शनिवार, २९ मे, २०२१

गाव कोरोना मुक्त करण्यासाठी दक्षता समित्यांनी कडक भूमिका घ्यावी - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गाव कोरोना मुक्त करण्यासाठी ग्राम दक्षता समित्यांनी कडक भूमिका घ्यावी, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. पंचायत समिती पलूस येथे कोविड-19 आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पंचायत समिती सभापती दिपक मोहिते, कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रागिणी पवार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अधिक पाटील, गटविकास अधिकारी डॉ. स्मीता पाटील यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी व विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने जारी केलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या ज्या पॉझिटीव्ह रूग्णांना हॉस्पीटलमध्ये ॲडमीट होण्याची गरज भासत नाही, अशा रूग्णांना त्यांच्या घरी सोय असेल तर होम आयसोलेट करावे. ज्यांच्या घरी होम आयसोलेशनची सोय होवू शकत नाही अशा रूग्णांना विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेल्या ठिकाणी ठेवावे. कोणत्याही स्थितीत कोरोनाचा प्रसार होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. दक्षता समित्यांनी याबाबत अधिक सतर्क राहून कामकाज करावे, अशा सूचना करून पलूस तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असल्याचे ते यावेळी म्हणाले. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, पॉझिटीव्ह रूग्ण बाहेर फिरू नये यासाठी दक्षता समित्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टींग यावर भर द्यावा. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रूग्णांबाबत कोरोनाची लक्षणे दिसत असणाऱ्या रूग्णांची माहिती तात्काळ प्रशासनास द्यावी. गरजू रूग्णांना बेड्स उपलब्धतेबाबतची माहिती द्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड यांनी पलूस तालुक्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर सादरीकरण केले. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा