शुक्रवार, २९ मार्च, २०२४

वासुंबेमध्ये सायकल रॅली, रांगोळी स्पर्धेचे आयोजन

सांगली दि.29 (जि.मा.का.) : येत्या सात मे रोजी लोकशाहीचा उत्सव पार पडत आहे. या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी स्वीप मोहिमेअंतर्गत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नाचे फलित म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश मतदानाची टक्केवारी वाढावी असा आहे. तासगाव तालुक्यातील मौजे वासुंबे येथे गेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये कमी मतदान झाले होते ही बाब तेथील नागरिकांना अस्वस्थ करत होती. यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला त्या अनुषंगाने स्वीप उपक्रमांतर्गंत मतदान वाढीसाठी तेथील प्रशालेची मदत घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्याद्वारे वासुंबे गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी व सायकल रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थी व पालक यांच्यासाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या कामी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शोभा जाधव यांनी उपस्थित नागरिकांना मतदान कर्तव्य बजाविण्याबाबत आवाहन केले. या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत, यंदा मतदानाचा हक्क मोठ्या प्रमाणावर बजावणार असल्याचे सांगितले. 0000000

बुधवार, २७ मार्च, २०२४

लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅली उत्साहात संपन्न सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे, यासाठी स्वीप (SVEEP) कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. सर्व मतदारांनी लोकशाही बळकटीकरणासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी केले. मतदार जनजागृतीसाठी स्वीप उपक्रमांतर्गत आज सकाळी 7 वाजता विश्रामबाग सांगली येथे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीस प्रारंभ केला. या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, महानगरपालिका उपायुक्त वैभव साबळे, आरोग्य अधिकारी रविंद्र ताटे, वैद्यकीय अधिकारी वैभव पाटील, मुख्य अग्नीशमन अधिकारी सुनील माळी, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर, श्री. बोडस, अरूण लोंढे, यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, सायकल पट्टू, क्रीडा प्रेमी, नागरिक, विविध शाळा, विद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी रॅलीमध्ये सहभाग घेणाऱ्यांचे अभिनंदन करून, 7 मे रोजी मतदान करण्याचे तसेच, इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याबाबत आवाहन केले. विश्रामबाग सांगली येथून काढण्यात आलेली सायकल रॅली पुढे पुष्कराज चौक - राम मंदिर मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम सांगली येथे या रॅलीची सांगता झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी 7 मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित सायकल पट्टू, पत्रकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात या सायकल रॅली कार्यक्रमाची सांगता झाली. 00000

मंगळवार, २६ मार्च, २०२४

अत्यावश्यक शासकीय सेवेमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची सुविधा

सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : भारत निवडणूक आयोगाने अत्यावश्यक शासकीय सेवेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानादिवशी पदीय कर्तव्य बजावत असल्याने प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून मतदान करता येत नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोस्टल मतदानाची सुविधी उपलब्ध करून दिली आहे. याबाबतची अधिसूचना व नमुना फॉर्म 12 D सांगली जिल्ह्याच्या sangli.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी याचा लाभ घेवून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अत्यावश्यक शासकीय सेवेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानादिवशी पदीय कर्तव्य बजावत असल्याने प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून मतदान करता येत नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोस्टल मतदानाची सुविधी उपलब्ध करून दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 19 मार्च 2024 रोजी प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 32 अत्यावश्यक शासकीय सेवेमधील जे अधिकारी, कर्मचाऱी मतदानादिवशी कर्तव्य बजावत असतील त्यांना पोस्टल मतदानाची सुविधा दिली आहे. अत्यावश्यक सेवेमधील आस्थापना पुढीलप्रमाणे - मेट्रो, रेल्वे ट्रान्सपोर्ट (पॅसेंजर आणि Freight) सर्व्हिसेस, ज्या प्रसारमाध्यमांना मतदान दिवसातील प्रक्रिया कव्हर करण्यासाठी आयोगाच्या मान्यतेने अधिकृत पत्रे जारी करण्यात आली आहेत ते प्रसारमाध्यम प्रतिनिधी, इलेक्ट्रीसिटी डिपार्टमेंट, बीएसएनएल, पोस्ट आणि टेलिग्राम, दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ, स्टेट मिल्क युनियन ॲण्ड मिल्क कोऑपरेटिव्ह सोसायटी, हेल्थ डिपार्टमेंट, फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ॲव्हीएशन, रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, फायर सर्व्हिसेस, ट्राफिक पोलिस, ॲम्बुलन्स सर्व्हिसेस, शिपींग, फायर फोर्स, जेल, एक्साईज, वॉटर ॲथॉरिटी, ट्रेझरी सर्व्हिसेस, फॉरेस्ट, इन्फॉर्मेशन ॲण्ड पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट, पोलीस, सिव्हील डिफेन्स ॲण्ड होम गार्ड, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार, पॉवर, भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, डिपार्टमेंट ऑफ पीडब्लूडी, एमटीएनएल. 00000

गुरुवार, २१ मार्च, २०२४

स्वीप अंतर्गत येत्या 27 मार्च रोजी सर्व तालुक्यांत सायकल रॅलीचे आयोजन

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : येत्या सात मे रोजी लोकशाहीचा उत्सव पार पडत आहे. या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी स्वीप मोहिमेअंतर्गत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नाचे फलित म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश मतदानाची टक्केवारी वाढावी असा असून या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह सांगली शहरामध्ये, दि. 27 मार्च रोजी सकाळी 7 वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला विश्राम बाग येथून प्रारंभ होणार असून कर्मवीर भाऊराव पाटील चौक, राममंदीर या ठिकाणा वरून मार्गक्रमण करत भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे या रॅलीची सांगता होणार आहे. या रॅलीला प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 18 वर्षापुढील सर्वांनी या सायकल रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन स्वीपचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले आहे. 00000

वय वर्ष फक्त 103 ..! - छे . . ! छे . . ! मी घरून मतदान करणार नाही तर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊनच मतदान करणार

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : पांढरपेशा . . . सुशिक्षित वर्गामध्ये मतदान करण्याविषयी फारशी रुची दिसून येत नाही. मात्र अशाही स्थितीत काहीजण प्रकाशाचा किरण बनतात. असाच एक किरण ...शिराळामध्ये आहे. नाव महादेव दंडगे (स्वातंत्र सैनिक ) वय वर्ष फक्त 103. या वयात ही देशप्रेम .. कणखरता . . जिद्द या शब्दांनी ओतप्रोत भरलेल. एक समृद्ध, सफल आयुष्य. ही गोष्ट आहे एका देशप्रेमी मतदाराची. शिराळा मतदार संघ विधानसभेला सांगली जिल्ह्याशी तर लोकसभेला कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदार संघाशी जोडलेला. या मतदारसंघाची पाहणी करण्यासाठी तेथील निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे हे गेले होते. सोबत शिराळ्याच्या तहसीलदार श्यामला खोत या ही सोबत होत्या. यंदा निवडणूक आयोगाने 85 वर्षांपुढील तसेच अंध मतदारासाठी विशेष बाब म्हणून घरातूनच मतदान करण्याची सोय या निवडणुकीत केली आहे. निवडणूक आयोगाच्या या मतदान उपक्रमाबाबत माहिती सांगण्यासाठी श्री. शिंदे यांनी शिराळाचा दौरा केला. यावेळेस त्यांना या ठिकाणी श्री. दंडगे नावाचे स्वातंत्र्य सैनिक (वय -103 )असल्याचे समजले. त्यांची श्री. शिंदे यांनी आपुलकीने भेट घेत घरून मतदान करण्याबाबत सुचित केले. त्यावर दंडगे यांनी स्मित हास्य करत सांगितले, छे . . ! छे . . ! मी घरून मतदान करणार नाही तर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊनच त्या ठिकाणी मतदान करणार. त्यांची ही जिद्द पाहून निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शिंदे ही क्षणभरासाठी थबकले . . . ! जर या 103 वर्षाच्या नवतरुण मतदाराचा आदर्श मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या नागरिकांनी घेतला तर ? 000000

जिल्हा कौशल्य विकास केंद्राकडून आज प्लेसमेंट ड्राईव्ह

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : खाजगी क्षेत्रात लहान मध्यम व मोठे उद्योजक तसेच कारखाने यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ व बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगलीच्या वतीने आज दि. 22 मार्च रोजी जिल्हास्तरीय प्लेसमेंट ड्राईव्ह-9 चे आयोजन सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत करण्यात आले आहे. या ड्राइव्हमध्ये तीन नामवंत कंपन्यांचा सहभाग असून एकूण 106 पदे भरण्यात येणार असून इच्छूक व पात्र उमेदवारांनी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सकाळी 10 ते 2 या वेळेत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत (तळमजला) जिल्हाधिकारी कार्यालय परिसर विजयनगर - सांगली या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे. 00000

शासकीय सुट्टीच्या दिवशीही मुद्रांक कार्यालय सुरू राहणार

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी एक एप्रिलला वार्षिक मूल्य दरानुसार नवीन दर जाहीर केले जातात. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन दिनांक 23 व 24 मार्च तसेच 29 ते 31 मार्च या शासकीय सुट्टीच्या दिवशी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंध कार्यालये या दिवशी सुरू राहणार असल्याची माहिती सहाय्यक जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे - जिरंगे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पक्षकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. 00000

भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्थापनेबाबत आवाहन

सांगली दि. 20 (जि.मा.का.) : सध्या कार्यरत असलेल्या जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या 2 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असल्याने नव्याने जिल्हा व तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची स्थापना करावयाची आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील इच्छुकांनी आपले स्वतःचे नाव, पत्ता, वय, शैक्षणिक पात्रता, तसेच कोणत्या गटातून शिफारस करण्यात येत आहे तो गट अथवा प्रवर्ग या सर्व आवश्यक कागदपत्रांसह 22 मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत. सदर अर्जाचा नमुना प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. इच्छुकांनी भरलेले परिपूर्ण अर्ज sgysangli@gmail.com या ईमेलवर पाठवावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सांगली यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 00000

बुधवार, २० मार्च, २०२४

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने 14,633 जाहिराती हटविल्या

सांगली दि. 20 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीला प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगाने निवडणूक जाहीर झाल्यापासून २४ तासाच्या आत शासकीय इमारती अथवा कार्यालयाच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर, पेपर, कटआउट, होर्डिंग्ज, जाहिरातींचे फलक, बॅनर्स प्रशासनाने हटवली असून याची संख्या सुमारे ५ हजार ५९ इतकी आहे. तसेच ४८ तासांमध्ये सार्वजनिक मालमत्ता व जागेच्या गैरवापर दूर करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने ६ हजार ४०१ जाहिराती काढल्या. तर ७२ तासांमध्ये खाजगी मालमत्तेवरील सुमारे ३ हजार १७३ इतक्या जाहिराती आत्तापर्यंत काढून टाकण्यात आल्या. आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणाने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने एकंदरीत सुमारे 14 हजार 633 इतक्या जाहिराती काढून टाकल्या आहेत. 000000

निवडणूक अनुषंगाने आता एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मिळणार विविध परवाने

सांगली दि. 20 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कामांकरिता विविध राजकीय पक्ष व उमेदवार यांना आचारसंहिता कालावधीत द्यावयाच्या विविध परवानग्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यास्तरावर आजपासून एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे. सांगली लोकसभा मतदार संघासाठी सदरचा कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय सांगली (तळमजला ) येथे कार्यरत करण्यात आला आहे. तर त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर ही एक खिडकी कक्षामधून परवाने देण्यात येतील. एकापेक्षा अधिक विधानसभा मतदार संघाकरिता वाहन परवाना, रॅली, मिरवणूक परवाना आदी बाबींचा यामध्ये समावेश राहणार आहे. सुविधा पोर्टलवर तसेच प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या अर्जाबाबत Encore पोर्टलच्या माध्यमातून परवानगी देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यातील 281-मिरज विधानसभा मतदार संघासाठी - पंचायत समिती मिरज, 282-सांगली - सांगली महानगरपालिका, 285 पलूस -कडेगाव - उपविभागीय कार्यालय कडेगाव, 286-खानापूर - तहसिल कार्यालय विटा, 287 - तासगाव - कवठे महांकाळ - प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय तासगाव व 288-जत विधानसभा मतदारसंघासाठी नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय जत या ठिकाणी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदार संघाचा समावेश नाही. जाहीर /कॉर्नर सभा, मेळावे, मिरवणुका, रोड – शो, रॅलीज, वाहन परवाना इत्यादींच्या अनुषंगाने संबंधित राजकीय पक्षाच्या लेटर हेडवर त्या संबंधित राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा अर्ज व उमेदवार यांच्या बाबतीत उमेदवाराच्या स्वतःच्या सहीचा अर्ज किंवा उमेदवाराचा अधिकृत निवडणूक प्रतिनिधीच्या सहीचा अर्ज सदर कक्षामध्ये स. 10 ते सायं 5 या वेळेत सुट्टीच्या दिवशीही स्विकारण्यात येतील. मीटिंग, सभा, रॅली आदीच्या परवानगीसाठी किमान 2 दिवस अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच suvidha.gov.eci.in या पब्लिक पोर्टलवर ही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असून विविध परवानगी देण्याच्या अनुषंगाने अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे, फी आदीबाबत सविस्तर माहिती sangli.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 00000

रविवार, ३ मार्च, २०२४

मुलांनी मोबाईल ऐवजी मैदान जवळ करावे - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 3 (जि.मा.का.) : हल्ली मुले मोबाईलमध्ये खूप गुंतली आहेत. या मोबाईल ऐवजी मुलांनी मैदान जवळ केल्यास त्यांच्या आरोग्यासाठी ते अधिक चांगले होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. निमित्त होते विश्रामबाग येथील महासंस्कृती महोत्सवातर्गंत, ' यलो सांगली हॅपी स्ट्रीट ' या कार्यक्रमाचे . . . जीवनातील टेन्शन, चिंता, काळजी या सारख्या शब्दाला पूर्ण विराम देण्याच्या उद्देशाने या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. या उपक्रमाला पालकमंत्र्यांनी अचानक भेट दिली. तेथील संपूर्ण वातावरण पाहिल्यानंतर पालकमंत्रीही क्षणभरासाठी आपल्या बालपणीच्या कालखंडात रंगून गेले. उपस्थित स्थानिक कलावंताशी त्यांनी अतिशय आत्मियतेने संवाद साधला. तसेच ' नंदीबैल - मालकास 'छोटीशी बक्षिसीही अदा केली. सकाळी ८ ते ११ या वेळेत पार पडलेल्या या हॅपी स्ट्रीट उपक्रमामध्ये बालकांबरोबर - पालक ही आपले वय विसरून सहभागी झाले होते. या हॅपी स्ट्रीट उपक्रमात बालपणीच्या सर्व आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले. बाळ गोपाळांना आनंद देणारा मिकी माऊस, काचेच्या गोट्या, लघोर, घोडेस्वारी, योगासने, लेझीम, झांज, युद्ध कलेची प्रात्यक्षिके, झुंबा डान्स, गायन, मिमिक्री त्याचबरोबर उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कोणताही कलाप्रकार सादर करावा याची मुभा सादरकर्त्यांना यावेळी देण्यात आली होती. त्यालाही नागरिकांनी गायन व नृत्याच्या रूपाने प्रतिसाद दिला. याप्रसंगी बैलगाडी, घोडेस्वारीची सफर मुलांनी अनुभवली तर नंदी बैलाची मोठी शिंगे बघून बाल चमू अचंबित झाला. स्वतःचे वय विसरायला लावणाऱ्या या जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमाबाबत उपस्थितांच्या चेहऱ्यावर 'आनंदरेषा' न उमटल्या तर नवलच . . ! शेवटी उपस्थितांचे आभार निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी मानले. उद्या दि. 4 मार्च (सोमवार) रोजी महासंस्कृती महोत्सवात सादर होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे – (1) सायंकाळी ५.३० ते ७ लोककला / शाहीर (सांगली परिसरातील लोककलाकारांचे सादरीकरण), (2) सायंकाळी ७ ते ९.३० आपली संस्कृती (परंपरा जपणाऱ्या लोककलांचा अविष्कार). oooooo

शुक्रवार, १ मार्च, २०२४

महासंस्कृती महोत्सवाचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

सांगली दि. 1 (जि.मा.का.) : राज्यातील विविध संस्कृतीचे आदान - प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती त्याचबरोबर लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने दि. 2 ते 6 मार्च या कालावधीत कल्पद्रुम मैदान नेमिनाथ नगर सांगली येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 2 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते होणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी मोफत असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दिनांक 2 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता गर्जा महाराष्ट्र (अभिनेत्री निवेदक - पूर्वी भावे, सेलेब्रिटी गायक (अभंग)- ज्ञानेश्वर मेश्राम, भरतनाट्यम नृत्य - धनश्री आपटे आणि शिष्यांगणा, मर्दानी खेळ, मल्लखांब प्रात्याक्षिक, गजी नृत्य, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा कार्यक्रम होणार आहे. 00000