शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३

महापालिकेच्या विकास कामांना अधिकचा निधी देणार -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 6 (जि.मा.का.) :- शहरातील नागरीकांना आवश्यक सेवा सुविधा पुरविण्याबरोबरच महापालिका क्षेत्रात विविध विकास कामेही महापालिकेमार्फत केली जातात. या विकास कामांना शासन स्तरावरुन तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून अधिकचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिली. कोविडमुळे मृत्यू पावलेल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरण आणि महापालिकेत लावण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते आज करण्यात आले. महापालिकेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, महापालिका आयुक्त सुनिल पवार यांच्यासह महापालिकेचे मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, महापालिकेकडील विकास कामे गतीने पूर्ण होऊन नागरीकांना दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात. विकास कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी या कामांसाठी आवश्यक निधी दिला जाईल. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील रस्त्यांची कामे गतीने करण्यास प्राधान्य दिले जाईल. विकास कामात महापालिका राज्यात आदर्शवत व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी बोलताना केले. कोरोना काळात महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून या काळात चांगले काम केले आहे. या कळात महापालिकेकडील 12 कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला ही दुर्दैवाची बाब आहे. मात्र महापालिका प्रशासनाने या 12 कर्मचाऱ्यांच्या वारसांना 10 लाखाची मदत केली. तसेच या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करुन त्यांना 50 लाखाच्या सानुग्रह अनुदानाची मदत मिळवून देऊन सामाजिक भान जपले असल्याचे पालकमंत्री श्री. खाडे म्हणाले. शासनाकडून मिळालेल्या या आर्थिक सहाय्याचा विनियोग चांगल्या कामासाठी करावा, अशी अपेक्षाही पालकमंत्री श्री. खाडे यांनी यावेळी व्यक्त केली. चिन, अमेरिका, जपान यासह काही देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत त्यामुळे नागरीकांनी घाबरुन न जाता कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. ज्यांचे लसीकरणाचे डोस घ्यावयाचे राहिले आहेत त्यांनी ते घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. महापालिकेकडील विकास कामांना अधिकचा निधी मिळावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करु अशी ग्वाही देऊन खासदार श्री. पाटील म्हणाले, कोरोना काळात राज्य व केंद्र सरकारने चांगले काम केल्यामुळे आपण कोविडची परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळू शकलो. लसीकरणाचे काम गतीने झाल्याने आपल्याकडे रुग्णांची संख्या अटोक्यात राहिली. त्यामुळे ज्या नागरीकांनी लसीचा डोस घेतलेला नाही त्यांनी तो लवकरात लवकर घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी महापालिकेने विशेष प्रयत्न केल्याबद्दल आमदार श्री. गाडगीळ यांनी महापालिका प्रशासनाचे कौतुक केले. महापौर दिग्विजय सुर्यवंशी, ज्येष्ठ नगरसेवक शेखर ईनामदार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. महापालिका आयुक्त श्री. पवार यांनी प्रास्ताविक केले. उपायुक्त स्मृती पाटील यांनी आभार मानले. 00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा