मंगळवार, ३ जुलै, २०१८

मागेल त्याला शेततळे योजनेतून जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी

- 5 हजार टीसीएम पाणी साठवण क्षमता निर्माण
- 2 हजार 852 हेक्टर क्षेत्रात संरक्षित सिंचन होणार
- 19 कोटी 29 लाख रुपये अनुदान वितरित
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मागेल त्याला शेततळे योजनेतून झालेल्या शेततळ्यांमुळे जिल्ह्यात पूर्ण झालेल्या 4  हजार 605 शेततळ्यांमधून 5 हजार 705 टीसीएम पाणी साठवण क्षमता निर्माण झालेली असून 2  हजार 852 हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झालेले आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात फायदा होत आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
राज्यात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच त्याच्या उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे. या पार्श्वभूमिवर पावसात पडलेला खंड, पाण्याची टंचाई पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच, दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त आहे. राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवता येणे शक्य होईल. तसेच, या माध्यमातून संरक्षित शाश्वत सिंचनाची सुविधा मिळणार आहे.
याबाबत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यास 4 हजार 500 इतका लक्ष्यांक निर्धारित केला आहे. शासनाच्या आपले सरकार पोर्टल या संकेत स्थळावर अर्ज सादर करण्यापासून अनुदान वितरीत करण्यापर्यंतची टप्प्यानुसार माहिती भरण्यात येते. या योजनेसाठी रु. 19 कोटी 29  लाख इतके अनुदान प्राप्त असून सर्व 19 कोटी 29  लाख निधी खर्च झालेला आहे.
जिल्ह्यामध्ये आजअखेर 20 हजार 181 अर्ज प्राप्त झाले असून. 18  हजार 718 सेवा शुल्क भरलेले आहेत. तालुकास्तरीय समितीने 14  हजार 161 लाभार्थीना तांत्रिक प्रशासकीय मंजुरी देवून 12 हजार 321 लाभार्थीना कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्या सर्व लाभार्थीना शेततळे आखणी करून दिले आहे. त्यापैकी 201 कामे सुरु असून 4  हजार 605 कामे पूर्ण झाली आहेत. 4 हजार 534 लाभार्थीना 19 कोटी 29 लाख रुपये इतके अनुदान वितरीत केले आहे. पूर्ण झालेल्या 4  हजार 605 शेततळ्यांमधून 5 हजार 705 टीसीएम पाणी साठवण क्षमता निर्माण झालेली असून 2  हजार 852 हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झालेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोणचे प्रशांत प्रकाश पाटील म्हणाले, मी कृषि विभागाच्या शेततळे, ट्रॅक्टर आणि ठिबक सिंचन या योजनांचा लाभ घेतला आहे. या योजनांचा लाभ झाल्याने माझा आर्थिक स्तर उंचावला आहे. मी माझ्या बहिणीचा विवाह करू शकलो. मी कौलारू घरात राहात होतो. आता माझे स्लॅबचे घर आहे. या योजनांमुळे माझी प्रगती झाली आहे.
एकूणच मागेल त्याला शेततळे ही योजना शेतकऱ्यांचे उत्पादन उत्पन्नात वाढ होवून, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. ही योजना शेतकऱ्यांस संजीवनी देणारी ठरत आहे.
वर्षा बाबासाहेब पाटोळे
जिल्हा माहिती अधिकारी
सांगली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा