मंगळवार, ३१ जुलै, २०१८

जिल्ह्यात दिलेल्या उद्दिष्टाच्या 100 टक्केपेक्षा जास्त वृक्षलागवड - उप वनसंरक्षक (प्रा.) डॉ. भारत सिंह हाडा

सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत सांगली जिल्ह्यात 1 ते 31 जुलै या कालावधीत जिल्ह्यातील सर्व यंत्रणा, लोकप्रतिनिधी, निसर्गप्रेमी, वनप्रेमी ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागाने वृक्षलागवडीचे 113.20 टक्के वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, अशी माहिती उप वनसंरक्षक (प्रा.) डॉ. भारत सिंह हाडा यांनी दिली.
    डॉ. भारत सिंह हाडा म्हणाले, 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत सांगली जिल्ह्यात वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग , ग्रामपंचायत इतर यंत्रणा यांना 29 लक्ष 17 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मोहीम कालावधीत जिल्ह्यात ऑनलाईन नोंद झालेली वृक्षलागवड 29 लाख 24 हजार 149 ऑफलाईन पध्दतीने नोंद झालेली वृक्षलागवड 4 लाख 11 हजार 143 अशी एकूण 33 लाख 35 हजार 292 वृक्ष लागवड झाली आहे. यामध्ये तालुकानिहाय ऑनलाईन ऑफलाईन पध्दतीने झालेली एकत्रित वृक्षलागवड पुढीलप्रमाणे आहे. आटपाडी - 3 लाख 14 हजार 168, जत - 5 लाख 76 हजार 852, कडेगाव - 2 लाख 13 हजार 506, कवठेमहांकाळ - 3 लाख 8 हजार 525, खानापूर - 4 लाख 60 हजार 773, मिरज - 3 लाख 12 हजार 594, पलूस - 1 लाख 44 हजार 7, शिराळा - 3 लाख 59 हजार 260, तासगाव -      2 लाख 32 हजार 704, वाळवा - 4 लाख 12 हजार 903.
00000

मंगळवार, २४ जुलै, २०१८

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : शासनाने खरीप हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेत बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 24 जुलै होती. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेवून त्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्यासाठी कर्जदार शेतकऱ्याप्रमाणेच या योजनेत आता सहभागी होण्यासाठी 25 जुलै पासून 31 जुलै 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे यांनी दिली.
    राजेंद्र साबळे म्हणाले, अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. सांगली जिल्ह्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता शासनामार्फत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.
     प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2018 मध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर कंसात शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता अनुक्रमे पुढीलप्रमाणे. भात - 30 हजार रूपये (600 रू.), खरीप ज्वारी - 24 हजार रूपये (480 रू.), बाजरी - 20 हजार रूपये (400 रू.), मका - 26 हजार 200 रूपये (524 रू.), तूर - 25 हजार रूपये (500 रू.), मूग - 18 हजार रूपये (360 रू.), उडीद - 18 हजार रूपये (360 रू.), भुईमूग 30 हजार रूपये (600 रू.), सोयाबिन 40 हजार रूपये (800 रू.), कापूस - 35 हजार रूपये (1 हजार 750 रूपये).
    पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व / लावणीपूर्व नुकसान भरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती या विमा संरक्षणाच्या बाबी आहेत. खरीप 2018 पासून सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करण्यावेळी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेल्या बँक खातेपुस्तकाची प्रत तसेच आधारकार्ड छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावतीसोबत मतदान ओळखपत्र / किसान क्रेडिटकार्ड/नरेगा जॉबकार्ड/वाहनचालक परवाना यापैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. खरीप हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरीत बँकेशी संपर्क साधावा. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बँक खाते क्रमांकच अर्जावर नमूद करावे लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अद्यापही आधार कार्ड र् नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरीत नजीकच्या आधार नोंदणी केंद्राशी संपर्क करून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.

00000

शनिवार, २१ जुलै, २०१८

लोकराज्य 'वारी' विशेषांकाचे जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या हस्ते प्रकाशन

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे अतिथी संपादक असलेल्या लोकराज्यच्या 'वारी' या ऑगस्ट महिन्याच्या विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजया यादव, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, माहिती अधिकारी संप्रदा बीडकर आदि उपस्थित होते.
    पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. यंदाच्या आषाढी वारीचे औचित्य साधून माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने 'वारी' हा लोकराज्य विशेषांक प्रकाशित केला आहे. या विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'रंगले हे चित्त माझे विठुपायी' असे म्हणत वारकऱ्यांसाठी संदेश दिला आहे. माहिती जनसंपर्क विभागाचे महासंचालक तथा लोकराज्यचे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या लोकराज्य वारी विशेषांकात श्रीपाद अपराजित, डॉ. द. ता. भोसले, श्रीधरबुवा देहूकर, संदेश भंडारे, बाळासाहेब बोचरे, डॉ. यू. म. पठाण, प्रा. राम शेवाळकर, डॉ. प्रतिमा इंगोले, जयंत साळगावकर आदि मान्यवरांनी वारीच्या विविध अनुषंगाने विचार मांडले आहेत. तसेच जयंत साळगांवकर यांचा लेख पुर्नमुद्रित केला आहे. विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी समितीमार्फत भक्तांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि सोलापूर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथे प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा तसेच उपाय योजनांची माहिती दिली आहे. राज्य शासनामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या वारीसंदर्भातही विशेषांकात माहिती आहे.
    आषाढी वारीच्या निमित्ताने माहिती जनसंपर्क विभागाने प्रकाशित केलेला वारी विशेषांक वाचनीय आणि संग्राह्य आहे. तो प्रत्येकाने वाचावा, संग्रही ठेवावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी वारी विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी केले. जिल्ह्यातील अंक विक्रेत्याकडे लोकराज्य वारी विशेषांक वाचकांसाठी उपलब्ध असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी सांगितले. या विशेषांकाची किंमत दहा रूपये आहे.
00000