गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : व्यापक पध्दतीने साजरा करा कार्यक्रमांचा सविस्तर आराखडा 15 नोव्हेंबर पर्यंत सादर करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्याला स्वातंत्र्य लढ्याचा दैदीप्यमान, गौरवपूर्ण वारसा लाभलेला आहे. देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्या निमित्त देशभरात आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्ह्यात अधिक व्यापक पध्दतीने साजरा करण्यासाठी सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करावे. यामध्ये प्राधान्याने अंमलात आणावयाचे उपक्रम, योजना, कार्यक्रम याबाबतचा सविस्तर आराखडा 15 नोव्हेंबर पर्यंत जिल्हा प्रशासनास सादर करावा. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाबाबत आयोजित आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, सर्व प्रातांधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत राबविण्यात येणार आहे. हा महोत्सव अधिक व्यापकपणे साजरा करण्यासाठी नवनविन संकल्पना राबविण्यात याव्यात. त्याचबरोबर शासनाकडून प्राप्त झालेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो प्राधान्याने सर्व कार्यालयांनी दर्शनी भागात लावावा. तालुकास्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना करावी. या समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात यावेत. या उपक्रमात सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, संकल्पक व्यक्ती यांचा सहभाग घ्यावा. ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत स्तरावरही समित्यांची स्थापना करावी व दरमहा या विषयाचा आढावा घेण्यात यावा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आत्तापर्यंत विविध विभागांनी राबविलेल्या उपक्रमांची माहिती छायाचित्रासह विहीत नमुन्यात द्यावी. तसेच १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे नियोजनही 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत विहीत नमुन्यात द्यावे. सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वातंत्र्य चळवळी संबंधित असणारी स्मारके, हुतात्मा स्मारके सुस्थितीत ठेवावीत. त्यांच्या दुरूस्तीसाठी निधी आवश्यक असल्यास प्रस्ताव त्वरीत सादर करावेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दर्जेदार आरोग्य, पर्यटन संधी, युवा शक्ती, सामाजीक न्याय, सामाजिक सलोखा, कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान, सुशासन, माझी वसुंधरा, अर्थ साक्षरता, रोजगार निर्मीती, चिरंतन विकास, महिलांचा वाढता सहभाग, सांस्कृतिक निर्देशांक वाढ या विषयांवर प्राधान्याने वैविध्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात. याबरोबरच स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हेरीटेज वॉक, सायकल रॅली, पथनाट्य, चर्चासर्त्रे, परिसंवाद, प्रदर्शने, मेळावे, लोककला, अभिजात कला, ‍निबंध स्पर्धा यांच्या माध्यमातून लोकसहभागातून महोत्सवी वातावरण निर्माण करावे. स्वातंत्र्य लढ्यातील योगदान दिलेली व्यक्तीमत्वे, वारसा स्थळे अशा ठिकाणी पदयात्रांचे आयोजन व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने शाळा, महाविद्यालयांमध्ये वातावरण निर्मिती करावी. मॉडेल स्कूल, क्रीडा विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या सर्वांचा सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ०००००

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत 91 हजार 464 शेतकऱ्यांना 14 कोटी 55 लाख रूपये वितरण

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा यंत्रणा, राष्ट्रीयीकृत/ग्रामीण/खाजगी बँकांकडून एक लाख रूपयांपेक्षा जास्त पण 3 लाख रूपये पर्यंतचे अल्पमुदती पीक कर्ज घेणाऱ्या आणि विहीत मुदतीत परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर उत्पादन प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. या योजनेंतर्गत सन 2019-20 ते सन 2021-22 पर्यंत जिल्ह्यातील एकूण 91 हजार 464 शेतकऱ्यांना 14 कोटी 55 लाख 7 हजार 584 रूपये रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत 3 लाखांपर्यंत अल्पमुदती पीक कर्ज घेणाऱ्या आणि विहीत मुदतीत (प्रत्येक वर्षी 30 जूनपर्यंत अथवा शासनाने अपवादात्मक परिस्थितीत कर्ज परतफेडीस मुदत वाढ दिली असल्यास तो दिनांक) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रूपयांपर्यंत 3 टक्के व 1 लाख रूपयांपेक्षा जास्त पण 3 लाखांपेक्षा कमी रकमेवर 1 टक्के वार्षिक दराने व्याजाची सवलत देण्यात येते. सन 2021-22 पासून 3 लाखापर्यंतच्या अल्पमुदती पीक कर्जास 3 टक्के प्रमाणे व्याज सवलत लागू करण्यात आली आहे. यासाठी तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडून वि.का.स. संस्था अथवा राष्ट्रीयीकृत/ग्रामीण/खाजगी बँकांच्या शाखांकडून पात्र सभासद शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली यांच्या कार्यालयास प्राप्त होतात. तद्नंतर सदर योजनेकरिता प्राप्त झालेल्या निधीतून कोषागाराकडून बील मंजूर झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर व्याज सवलतीची रक्कम जमा करण्यात येते. या योजनेंतर्गत सन २०१९-२० ते सन २०२१-२२ पर्यंत वर्षनिहाय लाभ दिलेली शेतकरी संख्या व कंसात रक्कम पुढीलप्रमाणे. सन 2019-20 - 42 हजार 462 (6 कोटी 55 लाख 59 हजार 161 रूपये), सन 2020-21 - 21 हजार 557 (2 कोटी 99 लाख 88 हजार 155 रूपये), सन 2021-22 - 27 हजार 445 (4 कोटी 99 लाख 60 हजार 268 रूपये), अशा एकूण 91 हजार 464 शेतकऱ्यांना 14 कोटी 55 लाख 7 हजार 584 रूपये रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे. 00000

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

जिल्ह्यात शिवभोजन केंद्रातून आत्तापर्यंत 22 लाख 63 हजारांहून अधिक थाळ्यांचे वाटप

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाने शिवभोजन योजना सुरू केली. त्यानुसार सांगली जिल्ह्यात 26 जानेवारी 2020 रोजी शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. आजमितीस सांगली जिल्ह्यात सांगली, मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 20 व तालुका स्तरावर 18 अशी एकूण 38 शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. जिल्ह्याचा शिवभोजन योजनेचा नियमित इष्टांक 4825 इतका असून जिल्ह्यातील सर्व शिवभोजन केंद्रातून दि. 26 जानेवारी 2020 ते दि. 08 नोव्हेंबर, 2021 अखेर एकूण 22,63,429 थाळ्याचे वाटप झालेले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दि. 1 एप्रिल, 2020 पासून दि. 13 एप्रिल, 2021 पर्यंत शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना 5 रु. प्रतिथाळी प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आली. या काळात 10 लाख 46 हजार 392 इतक्या लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. दि. 15 एप्रिल, 2021 पासून दि. 30 सप्टेंबर, 2021 पर्यंत दीडपट इष्टांक तसेच मोफत प्रमाणे शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या काळात 9 लाख 48 हजार 268 इतक्या लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. दि. 01 ऑक्टोंबर, 2021 पासून शिवभोजन थाळी मूळ इष्टांकासह 10 रु. प्रतिथाळी प्रमाणे लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. 00000