सोमवार, २ जुलै, २०१८

अफवांवर विश्वास ठेवू नका पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांचे आवाहन

सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : राज्यात मागील काही दिवसांपासून समाजकंटक व्हॉटसऍ़प, फेसबुक आदि सोशल मीडियाच्या माध्यमातून मुले पळवणारी टोळी आली किंवा चोर आले अशा प्रकारच्या अफवा पसरवित आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाण, हिंसक हल्ले, असे प्रकार घडले आहेत. सांगली जिल्ह्यातही अशा अफवा पसरविल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जनतेने सर्तक राहून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा अप्पर पोलीस अधिक्षक शशिकांत बोराटे यांनी केले आहे.
    केवळ संशयावरून एखादी व्यक्ती अथवा गटावर जमावाने हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. अलिकडच्या काळात जिल्ह्यात मुले पळवून नेल्याची एकही घटना घडली नाही किंवा तशी तक्रारही आलेली नाही. त्यामुळे अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर कोणी अशा अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे. खात्री केल्याशिवाय सोशल मीडियावर आलेला संदेश अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नये. सोशल मीडियातून आलेल्या संदेशावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अफवा पसरविणाऱ्या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे. अफवा पसरविण्यास हातभार लावल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अफवेला बळी पडून हातून गंभीर गुन्हा घडल्यास संपूर्ण आयुष्य तुरूंगात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी स्वत:हून कायदा हातात घेवू नये. कायदा आणि सुव्यवस्था  अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जनतेने अफवा पसरविणाऱ्यांबाबत सर्तक संवेदनशिल राहावे कोणताही अनुचित प्रकार समोर आल्यास त्वरित 100 नंबरवर तसेच सांगली नियंत्रण कक्षातील 0233-2672100, 0233-2674055, 7875714883, 1090, 1091 वर  संपर्क साधावा अथवा नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये माहिती द्यावी, असे आवाहन सांगली पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.
   
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा