बुधवार, ११ जानेवारी, २०२३

तृणधान्य आरोग्यास हितकारक; तृणधान्य वापरासाठी प्रत्येकाने योगदान देऊया - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 11 (जि.मा.का.) :- आहारात तृणधान्याचा वापर वाढविणे आरोग्यासाठी हितकारक आहे. तृणधान्ये आरोग्यदायी असल्याने आहारात मोठ्या प्रमाणात वापर होणे आवश्यक असून यासाठी कृषी विभागाने व्यापक जनजागृती मोहीम राबवावी. तसेच तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देऊया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने कृषी विभागामार्फत मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, तृणधान्याचा वापर वाढविण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले पाहिजे. यासाठी तृणधान्यापासून वेगवेगळे पदार्थ बनविण्याची रेसीपी लोकांपर्यंत पोहचविली पाहिजे. तृणधान्यापासून विविध प्रकार बनविण्याचे तंत्र विकसित असून ते लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. हे तंत्र/ रेसीपी लोकांपर्यंत पोहचविल्यास आहारात तृणधान्याचा वापर वाढेल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. सांगली जिल्हा प्रोसेसिंग व मायक्रो फुड प्रोसेसिंगमध्ये अग्रेसर असून तृणधान्यावरील प्रोसेसिंगमध्ये याचा उपयोग करून ग्राहकाला हवे ते उपलब्ध करुन देण्यात यावे. यामध्ये जिल्ह्यातील महिला बचत गटांचे योगदान महत्वाचे राहणार आहे. तृणधान्यापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांच्या चव व गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रीत करुन लोकांना तृणधान्याचे पदार्थ वापरण्यास प्रवृत्त करावे. शासकीय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमातही तृणधान्याचे पदार्थ देण्याचा वापर वाढवावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी बोलताना केली. ‍ प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी प्रास्ताविकात आहारात तृणधान्याचे महत्व सांगून पौष्टिक तृणधान्य हा कार्यक्रम जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबवून तृणधान्य वापराबाबत जनजागृती केली जाईल, असे सांगितले. कार्यक्रमात ज्वारी व बाजरी पिकाचे उत्पन्न वाढीसाठी योगदान देणाऱ्या कृषी सहाय्यकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा