शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३

कनोईंग व कयाकिंग खेळाच्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सांगलीत होणार स्पर्धेचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते उद्घाटन

सांगली दि. 6 (जि.मा.का.) :- महाराष्ट्र राज्य असो. फॉर कनोईंग व कयाकिंग आणि सांगली जिल्हा असो. फ़ॉर कनोईंग व कयाकिंग या संघटनांच्या समन्वयाने सांगली येथे दि. 8 ते 11 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये सांगली मधील रॉयल कृष्णा बोट क्लब, कृष्णा नदी पात्र श्री. स्वामी समर्थ घाट, वसंतदादा स्मारक शेजारी, सांगली या ठिकाणी कनोईंग व कयाकिंग या खेळाच्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन दि. 9 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते व मान्यवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेचा समारोप दि. 10 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा चे आयोजन दि. 2 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये विविध 39 क्रीडा प्रकारांमध्ये, शिवछत्रपती क्रीडापीठ, पुणे, तसेच पुणे जिल्ह्यामध्ये बारामती, ए.एस. आय. घोरपडी, पुना क्लब येथे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच राज्यातील नाशिक, नागपुर, जळगांव, मुंबई अमरावती, औरंगाबाद व सांगली या जिल्ह्यांमध्ये क्रीडा स्पर्धा सपंन्न होणार आहेत. या स्पर्धा कनोईंग व कयाकींग या दोन्ही जलक्रीडा प्रकारात 1000 मि. 500मि. आणि 200 मि. अंतरामध्ये व सांघीक आणि वैयक्तीक प्रकारात संपन्न होणार आहेत. या सर्व स्पर्धा कृष्णा नदीवरील बायपास पुलापासून सुरु होऊन आयर्वीन पुलाजवळ शेवट होणार आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंची निवड चाचणी घेऊन पात्र ठरलेले सुमारे 77 मुले आणि 33 मुली या सोबत 27 व्यवस्थापक व मार्गदर्शक, 35 अधिकारी आणि पंच अशा एकुण 172 व्यक्ती सहभागी होणार आहेत. तसेच स्थानिक स्तरावर सुमारे 100 लोकांचे मनुष्यबळ या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच व इतर अधिकारी यांची निवास व भोजन व्यवस्था शहरातील विविध हॉटेल्स मध्ये करण्यात येत असून यासाठी राज्यस्तरावरुन पुरवठादार यंत्रणा निश्चित केलेल्या आहेत. स्पर्धा दिनांक 8 ते 11 जानेवारी या कालावधीत होणार आहेत. दि. 8 जानेवारी 2023 रोजी खेळाडूंचे शहरात आगमन होणार असून दिनांक 9 व 10 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते 5 अशा दोन सत्रात प्रत्यक्ष स्पर्धा होणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांगली-मिरज- कुपवाड महानगरपालिका, जलसंपदा व पाटबंधारे विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग व शिक्षण विभाग (माध्यमिक) यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. खास स्पर्धेसाठी आवश्यक स्पर्धा बोटी भोपाळ, मध्यप्रदेश येथून मागविण्यात आलेल्या असून इतर स्पर्धा आयोजनासाठी स्थानिक बोटींचा वापर केला जाणार आहे. स्पर्धा कालावधीत प्रत्यक्ष पायलटींग व लाईफ सेव्हींग व्यवस्थेसाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन दल, आपदा मीत्र तसेच महापुराच्या प्रसंगी आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करणारे बोटक्लब व जवान यांचे सहकार्य घेण्यात येणार असल्याची माहिती श्री. वाघमारे यांनी दिली. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा