सोमवार, ९ जुलै, २०१८

कृषि यांत्रिकीकरण मोहिमेतून 1789 लाभार्थींना लाभ

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : उन्नत शेती समृद्ध शेतकरी या मोहिमेंतर्गत सांगली जिल्ह्यात कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे काम कृषि विभाग करत आहे. या योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात मार्चअखेर 1 हजार 789 लाभार्थींना 12 कोटी, 27 लाख, 56 हजार, 300 रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. यामध्ये उद्दिष्टापेक्षाही अधिक भौतिक साध्य प्राप्त केले आहे.
शेती विकासाच्या तसेच शेतकरी कल्याणाच्या विविध योजना कृषि विभागामार्फत राबवल्या जातात. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याचे उद्दिष्ट ठेवून राज्य शासन उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम राबवत आहे. शेतकऱ्यांना प्रमुख पिकांच्या प्रत्यक्षात प्राप्त होणारी उत्पादकता त्या पिकांच्या अनुवंशिक उत्पादन क्षमतेतील तफावत कमी करून शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न प्राप्त करून देणे आणि पीक विमा योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
राज्यातील वाढत्या लोकसंख्येबरोबर घटत असलेली जमीन धारणा, बैलांची लक्षणीयरीत्या कमी झालेली संख्या, शेतमजुरांची घटलेली संख्या, वाढते मजुरीचे दर, खरीप हंगामात पेरणीसाठी मिळणारा अल्प कालावधी राज्यातील पिकांमध्ये, फळबागांमध्ये असलेली विविधता या पार्श्वभूमिवर स्थानिक परिस्थितीनुरूप कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, चाफकटर, ब्लोअर, पावर विडर, डबल पलटी, पेरणी यंत्र, मळणी यंत्र आदि  प्रकारची कृषि अवजारे/उपकरणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना केंद्र हिस्सा 60 टक्के राज्य हिस्सा 40 टक्के या प्रमाणात अर्थसहाय्य देण्यात येते.
या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अल्प अत्यल्प तसेच सर्वसाधारण या प्रवर्गातील लाभार्थींना देण्यात आला आहे. गत आर्थिक वर्षात अनुदानावर आधारित कृषि अवजारांचा पुरवठा अंतर्गत मिनी ट्रॅक्टर 343, ट्रॅक्टर 562, पॉवर टिलर 387, रोटावेटर 309, फवारणी यंत्र 37, पेरणी यंत्र 37, कल्टीवेटर 21, भात मळणी यंत्र 6, खत बी टोकन यंत्र 6, मळणी यंत्र 54, सबसाइलर 4, दालमिल 4, पॉवर विडर 5, रिपर 1, ब्लोअर 11 आणि ऊस पाचट कुट्टी 2 अशा 1 हजार 789 लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे. त्यासाठी 12 कोटी, 27 लाख, 56 हजार, 300 रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
सन 2018-19 मध्ये सांगली जिल्ह्यात 2 हजार 199 अवजारांची संख्या निश्चित करण्यात आली असून त्यासाठी 15 कोटी 39 लाख 40 हजार रुपयांचा आराखडा पाठविण्यात आला आहे. यामध्ये ट्रॅक्टरसाठी 13 हजार 755 अर्ज आणि इतर अवजारांसाठी 8 हजार 534 अर्ज असे एकूण 22 हजार 289 अर्ज कृषि विभागाकडे प्राप्त झाले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा