गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

अल्पबचत योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : केंद्र शासनाने जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांच्या व्याजदरात 0.20 ते 1.10 अशी वाढ केली आहे. अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवून नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची आणि सध्याच्या खातेदारांना अधिक गुंतवणूक करण्याची संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. तसेच टपाल खात्याच्या विमा योजना व विविध अल्पबचत योजना सर्व आयकरदात्यांना आयकरात सवलत देण्याचे काम करीत असल्याने सर्व नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांगली डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक रमेश पाटील यांनी केले आहे. मुदत ठेव योजना, राष्ट्रीय बचत पत्र, मासिक उत्पन्न योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे. एक् वर्ष ठेवीसाठी 5.5 टक्के वरून 6.6 टक्के इतकी वाढ केली आहे. दोन वर्ष ठेवीसाठी 5.7 टक्के वरून 6.8 टक्के इतकी वाढ केली आहे. तीन वर्ष ठेवीसाठी 5.8 टक्के वरून 6.9 टक्के इतकी वाढ केली आहे. पाच वर्ष ठेवीसाठी 6.7 टक्के वरून 7 टक्के इतकी वाढ केली आहे. मासिक उत्पन्न योजनेसाठी 6.7 टक्के वरून 7.1 टक्के इतकी वाढ केली आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेसाठी 6.8 टक्के वरून 7 टक्के इतकी वाढ केली आहे. किसान विकास पत्र योजनेसाठी 7 टक्के वरून 7.2 टक्के इतकी वाढ केली आहे. किसान विकास पत्र योजनेमध्ये आता करण्यात येणारी गुंतवणूक 120 महिन्यामध्ये दुप्पट होईल. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी 7.6 टक्के वरून 8 टक्के इतकी वाढ केली आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाचा टपाल खात्यातील अल्पबचत योजनांमधील गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे. सांगली डाक विभागाने चालू आर्थिक वर्षात नवीन एक लाख खात्यांचा टप्पा पार केला आहे. पोस्ट विभागाच्या सुकन्या समृध्दी सारख्या विविध बचत योजना जनतेमध्ये लोकप्रिय असून लाभार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या योजनांमधील गुंतवणुकीसाठी सांगली डाक विभागामध्ये विशेष मोहिम चालू करण्यात आली असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा