शुक्रवार, ६ जुलै, २०१८

कवठेपिरानने केला एक लाख वृक्षारोपणाचा संकल्प विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याहस्ते प्रारंभ

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : राज्य शासनाच्या 50 कोटी वृक्षलागवड उपक्रमांतर्गत यावर्षी सांगली जिल्ह्यास 29 लाख 17 हजार वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिले आहे. यातील 7 लाख, 63 हजार उद्दिष्ट ग्रामपंचायतींसाठी देण्यात आले आहे. या उपक्रमाला उदंड प्रतिसाद देत मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे वर्षभरात टप्प्याटप्प्याने एक लाख वृक्षलागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या मोहिमेचा शुभारंभ विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याहस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, उपवनसंरक्षक (प्रा.) डॉ. भारतसिंह हाडा, विभागीय वन अधिकारी विश्वास जवळेकर, सरपंचा शालन गायकवाड, उपसरपंच प्रताप भोसले, आदर्श सरपंच पुरस्कारप्राप्त भीमराव माने आदि उपस्थित होते.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत प्रेरणेने आणि उपवनसंरक्षक (प्रा.) डॉ. भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श सरपंच पुरस्कारप्राप्त भीमराव माने यांनी ही संकल्पना ग्रामसभेत मांडली. सर्वच ग्रामस्थांनी या संकल्पनेला उदंड प्रतिसाद वर्षभरात टप्प्याटप्प्याने कवठेपिरान येथे एक लाख वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला. याअंतर्गत आतापर्यंत गावात 8 हजार वृक्षारोपण पूर्ण झाले आहे. त्यातील 3 हजार झाडे सामाजिक वनीकरण विभागाकडून देण्यात आली साधारणतः 4 ते 5 वर्षे वयोगटातील 5 ते 6 फूट उंचीची झाडे लावण्यात आली असून यामध्ये आंबा, नारळ, सागवान, लिंबू, वड, पिंपळ, चिंच यांचा समावेश आहे.
याबाबत शेतकरी ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. गावातील मृत व्यक्तिंच्या स्मरणार्थ अनेकांनी झाडे दान केली आहेत. त्या व्यक्तिंच्याच नावाने ती झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकवर्गणीतून 5 हजार झाडे प्राप्त झाली. यासाठी सावली फाऊंडेशन, हिंदकेसरी हायस्कूलचे शिक्षक, सप्तर्षी शिक्षण प्रसारक मंडळ, राजेश्वरी चिरमुरे भट्टी यासह गावातील आणि सांगलीतूनही अनेक सामाजिक संस्था, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या, पतसंस्था स्वयंस्फूर्तीने पुढे आल्या आहेत.
शेतकऱ्यांना उपयुक्त झाडे लावण्यावर भर देण्यात आला आहे. गावातील 28 एकर गायरान जमिनीसह, शेताच्या बांधावर, महामार्गावर दुतर्फा झाडे लावण्यात आली आहेत. केवळ झाडे लावण्यावर भर नसून, त्याचे संगोपन करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. 

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा