शनिवार, २९ मे, २०२१

गंभीर संसर्ग असणाऱ्या कोरोना रूग्णावर उपचारास नकार दिल्यास कठोर कारवाई - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : कोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या रूग्णास रूग्णालयात बेड शिल्ल्क असतानाही दाखल करून घेतल्या जात नसल्याची तक्रारी जिल्ह्यातून येत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना रूग्णाला उपचार नाकारणाऱ्या अथवा टाळाटाळ करणाऱ्या रूग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपअधिष्ठाता डॉ. प्रदिप दीक्षित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, महानगरपालिका उपायुक्त राहूल रोकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात जवळपास साडेसहा ते सात हजार कोरोना स्वॅब टेस्टींग करण्यात येत आहे. पॉझिटीव्हीटी रेट टप्प्याटप्प्याने कमी होत असून तो सद्या 17.35 वर आलेला आहे. होम आयसोलेशनमध्ये सुमारे 8 हजार 500 तर कम्युनिटी आयसोलेशनमध्ये 1 हजार 650 रूग्ण आहेत. लॉकडाऊनचा चांगला परिणाम पॉझिटीव्हीटी रेट कमी होत असल्याच्या माध्यमातून दिसून येत आहे. सर्वांनी संसर्ग टाळण्यासाठी यापुढेही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 4 हजार 320 बेड संख्या असून यामध्ये 861 आयसीयु मधील बेड्सची तर 3 हजार 459 ऑक्सिजनेटेड बेडची संख्या आहे. आयसीयु बेडची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने शासकीय इमारती वापरात आणाव्यात त्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्यासह सर्व उपचार यंत्रणा सज्ज ठेवावी. आयसीयु मध्ये काम करण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सना आवश्यकतेनुसार ट्रेनिंग द्या. कोणत्याही स्थितीत रूग्ण दगावू देणार नाही अशी जिद्द त्यांच्यात निर्माण करा. तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा आत्तपासूनच सुसज्ज ठेवा. या लाटेचा लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेवून उपचारासाठी लागणारी औषधे वेळेत खरेदी करून ठेवा. या संदर्भात निर्माण करण्यात आलेल्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्कफोर्सच्या सुचनांनुसार सर्व कार्यवाही करा. कोविड रूग्णांसंबधीची सर्व माहिती पोर्टलवर अद्ययावत ठेवावी. सर्व वॉर्डमध्ये कॅमेरे बसविण्यात यावेत व ते पोर्टलला जोडण्यात यावेत. बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम अधिक सक्षम करा, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील नादुरूस्त व्हेंटीलेटर्स बाबत आढावा घेवून सदरचे व्हेंटीलेटर्स त्वरीत दुरूस्त करून घ्या असे सांगून जिल्ह्यात जे ऑक्सिजन प्लाँट उभारणी प्रक्रियेत आहेत त्यांची कामे गतीने पूर्ण करून घ्या, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. फळ, भाजीपाला व्यापाऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल पण कोरोना संसर्गाची ही वेळ अशी आहे की, सर्वांनीच यामध्ये संयमाने सहकार्य करणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या निर्देशास अनुसरून जिल्ह्यातही निर्णय घेतला जाईल, असेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी बालरोग तज्ज्ञांच्या टास्कफोर्सच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी महानगरपालिकेने कम्युनिटी आयसोलेशनसाठी यंत्रणा वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले. 000000

गाव कोरोना मुक्त करण्यासाठी दक्षता समित्यांनी कडक भूमिका घ्यावी - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गाव कोरोना मुक्त करण्यासाठी ग्राम दक्षता समित्यांनी कडक भूमिका घ्यावी, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. पंचायत समिती पलूस येथे कोविड-19 आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पंचायत समिती सभापती दिपक मोहिते, कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रागिणी पवार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अधिक पाटील, गटविकास अधिकारी डॉ. स्मीता पाटील यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी व विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने जारी केलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या ज्या पॉझिटीव्ह रूग्णांना हॉस्पीटलमध्ये ॲडमीट होण्याची गरज भासत नाही, अशा रूग्णांना त्यांच्या घरी सोय असेल तर होम आयसोलेट करावे. ज्यांच्या घरी होम आयसोलेशनची सोय होवू शकत नाही अशा रूग्णांना विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेल्या ठिकाणी ठेवावे. कोणत्याही स्थितीत कोरोनाचा प्रसार होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. दक्षता समित्यांनी याबाबत अधिक सतर्क राहून कामकाज करावे, अशा सूचना करून पलूस तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असल्याचे ते यावेळी म्हणाले. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, पॉझिटीव्ह रूग्ण बाहेर फिरू नये यासाठी दक्षता समित्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टींग यावर भर द्यावा. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रूग्णांबाबत कोरोनाची लक्षणे दिसत असणाऱ्या रूग्णांची माहिती तात्काळ प्रशासनास द्यावी. गरजू रूग्णांना बेड्स उपलब्धतेबाबतची माहिती द्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड यांनी पलूस तालुक्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर सादरीकरण केले. 000000

कोरोना रूग्णांची जास्त संख्या असलेल्या गावात निर्बंधांचे काटेकोरपणे पालन होण्याबाबत पोलिस विभागाने दक्षता घ्यावी - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ज्या गावात कोरोना बाधित रूग्णांची संख्या जास्त आहे, अशा प्रत्येक गावात प्रशासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधांचे काटेकोरपणे पालन होण्याबाबत पोलिस विभागाने अधिक सतर्कता बाळगून दक्षता घ्यावी, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. कडेगाव येथील तहसील कार्यालयात कोविड-19 आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार मोहनराव कदम, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड, उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, नगराध्यक्षा संगीता राऊत, मुख्याधिकारी कपिल जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वूमीवर शासन व प्रशासन सर्वोतोपरी काम करीत आहे. नागरिकांनीही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने जारी केलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी कडेगाव तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांची सद्यस्थिती, उपलब्ध बेड्स, उपचार सुविधा, लसीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, दक्षता समितीचे कामकाज याबाबत सविस्तर आढावा घेवून कडेगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग, पॉझिटीव्ह रूग्णांचे अलगीकरण यावर भर द्यावा. लसीकरणाचे योग्य नियोजन करावे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घ्यावी. यावेळी तालुकास्तरावर सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेसाठी कडेगाव व्यापारी असोसिएशनतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन सुपूर्द करण्यात आली. यावेळी कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड यांनी तालुक्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर सादरीकरण केले. 00000

शुक्रवार, २८ मे, २०२१

संभाव्य पूरपरिस्थितीच्या मुकाबल्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने सज्जता ठेवावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

संभाव्य पूरपरिस्थितीच्या मुकाबल्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने सज्जता ठेवावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी - आरोग्य विभागाने संभाव्य पूरस्थितीत लसीकरण मोहिम थांबू नये यासाठी पर्यायी जागा निश्चित करावी. - जलसंपदा विभागाने कर्नाटकातील अलमट्टी व कोल्हापूर, सातारा येथील धरण व्यवस्थापन यंत्रणांशी समन्वय ठेवावा. - सार्वजनिक बांधकाम विभागाने पुरामुळे पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी बॅरीकेटींग, रिफलेक्टर अशी संबंधित साधनसामग्री तयार ठेवावी. सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : हवामान विभागाने 98 ते 103 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे संभाव्य पूरपरिस्थिती उद्भविल्यास जिल्ह्यात पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधित विभागातील यंत्रणांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करावेत. तसेच आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवावी, असे, निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता मिलींद नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार तसेच प्रांताधिकारी, तहसिलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोना परिस्थितीत सर्व प्रशासन अहोरात्र काम करीत आहे. कोरोना परिस्थितीबरोबरच संभाव्य पूर परिस्थितीही हाताळणे ही अत्यंत महत्वाचे काम आहे. त्यासाठी कोणीही गाफील न राहता सतर्क राहून कामकाज करावे. तालुकास्तरावरील आपत्ती निवारण आराखडे सज्ज ठेवण्यात यावेत. जिल्हा प्रशासनामार्फत पुरविण्यात आलेले साहित्य यांचीही तज्ज्ञांकडून तपासणी करावी. आवश्यकता भासल्यास त्याची तातडीने दुरूस्तीही करून घ्यावी. जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या 104 पूरबाधित गावातील पूर आराखडे यांचे अवलोकन करून यामध्ये त्रुटी असल्यास त्या दुरूस्तीबाबतची कार्यवाही करावी. आपत्ती बाबतच्या रंगीत तालमी तातडीने घेण्यात याव्यात. बाधीत क्षेत्रात बोट चालविणाऱ्या व्यक्तींना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात यावे. संबंधित विभागाचे नियंत्रण कक्ष 24 x 7 सुरू राहण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात. तसेच जिल्ह्यातील सर्व पाणी साठवण तलाव याची तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पाटबंधारे विभागाने संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करावे. कोयना धरणावर जलसंपदा विभागामार्फत सर्कल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. या संबंधित अधिकाऱ्यांकडे संपर्काची अद्ययावत यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो. त्यामुळे कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग व त्याचा सांगली जिल्ह्यावर होणारा परिणाम याची शास्त्रशुध्द माहिती प्रशासनाला तात्काळ मिळणे अनिवार्य आहे. कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाच्या व्यवस्थापनाशी सतत संपर्क ठेवावा. तसेच कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील विविध धरणे व सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल दर दोन तासांनी माहिती देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत ठेवा. या काळात धरणातील पाणीसाठा, धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, धरणातील विसर्ग, नदीतील पुराची पातळी आणि त्यामुळे पाण्याखाली येणारी गावे तसेच भाग याची सविस्तर माहिती पाटबंधारे विभागाने जनतेसाठी वेळोवेळी द्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून घ्यावेत. यापूर्वी पाण्यामुळे जिल्ह्यातील जे रस्ते बंद झाले होते त्याची यादी तातडीने तयार करावी. पूरामुळे पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी बॅरीकेटींग, रिफलेक्टर अशी संबंधित साधनसामग्री तयार ठेवावी. त्यामुळे संभाव्य धोके टळतील त्यामुळे जीवित हानीचा धोका टळेल. रस्त्यावर झाडे पडल्यामुळे तसेच रस्ता खचून वाहतूक बंद होणार नाही याबाबतची यंत्र सामग्री सज्ज ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने या काळात पाण्याखाली गेलेले रस्ते, पूल यांची माहिती देवून ज्या पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आलेली आहे त्याची माहिती जनतेला द्यावी. महाराष्ट्र जीवनप्राधिकरण आणि जिल्हा परिषदेची ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा यांनी पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नियोजन करावे. संभाव्य आपत्तीचा यशस्वी सामना करण्यासाठी साधनसामुग्रीची सज्जता असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने महसूल विभागाकडील साहित्य सुस्थितीत असल्याबाबत तहसिलदारांनी तर ग्रामपंचायती व महानगरपालिकेकडील साहित्याबाबत संबंधित यंत्रणांनी वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. बीएसएनएलने लँडलाईन, इंटरनेट आणि मोबाईल यंत्रणा सक्षमपणे सुरू रहावी यासाठी आत्ताच आवश्यक ती तजवीज ठेवावी व त्यांची रंगीत तालीम घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूम, महानगरपालिकेकडील आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूम पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे. महानगरपालिकेनेही वार्डनिहाय आपत्ती व्यवस्थापन दल तयार करावे. बोटी व अन्य आवश्यक सामग्री सज्ज ठेवावी. धोकादायक निवासी व शाळेच्या इमारतीबाबत वेळीच कार्यवाही करावी. तसेच, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पूरबाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याबाबतही आवश्यक नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, संभाव्य पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करणे आवश्यक ठरल्यास निवारागृहांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी पूरबाधीत गावांमध्ये जादा निवारागृहांची उपलब्धता ठेवा. अतिवृष्टीच्या काळात जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री होऊ नये यासाठी पुरवठा विभागाने पथके तैनात ठेवावीत. आरोग्य विभागामार्फत कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणाची मोहिम सुरू असून संभाव्य पूरपरिस्थितीत लसीकरण थांबू नये यासाठी लसीकरण केंद्रे उभारण्यासाठी पर्यायी जागा निश्चित करावी. तसेच कोविड केअर सेंटर, संस्थात्मक अलगीकरण इतर ठिकाणी हलविण्याची आवश्यकता भासल्यास पर्यायी जागा निश्चित करावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, आरोग्य विभागाने संभाव्य पूर परिस्थितीत आवश्यक ती आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. साथीच्या रोगाबाबत सर्तकता बाळगावी. तसेच पूरपरिस्थिती, वादळी वारे, साथीचे रोग, पर्यायी मार्ग, तात्पुरता निवारा, औषध साठा, अन्न-धान्य वितरण, वाहतूक व कायदा सुव्यवस्था, विद्युत पुरवठा, पशुधनाचे लसीकरण व औषधाचा साठा या बाबतीत संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. तसेच कृषि विभागाने स्वयंचलित हवामान केंद्रे याबाबतची तपासणी करावी व खते, बी-बियाण्यांचे योग्य नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी बैठकीची माहिती सांगून संभाव्य पूर परिस्थितीबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 00000

शुक्रवार, २१ मे, २०२१

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती 1098 क्रमांकावर कळवा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधर

ी जिल्हास्तरावर टास्क फोर्स स्थापन सांगली दि. 21 (जि.मा.का.) : कोविड-19 आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांबाबत विहीत प्रपत्र तयार करून, अशा बालकांची माहिती प्राप्त करून महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे तातडीने द्यावी. कोविड-19 आजाराकरिता रूग्णालयात दाखल होतेवेळी बालकाचा ताबा कोणाकडे द्यावा ही माहिती रूग्णांकडून भरून घेण्यात यावी. अशा प्रकारच्या मुलांची माहिती बालकांचे शुभचिंतक या दृष्टीने चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 व बाल कल्याण समिती सांगली यांना संपर्क करून कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाची (टास्क फोर्स) बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सींगव्दारे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विश्वास माने, महानगरपालिका उपायुक्त राहूल रोकडे, बाल कल्याण समिती अध्यक्षा सुचेता मलवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बी. टी. नागरगोजे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे एस. एच. बेंद्रे आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड-19 प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आले आहे. कोरोनामुळे जीव गमवलेल्या पैकी अनेक व्यक्तींची मुले 18 वर्षाखालील असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा परिस्थितीत मुलांचे संगोपण व संरक्षण होणे खूप गरजेचे आहे. चाईल्ड हेल्पलाईन 1098 बाबतचा माहिती फलक सर्व रूग्णालयात दर्शनी भागात लावण्यात यावे. कोविड-19 आजाराने पालक गमावलेल्या बालकांना इतर नातेवाईक सांभाळण्यास तयार आहेत किंवा कसे तसेच बालगृहात दाखल करणे आवश्यक आहे किंवा कसे याबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून योग्य ती कार्यवाही करावी. जिल्ह्यात कार्यरत निरीक्षणगृह / बालगृहांना नियमित भेटी देवून सर्व प्रवेशितांची नियमित वैद्यकीय तपासणी होत आहे का याची माहिती घ्यावी. बालकांच्या आरोग्याबाबत दैनंदिन आढावा घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. कोरोनामुळे मृत झालेल्या पालकांच्या बालकांना मदत करण्यासाठी शासनाने चाईल्ड हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत. या नंबरवर बालकांची माहिती वेळेत प्राप्त झाल्यास त्यांची काळजी व संरक्षणासंबंधी पुढील कार्यवाही करणे शक्य होणार आहे. चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 तसेच आयुक्त महिला व बाल विकास विभाग पुणे 8308992222 / 7400015518, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी 0233-2600043, अध्यक्ष बाल कल्याण समिती सांगली 9890837284, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (समन्वयक) 7972214236 / 9552310393 आदि हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे एस. एच. बेंद्रे यानी जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या कृती दलाची सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्राम बाल संरक्षण समिती मधील अंगणवाडी सेविका यांच्या सहाय्याने बालकांच्या पालकांना संपर्क साधून आवश्यक मदत पुरविण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. 00000

कृषि उत्पन बाजार समितीमधून किराणा साहित्य विक्री रविवारपासून बंद - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिनांक 19 मे सकाळी 7 वाजल्या पासून 26 मे सकाळी 7 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेशांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दि. 19 ते 22 मे या कालावधीमध्ये सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त किराणा साहित्याचे घाऊक विक्रेते यांच्याकडून फक्त किरकोळ किराणा विक्रेते यांना खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली होती. हे व्यवहार रविवार, दिनांक 23 मे 2021 पासून बंद राहतील, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्‍ट केले आहे. दिनांक 19 ते 26 मे 2021 या कालावधीत किरकोळ किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते यांना सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत ग्राहकांना फक्त घरपोच सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. किरकोळ किराणा विक्रेत्यांना किराणा साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी 19 ते 22 मे 2021 या कालावधीत सकाळी 7 ते 11 या वेळेत कृषि उत्पन्न बाजार समितीमधून या साहित्याच्या घाऊक विक्रेत्यांना फक्त किरकोळ किराणा विक्रेत्यांना माल विक्रीची परवानगी देण्यात आली होती. 00000

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागासाठी पोस्ट विभागाची बँकिंग सुविधा

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : संचारबंदीमुळे बऱ्याच नागरिकांची बँक खात्यावर पैसे भरणे अथवा काढणे यासारख्या आवश्यक सेवा उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होते. तसेच या व्यवहारांसाठी संबंधित नागरिकाने प्रवास केला अथवा बँकेमध्ये गर्दी केल्यास त्याच्या स्वत:च्या आणि पर्यायाने त्याचे कुटुंब आणि ग्रामस्थ यांना कोरोना प्रसाराचा धोका निर्माण होऊ शकतो. पोस्ट ऑफिसेसची सुविधा बहुतेक सर्व ग्रामीण भागात उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिसेसच्या विविध सुविधांचा वापर केल्यास बँकांमध्ये होणारी गर्दी कमी होवून कोरोना संसर्ग होण्याचा आणि प्रसाराचा धोका टळेल. नागरिकांनी पोस्ट विभागाच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांगली आयपीपीबी शाखेचे शाखा व्यवस्थापक यांनी केले आहे. शासकीय मदत निधी उदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, एकदा बँक खात्यावर वर्ग झाल्यास ते काढण्यासाठी बँकामध्ये प्रचंड गर्दी होण्याची संभव निर्माण होतो. जे सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत धोकादायक आहे. पोस्ट ऑफिसेसची सुविधा बहुतेक सर्व ग्रामीण भागात उपलब्ध आहे. AEPS या सुविधेचा वापर करुन गावातील नागरिक त्यांच्या इतर बँक खात्यामधील रक्कम काढू शकतात. तसेच डायरेक्ट मनी ट्रान्सफर (DMT) या सेवेचा वापर करुन इतर बँक खात्यावर पैसे भरण्याची सुविधाही पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. AEPS सुविधेमध्ये इतर कोणत्याही बँक खात्यामधून पैसे काढण्याची सुविधा (जिल्हा मध्यवर्ती बँक/स्थानिक सहकारी बँक सोडून) आहे. त्यासाठी बँक खात्याला आधार सीडींग आवश्यक असून एकावेळेस जास्तीत जास्त 10 हजार रुपये काढता येतात. एका दिवसात व्यवहाराची आणि रक्कमेची कमाल मर्यादा बँक नुसार बदलते. या सुविधेसाठी कोणत्याही प्रकारचे जादाचे शुक्ल आकारले जाणार नाहीत. आधार क्रमांक आणि मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे. DMT सुविधेमध्ये इतर कोणत्याही आणि कोणाच्याही बँक खात्यावर पैसे भरता येतात. KYC पुर्ण असेल तर एका वेळेस कमाल 25 हजार आणि KYC पुर्ण नसेल तर एका वेळेस कमाल 5 हजार रूपये भरण्याची सोय आहे. या सेवेसाठी व्यवहार रक्कमेच्या 1 टक्के किंपर 10 रुपये या पैकी जे जास्त आहे ती रक्कम शुल्क म्हणून आकारण्यात येईल. अधिक माहितीसाठी 0233-2324252 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांगली आयपीपीबी शाखेचे शाखा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

विविध कृषी पुरस्कारांसाठी 30 जून पर्यंत प्रस्ताव सादर करा - कृषी संचालक विकास पाटील

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अति उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्कार करुन सन्मानित करण्यात येते. तरी सर्व शेतकरी, शेतकरी गट/संस्था यांनी मार्गदर्शक सुचनांचे अधिन राहुन कृषि पुरस्कारासाठीचा आपला परीपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात दिनांक 30 जुन पर्यंत सादर करावा. विविध कृषि पुरस्कारांच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे आवाहन कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे चे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध कृषी पुरस्कार सन 2020 करीता मागविण्यात आले आहेत. यावर्षी नवीन शासन निर्णय क्रमांक कृपु-2020/ प्र.क्र12/4अे, मंत्रालय मुंबई-32, दि. 15 फेब्रवारी 2021 अन्वये विविध कृषी पुरस्कारांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे व काही अंशी निकषामध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनिय व नाविन्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांसाठी राज्यातील प्रत्येक कृषी विभागातुन एक याप्रमाणे एकुण आठ युवक शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार या वर्षापासून नव्याने देण्यात येणार आहे. कृषि विभागामार्फत देण्यात येणारे पुरस्कार, पुरस्काराची संख्या व पुरस्कार रक्कम अनुक्रमे पुढीलप्रमाणे. (१) डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार - 01 (राज्यातून एक), 75 हजार रूपये. (२) वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार - 08 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८), 50 हजार रूपये. (३) जिजामाता कृषिभुषण पुरस्कार - 08 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८), 50 हजार रूपये. (४) कृषिभूषण (सेंद्रिय शेती ) पुरस्कार - 08 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८), 50 हजार रूपये. (५) युवा शेतकरी पुरस्कार - 08 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८), 30 हजार रूपये. (६) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार - 08 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८), 30 हजार रूपये. (७) उद्यान पंडीत पुरस्कार - 08 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८), 25 हजार रूपये. (८) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार - ४० (सर्वसाधारण गटासाठी प्रति जिल्हा 1 याप्रमाणे ३४ आणि आदिवासी गटासाठी प्रति विभाग 01 याप्रमाणे ०६ असे एकूण 40), 11 हजार रूपये. (९) पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार - 09 (आठ कृषि विभागातून प्रत्येकी 01 अधिकारी/कर्मचारी याप्रमाणे 8 तसेच कृषि आयुक्तालय स्तरावरून एक अधिकारी/कर्मचारी याप्रमाणे एकंदर एकूण 9). अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक / कृषी पर्यवेक्षक / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन आयुक्त (कृषी ) यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे. 00000

अँबुलन्स चालकांनी जादा दराची आकारणी केल्यास अँबुलन्स कंट्रोल रूमकडे तक्रार करा - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : कोरोना बाधीत रूग्णांना उपचाराकरिता हॉस्पीटल पर्यंत पोहोचवणे व उपचारानंतर बरे झालेले रूग्ण घरी सोडण्याकरीता खाजगी मालकीच्या नोंदणी झालेल्या अँबुलन्स नागरीकांना माफक दरात व वेळेवर मिळाव्यात याकरीता जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे 12 एप्रिल 2021 पासून अँबुलन्स कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली आहे. अँबुलन्सचे चालक/मालक यांनी मंजुर भाडे दरापेक्षा जादा दराची आकरणी केल्यास, कंट्रोल रूमकडे 0233-2310555 या दूरध्वनर क्रमांकावर तक्रार दाखल करावी. तक्रारीत रूग्णाचे नाव, अँबुलन्सचा क्रमांक, कोठून कोठे असे प्रवास ठिकाण, प्रवासाचा दिनांक व वेळ इत्यादी नमुद करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी केले आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे 24 x 7 करीता अँबुलन्स कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली असून त्याचा दुरध्वनी क्रमांक 0233-2310555 आहे. या क्रमांकावर ज्या नागरिकांना खाजगी अँबुलन्सची आवश्यकता आहे, त्यांना संपर्क साधून अँबुलन्सचे बुकिंग करता येईल. अँबुलन्स बुकिंग केल्यानंतर संबंधित वाहन चालक / मालक यांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सांगली यांनी दि. 7 जुलै 2020 रोजीच्या बैठकीत पुढीलप्रमाणे मंजुर केलेल्या भाडेदराप्रमाणे भाडे अदा करावे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सांगली यांनी अँबुलन्स करीता मंजुर केलेले भाडेदर पुढीलप्रमाणे आहेत. मारूती व्हॅनसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 550 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 11 रूपये. टाटा सुमो / मारूती इको / मॅटेडोर सदृष्य वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 700 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 14 रूपये. टाटा 407/स्वराज माझदा / टेंपो ट्रॅव्हलर इत्यादी वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 900 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 18 रूपये. ALS/आय.सी.यु. वातानुकुलीत वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 1200 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 24 रूपये आहे. 00000

वैद्यकीय व औद्योगिक क्षेत्रात काम करण्यासाठी बेरोजगार उमेदवारांकरिता 27 व 28 मे रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा - सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम

इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी दि. 25 मे पर्यंत पसंतीक्रम नोंदवावा सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये कोविड-19 साथरोग अत्यंत वेगाने जनमानसात फैलावत असल्याने कोरोना हॉस्पीटल निर्माण होत आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात मनुष्यबळांची कमतरता भासत आहे. या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली या कार्यालयाच्या वतीने नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी विशेषत: वैद्यकीय क्षेत्रामध्ये व औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी दि. 27 व 28 मे 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम यांनी दिली. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर, नर्स, हाऊस किपींग, फार्मासिस, बेड साईड असीस्टंट, इर्मजन्सी मेडीकल असीस्टंट, इत्यादी पदे भरती करण्यांत येणार आहेत. तसेच औद्योगिक व सेवा क्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील सी.एन.सी ऑपरेटर, टर्नर, फिटर, वेबसाईट डेव्हलपर, सेल्स असोसिएट, हेल्पर, फायनान्सियल ॲडव्हायझर, सेल्स मॅनेजर, स्पेअरपार्ट, सर्व्हिस, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर,रुरल करिअर एजंट, सिटी करिअर एजंट, पॉईंट आफ सेल, सेल्स ऑफिसर, इत्यादी भरण्यात येणार आहेत. तसेच साखर कारखान्यामध्ये फक्त अनुभवी उमेदवारांसाठी ‍चिफ अकौटंट, ऊस विकास अधिकारी, ॲग्री ओव्हरसिअर, मॅन्यु.केमिस्ट, असि. इंजिनिअर, पर्यावरण अधिकारी, केनयार्ड सुपरवायझर, सुरक्षा अfधकारी, सेफटी ऑफिसर, वर्कशॉप फिटर, इव्हापोरेटर मेट, वॉटरमन, खलाशी, सल्फीटेशन मेट, इत्यादी पदे भरती करण्यात येणार असल्याचे श्री. करीम यांनी सांगितले. हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आपआपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे Web : https://mahaswayam.gov.in या संकेत स्थळाव्दारे लॉगीन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदांसाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावा. पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या कंपनीची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करावी. पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अर्लटव्दारे कळविण्यांत येईल. शक्य असेल तेथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यांत येईल. जिल्ह्यातील इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी दिनांक 25 मे 2021 पर्यंत आपआपले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे. 00000

बुधवार, १९ मे, २०२१

खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी कोविड सदृष्य लक्षणे असणाऱ्या संशयित बाह्यरुग्णांची दैनंदिन माहिती देण्याचे प्रशासनाचे निर्देश

सांगली दि. 19 (जि.मा.का.) : सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही कोरोना साथरोग आजाराची दुसरी लाट फैलावत आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी जिल्हास्तरावरुन विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे येणाऱ्या सर्दी, ताप, श्वासन व फुफ्फुस विषयक आजार व इतर कोविड सदृष्य लक्षणे असणाऱ्या संशयित बाह्यरुग्णांची दैनंदीन माहिती घेण्याचे काम जिल्हा परिषदेतील पाणी व स्वच्छता कक्ष व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील क्षेत्रीय कर्मचारी यांच्याकडून घेतले जात आहे. जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय डॉक्टरांनी दैनंदीन व नियमित माहिती https://forms.gle/Ejnqw1JWCvQARV7J7 या लिंकवर भरुन जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. ग्रामीण भागातील खाजगी वैद्यकीय डॉक्टरांकडून गुगल लिंकच्या माध्यमातून बाह्यरुग्णांची माहिती घेतली जात आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त 1520 खाजगी वैद्यकीय डॉक्टरांपैकी आत्तापर्यंत 600 खाजगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या दैंनदिन कोविड सदृष्य, सारी, इन्फुलुजा आजाराची लक्षणे असणाऱ्या बाह्यरुग्णांची माहिती भरण्यास सुरुवात केलेली आहे. प्राप्त झालेल्या बाह्यरुग्णांच्या माहितीच्या आधारे तालुका वैद्यकीय अधिकारी/मेडिकल ऑफिसर यांनी संशयित रुग्णांपर्यत पोहचून रुग्णांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील ज्या खाजगी डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनास सदर बाह्यरुग्णांची माहिती लपविल्यास अथवा माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास व संबधित रुग्णास नजिकच्या आरोग्य संस्थेकडे तपासाणी करण्याकरिता संदर्भीत केले नसल्याचे निदर्शनास आल्यास, अशा रुग्णांचा दुर्दैवी मुत्यू झाल्यास संबंधित डॉक्टरांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग अधिनियम 1897 अन्वये कायदेशिर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 00000

कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देवून केली पाहणी

सांगली दि. 19 ( जि.मा.का) : कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथे सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथील नुतन होमिओपॅथीक मेडीकल कॉलेज ॲन्ड हॉस्पीटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देवून पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी समिर शिंगटे, तहसिलदार बी. जे. गोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. आर. पाटील, गटविकास अधिकारी रविंद्र कणसे, कवठेमहांकाळ उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक सतिश गडदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, नुतन होमिओपॅथीक मेडीकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाजीराव शिंदे, डॉ. संदीप पाटील आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सुरूवातीस या हॉस्पीटलमध्ये 25 ऑक्सिजनेटेड बेड्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येथील डॉक्टरांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हॉस्पीटल चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन, औषधे आदि आवश्यक साधन सामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, औषधे, आरटीपीसीआर टेस्टींग, जैविक कचरा विल्हेवाट आदिंबाबत सविस्तर माहिती घेतली व हॉस्पीटलमध्ये पुरविण्यात आलेल्या सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून तालुक्यातील रूग्णस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. भारत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कुची यांच्यावतीने कवठेमहांकाळ तालुक्यातील उपजिल्हा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील डॉक्टर्स व कर्मचारी तसेच आशा वर्कर्स यांना मोफत पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज, ऑक्सिमिटर, फेसशिल्ड आदि कोविड साहित्यांचे वाटप करण्यात येत आहे. भारत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने हॉस्पीटलच्या परिसरात सुरू केलेल्या स्टॉलला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देवून पाहणी केली व त्यांचे कौतुक केले. 00000

जत येथे सुरू केलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमुळे रूग्णांना मोठे सहाय्य मिळणार - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली दि. 19 ( जि.मा.का) : जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची रूग्णसंख्या वाढत आहे. कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी जतपासून सांगलीचे अंतरही जास्त आहे. अशा संकटाच्या काळात जत येथे 70 ऑक्सिजनयुक्त बेड्सचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू केले आहे. जत तालुक्यासाठी ही अत्यंत चांगली व्यवस्था उपलब्ध केली आहे याचे समाधान आहे. यामुळे जत तालुक्यातील रूग्णांना फार मोठे सहाय्य मिळणार असून रूग्णांचे प्राणही वाचणार आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह जत येथील 70 ऑक्सिजनयुक्त बेड्सच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनिता पवार, पंचायत समिती सभापती मनोज जगताप, उपविभागीय अधिकारी जत प्रशांत आवटे, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, तहसिलदार सचिन पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. इरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर, गटविकास अधिकारी डी. गुत्तीकर तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, येणाऱ्या काळात कोरोना बाधित रूग्णांची संख्या कमी करण्यासाठी सर्वांनी घरात थांबणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधांचे तंतोतंत पालन करावे. कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्रानींही फार मोठी मदत केली आहे. त्यांचे महत्व कोरोना काळात समजले आहे. आरोग्य सेवेवर भर देणे, जिल्ह्यात आरोग्य सेवा वाढविणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सद्यस्थितीत ऑक्सिजन जेमतेम उपलब्ध होत असतानाही सर्वांच्या पुढाकाराने जत येथे 70 ऑक्सिजनयुक्त बेड्सचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पहाणी करून समाधान व्यक्त केले. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह जत येथील 70 ऑक्सिजनयुक्त बेड्सच्या उद्घाटनंतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जत येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींची शासकीय निवासी शाळा येथे सुरू असलेल्या डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलला भेट देवून तेथील डॉक्टरांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी डॉ. शरद पवार, डॉ. रोहन मोदी, डॉ. विवेकानंद राऊत, डॉ. सुनिल वनकुंडे आदि उपस्थित होते. 000000

रविवार, १६ मे, २०२१

दहा दिवसात जिल्ह्याला ४२ व्हेंटिलेटर्स व २० बायपॅप मशीन्सचा पुरवठा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 16 (जि.मा.का.) : कोरोना महामारीचा झपाट्याने वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन गरजू रुग्णांना उपचाराची सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. गेल्या दहा दिवसात जिल्ह्यात ४२ व्हेंटिलेटर्स व २० बायपॅप मशीनची उपलब्ध करण्यात आली असून शासकीय रुग्णालयांसह विविध खाजगी रुग्णालयांना यांचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. यातील ३२ व्हेंटिलेटर प्रशासनामार्फत खरेदी करण्यात आले असून यामधील 2 सीएसआर फंडातून खरेदी करण्यात आले आहेत. तर दहा व्हेंटिलेटर्स वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजसाठी राज्य शासनाकडून उपलब्ध झाले आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज, भारती हॉस्पिटल मिरज येथे प्रत्येकी तीन, मिरज ग्रुप ऑफ फिजिशियन मिरज यांना 2, सिनर्जी हॉस्पिटल मिरज, सायना कोवीड सेंटर गणेश नगर सांगली यांना प्रत्येकी एक व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. जत कोविड हॉस्पिटलला चार, भगवान महावीर कोविड हॉस्पिटल सांगली आणि क्रीडा संकुल मिरजला प्रत्येकी तीन, विवेकानंद हॉस्पिटल बामनोलीला दोन व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय श्वास हॉस्पिटल सांगली, घाडगे हॉस्पिटल सांगली, लाईफ केअर तासगाव, श्री हॉस्पिटल विटा, सद्गुरु हॉस्पिटल विटा, कवठेमहांकाळ कोविड हॉस्पिटल, कोविड हॉस्पिटल पलूस, देशमुख (सत्रे) चारिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल इस्लामपूर , प्रकाश मेमोरियल क्लिनिक इस्लामपूर यांना प्रत्येकी एक व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच आटपाडी ग्रामीण रुग्णालयाला दोन व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज साठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेले 10 व्हेंटिलेटर मिरज येथे पोहोच झाल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले. याशिवाय मिरज चेस्ट हॉस्पिटल मिरजला चार, भारती हॉस्पिटल मिरजला पाच, वेध मल्टीस्पेशालिटी तासगाव, उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर, पलूस ग्रामीण रुग्णालय यांना प्रत्येकी दोन तर वाळवेकर हॉस्पिटल सांगली यांना तीन बायपॅप मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. 00000

शनिवार, १५ मे, २०२१

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास 500 रूपये दंड - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

दंडात्मक कारवाईसाठी पोलीस प्रशासनास अधिकार प्रदान सांगली दि. 15 (जि.मा.का.) : जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून करावयाच्या कार्यवाहीबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत. नाकाबंदी तसेच इतर कारवाईच्यावेळी पोलिसांना कोणी नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय व कारणाशिवाय घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार पोलीस प्रशासनाला मिळण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत. कोणतीही व्यक्ती अत्यावश्यक कामाशिवाय व कारणाशिवाय घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर 500 रूपये इतकी दंडात्मक कारवाई करावी. तसेच त्या व्यक्तींच्या ताब्यातील वाहन संबंधित प्रतिबंधात्मक आदेश लागू असेपर्यंत किंवा केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोविड-19 साथरोग आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी ताब्यात घेण्यात यावे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत. 00000

शुक्रवार, १४ मे, २०२१

खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांनी कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला देणे आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

संशयीत कोविड रूग्णाबाबतची माहिती लपविल्यास कारवाई सांगली दि. 14 (जि.मा.का.) : सद्यस्थितीत कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यानुसार सर्दी, ताप व इतर कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्ती खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांच्या बाह्य रूग्ण विभागात उपचाराकरिता येतात. अशा कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला देणे आवश्यक आहे. अशा रूग्णांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आर.टी.पी.सी.आर. अथवा ॲन्टीजन टेस्ट करण्याकरिता संदर्भित करावे. जेणेकरून कोविड बाधित रूग्णांवर त्वरीत उपचार सुरू करून रूग्णांचा SpO2 मेंनटेन करता येईल व संभाव्य मृत्यू टाळता येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. संशयित कोविड रूग्ण कोविड तपासणी न करता किरकोळ उपचाराकरिता इतरत्र फिरत असल्याने कोविड संसर्गाचा प्रसार वाढत असून अशा रूग्णांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. रूग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला कळविण्यासाठी गुगल शीट तयार करण्यात आली असून खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांच्या बाह्यरूग्ण विभागात येणाऱ्या व कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या सर्व रूग्णांची माहिती दैनंदिन https://forms.gle/Ejnqw1JWCvQARV7J7 या गुगल फॉर्म मध्ये भरावी. ॲन्टीजन तपासणी करण्याकामी परवानगी हवी असल्यास जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करावा. बाह्यरूग्ण विभागात उपचाराकरिता आलेल्या संशयीत कोविड रूग्णाबाबतची माहिती लपविल्यास अथवा रूग्णास नजीकच्या आरोग्य तपासणी करण्याकरिता संदर्भित केले नसल्याचे निदर्शनास आल्यास अथवा अशा रूग्णांचा दुर्देवी मृत्यू झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये व भारतीय साथरोग अधिनियम 1897 नुसार आणि Section 2(a) (iii) Maharashtra Essential Services Maintenance Act 2005 अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ष्ट केले आहे. 00000

सोमवार, ३ मे, २०२१

कोरोना बाधीतांची संख्या जास्त असलेल्या गावात सक्तीने कडक जनता कर्फ्यू पाळा - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली दि. 3 (जि.मा.का.) : जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या गावात कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे त्या गावात निर्बंध अधिक कडक करून जनता कर्फ्यूचे सक्तीने पालन करावे, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. जत येथील पंचायत समिती सभागृहात कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी जितेंद्र डुडी, प्रातांधिकारी प्रशांत आवटे, तहसिलदार सचिन पाटील, नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवार, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर, गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर आदि उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, विनाकारण बाहेर फिरताना आढळल्यास रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करा. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स यांना दमदाटी केल्यास शासकीय कामात अडथळा या अनुषंगाने कडक कारवाई करा. हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्यांनाही होम आयसोलेशन करा. तसेच सौम्य लक्षणे जाणवणाऱ्यांनीही होम आयसोलेशन व्हावे. चेक पोस्टच्या ठिकाणी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात बंदोबस्त कडक करावा. प्राथमिक आरोग्य केंद्रांना जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. ॲम्बुलन्स सेवा सुरळीत ठेवावी. व्हेंटीलेटर तातडीने उपलब्ध करून घ्यावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. खाजगी रूग्णालंयानी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच बील आकारणी करावी, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जी खाजगी रूग्णालये कोरोना रूग्णांकडून डिपॉझीट मागणी करत असतील त्यांचे ऑडीट करावे. औषधांचा पुरवठा पुरेसा प्रमाणात करावा. जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा कोटा 23 वरून 35 टन करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्सिजन उपलब्ध करून देवू. देशात 60 रेमडीसीवीअर उत्पादक असून लोकसंख्येच्या प्रमाणात पुरवठा व्हावा, अशी केंद्राकडे मागणी केली आहे. रेमडेसीवीअरचा पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहिम चांगली राबविण्यात येत असून लसीकरणात सांगली जिल्हा सर्वात पुढे आहे. 18 ते 45 वयोगटातील तरूण वर्गाला मोफत लस देणार असून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करावे. जत तालुका आकाराने मोठा असून प्राथमिक आरोग्य केंद्रे सज्ज करावी. माडग्याळ येथे हॉस्पीटल सुरू करण्याची तातडीने कार्यवाही करावी. सांगली मुख्यालयापासून अंतर जास्त असल्याने रूग्णांना उपचार येथेच उपलब्ध करावा. जत तालुक्यात 63 गावे आहेत. ज्या गावात 15 पेक्षा जास्त रूग्ण आहेत त्या गावातील निर्बंध अधिक कडक करावेत. सक्तीने जनता कर्फ्यू लागू करा. कोरोना बाधित रूग्णांना शिक्के मारा व त्यांची यादी ग्रामपंचायतींच्या बोर्डावर प्रसिध्द करावी. कोरोना बाधित रूग्ण बाहेर फिरताना आढळल्यास त्यांना विविध शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत त्या ठिकाणी पाठवावे. गावातील शाळा निश्चित करून बाधितांना शाळेत ठेवावे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जे निर्बंध घातले आहेत त्याला नागरिकांनी सहकार्य करावे. निर्बंधांचे कठोर पालन होण्यासाठी पोलीसानींही गस्त वाढवावी. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली असेल त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी, असे आवाहनही शेवटी त्यांनी केले. तत्पूर्वी पालकमंत्री जयंत पाटील यांनी डफळापूर येथील कोविड केअर सेंटरचे उदघाटन करून तेथे असणाऱ्या विविध सोयी सुविधांची पहाणी केली. यावेळी त्यांनी रूग्णांना चांगल्या सुविधा देण्याची सूचना करून रूग्णांची योग्य ती काळजी घ्यावी असे सांगितले 000000

सिव्हील हॉस्पीटल सांगली येथील टेलीमेडीसीन कक्षाची जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पहाणी

गरजू रूग्णांना उपचाराबातच्या सल्ल्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन सांगली दि. 3 (जि.मा.का.) : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना पॉझीटीव्ह व सौम्य लक्षणे असणारे बरेच रूग्ण होम आयसोलेशनमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. अशा रूग्णांच्या व इतर रूग्णांच्या उपचाराबाबतच्या सल्ल्यासाठी सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे टेलीमेडीसीन कक्ष सुरू करण्यात आला आहे. तरी रूग्णांना काही शंका असल्यास, त्रास होत असल्यास त्यांनी उपचाराबाबतच्या सल्ल्यासाठी टेलीमेडीसीन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे सुरू करण्यात आलेल्या टेलीमेडीसीन कक्षाला भेट देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पहाणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्ष्क डॉ. नंदकिशोर गायकवाड, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश आष्टेकर, प्रशासकीय अधिकारी मनोज धाबाडे, डॉ. मनोज पवार आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी टेलीमेडीसीन कक्षातील सोयी सुविधांची पहाणी करून या कक्षात नेमणूक करण्यात आलेल्यांना उपचाराबाबतच्या सल्ल्यासाठी आवश्यक ट्रेनींग द्यावे. कॉलची संख्या वाढल्यास त्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना दिल्या. टेलीमेडीसीन सुविधा सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेत उपलब्ध राहील. यासाठी 0233-2621400 व 0233-2621700 या दूरध्वनी क्रमांकावर गरजू रूग्णांनी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे उभारण्यात येत असलेल्या लिक्वीड ऑक्सिजन प्लाँटची पहाणी करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. 00000