मंगळवार, १७ जुलै, २०१८

सांगली जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात जिल्हाधिकारी वि. ना. काळम - पूर परिस्थितीचा घेतला आढावा

सांगली, दि. 17, (जि. मा. का.) : वारणा कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाटबंधारे विभाग, महसूल, पोलीस हे सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या काळजीचे कारण नाही. तथापि, नदीपात्रातील सखल भागातील नागरिकांनी दक्ष राहावे. नदीकाठच्या भागातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित स्थळी बांधावीत. वेळोवेळी होणाऱ्या नदीपात्रातील प्रवाहातील बदलांनुसार त्यांना माहिती देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित संभाव्य पूर परिस्थिती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय गिड्डे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, पाटबंधारे कार्यकारी अभियंता नामदेव करे, सर्व उपविभागीय अधिकारी, महसूल, पाटबंधारे, महावितरण, कृषि, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन, बीएसएनएल, परिवहन, आरोग्य आदि यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
   आपत्तीच्या काळात संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून परस्पर समन्वय ठेवावा. कोणत्याही स्थितीत जीवितहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, आपत्ती निवारणार्थ देण्यात आलेली सर्व साधनसामग्री अद्ययावत ठेवावी. ऐन वेळची धावपळ टाळावी, आपत्तीच्या काळात यंत्रणेतील त्रृटी सहन केल्या जाणार नाहीत, याची जाणीव ठेवून तात्काळ प्रतिसादासाठी तत्पर राहावे. सर्व यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपत्तीच्या काळात आपली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडावीत. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आपल्या बाजूच्या तालुक्यांमधीलही सद्यस्थितीची अद्ययावत माहिती ठेवावी. जिल्ह्यात घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या घटनेची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षाला द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा