्रमांक शिराळा तालुक्यातील मांगले जिल्हा परिषद गट, तृतीय क्रमांक वाळवा तालुक्यातील वाटेगाव जिल्हा परिषद गट यांना वितरित करण्यात आले. 00000

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील पालकमंत्री कार्यालयाचे शेतकऱ्याच्या हस्ते उद्घाटन

सांगली दि. 13 (जि. मा. का.) : मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये नुतनीकरण झालेल्या पालकमंत्री सांगली जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत करोली चे शेतकरी जगन्नाथ पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंचल दलाल, माजी आमदार विलासराव जगताप व पृथ्वीराज देशमुख यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. ०००००

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक : उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 13 (जि. मा. का.) : ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या ज्या उमेदवारांनी अद्यापी खर्चाचा हिशोब सादर केलेला नाही, अशा उमेदवारांनी 20 जानेवारी 2023 पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसीलदार कार्यालयात विहित नमुना तसेच प्रतिज्ञा पत्रासह खर्चाचा हिशोब सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 14 (ब) 1 नुसार निवडणुकीचा निकाल लागल्यापासून 30 दिवसाच्या आत उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या ४४७ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक लढवलेल्या 10 हजार 107 उमेदवारांपैकी 2 हजार 907 उमेदवारांनी खर्चाचा हिशेब सादर केलेला आहे. उर्वरित 7 हजार 200 उमेदवारांनी अध्यापी खर्चाचा हिशोब सादर केलेला नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 14 (ब) नुसार विहित मुदतीत खर्चाचा हिशोब सादर न केल्यास उमेदवारांना निवडणूक लढविण्यास निरर्ह करण्याची तरतूद आहे. खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्यात येणार असल्याने, ज्या उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे तसेच ज्यांची बिनविरोध निवड झाली आहे, अशा सर्व उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब तातडीने सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. 000000

बुधवार, ११ जानेवारी, २०२३

तृणधान्य आरोग्यास हितकारक; तृणधान्य वापरासाठी प्रत्येकाने योगदान देऊया - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 11 (जि.मा.का.) :- आहारात तृणधान्याचा वापर वाढविणे आरोग्यासाठी हितकारक आहे. तृणधान्ये आरोग्यदायी असल्याने आहारात मोठ्या प्रमाणात वापर होणे आवश्यक असून यासाठी कृषी विभागाने व्यापक जनजागृती मोहीम राबवावी. तसेच तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देऊया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने कृषी विभागामार्फत मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, तृणधान्याचा वापर वाढविण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले पाहिजे. यासाठी तृणधान्यापासून वेगवेगळे पदार्थ बनविण्याची रेसीपी लोकांपर्यंत पोहचविली पाहिजे. तृणधान्यापासून विविध प्रकार बनविण्याचे तंत्र विकसित असून ते लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. हे तंत्र/ रेसीपी लोकांपर्यंत पोहचविल्यास आहारात तृणधान्याचा वापर वाढेल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. सांगली जिल्हा प्रोसेसिंग व मायक्रो फुड प्रोसेसिंगमध्ये अग्रेसर असून तृणधान्यावरील प्रोसेसिंगमध्ये याचा उपयोग करून ग्राहकाला हवे ते उपलब्ध करुन देण्यात यावे. यामध्ये जिल्ह्यातील महिला बचत गटांचे योगदान महत्वाचे राहणार आहे. तृणधान्यापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांच्या चव व गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रीत करुन लोकांना तृणधान्याचे पदार्थ वापरण्यास प्रवृत्त करावे. शासकीय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमातही तृणधान्याचे पदार्थ देण्याचा वापर वाढवावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी बोलताना केली. ‍ प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी प्रास्ताविकात आहारात तृणधान्याचे महत्व सांगून पौष्टिक तृणधान्य हा कार्यक्रम जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबवून तृणधान्य वापराबाबत जनजागृती केली जाईल, असे सांगितले. कार्यक्रमात ज्वारी व बाजरी पिकाचे उत्पन्न वाढीसाठी योगदान देणाऱ्या कृषी सहाय्यकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ०००००

सांगली जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

सांगली दि. 11 (जि.मा.का.) :- सांगली जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बुधवार, 30 ऑगस्ट 2023 रोजी रक्षाबंधन, सोमवार, 13 नोव्हेंबर 2023 रोजी दर्श सोमवती अमावस्या आणि मंगळवार, 26 डिसेंबर 2023 रोजी श्री दत्तात्रेय जयंती या तीन दिवसासाठी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. ०००००

मुख्य् निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणुका नि:पक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक कार्यालयाची जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडत असताना प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे निवडणूक आयोगाला सहकार्य लाभत असते. हे लक्षात घेऊन यंदापासून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार जाहीर केले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. पत्रकार आणि स्वयंसेवी संस्था या पुरस्कारासाठी स्वत: अर्ज करू शकतात. त्याकरता मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी गेल्या वर्षभरातील आपल्या कार्याची अहवाल स्वरूप माहिती आणि छायाचित्रांसह अर्ज democracybook2022@gmail.com या ई मेल आयडीवर अर्ज पाठवावा. अधिक माहितीसाठी प्रणव सलगरकर (मो.क्र. 8669058325) वर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी माहितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी 'निवडणूक वार्तांकन पुरस्कार' दिला जाणार आहे. तर मतदार जागृतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 'मतदार-मित्र पुरस्कार' दिला जाणार आहे. 10 हजार रूपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. हे पुरस्कार 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात वितरित केले जातील, असे प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. 00000

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 16 जानेवारीला

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 16 जानेवारीला सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे जानेवारी 2023 या महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन दि. 16 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित केला असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी दिली. 00000

शालेय राज्यस्तरीय मल्लखांब क्रीडा स्पगर्धा मिरज येथे

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हाा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हाय क्रीडा परिषद सांगली यांच्या विद्यमाने व सांगली जिल्हा अमॅच्युअर मल्लखांब असोसिएशन, सांगली आणि मातोश्री तानुबाई दगडू खाडे, इंग्लिश स्कूल, मिरज यांचे सहकार्याने आयोजीत शालेय राज्यस्तर मल्लखांब क्रीडा स्पपर्धा (14, 17, 19 वर्षे मुले/मुली) चे आयोजन दिनांक 11 ते 13 जानेवारी, 2023 या कालावधीत मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल, साईनंदन कॉलनी, मिरज येथे होत आहेत. या स्पर्धेमध्ये मुलांसाठी पुरलेला मल्लखांब व मुलींसाठी दोरिचा मल्लखांब या प्रकारात स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती जिल्हाॅ क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी दिली. या स्पार्धेसाठी महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे व यजमान कोल्हापूर विभागातील विविध जिल्ह्यातून 200 ते 250 खेळाडू मुले/ मुली व पंच, व्यजवस्थाापक सहभागी आहेत. मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल, मिरज मध्ये विद्युत झोकातील सुसज्य अशा पेंडॉलमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेचे नियोजन करण्यात आलेले आहे. सहभागी खेळाडू व संघव्यवस्थापक क्रीडा मार्गदर्शक यांची निवासाची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकूल, सांगली येथील वसतिगृहामध्ये करण्यात आलेली आहे. तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत नियुक्त केलेले निरिक्षक, पदाधिकारी व पंच यांची निवासाची व्यवस्था मिरज येथे करण्यात आली आहे. सहभागी खेळाडू, संघव्यवस्थापक, निरिक्षक, पदाधिकारी व पंच यांची भोजनाची व्यवस्था ही जिल्हा क्रीडा संकूल, सांगली येथे करण्यात आलेली आहे. या स्परर्धेचा उद्घाटन समारंभ दि. 12 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. 00000

चारचाकी वाहनांकरिता नविन मालिका सोमवार पासून सुरू

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली करीता नव्याने नोंदणी होणाऱ्या चारचाकी वाहनांकरिता एम एच 10 ई ए ही नवीन मालिका सोमवार, दि. 16 जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली. एम एच 10 ई ए या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनांकरीता आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या ठिकाणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या 5(अ) मध्ये विहीत केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत - आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत, ई-मेल आयडी आवश्यक आहे. पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन 4.0 या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहीत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास दि. 17 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेची डीडी जो अर्जदार सादर करेल त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

कनोईंग व कयाकिंग स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यरांच्या हस्ते गौरव

सांगली दि. 11 (जि.मा.का.) :- महाराष्ट्रय शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व्दारा आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक कनोईंग व कयाकिंग स्पर्धा सन 2022-23 च्या आयोजनाची जबाबदारी सांगली जिल्ह्याकडे सोपविण्यात आलेली आहे. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य असो. फॉर कनोईंग व कयाकिंग आणि सांगली जिल्हा असो. फ़ॉर कनोईंग व कयाकिंग या संघटनांच्या समन्वयाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने दि. 8 ते 11 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये सांगली मधील रॉयल कृष्णा बोट क्लब, कृष्णा नदी पात्र श्री स्वामी समर्थ घाट, वसंतदादा स्मारक शेजारी, सांगली या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना तहसिलदार दगडू कुंभार, माजी आमदार दिनकर पाटील, डॉ. बी. डी. वनार, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, प्रताप जामदार, दत्ता पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते मेडल्स देऊन गौरविण्यात आले. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा असो. फ़ॉर कनो. कयाकिंग, राज्य असो. फ़ॉर कनो. कयाकिंग यांनी प्रयत्न केले. त्यांना सांगली जिल्हा प्रशासन, सांगली-मिरज-कुपवाड महानगरलिका, जलसंपदा व पाटबंधारे विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, महानगरपालिका अग्निशमन दल, आपदा मीत्र तसेच महापुराच्या प्रसंगी आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करणारे बोटक्लब व जवान यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 00000

दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साधने; मोजमाप शिबीरात 6 हजारावर साहित्याची नोंद

सांगली दि. 11 (जि.मा.का.) :- दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित केलेल्या मोजमाप शिबीरामध्ये 3 हजार 482 दिव्यांगांनी 6 हजार 464 साहित्याची नोंदणी केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांनी दिली. जिल्ह्यात 28 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 या कालावधीत दिव्यांगांना मोफत अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोजमाप शिबीर तालुकास्तरावर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये शिराळा तालुक्यात 296 लाभार्थ्यांनी 541 साहित्याची नोंद केली. वाळवा तालुक्यात 356 लाभार्थ्यांनी 644 साहित्याची नोंद, पलूस तालुक्यात 343 लाभार्थ्यांनी 622 साहित्याची नोंद, महापालिका क्षेत्रात 237 लाभार्थ्यांनी 451 साहित्याची नोंद, मिरज ग्रामीणमध्ये 390 लाभार्थ्यांनी 713 साहित्याची नोंद, कवठेमहांकाळ तालुक्यात 450 लाभार्थ्यांनी 836 साहित्याची नोंद, जत तालुक्यात 205 लाभार्थ्यांनी 401 साहित्याची नोंद, आटपाडी तालुक्यात 191 लाभार्थ्यांनी 360 साहित्याची नोंद, तासगाव तालुक्यात 451 लाभार्थ्यांनी 813 साहित्याची नोंद, खानापूर-विटा तालुक्यात 344 लाभार्थ्यांनी 665 साहित्याची नोंद आणि कडेगाव तालुक्यात 219 लाभार्थ्यांनी 418 साहित्याची नोंद केली आहे. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयामार्फत ADIP योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तींना देण्याच्या अनुषंगाने भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने उपलब्ध करून देण्यासाठी मोजमाप शिबीराचे आयोजन केले. या कामासाठी खासदार संजय पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी एलिम्को संस्थेशी समन्वय साधून दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. 00000

मंगळवार, १० जानेवारी, २०२३

मकर संक्रांती-भोगी दिवस पौष्टिक तृणधान्य दिन उत्साहाने साजरा करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

सांगली दि. 10 (जि.मा.का.) : संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मकर संक्रांती-भोगी हा दिवस राज्यामध्ये “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे. सर्व सामान्य लोकांपर्यंत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे काय आहेत याबरोबरच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत “मकर संक्रांती-भोगी” हा सणाचा दिवस दरवर्षी राज्यामध्ये “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करण्याबाबत सूचित केले आहे. या दिनाचे औचित्य साधून प्रत्येक कृषि सहाय्यक गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देण्यासाठी प्रगतीशील शेतकरी, आहार तज्ज्ञ, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे कृषि विभागाकडून कळविण्यात आले आहे. 00000

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत 31 जानेवारी पर्यंत

सांगली दि. 10 (जि.मा.का.) : जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 2023 इयत्ता 6 वी साठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ www.navodaya.gov.in व https://navodaya.gov.in.nvs/en/Admission वर संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय पलूस चे प्राचार्य सुनिलकुमार नल्लाथ यांनी केले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना ते इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून योग्यरीत्या भरलेले प्रमाणपत्र ज्यावर स्वत:चे अलीकडील काळात काढलेले छायाचित्र, विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, पालकांची स्वाक्षरी आणि मुख्याध्यापकाकडून प्रतिहस्ताक्षरीत केलेले प्रमाणपत्र (jpg स्वरूपात 10kb - 100 kb प्रमाणात) ऑनलाईन अपलोड करावयाचे आहे. त्याचबरोबर आधार कार्ड / रेशनकार्ड असणे गरजेचे आहे. प्रवेश परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत 31 जानेवारी पर्यंत असून प्रवेश परीक्षा 29 एप्रिल 2023 रोजी असल्याचे प्राचार्य श्री नल्लाथ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

सोमवार, ९ जानेवारी, २०२३

जिल्हा नियोजन समितीची सभा 13 जानेवारीस

सांगली दि. 9 (जि.मा.का.) :- जिल्हा नियोजन समितीची सभा कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, 13 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात होणाऱ्या या बैठकीत 14 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत व त्यावरील कार्यवाहीच्या अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2022-2023 (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी घटक कार्यक्रम) कार्यक्रमांतर्गत माहे डिसेंबर 2022 अखेरच्या खर्चाचा आढावा घेणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2023-2024 (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी घटक कार्यक्रम) कार्यक्रमाच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देणे, आणि अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेस येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे, अशी या सभेची विषयसूची आहे. 000000

पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत 17 जानेवारीला

सांगली दि. 9 (जि.मा.का.) :- जिल्ह्यातील 10 पंचायत समिती सभापती आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 17 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास ज्यांना उपस्थित रहावयाचे आहे त्यांनी विहित वेळेत उपस्थित्त रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. आरक्षण काढण्यासाठी ग्राम विकास विभाग, मुंबई यांचेकडील अधिसूचना दिनांक 4 ऑक्टोबर 2022 अन्वषये शासकीय अधिसूचना लगत अनुसूचीमध्ये, अनुसुचित जाती, अनुसूचीत जाती महिला, अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, सर्वसाधारण प्रवर्गासाठी, सर्वसाधारण महिलासाठी राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांची संख्या ठरवून दिलेली आहे. तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती व उप सभापती) (पदांचे आरक्षण व निवडणूक) नियम, 1962 मधील नियम 2 फ यातील तरतुदीनुसार पंचायत समिती सभापतीच्या आरक्षणासंदर्भात करावयाची कार्यवाही नमूद करण्यात आलेली आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. 00000
सांगलीत कनोईंग व कयाकिंगच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यकती सर्व मदत करणार - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील कनोईंग व कयाकिंग स्पर्धा सांगलीत सुरु सांगली दि. 9 (जि.मा.का.) : कनोईंग व कयाकिंग या क्रीडा प्रकारासाठी सांगली येथे उत्तम दर्जाची सोय होण्याबरोबर खेळाडूंना चांगले मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. यासाठी सांगली येथे कनोईंग व कयाकिंग या क्रीडा प्रकारासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र होण्यासाठी शासनस्तरावरुन आवश्यकती सर्व मदत व पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनद्वारा शिवछत्रपती क्रीडापीठ, बालेवाडी पुणे येथे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा- 2022-2023 आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील कनोईंग व कयाकिंग स्पर्धा सांगली येथे होत असून या स्पर्धेचे उद्घाटन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, माजी आमदार दिनकर पाटील, भारतीय कनोईंग व कयाकिंग फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी डॉ. भगवानसिंग वनोरे, महाराष्ट्र असो. फॉर कनोईंग कयाकिंगचे अध्यक्ष समीर मुणगेर, टेक्निकल ऑफिसर पी. रामकृष्णन, हेमंत पाटील यांच्यासह स्पर्धेत सहभागी खेळाडू, मार्गदर्शक व क्रीडा प्रेमी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. खाडे म्हणाले, राज्यातील खेळाडूंना आपला खेळ दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करता यावा, ऑलिम्पिकमध्ये राज्याच्या खेळाडूंनी प्रतिनिधीत्व करावे यासाठी अशा क्रीडा स्पर्धा महत्वाच्या आहेत. महाराष्ट्र राज्याने खेळाडूंना अधिक चांगल्या प्रकारे सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतून उत्तोमोत्तम खेळाडू घडतील, असा विश्वास पालकमंत्री श्री. खाडे यांनी व्यक्त करुन स्पर्धेतील खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या श्री. वनोर म्हणाले, महाराष्ट्र राज्याने खेळाडूंसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करुन क्रीडा विश्वात एक नवीन पायंडा सुरु केला आहे. या स्पर्धेतून अनेक खेळाडू तयार होऊन ते देश व आंतराष्ट्रीय पातळीवर आपला वेगळा ठसा निर्माण करतील. महाराष्ट्र राज्याने सुरु केलेल्या या स्पर्धेचे देशातील अन्य राज्यांनी अनुकरण करणे आवश्यक आहे. सांगलीत कृष्णा नदीमध्ये कनोईंग व कयाकिंग स्पर्धेसाठी पोषक वातावरण आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र सुरु होणे गरजचे आहे. महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याबाबत पुढाकार घेतल्यास भारतीय कनोईंग व कयाकिंग फेडरेशन आवश्यक मदत करेल, असा विश्वास त्यांनी दिला. तसेच खेळ व क्रीडाच्या विकासासाठी प्रत्येक गावात क्रीडा महाकुंभ व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जल स्पर्धेसाठी सांगली येथील कृष्णा नदीचे पात्र चांगले आहे. अशा स्पर्धेतून जिल्ह्यात या क्रीडा प्रकारचा विकास होईल, अशी अपेक्षा माजी आमदार दिनकर पाटील व्यक्त केली. जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून स्पर्धेची सविस्तर माहिती दिली. खेळाडूंना अधिक संधी व प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासनाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंना सर्व सुविधा पुरविण्यात येत असून कमी वेळेत स्पर्धेची तयारी केल्याचे त्यांनी सांगितले. कनोईंग व कयाकिंग या दोन्ही जलक्रीडा स्पर्धा 1000 मीटर, 500 मीटर आणि 200 मीटर इतक्या अंतराच्या होणार आहेत. दोन्ही प्रकारामध्ये सिंगल, डबल आणि फोर या प्रकारात मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत राज्यातील खेळाडूंची निवड होऊन 77 मुले व 33 मुली स्पर्धेसाठी पात्र ठरली आहेत. 27 व्यवस्थापक व मार्गदर्शक आणि 35 अधिकारी आणि पंच स्पर्धेचे कामकाज पाहणार असल्याचे श्री. वाघमारे यांनी यावेळी सांगितले. 00000

शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 जानेवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सांगली दि. 6 (जि.मा.का.) :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मुलीच्या सामुहिक विवाहासाठी शुभ मंगल सामुहिक विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता सांगली जिल्ह्यातील गरीब शेतकरी, शेतमजूर यांनी मुलीच्या विवाहाकरीता व इच्छुक संस्थानी त्यांचे प्रस्ताव तालुकास्तरीय अभय केंद्र ( संरक्षण अधिकारी ) कार्यालय पंचायत समिती येथे 31 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले आहे. या योजनांतर्गत शेतकरी / शेतमजूर कुटूंबातील मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसुत्र व इतर वस्तूची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपी दहा हजार रूपये एवढे अनुदान वधूच्या आईच्या नावाने देण्यात येते व सामुहीक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेस प्रती विवाह दोन हजार रूपये एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचे आयोजन, विवाह समारंभाचा खर्च भागविण्यासाठी देण्यात येते. तसेच या योजनेंतर्गत विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत पध्दतीने विवाह करणाऱ्या शेतकरी / शेतमजूर कुटूंबातील तसेच विधवा महिलेच्या मुलीच्या विवाहसाठी प्रती जोडपी दहा हजार रूपये एवढे अनुदान वधूच्या आईच्या नावाने देण्यात येते. या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे - योजनेचा लाभ शेतकरी व शेतमजूर कुटूंबातील मुलीच्या विवाहासाठी राहील. वधू ही महाराष्ट्रातील संबधित जिल्ह्याची स्थानिक अधिवासी असावी. विवाह सोहळ्याचे दिनांकास वराचे वय 21 वर्ष व वधूचे वय 18 वर्ष यापेक्षा कमी असू नये. तलाठी / तहसिलदार यांनी दिलेला 1 लाखाच्या आतील वार्षिक उत्पन्नाचा दाखला. या योजनेंतर्गत जे जोडपे सामुहिक विवाह सोहळ्यात सामील न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयामध्ये जावून विवाह करतील त्यांनाही रूपये दहा हजार देण्यात येईल. वधू विधवा किंवा घटस्फोटात असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी अनुज्ञेय राहील. वधू व वर यांनी विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. स्वयंसेवी संस्थेमार्फत आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्याच्या किमान एक महिना अगोदर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, सांगली यांचे कार्यालयास अर्जासह सर्व एकत्रित दाखले सादर करावेत. या योजनेअंतर्गत अनुदानासाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दांपत्ये पात्र राहणार नाही. कारण, त्यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वतंत्र योजना राबविण्यात येत असल्याचे श्रीमती पवार यांनी सांगितले. 00000

रोजगार मेळावा मिरज येथे 12 जानेवारीला

सांगली दि. 6 (जि.मा.का.) :- बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून रोजगार मेळाव्याचे ऑफलाईन आयोजन गुरूवार, दि. 12 जानेवारी 2023 रोजी प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, श्री सिध्दीविनायक गणपती कॅन्सर हॉस्पीटलच्या समोर, सांगली मिरज रोड, मिरज येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी समक्ष उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. या मेळाव्यामध्ये नियमीत एकूण 200 पदे भरण्यात येणार असून यामध्ये सांगली जिल्ह्यातील वेस्टर्न प्रसिकॉस्ट प्रा. लि., कामधेनू ॲग्रोवेट, रोटाडाईन टुल्स प्रा.लि, सह्याद्री मोटार्स प्रा.लि. सांगली, विजय टेक्नो इंडस्ट्रीज तसेच फडके इंजिनिअरींग प्रा. लि. मिरज इत्यादी विविध नामवंत कंपन्यानी सहभाग नोंदवला आहे. एएससी, एचएससी, बीएस्.सी , ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रुज्युएट, आयटीआय, डिप्लोमा, बीई इत्यादी शैक्षणिक पात्रतेची पदे भरण्यात येणार असून असून उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अप्लॉय करावे, असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे. 000000

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 जानेवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सांगली दि. 6 (जि.मा.का.) :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मुलीच्या सामुहिक विवाहासाठी शुभ मंगल सामुहिक विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता सांगली जिल्ह्यातील गरीब शेतकरी, शेतमजूर यांनी मुलीच्या विवाहाकरीता व इच्छुक संस्थानी त्यांचे प्रस्ताव तालुकास्तरीय अभय केंद्र ( संरक्षण अधिकारी ) कार्यालय पंचायत समिती येथे 31 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले आहे. या योजनांतर्गत शेतकरी / शेतमजूर कुटूंबातील मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसुत्र व इतर वस्तूची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपी दहा हजार रूपये एवढे अनुदान वधूच्या आईच्या नावाने देण्यात येते व सामुहीक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेस प्रती विवाह दोन हजार रूपये एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचे आयोजन, विवाह समारंभाचा खर्च भागविण्यासाठी देण्यात येते. तसेच या योजनेंतर्गत विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत पध्दतीने विवाह करणाऱ्या शेतकरी / शेतमजूर कुटूंबातील तसेच विधवा महिलेच्या मुलीच्या विवाहसाठी प्रती जोडपी दहा हजार रूपये एवढे अनुदान वधूच्या आईच्या नावाने देण्यात येते. या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे - योजनेचा लाभ शेतकरी व शेतमजूर कुटूंबातील मुलीच्या विवाहासाठी राहील. वधू ही महाराष्ट्रातील संबधित जिल्ह्याची स्थानिक अधिवासी असावी. विवाह सोहळ्याचे दिनांकास वराचे वय 21 वर्ष व वधूचे वय 18 वर्ष यापेक्षा कमी असू नये. तलाठी / तहसिलदार यांनी दिलेला 1 लाखाच्या आतील वार्षिक उत्पन्नाचा दाखला. या योजनेंतर्गत जे जोडपे सामुहिक विवाह सोहळ्यात सामील न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयामध्ये जावून विवाह करतील त्यांनाही रूपये दहा हजार देण्यात येईल. वधू विधवा किंवा घटस्फोटात असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी अनुज्ञेय राहील. वधू व वर यांनी विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. स्वयंसेवी संस्थेमार्फत आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्याच्या किमान एक महिना अगोदर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, सांगली यांचे कार्यालयास अर्जासह सर्व एकत्रित दाखले सादर करावेत. या योजनेअंतर्गत अनुदानासाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दांपत्ये पात्र राहणार नाही. कारण, त्यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वतंत्र योजना राबविण्यात येत असल्याचे श्रीमती पवार यांनी सांगितले. 00000

कनोईंग व कयाकिंग खेळाच्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सांगलीत होणार स्पर्धेचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते उद्घाटन

सांगली दि. 6 (जि.मा.का.) :- महाराष्ट्र राज्य असो. फॉर कनोईंग व कयाकिंग आणि सांगली जिल्हा असो. फ़ॉर कनोईंग व कयाकिंग या संघटनांच्या समन्वयाने सांगली येथे दि. 8 ते 11 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये सांगली मधील रॉयल कृष्णा बोट क्लब, कृष्णा नदी पात्र श्री. स्वामी समर्थ घाट, वसंतदादा स्मारक शेजारी, सांगली या ठिकाणी कनोईंग व कयाकिंग या खेळाच्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन दि. 9 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते व मान्यवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेचा समारोप दि. 10 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा चे आयोजन दि. 2 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये विविध 39 क्रीडा प्रकारांमध्ये, शिवछत्रपती क्रीडापीठ, पुणे, तसेच पुणे जिल्ह्यामध्ये बारामती, ए.एस. आय. घोरपडी, पुना क्लब येथे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच राज्यातील नाशिक, नागपुर, जळगांव, मुंबई अमरावती, औरंगाबाद व सांगली या जिल्ह्यांमध्ये क्रीडा स्पर्धा सपंन्न होणार आहेत. या स्पर्धा कनोईंग व कयाकींग या दोन्ही जलक्रीडा प्रकारात 1000 मि. 500मि. आणि 200 मि. अंतरामध्ये व सांघीक आणि वैयक्तीक प्रकारात संपन्न होणार आहेत. या सर्व स्पर्धा कृष्णा नदीवरील बायपास पुलापासून सुरु होऊन आयर्वीन पुलाजवळ शेवट होणार आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंची निवड चाचणी घेऊन पात्र ठरलेले सुमारे 77 मुले आणि 33 मुली या सोबत 27 व्यवस्थापक व मार्गदर्शक, 35 अधिकारी आणि पंच अशा एकुण 172 व्यक्ती सहभागी होणार आहेत. तसेच स्थानिक स्तरावर सुमारे 100 लोकांचे मनुष्यबळ या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच व इतर अधिकारी यांची निवास व भोजन व्यवस्था शहरातील विविध हॉटेल्स मध्ये करण्यात येत असून यासाठी राज्यस्तरावरुन पुरवठादार यंत्रणा निश्चित केलेल्या आहेत. स्पर्धा दिनांक 8 ते 11 जानेवारी या कालावधीत होणार आहेत. दि. 8 जानेवारी 2023 रोजी खेळाडूंचे शहरात आगमन होणार असून दिनांक 9 व 10 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते 5 अशा दोन सत्रात प्रत्यक्ष स्पर्धा होणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांगली-मिरज- कुपवाड महानगरपालिका, जलसंपदा व पाटबंधारे विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग व शिक्षण विभाग (माध्यमिक) यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. खास स्पर्धेसाठी आवश्यक स्पर्धा बोटी भोपाळ, मध्यप्रदेश येथून मागविण्यात आलेल्या असून इतर स्पर्धा आयोजनासाठी स्थानिक बोटींचा वापर केला जाणार आहे. स्पर्धा कालावधीत प्रत्यक्ष पायलटींग व लाईफ सेव्हींग व्यवस्थेसाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन दल, आपदा मीत्र तसेच महापुराच्या प्रसंगी आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करणारे बोटक्लब व जवान यांचे सहकार्य घेण्यात येणार असल्याची माहिती श्री. वाघमारे यांनी दिली. 000000

महापालिकेच्या विकास कामांना अधिकचा निधी देणार -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 6 (जि.मा.का.) :- शहरातील नागरीकांना आवश्यक सेवा सुविधा पुरविण्याबरोबरच महापालिका क्षेत्रात विविध विकास कामेही महापालिकेमार्फत केली जातात. या विकास कामांना शासन स्तरावरुन तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून अधिकचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिली. कोविडमुळे मृत्यू पावलेल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरण आणि महापालिकेत लावण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते आज करण्यात आले. महापालिकेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, महापालिका आयुक्त सुनिल पवार यांच्यासह महापालिकेचे मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, महापालिकेकडील विकास कामे गतीने पूर्ण होऊन नागरीकांना दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात. विकास कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी या कामांसाठी आवश्यक निधी दिला जाईल. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील रस्त्यांची कामे गतीने करण्यास प्राधान्य दिले जाईल. विकास कामात महापालिका राज्यात आदर्शवत व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी बोलताना केले. कोरोना काळात महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून या काळात चांगले काम केले आहे. या कळात महापालिकेकडील 12 कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला ही दुर्दैवाची बाब आहे. मात्र महापालिका प्रशासनाने या 12 कर्मचाऱ्यांच्या वारसांना 10 लाखाची मदत केली. तसेच या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करुन त्यांना 50 लाखाच्या सानुग्रह अनुदानाची मदत मिळवून देऊन सामाजिक भान जपले असल्याचे पालकमंत्री श्री. खाडे म्हणाले. शासनाकडून मिळालेल्या या आर्थिक सहाय्याचा विनियोग चांगल्या कामासाठी करावा, अशी अपेक्षाही पालकमंत्री श्री. खाडे यांनी यावेळी व्यक्त केली. चिन, अमेरिका, जपान यासह काही देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत त्यामुळे नागरीकांनी घाबरुन न जाता कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. ज्यांचे लसीकरणाचे डोस घ्यावयाचे राहिले आहेत त्यांनी ते घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. महापालिकेकडील विकास कामांना अधिकचा निधी मिळावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करु अशी ग्वाही देऊन खासदार श्री. पाटील म्हणाले, कोरोना काळात राज्य व केंद्र सरकारने चांगले काम केल्यामुळे आपण कोविडची परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळू शकलो. लसीकरणाचे काम गतीने झाल्याने आपल्याकडे रुग्णांची संख्या अटोक्यात राहिली. त्यामुळे ज्या नागरीकांनी लसीचा डोस घेतलेला नाही त्यांनी तो लवकरात लवकर घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी महापालिकेने विशेष प्रयत्न केल्याबद्दल आमदार श्री. गाडगीळ यांनी महापालिका प्रशासनाचे कौतुक केले. महापौर दिग्विजय सुर्यवंशी, ज्येष्ठ नगरसेवक शेखर ईनामदार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. महापालिका आयुक्त श्री. पवार यांनी प्रास्ताविक केले. उपायुक्त स्मृती पाटील यांनी आभार मानले. 00000000

राज्यातील खाजगी चित्रीकरण स्थळांची माहिती पाठविण्याचे आवाहन

सांगली दि. ६ : राज्यातील खाजगी मालकीच्या चित्रीकरण स्थळांची माहिती जास्तीत जास्त निर्मिती संस्थांना कळावी यासाठी संबधित चित्रीकरण स्थळांचे मालक अथवा संस्थांनी गुगल ड्राईव्हवर स्थळांची विस्तृत माहिती, छायाचित्र, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने (चित्रनगरी/फिल्मसिटी) केले आहे. महाराष्ट्र हे मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले राज्य असून देश-विदेशातील निर्मिती संस्था येथे चित्रीकरण करण्यासाठी प्राधान्याने येत असतात. सध्या राज्यातील विविध ठिकाणी खाजगी चित्रीकरण स्थळ विकसित होत आहेत. ही चित्रीकरण स्थळे विविध निर्मिती संस्थांना माहिती व्हावीत यासाठी महामंडळ पुढाकार घेत आहे. यासाठी चित्रीकरणायोग्य अशा मालमत्ताधारकांनी महामंडळास संपर्क साधून आपल्या स्थळांची परिपूर्ण माहिती कळविल्यास, महामंडळ विविध प्रसिद्धीमाध्यमाद्वारे चित्रीकरण स्थळांची माहिती निर्मितीसंस्थांपर्यंत पोहोचविण्याचे काम करेल. याद्वारे नागरिकांना अधिकचे उत्पन्न प्राप्त होईल आणि त्यांच्या स्थळांची प्रचार-प्रसिद्धी होईल. अधिक माहितीसाठी www.filmcitymumbai.org, www.filmcell.maharashtra.gov या संकेतस्थळांवर भेट देता येईल. गुगल ड्राईव्ह लिंक वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 00000

जिल्ह्यातंर्गत म्हैशीचे आठवडी बाजार भरविण्यास व गुरांची वाहतूक करण्यास अटी-शर्तीस अधिन राहून मान्यता प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : जिल्ह्यातंर्गत म्हैशीचे आठवडी बाजार भरविण्यास व जिल्ह्यातंर्गत गुरांची वाहतूक करण्यास अटी-शर्तीस अधिन राहून मान्यता देण्यात आली असल्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातंर्गत वाहतूक करावयाच्या गुंराचे लम्पी चर्म रोगाकरीता 28 दिवसापूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. वाहतूक करावयाच्या गुरांची/म्हैशींची ओळख पटविण्यासाठी कानात टॅग नंबर असणे तसेच इनाफ पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे. गुरांची / म्हैशीची वाहतूक करताना विहित प्रपत्रामधील आरोग्य दाखला तसेच स्वास्थ प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. म्हैशीचे आठवडी बाजार भरण्यापूर्वी व नंतर संपूर्ण परिसरात जंतूनाशक व कीटकनाशक औषधाची फवारणी आयोजकांनी करणे बंधनकारक आहे. आठवडी बाजार परिसरात फक्त कानात टॅग मारलेल्या म्हैस वर्गातील जनावरांना प्रवेश देणे बंधनकारक आहे व सदर जनावरांची यादी संबंधित पशुपालकांच्या नावासहीत (टॅग नंबरसह) पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांना त्याच दिवशी देणे बंधकारक आहे. तसेच संक्रमित असलेल्या व नसलेल्या क्षेत्रातून गुरांची/म्हैशींची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ते आरोग्य प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाच्या/जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी गट-अ पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे. 000000

श्रीराम कथा व नामसंकिर्तन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात वाहतूक नियमन

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : कल्पद्रुम मैदान नेमिनाथनगर सांगली येथे श्रीराम कथा व नामसंकिर्तन सोहळा दि. 4 ते 14 जानेवारी 2023 रोजीपर्यंत संपन्न होत आहे. सोहळा कार्यक्रमात सामील असणाऱ्या भक्तगणांना वाहनांमुळे धोका पोहचु नये याकरीता पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 34 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये सांगली शहरातील शांतीबन चौक ते टाटा पेट्रोल पंप चौक (100 फुटी रोड ते नेमिनाथनगर कल्पद्रुम मैदान ते टाटा पेट्रोल पंप चौक (सांगली ते मिरज जाणारा रस्ता)) मार्गावर पोलीस वाहने, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड वाहने व दुचाकी व लाईट मोटार व्हेईकल या वाहनांखेरीज जड वाहनांना दि. 4 ते 14 जानेवारी 2023 रोजीपर्यंत श्रीराम कथा व नामसंकिर्तन सोहळा कार्यक्रम संपेपर्यंत 13.00 ते 21.00 वाजेपर्यंत मनाई केली आहे. पर्यायी वाहतूक व्यवस्था पुढीलप्रमाणे - कोल्हापूर रोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी - कोल्हापूर रोड जुना जकात नाका येथून इनाम धामणी गावांमध्ये प्रवेश न करता कोल्हापूर रोड फळमार्केट मार्गे सांगली शहरात येता व जाता येईल. कोल्हापूर रोड व इनाम धामणी कडून येणाऱ्या वाहनांसाठी - कोल्हापूर रोड जुना जकात नाका - इनाम धामणी गांव - पार्श्वनाथनगर - शांतीबन चौक मार्गे - डावीकडे वळण घेऊन - 100 फुटी रोड मार्गे - विकास चौक - बिरनाळे कॉलेज किंवा माने चौक व चेतना पेट्रोल पंप मार्गे मार्केट यार्ड व सांगली शहरात येता व जाता येईल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी जारी केले आहेत. 00000

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्रैमासिक विवरणपत्र तात्काळ सादर करावे - सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम

सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी 31 डिसेंबर 2022 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र (ई.आर-1) तात्काळ सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करण्यास भाग पाडणे) अधिनियम 1959 नुसार रिक्तपदे कळविण्याबाबत व तिमाही विवरणपत्र ईआर-1 मध्ये मनुष्यबळाची माहिती सादर करणे बंधनकारक आहे. सांगली जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योजकांनी त्यांच्याकडे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या माहितीबाबतचे दि. 31 डिसेंबर 2022 अखेरच्या तिमाहीचे विविरणपत्र ईआर-1 https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवरून ऑनलाईन सादर करावे. अधिक माहितीसाठी 0233-2990383 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे. ०००००

अल्पबचत योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : केंद्र शासनाने जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांच्या व्याजदरात 0.20 ते 1.10 अशी वाढ केली आहे. अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवून नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची आणि सध्याच्या खातेदारांना अधिक गुंतवणूक करण्याची संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. तसेच टपाल खात्याच्या विमा योजना व विविध अल्पबचत योजना सर्व आयकरदात्यांना आयकरात सवलत देण्याचे काम करीत असल्याने सर्व नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांगली डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक रमेश पाटील यांनी केले आहे. मुदत ठेव योजना, राष्ट्रीय बचत पत्र, मासिक उत्पन्न योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे. एक् वर्ष ठेवीसाठी 5.5 टक्के वरून 6.6 टक्के इतकी वाढ केली आहे. दोन वर्ष ठेवीसाठी 5.7 टक्के वरून 6.8 टक्के इतकी वाढ केली आहे. तीन वर्ष ठेवीसाठी 5.8 टक्के वरून 6.9 टक्के इतकी वाढ केली आहे. पाच वर्ष ठेवीसाठी 6.7 टक्के वरून 7 टक्के इतकी वाढ केली आहे. मासिक उत्पन्न योजनेसाठी 6.7 टक्के वरून 7.1 टक्के इतकी वाढ केली आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेसाठी 6.8 टक्के वरून 7 टक्के इतकी वाढ केली आहे. किसान विकास पत्र योजनेसाठी 7 टक्के वरून 7.2 टक्के इतकी वाढ केली आहे. किसान विकास पत्र योजनेमध्ये आता करण्यात येणारी गुंतवणूक 120 महिन्यामध्ये दुप्पट होईल. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी 7.6 टक्के वरून 8 टक्के इतकी वाढ केली आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाचा टपाल खात्यातील अल्पबचत योजनांमधील गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे. सांगली डाक विभागाने चालू आर्थिक वर्षात नवीन एक लाख खात्यांचा टप्पा पार केला आहे. पोस्ट विभागाच्या सुकन्या समृध्दी सारख्या विविध बचत योजना जनतेमध्ये लोकप्रिय असून लाभार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या योजनांमधील गुंतवणुकीसाठी सांगली डाक विभागामध्ये विशेष मोहिम चालू करण्यात आली असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. 00000

मुख्यू निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार 7 जानेवारी पर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन

सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणुका नि:पक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक कार्यालयाची जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडत असताना प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे निवडणूक आयोगाला सहकार्य लाभत असते. हे लक्षात घेऊन यंदापासून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार जाहीर केले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. पत्रकार आणि स्वयंसेवी संस्था या पुरस्कारासाठी स्वत: अर्ज करू शकतात. त्याकरता मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी गेल्या वर्षभरातील आपल्या कार्याची अहवाल स्वरूप माहिती आणि छायाचित्रांसह अर्ज democracybook@gmail.com या ई मेल आयडीवर दि. 7 जानेवारी 2023 पर्यंत पाठवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी माहितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी 'निवडणूक वार्तांकन पुरस्कार' दिला जाणार आहे. तर मतदार जागृतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 'मतदार-मित्र पुरस्कार' दिला जाणार आहे. 10 हजार रूपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. हे पुरस्कार 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात वितरित केले जातील, असे प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. 00000

राज्यातील खाजगी चित्रीकरण स्थळांची माहिती पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. ४ : राज्यातील खाजगी मालकीच्या चित्रीकरण स्थळांची माहिती जास्तीत जास्त निर्मिती संस्थांना कळावी यासाठी संबधित चित्रीकरण स्थळांचे मालक अथवा संस्थांनी गुगल ड्राईव्हवर स्थळांची विस्तृत माहिती, छायाचित्र, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने (चित्रनगरी/फिल्मसिटी) केले आहे. महाराष्ट्र हे मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले राज्य असून देश-विदेशातील निर्मिती संस्था येथे चित्रीकरण करण्यासाठी प्राधान्याने येत असतात. सध्या राज्यातील विविध ठिकाणी खाजगी चित्रीकरण स्थळ विकसित होत आहेत. ही चित्रीकरण स्थळे विविध निर्मिती संस्थांना माहिती व्हावीत यासाठी महामंडळ पुढाकार घेत आहे. यासाठी चित्रीकरणायोग्य अशा मालमत्ताधारकांनी महामंडळास संपर्क साधून आपल्या स्थळांची परिपूर्ण माहिती कळविल्यास, महामंडळ विविध प्रसिद्धीमाध्यमाद्वारे चित्रीकरण स्थळांची माहिती निर्मितीसंस्थांपर्यंत पोहोचविण्याचे काम करेल. याद्वारे नागरिकांना अधिकचे उत्पन्न प्राप्त होईल आणि त्यांच्या स्थळांची प्रचार-प्रसिद्धी होईल. अधिक माहितीसाठी www.filmcitymumbai.org, www.filmcell.maharashtra.gov या संकेतस्थळांवर भेट देता येईल. गुगल ड्राईव्ह लिंक वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 00000

बुधवार, ४ जानेवारी, २०२३

बांबवडे - टाकवे भागात बिबट वन्यप्राण्याचा वावर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : शिराळा तालुक्यातील बांबवडे येथे बिबट वन्यप्राण्यांची तीन पिल्ले आढळून आल्याने मौजे बांबवडे - टाकवे भागात बिबट वन्यप्राण्याचा वावर असल्याने परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल महंतेश बगले यांनी केले आहे. शिराळा तालुक्यातील बांबवडे येथे बिबट वन्यप्राण्यांची 3 पिल्ली आढळून आल्याची माहिती बांबवडे येथील भानुदास यशवंत माने यांच्याकडून वनपरिक्षेत्र शिराळा कार्यालयास दुरध्वनीव्दारे दि. 3 जानेवारी 2023 रोजी दुपारी 1 वाजता मिळाली. ही माहिती मिळताच वनक्षेत्रपाल महंतेश बगले, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, वनपाल बिळाशी चंद्रकांत देशमुख, वनरक्षक खुजगांव कु. देवकी ताशिलदार, वनरक्षक बिळाशी प्रकाश पाटील व अधिनस्थ कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर ठिकाणी टाकवे येथील सुनिल शिवाजी राऊत यांच्या मा.स.नं. 536 मध्ये ऊसतोड चालू असताना बिबट वन्यप्राण्याची नर - 2 व मादी 1 अशी एकुण 3 पिल्ली आढळून आली. या पिलांची शिराळा पशुवैद्यकिय अधिकारी सतिशकुमार जाधव व शुभांगी अरगडे, यांच्यामार्फत तपासणी केली असता ती सुस्थितीत असल्याने त्यांना सुरक्षितरित्या त्याच शेतात ठेवून त्यांची देखभाल व काळजी घेतली. पिल्यांचे बचावकार्य उप वनसंरक्षक (प्रा.) निता कट्टे, व सहा. वनसंरक्षक (वनीकरण) डॉ. अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या करण्यात आले आहे. तदनंतर सायंकाळी सदरच्या शेतात घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावून तीनही पिल्ली सुस्थितीत ठेवण्यात आली. काही वेळानंतर सदर पिलांची आई (मादी) घटनास्थळी येवून तीनही पिल्ली घेवून नैसर्गिक अधिवासात गेली. या घटनेचे व्हिडीओ कॅमेरामध्ये ट्रॅप झाले आहेत. या कामी बांबवडे गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे वनक्षेत्रपाल महंतेश बगले यांनी कळविले आहे. 00000

डाळींब फळपिकासाठी विमा बँकाकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 14 जानेवारी

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना, (अंबिया बहार)2022-23 या योजनेत डाळींब पिकाचा समावेश असून या योजनेची अंमलबजावणी दिनांक 18 जून 2021 च्या शासन निर्णयानुसार एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई मार्फत जिल्ह्यात करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अंबिया बहार मध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी यांना विमा बँकाकडे डाळींब फळपिकासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 14 जानेवारी 2023 अशी आहे. या योजनेत इच्छुकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी केले आहे. डाळींब फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख 30 हजार रूपये असून विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा 13 हजार रूपये आहे. विमा संरक्षण कालावधी अवेळी पाऊस यासाठी 15 जानेवारी 2023 ते 31 मे 2023, ज्यादा तापमान 15 एप्रिल 2023 ते 31 मे 2023, जास्त पाऊस 1 जून 2023 ते 31 जुलै 2023 आहे. गारपिटसाठी विमा संरक्षित रक्कम 43 हजार 333 रूपये असून विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा 6 हजार 500 रूपये आहे. गारपिटसाठी ‍विमा संरक्षण कालावधी 1 जानेवारी 2023 ते 30 एप्रिल 2023 आहे. या योजनेमध्ये डाळिंब फळपिकासाठी अधिसूचित महसूल मंडळाची संख्या 31 असून या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक असल्याने अधिसूचित क्षेत्रातील सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँक खाते असणाऱ्या जवळच्या प्राधिकृत बँका/प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था/ संबधित विमा कंपनीची कार्यालये किंवा विमा प्रतिनिधीशी संपर्क साधून विमा प्रस्ताव विहीत प्रपत्रात योग्य त्या विमा हप्त्यासह, 7/12 खाते उतारा, आधार कार्ड, बँक खात्याचे तपशिल, घोषणापत्र, बागेबाबत छायाचित्र अक्षांश-रेखांश पत्र इत्यादी कागदपत्रासह विहीत वेळेत जमा करावे. बिगर कर्जदार फळपिक उत्पादक शेतकरी यांनी बँकेतील गर्दी टाळण्यासाठी प्राधिकृत आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क करुन सहभाग नोंदवावा. या योजनेंतर्गत विहीत मुदतीत नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी व दायित्व विमा कंपन्याचे आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. सुर्यवंशी यांनी केले आहे. या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. ही योजना शासन निर्णयातील अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी लागू राहील. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ऐच्छिक आहे. अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी खातेदारां व्यातिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त अधिसूचित फळपिकासाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येईल. अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामा करीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. (उदा. डाळींब). केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहाणार आहे. उत्पादनक्षम अधिसूचित वय डाळींब पिकासाठी 2 वर्ष आहे व या पेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षण घेतल्याचे निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता 30 टक्के दरापर्यंत मर्यादित केलेला आहे. त्यामुळे 30 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांना स्विकारणे क्रमप्राप्त आहे. या योजनेंतर्गत 30 ते 35 टक्के पर्यंतचे अतिरिक्त 5 टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्विकारले असून 35 टक्केवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी 50:50 टक्के प्रमाणे भरावयाचा आहे. 00000

बांधकाम कामगारांच्या नोंदणी व नुतनीकरण शुल्कात बदल

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत बांधकाम कामगाराच्या नोंदणी व नुतनीकरणातील तांत्रिक अडचणी कमी करून कामगारांची नोंदणी सुलभ होण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीतील नोंदणी व नुतनीकरण शुल्कात बदल करून नोंदणी शुल्क 25 रूपये व नुतनीकरण शुल्क 12 रूपये ऐवजी नोंदणी व नुतनीकरण शुल्क एक रूपये करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बांधकाम कामाच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व कामगारांनी नोंदणीचा लाभ घ्यावा व एक रूपये भरून नोंदणी सुलभरित्या करून घ्यावी. कोणत्याही व्यक्तीच्या भूल थापास बळी पडू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे. 00000

जी.डी.सी. ॲण्ड ए व सी.एच.एम. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 5 फेब्रुवारी पर्यंत मुदत

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲण्ड ए) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परिक्षा सांगली केंद्रावर दि. 26, 27 व 28 मे 2023 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. 5 जानेवारी 2023 पासून दि. 5 फेब्रुवारी 2023 पर्यंत देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली. ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे या परिक्षेसाठी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरच भरता येईल. या परिक्षेस नव्याने बसू इच्छिणाऱ्या परिक्षार्थींना तसेच पुर्वी परिक्षेस बसलेल्या परंतु अनुत्तीर्ण झालेल्या परिक्षार्थींना बसता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत 2 रा मजला, विजयनगर, सांगली येथे 0233-2600300, 0233-2600400 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. सुरवसे यांनी केले आहे. 00000