सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे

सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने दि. 1 डिसेंबर रोजी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत एच. आय. व्ही. एड्स बाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. आपली एकता, आपली समानता, एचआयव्ही सहज जगणाऱ्या करिता ही यावर्षीची जागतिक एड्स दिनानिमित्तची थीम आहे. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त सकाळी 8.30 वाजता जनजागृती प्रभात फेरीचे नियोजन पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली या ठिकाणी करण्यात आले आहे. या प्रभात फेरीसाठी जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व सामाजिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच प्रभात फेरीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच एनसीसी केडेट, रेड रिबन क्लब, एन एस एस चे विद्यार्थी नर्सिंग कॉलेजेस तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी व समलिंगी पुरुषांसाठी काम करणाऱ्या संस्था, लिंक वर्कर स्कीम एन. जी. ओ., स्थलांतरित कामगारासाठी काम करणाऱ्या संस्था, सहभागी होणार आहेत. प्रभात फेरी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली-आंबेडकर रोड-एसटी स्टँड-शिवाजी मंडई-हरभट रोड-राजवाडा चौक मार्गे जावून रॅलीचा समारोप पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक स्टेशन चौक येथे होणार आहे. या ठिकाणी एचआयव्ही प्रतिबंधाकरिता सर्व उपस्थितांना शपथ दिली जाणार आहे. त्याचबरोबर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची मतदार यादी मध्ये नाव नोंद करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 1 डिसेंबर रोजी जनजागृती प्रभात फेरीचे नियोजन स्थानिक आयसीटीसीच्या माध्यमातून करण्यात आले असून यामध्ये एनसीसीचे कॅडेट व रेड रिबन क्लब मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवणार आहेत. तरुण वर्गामध्ये अधिकची जनजागृती व्हावी यासाठी महाविद्यालयामध्ये व अतिजोखमीच्या गटामध्ये तज्ञांचे मार्गदर्शन, डिजिटल बॅनर, वॉल पेंटिंग, रेडिओ वर मुलाखत, स्थानिक केबल चॅनलवर स्क्रोल जाहिरात अशा उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पोस्टर्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे नियोजन करण्यात आले असून भेदभाव व कलंक मिटवून समानता आणणे हा दोन्ही स्पर्धेचा विषय आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी ७०० रूपये, द्वितीय क्रमांक ५०० रूपये, आणि तृतीय क्रमांकासाठी ३०० रूपये अशी बक्षिसाची रक्कम असून सर्व सहभागीना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे व याचे प्रदर्शन १ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित रॅलीमध्ये तसेच पोस्टर पेंटिंग स्पर्धा व रांगोळी स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत यांनी केले आहे. 00000

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

पशुधनाची काळजीपूर्वक सुश्रुषा केल्यास लम्पी आजारापासून वाचविण्यात उत्तम यश

जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून गोवंशातील जनावरांमध्ये लम्पी आजाराची साथ चालू आहे. आजाराच्या तीव्रतेनुसार बाधित जनावरांमध्ये विविध लक्षणे आढळून येत आहेत. हा आजार विषाणूजन्य असल्याने त्यावर १०० टक्के प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. मात्र शेतकऱ्यांनी ज्या जनावरावर तात्काळ योग्य उपचार करून घेतला व चांगली काळजी घेतली आहे ती जनावरे बरी होत आहेत. सर्वसामान्यपणे रोगातून बरे होणाऱ्या जनावरात ८० टक्के सुश्रुषा अथवा निगा व २० टक्के औषधोपचाराचा वाटा दिसून येत आहे. म्हणून पशुपालकानी रोगी जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व आपले पशुधन वाचवण्यासाठी जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे. आहार विषयक काळजी १) रोगी जनावरांची प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी संतुलित आणि सकस आहार नियमित देण्यात यावा. त्याचप्रमाणे त्यांचा आहार व पाणी पिणे जास्तीत जास्त राहील यासाठी पशुपालकांनी काळजी घ्यावी. २) आजारी जनावराना हिरवा, मऊ व लुसलुशीत चारा तसेच चांगल्या प्रतीचा प्रथिन व उर्जायुक्त खुराक (भरडा/पशुखाद्य/ मका आदी) द्यावा. पिण्याचे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात दिवसातून ४-५ वेळा उपलब्ध करून द्यावे. पाण्यामध्ये मीठ व गुळ टाकून दिल्यास जनावर पाणी आवडीने पितात तसेच त्यांना खनिजक्षार व उर्जा मिळेल. थंडीच्या काळात हलके कोमट पाणी दिल्यास जनावर आवडीने पाणी पितात. पाणी पिणे चालू राहील्यास अत्यवस्थ जनावर सुध्दा बरे होत आहेत. ३) ज्या बाधित जनावरांना मानेवरील व छातीवरील सुजेमुळे मान खाली करता येत नाही अशा जनावरांना चारा व पाणी तोंडाच्या उंचीवर उपलब्ध करून देण्यात यावे. गरजेप्रमाणे चारा हातानी खाऊ घातल्यास रोगी जनावर चारा खात असल्याचे दिसून आले आहे. ४) जनावरे आजारातून बरी होईपर्यंत त्यांना जीवनसत्वे, प्रतिकारक शक्ती वर्धक तसेच यकृतवर्धक औषधे नियमितपणे देण्यात यावीत. ५) आजारी जनावरांना औषधे पाजणे शक्यतो टाळावे. पावडर किंवा पातळ औषधे ही कणीक/ पीठ/गुळ खुराक किंवा पाण्यातून देण्यात यावीत. उबदार निवारा विषयक काळजी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर आजारी जनावरांचे थंडीपासून संरक्षण करावे. जनावरे रात्रीच्या वेळी उघड्यावर बांधू नये. त्यांना कोरडा व उबदार निवारा उपलब्ध करून देण्यात यावा. लहान वासरांच्या अंगावर उबदार कपडे पांघरावीत. गोठ्यात अधिक तीव्रतेचे बल्ब लावावेत जेणेकरून उष्णता निर्माण होईल व प्रतिकूल वातावरणामुळे येणारा ताण टाळता येईल. जनावरांच्या पोळी-पायावरील सुजेवर शेक देणे १) ज्या जनावरांना पाया समोरील लसीका ग्रंथीवर, पायांवर किंवा छातीवर सूज आहे अशा जनावराना बसताना त्रास होतो म्हणून अशी जनावरे बरीच दिवस उभीच राहतात. अशा जनावरांना मिठाच्या गरम पाण्याचा सुती कापडाच्या सहाय्याने दिवसातून २ वेळा उत्तम शेक द्यावा तसेच मॅग्नेशियम सल्फेट (बारीक पावडर) आणि ग्लीसरीन या संयुगाचा लेप सुजेवर सकाळ संध्याकाळी लावल्यास सूज कमी होण्यास मदत मिळते. २) अंगावरील गाठी व सूज कमी करण्यासाठी उन्हाच्या वेळेत गरम पाण्याची अंघोळ (शेकत / अंग चोळत) घालावी व अंग कापडाने कोरडे करावे म्हणजे सर्दी होणार नाही. ३) लहान वासरांना चेहऱ्यावरील दुखणाऱ्या गाठीमुळे तोंडाची हालचाल करण्यास अवघड झाल्याने दुध पिता येत नाही. त्यासाठी चेहऱ्यावर गरम पाण्याने सुती कापडाच्या सहाय्याने शेक द्यावा. ४) शेक देताना जनावरांना गरम पाण्याचा चटका बसणार नाही याची पशुपालकांनी खबरदारी घ्यावी. बसू पडलेल्या (बसलेल्या / न उठणाऱ्या) जनावराची काळजी १) पायावरील सुजेमुळे उभे राहण्यास शक्य नसल्याने किंवा अशक्तपणामुळे रोगी जनावर बसू पडते. २) बसू पडलेल्या जनावरांना सिमेंट काँक्रीटची जमीन टाळावी. अंगाखाली मऊ गवत / तुसाची गादी करावी. ३) दर २-३ तासानी जनावराची बाजू / कूस बदलावी. दिवसातून दोन वेळा मदतीने उभे करावे. पाय चोळावेत / शेकावेत तोंडातील व्रणोपचार / नाकाची स्वच्छता/डोळे याबाबत घ्यावयाची काळजी १) जनावराच्या विशेषत: लहान वासरांच्या तोंडात जखमा आढळून आल्यास, तोंड पोटॅशियम परमगनेटच्या द्रावणाने धुवून दिवसातून ३-४ वेळेस बोरो ग्लिसरीनचे द्रावण तोंडातील जखमांवर लावावे. त्यामुळे जनावराला चारा खाण्यास / वासरांना दुध पिण्यास त्रास होणार नाही. २) रोगी जनावराच्या विशेषतः लहान वासरांच्या नाकामध्ये बऱ्याचवेळा अल्सर/ जखमा निर्माण होतात, नाक चिकट स्वायानी भरलेले असते. काही वेळा तो घट्ट व कडक होतो. त्यामुळे श्वसनास त्रास होतो. त्यासाठी कोमट पाण्याने नाकपुडी नियमितपणे स्वच्छ करावी. तसेच दोन्ही नाकपुड्यात बोरोग्लिसरीन अथवा कोमट खोबरेल तेल व बोरीक पावडरचे मिश्रण चार-चार थेंब टाकावे जेणेकरून मऊपणा टिकून राहील, जखमा भरून येतील व श्वसनास त्रास होणार नाही. ३) सर्दी असेल तर निलगीरीच्या तेलाची किंवा विक्सची वाफ दिली तर चांगला फायदा होतो. ४) डोळ्यात व्रण असतील तर डोळ्यातून पाणी येते व पुढे पांढरेपणा येतो. त्यासाठी डोळे बोरिक पावडरच्या द्रावणाने, नियमीत धुवून घ्यावेत किंवा कोमट पाण्याने साफ करावेत. बैलांची काळजी रोगातून बरे झालेल्या बैलांना कामास जुंपल्यामुळे रोग प्रकोप होवून दगावत आहेत म्हणून प्रकृती ठणठणीत होईपर्यंत त्यांना काम लावू नये. जखमांचे व्यवस्थापन बाधित जनावरांमध्ये २-३ आठवड्यानंतर प्रामुख्याने सूज आलेल्या भागात विशेषत: पायावर जखमा होतात. त्याचप्रमाणे शरीरावरील गाठी फुटून सुद्धा जखमा होतात. त्या जखमांवर खालीलप्रमाणे उपचार करावा. १) जखमा ०.१ टक्के पोटॅशियम परम्यांगनेटच्या द्रावणाने धुवून घेतल्यानंतर त्यावर पोव्हेडीन आयोडीन किंवा टिंक्चर आयोडीन लावावे. त्यानंतर जखमेवर मगनेशियम सल्फेट व ग्लिसरीनचे मिश्रण लावून बँडेजने हळुवारपणे बांधावी. २) सोबत जखमांवर माश्या व इतर बाह्यपरजीवी बसू नयेत यासाठी दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे जखमांवर फवारण्यात यावा. ३) जखमेमध्ये अळ्या पडल्यास अशा जखमेत टरपेनटाईनच्या तेलात भिजवून कापसाचा बोळा ठेवावा आणि त्यानंतर मृत अळ्या बाहेर काढून घ्याव्यात, अशा जखमांवर दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे फवारण्यात यावा. ४) जखमा जास्त खोल व दुषित प्रकारच्या असल्यास हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर करून अशा जखमांचा उपचार पशुवैद्यक अधिकाऱ्‍यांकडून करून घ्यावा. ५) जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी नियमित ड्रेसिंग करणे गरजेचे आहे. गोमाशांचा / गोचिड यांचा उपद्रव व नियंत्रण रोगी जनावर सुस्त झाल्याने तसेच अंगावरती जखमा झाल्याने माशा बसतात व जनावर त्रस्त होते. म्हणून रोगी जनावरांना गोचीड-गोमाश्या यांचा त्रास कमी होण्यासाठी गोठ्यात दर ३-४ दिवसानी कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यात यावी. तसेच अंगावर हर्बल / वनस्पतीजन्य किटकनाशक औषधीचा नियमित वापर करावा. यासाठी एक लिटर पाण्यामध्ये १० मिली निंबोळी तेल, १० मिली करंज तेल, १० मिली निलगीरी तेल आणि २ ग्रॅम अंगाचा साबण मिसळावे व हे मिश्रण फवारणीसाठी वापरावे. बाधित जनावरांच्या उपचारादरम्यान पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजीपूर्वक सुश्रुषा केल्यास पशुधन लम्पी आजारापासून वाचविण्यात उत्तम यश मिळू शकते. - डॉ. एस. एस. बेडक्याळे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

संविधान दिन उत्साहात साजरा

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : संविधान ‍दिनानिमित्त एस. टी. स्टँड सांगली जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महानगरपालिका उपायुक्त राहूल रोकडे, जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य खुशाल गायकवाड, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त अशोक पवार, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सामुहिक संविधान वाचन करून संविधान रॅलीची सुरूवात करण्यात आली. ही संविधान रॅली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, एस.टी. स्टँड मार्गापासून शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महानगरपालिका इमारत मार्ग - सिटी पोस्ट ऑफिस मार्गे स्टेशन चौक सांगली येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी स्टेशन चौक परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी प्रधानमंत्री कै. पंडीत नेहरू व माजी मुख्यमंत्री कै. डॉ. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संविधान रॅलीमध्ये सिटी हायस्कूल सांगली व राणी सरस्वती कन्या शाळेचे शिक्षक, शिक्षीका, विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमास अरुण आठवले, नितीन गोंधळे, उत्तम कांबळे, विठ्ठलराव काळे, बापूसाहेब सोनवणे, संतोष वाघमारे, प्रियानंद कांबळे, सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा परिषद समाज कल्याण, जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाचे तसेच विविध महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ०००००

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत विहीत मुदतीत सहभागी होण्याचे आवाहन

सांगली दि. 24 (जि. मा. का.) : प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम ज्वारी (बागायत, जिरायत) पिकासाठी दि. ३० नोव्हेंबर २०२२, गहू (बागायत), हरभरा पिकासाठी १५ डिसेंबर २०२२ व उन्हाळी भुईमूग पिकासाठी ३१ मार्च २०२३ अशी विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम तारीख आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या विमा योजनेत विहीत मुदतीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांनी केले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड/ आधार नोंदणीची प्रत, सातबारा उतारा, भाडे करार असलेल्या शेतकऱ्यांसाठी करारनामा/ सहमती पत्र, पेरणी स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक प्रत या आवश्यक कागदपत्रासह खाते कार्यरत असणारी बँक/ शाखा प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, संबंधित विमा कंपनी कार्यालय, आपले सहकार सेवा सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करूनही शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी /कर्मचारी अथवा संबंधित विमा कंपनी प्रतिनिधीशी (संदिप पाटील ९७३०१९७७७१) संपर्क साधावा. प्रधानमंत्री पिक विमा योजना सर्व शेतकऱ्यांसाठी (कर्जदार/ बिगर कर्जदार) ऐच्छिक असून खातेदार शेतकरी, व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी सुद्धा या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र राहतील. योजनेतील सर्व अधिसूचित पिकासाठी जोखीम स्तर 70 टक्के इतका राहणार असून, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रब्बी हंगामातील पिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या १.५ टक्के तर नगदी पिकासाठी ५ टक्के इतका आहे. पिक निहाय विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर व कंसात शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम पुढीलप्रमाणे आहे. गहू बा. 30 हजार रूपये (450 रू.), ज्वारी बा. 35 हजार रूपये (525 रू.), ज्वारी जि. 25 हजार रूपये (375 रू.), हरभरा 35 हजार रूपये (525 रू.), उ. भुईमूग 40 हजार रूपये (600 रू.). 00000

संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा होणार संविधान सन्मान रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

सांगली दि. 24 (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. २६ नोव्हेबर २०२२ रोजी संविधान दिन सांगली जिल्ह्यामध्ये साजरा करण्यात येणार आहे. दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान दिनानिमित्त सांगली व तालुक्याच्या न्यायालयामध्ये संविधान उद्देशीका वाचन करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व न्यायिक अधिकारी, वकील संघटना तसेच न्यायालयीन कर्मचारी वर्ग सहभागी होवून उद्देशीका वाचन करणार आहेत. तसेच विविध शाळांमध्ये संविधान रॅली, सांगली व तालुक्यांच्या शाळांमध्ये प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. सांगली येथील विधी विद्यार्थी सांगली शहरामध्ये विविध ठिकाणी कायदेविषयक जनजागृतीपर पथनाट्य सादर करणार आहेत. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण नरडेले यांनी दिली. दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता वेबिनारव्दारे चर्चासत्रे तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून संविधानाचे महत्व या विषयावर भारती विद्यापीठ्स न्यू लॉ कॉलेज सांगली प्राचार्या डॉ. पूजा नरवाडकर, मार्गदर्शन करणार आहेत. सदरच्या वेबिनार व चर्चासत्रामध्ये सांगली येथील पॅनेल वकील, विधी विद्यार्थी, शाळेतील विद्यार्थी सहभागी होतील. तसेच त्याच दिवशी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, जिल्हा सांगली यांनी आयोजित संविधान दिन सन्मान रॅलीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली हे सहभागी होवून सदर रॅलीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची कार्ये व माहिती पत्रके वाटप करून जनजागृती करण्यात येणार आहे. सदर संविधान सन्मान रॅलीमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 00000

पाणीवापर संस्थांच्या गट क्रमांक व क्षेत्रासंबंधी हरकत असल्यास 5 डिसेंबर पर्यंत कळविण्याचे आवाहन

सांगली दि. 24 (जि. मा. का.) : वारणा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील किमी 1 ते 26 मधील पणुंब्रे तर्फ वारूण व शिराळा तालुक्यातील मौजे मणदूर या गावांमध्ये पाणीवापर संस्था स्थापन करण्याबाबत कोल्हापूर पाटबंधारे विभागामार्फत कार्यवाही सुरू आहे. स्थापित होणाऱ्या पाणीवापर संस्थांच्या कार्यक्षेत्राबाबत समाविष्ट गटनंबरची यादी ग्रामपंचायत कार्यालय, गाव चावडी, पाटबंधारे शाखा कार्यालय तसेच उपविभागीय कार्यालय येथे प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर गट क्रमांक व क्षेत्रासंबंधी कोणाची काही हरकत असल्यास दिनांक 5 डिसेंबर 2022 सायंकाळी 5.15 वाजेपर्यंत शाखाधिकारी वारणा पाटबंधारे शाखा, वारणावती या कार्यालयात लेखी कळविण्यात याव्यात. तद्नंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005 या कायद्यानुसार सध्या सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पाणीवापर संस्था स्थापन करून उपलब्ध पाण्याचे सुयोग्य रितीने वाटप करणे व जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे शासनाचे धोरण आहे. पाणीवापर संस्था स्थापन करण्याबाबत अधिसूचना 1 व 2 या यापूर्वीच प्रसिध्द झाल्या आहेत. सध्यस्थितीला तिसरी अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यात येत असल्याचे कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) कार्यालयातर्फे प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 00000

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2022 : जाहिरातीच्या परवानगीसाठी तालुकास्तरावर समिती गठीत

सांगली दि. २३ (जि.मा.का.) : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2022 साठी निवडणुकीस उभे असलेल्या उमेदवारांना जाहिरात ( पेड सोशल कमेंट, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, व्हॉटसअप, फेसबुक) प्रसारित करण्यास परवानगी देण्यासंदर्भात तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसीलदार असून आचारसंहिता कक्ष प्रमुख आणि संबंधित प्रभागाचा निवडणूक निर्णय अधिकारी हे या समितीचे सदस्य आहेत. ०००००

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष शिबीराचा लाभ घ्या - जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल

सांगली, दि. 17, (जि. मा. का.) : मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 19 व 20 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विशेष शिबीर आयोजित करण्यात आले असून सर्व मतदान केंद्रावरती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मतदार यादीत नाव नोंदणीसाठी व वगळण्यासाठी तसेच नावात दुरूस्ती, पत्ता बदल व मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी आवश्यक फॉर्म भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे देवून या विशेष मोहिमेचा 282 सांगली विधानसभा मतदार संघातील मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन 282 सांगली विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी केले आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि. 9 नोव्हेंबर 2022 ते 8 डिसेंबर 2022 आहे. नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंद करण्यासाठी फॉर्म नंबर 6 भरुन संबंधित मतदान केंद्रावरती जमा करावे. मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी फॉर्म नंबर 7 भरावा, ज्या मतदारांचे मतदार यादीमध्ये नावात दुरूस्ती किंवा पत्ता बदल करावयाचा असेल तर त्या मतदारांनी फॉर्म नंबर 8 भरावा. मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी फॉर्म 6ब भरून आपल्या परिसरातील मतदान केंद्रावर उपस्थित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत. तसेच NVSP.IN या वेबसाईट वरून ऑनलाईन पध्दतीने फॉर्म भरू शकता, असे जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

जागतिक वारसा सप्ताह कालावधीत सांगली वस्तुसंग्रहालय मोफत पाहण्यास उपलब्ध

सांगली, दि. 17, (जि. मा. का.) : जागतिक वारसा सप्ताह 19 ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. जागतिक वारसा सप्ताहनिमित्त सांगली वस्तुसंग्रहालय प्रेक्षकांना मोफत पाहण्यास उपलब्ध राहणार आहे. तसेच संग्रहालयात मोडी लिपी संबंधी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सांगली वस्तुसंग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक एस. डी. मुळे यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

सांगली, दि. 17, (जि. मा. का.) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक, विविध आंदोलने, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2022 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे. या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. सदर आदेश दि. 17 नोव्हेंबर 2022 रोजीचे 10.00 वाजल्यापासून ते दि. 1 डिसेंबर 2022 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. 00000

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

लसीकरण व वाहतूक प्रमाणपत्राशिवाय गोवंशीय पशुधनास जिल्ह्यात प्रवेशास बंदी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आदेश

सांगली दि. 15 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या चालू झालेल्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य जिल्ह्यातील (परभणी, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, हिंगोली इ. ) जिल्ह्यातून ऊस तोड कामगाराबरोबर ऊस वाहतुकीसाठी आवश्यक बैल व इतर पशुधनांची वाहतूक चालू आहे. त्यामुळे इतर राज्यातून महाराष्ट्रात तसेच अन्य जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात लसीकरण न झालेल्या अथवा बाधित जनावरांची वाहतूक केल्यामुळे लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता असल्यामुळे गाय वर्गीय पशुधनास विना लसीकरण प्रमाणपत्र व वाहतूक प्रमाणपत्र शिवाय जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. यासाठी पोलीस व पशुसंवर्धन विभागाने आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमांवर तात्पुरते तपासणी नाके उभारावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे, तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आलेल्या तपासणी नाक्यांवर २४ तास कडक पाहणी करून विना लसीकरण प्रमाणपत्र जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ऊस तोड कामगारांच्या पशुधनास प्रवेशबंदी करावी. तात्पुरत्या तपासणी नाक्यावर लसीकरण प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. उसतोड कामगारांची गुरे साखर कारखान्यांच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर साखर कारखाना प्रशासकाकडून नेमलेल्या पशुवैद्यकामार्फत अशा गुरांची तपासणी करून गुरे ऊस वाहतुकीसाठी योग्य असल्याबाबत खातरजमा करून घ्यावयाची आहे. तसेच गुरांची दैनंदिन आरोग्य तपासणी करून एखाद्या गुरामध्ये लम्पी चर्मरोगाची लक्षणे दिसून आल्यास, अशा गुरांचे तात्काळ विलगीकरण करून तसे जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त यांना तात्काळ कळविणे बंधनकारक आहे. या रोगाची लक्षणे पशुमध्ये आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती / अशासकीय संस्था सहकारी संस्था/खाजगी संस्था संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था इ. यांनी प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध नियंत्रण अधिनियम २००९ मधील कलम ४(१) अन्वये लेखी स्वरुपात नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. यामध्ये दिरंगाई केल्यास प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध नियंत्रण अधिनियमानुसार संबंधिताविरुध्द गुन्हा नोंद केला जाईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आदेशात नमुद केले आहे. 00000

कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांचा छळ होत असल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन

सांगली दि. 15 (जि. मा. का.) : कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी छळ होत असल्यास कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013 अंतर्गत Sexual Harassment electronic Box (SHEBOX) या ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणालीवर तक्रार नोंद करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013 व नियम दि. 9 डिसेंबर 2013 रोजी प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. या अधिनियमातील कलम ४(१) अंतर्गत कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती गठीत करण्याची तरतुद आहे. त्याअनुषंगाने शासकीय, निमशासकीय, कार्यालय, संघटना, महामंडळे, आस्थापना, संस्था शाखा यांची शासनाने स्थापन केली असेल किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असेल किंवा पूर्ण किंवा अंशत: प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निधी, शासनामार्फत किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा शासकीय कंपनी किंवा नगरपरिषद किंवा सहकारी संस्था अशा सर्व आस्थापना तसेच कोणतेही खाजगी क्षेत्र संघटना किंवा खाजगी उपक्रम, संस्था, एन्टरप्राईझेस, अशासकीय संघटना, ट्रस्ट उत्पादक पुरवठा, विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिंक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्य इत्यादी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठाधारक, रूग्णालय, सुश्रुषालये, क्रिडा संस्था प्रेक्षागृहे, क्रिडा संकुले इत्यादी ठिकाणी किंवा अधिनियमात नमुद केलेल्या कामाच्या शासकीय व खाजगी क्षेत्रातील कार्यालयाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013 व नियम दि. 9 डिसेंबर 2013 या कायद्याच्या अंमलबजावणी करीता अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे व समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये लावणे या कायद्यान्वये बंधनकारक आहे. कार्यालयांनी अधिनियमातील कलम ४(१) अंतर्गत कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती गठीत करावी व समिती मधील अध्यक्ष / सदस्य यांची नावे व दुरध्वनी क्रमांक असलेला फलक कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये लावावा. तसेच समिती गठीत केल्याबाबतचा अहवाल दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सांगली येथे सादर करावा. समिती स्थापन करण्यासाठीची माहिती अधिनियमाच्या कलम ४(२) व महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णय दि. 19 जून 2014 मध्ये देण्यात आली आहे. समिती गठीत केल्याबाबतचा अहवाल सादर न झाल्यास अधिनियमाच्या कलम 26(अ) नुसार 50 हजार रूपये संबंधित आस्थापनेला दंड आकारण्यात येईल यांची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. 00000

हळद व बेदाण्याचे मार्केटिंग व ब्रॅन्डिग करा - गोविंद हांडे

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत सांगलीत खरेदीदार - विक्रेता संमेलन संपन्न सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : भौगोलिक मानांकन मिळालेल्या हळद व बेदाणा या उत्पादनाचा फायदा उद्योजक, निर्यातदार यांनी घेऊन याचे मार्केटिंग व ब्रॅन्डिग करावे, असे आवाहन कृषि आयुक्तालय पुणे येथील तंत्र सल्लागार गोविंद हांडे यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या खरेदीदार - विक्रेता संमेलनामध्ये मार्गदर्शन करताना केले. सांगली येथे झालेल्या खरेदीदार - विक्रेता संमेलनास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, अन्न व प्रशासन विभागाचे उपायुक्त सुकुमार चौगुले, कृषि उपसंचालक प्रियांका भोसले, अन्न तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल ढाकणे, सुरेश पाटील, उद्योजक खरेदीदार व विक्रेते उपस्थित होते. श्री. हांडे म्हणाले, देशांतर्गत व परदेशामध्ये प्राधान्याने अंशमुक्त / विषमुक्त व प्रक्रिया केलेला माल याची मागणी आहे. अंशमुक्त शेतमाल तयार करणे व त्यावरच प्रक्रिया करणे काळाची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत तरूण उद्योजकांनी अपेडा प्रणालीवर ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच उपलब्ध असलेल्या ऑनलाईन बाजारपेठ यांचा उपयोग करावा. त्यासाठी योग्य उत्कृष्ट पॅकिंग, लेबेलिंग, ब्रॅन्डिग असणे आवश्यक असल्याचे श्री. हांडे म्हणाले. कृषिमाल प्रक्रियेसाठी लागणारे परवाने, मालाचा दर्जा, मानके याबद्दल असलेले निकष याबद्दल श्री. चौगुले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी खरेदीदार व उद्योजक यांना सविस्तर मार्गदर्शन केले. उत्पादनाचा दर्जा चांगला असला पाहिजे, सांगली जिल्ह्यातून 2 लाख टन बेदाणा उत्पादन होत असून देशांतर्गत व परदेशी बाजारपेठांचा उद्योजकांनी फायदा करून घ्यावा. तसेच ऑनलाईन बाजारपेठ व सद्यपरिस्थितीतील बाजारपेठ याबद्दल चेंबर ऑफ कॉमर्स चे माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. संमेलनात अमोल ढाकणे, अशोक बाफना, रोहर झँवर, वसीम फकीर, आदित्य शहा, पुनम साठम यांनी मनोगत व्यक्त केले. कृषि उपसंचालक प्रियांका भोसले यांनी प्रास्ताविकात प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेबद्दल मार्गदर्शन केले. प्रविण बनसोडे सुत्रसंचालन यांनी केले. कृषि अधिकारी प्रकाश नागरगोजे यांनी आभार मानले. 0000

रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

आता .. विधी साक्षर होणे गरजेचे - न्यायमूर्ती सारंग कोतवाल

मालगाव येथे विधी साक्षरता महाशिबीर संपन्न सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : नियम व कायदे हे सतत बदलत जाणारी प्रक्रिया आहे. कायदा माहित नाही हा समज न्यायालयात चालत नाही. यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा लाभ घेऊन प्रत्येकाने विधी साक्षर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व पालक न्यायमूर्ती सांगली न्यायिक जिल्हा न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी मिरज तालुक्यातील मालगाव येथे आयोजित विधी साक्षरता महाशिबीर उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले. अखिल भारतीय विधी जागरूकता संपर्क अभियानांतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली आणि दि सांगली बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज तालुक्यातील मालगाव येथे विधी साक्षरता महाशिबिर आयोजित करण्यात आले होते. या महशिबिराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व पालक न्यायमूर्ती सांगली न्यायिक जिल्हा न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व पालक न्यायमूर्ती सांगली न्यायिक जिल्हा न्यायमूर्ती अभय आहुजा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगलीचे अध्यक्ष अजेय राजंदेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रवीण नरडेले, भारती विद्यापीठाच्या लॉ कॉलेजच्या प्राचार्य पूजा नरवाडकर, जिल्हा न्यायालयातील न्यायमूर्ती यांच्यासह सांगली बार असोसिएशनचे पदाधिकारी, विधीज्ञ व मालगाव व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. न्यायमूर्ती श्री. कोतवाल म्हणाले, संविधानाने दिलेले हक्क, कर्तव्य याची प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी विधी साक्षरतासारखी शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत. या शिबीरांच्या माध्यमातून तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडील तज्ज्ञ विधींज्ञांमार्फत सर्वसामान्यांना कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन केले जात आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा. न्यायपालिकेबाबत सर्वसामान्यांच्या मनात अनाठायी भिती आहे. मात्र न्यायपालिका या केवळ कायद्याचे पालन करुन आपले कर्तव्य बजावून लोकांना मदत करण्याची भूमिका पार पाडत असल्याने न्यायपालिकांबाबत भिती बाळगू नये. विधी सेवा प्राधिकरणामार्फत प्रत्येक गावात विधी साक्षरता विषयक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आहे, याचा लाभ घ्यावा असे आवाहन न्यायमूर्ती श्री. कोतवाल यांनी केले. कायदे विषयक महाशिबीर कार्यक्रमास उपस्थित राहताना मालगावकरांनी केलेले स्वागत अविस्मरणीय आहे. आपण सांगली जिल्ह्याचा पालक न्यायमुर्ती असल्याने या विभागात सांगली जिल्ह्याचे असलेले प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही न्यायमूर्ती श्री. कोतवाल यांनी यावेळी बोलतांना दिली. न्यायमूर्ती श्री. आहुजा म्हणाले, न्यायाचे चाक नेहमी पुढे जात रहावे या उक्ती प्रमाणे न्यायपालिका काम करीत आहे. सामान्यांच्या हक्काचे रक्षण व वंचिताना न्याय मिळवून देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत अनेक कायदेविषयक मागदर्शन व शिबीरे आयोजित केली जात आहेत. यातून लोकांना त्यांचे हक्क, कर्तव्य व कायद्याबाबतची माहिती मिळेल. विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करुन विधी सेवा प्राधिकरणाच्या कामकाजाची माहिती न्यायमूर्ती आहुजा यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सर्व सामान्यांमध्ये विधी साक्षरता व कायदेविषयक जनजागृती करणे हा मुख्य उद्देश ठेवून विधी सेवा प्राधिकरणामार्फत राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन, कायदे विषयक शिबीरे आयोजित केली जात आहेत. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. विधी साक्षरता महाशिबीरातून लोकांना न्याय व्यवस्था, विधी प्राधिकरणाबाबत मोफत मार्गदर्शन सल्ला या बाबत माहिती मिळत आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी असे उपक्रम महत्वाचे आहेत. न्याय, विधी आणि प्रशासन एकत्र काम करत असल्याने याचा लाभ सामान्य जनतेला होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डुडी यांनी यावेळी सांगितले. विधी साक्षरतेमध्ये सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांचाही सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. पोलीस अधीक्षक डॉ. तेली म्हणाले, गुन्हे घडण्याच्या प्रकारात वेगाने बदल होत आहेत. सद्या सायबर गुन्हे व आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. या गुन्ह्यांना बळी पडणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने यातील कायदेविषयक बाबींची माहिती सर्वांनी करुन घेणे गरजेचे आहे. प्राचार्य श्रीमती नरवाडकर यांनी घटनेने दिलेले मूलभूत हक्क व कर्तव्य याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश श्री. राजंदेकर यांनी प्रस्ताविकात जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण नरडेले यांनी आभार मानले. 0000000

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

जिल्ह्यातील 452 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यातील 452 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर सांगली, दि. 09, (जि. मा. का.) : ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणूकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यातील 452 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली. ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये आटपाडी तालुक्यातील 26, जत 81, कडेगाव 43, कवठेमहांकाळ 29, खानापूर 45, मिरज 38, पलूस 16, शिराळा 60, तासगाव 26, वाळवा 88 अशा एकूण 452 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ज्या जिल्ह्यामध्ये 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू राहील. ज्या तालुक्यात 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका आहेत त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू राहील. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या सीमेलगतच्या गावांमध्येसुध्दा आचारसंहिता लागू राहील. सदर आचारसंहिता ही केवळ ग्रामीण क्षेत्रासाठी लागू असेल. तथापि, नागरी स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रासाठी सदर आचारसंहिता लागू नसली तरी ग्रामपंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पडेल अशा प्रकारची कोणतीही कृती अगर भाष्य नागरी क्षेत्रात करता येणार नाही. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती / घोषणा आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे. तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक - दि. 18 नोव्हेंबर 2022 (शुक्रवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ - दि. 28 नोव्हेंबर 2022 (सोमवार) ते दि. 2 डिसेंबर 2022 (शुक्रवार) सकाळी 11 ते दुपारी 3. नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ - दि. 5 डिसेंबर 2022 (सोमवार) सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ - दि. 7 डिसेंबर 2022 (बुधवार) दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ - दि. 7 डिसेंबर 2022 (बुधवार) दुपारी 3 वाजल्यानंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक - दि. 18 डिसेंबर 2022 (रविवार) सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत (मात्र नक्षलग्रस्त भागामध्ये उदा. गडचिरोली, गोंदीया जिल्ह्यांकरीता सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत). मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाघिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) - दि. 20 डिसेंबर 2022 (मंगळवार). जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक - दि. 23 डिसेंबर 2022 (शुक्रवार) पर्यंत. 00000

लोकशाही बळकटीकरणात युवकांचा सहभाग महत्वाचा मतदार नोंदणीसाठी युवकांनो पुढे या - अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख

सांगली, दि. 09, (जि. मा. का.) : लोकशाहीच्या बळकटीकरणामध्ये युवकांचा सहभाग महत्वाचा आहे. लोकशाहीवरील विश्वास अधिक वृध्दींगत होण्यासाठी मतदार नोंदणी होणे आवश्यक असल्याने युवकांनी मतदार यादीत आपल्या नावाची नोंद करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2023 अंतर्गत प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी कार्यक्रमाप्रसंगी डॉ. देशमुख बोलत होत्या. कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी एम. बी. बोरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, खेलो इंडिया युथ गेममध्ये वेटलिफटिंग खेळातील सुवर्ण पदक विजेती युथ ऑयकॉन काजल सरगर यांच्यासह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते. डॉ. देशमुख म्हणाल्या, मतदार जन जागृतीसाठी भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आता 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर आधारित वर्षातून चार वेळा मतदार आपल्या नावाची नोंद मतदार यादीत करु शकणार आहे. सांगली जिल्हा मतदार नोंदणीमध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मतदार नोंदणीमध्ये जिल्ह्याचे काम आणखी उठावदार होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करुन जिल्ह्याचा लौकिक वाढवूया. मतदार नोंदणीमध्ये वंचित घटक, दिव्यांग, तृतीयपंथी या बरोबरच देहविक्री करणाऱ्या महिलांच्या नावाचीही नोंद करुन त्यांनाही लोकशाहीच्या सशक्तीकरणामध्ये सहभागी करुन घेऊ. मतदार ओळखपत्रास आधार जोडणीमध्ये जिल्ह्याचे जवळपास 59 टक्केपर्यंत काम झाले असून 100 टक्के काम होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. मतदार यादीचे शुद्धीकरण करणे या दुहेरी उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात उद्या १० नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करुन मतदार यादीचे वाचन, नवीन मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही डॉ. देशमुख म्हणाल्या. श्री. बारकुल म्हणाले, लोकशाहीत मतदारांचे योगदान अनन्य साधारण असून मतदार नोंदणी ही सक्षम लोकशाहीची पहिली पायरी आहे. यासाठी तरुणांनी मतदार यादीत आपल्या नावाची नोंद करण्यासाठी पुढे यावे. युवकांची मतदार यादीत नोंद करण्यासाठी मविद्यालयस्तरावर शिबीर आयोजित करण्यात यावीत. यासाठी महाविद्यालयांनीही सहकार्य करावे. प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. बोरकर यांनी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2023 बाबत माहिती दिली. प्रारुप मतदार यादीचे वाचन करण्यासाठी 10 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात ग्रामसभा आयोजित करण्यात आल्याचे सांगून 19 व 20 नोव्हेंबर आणि 3 व 4 डिसेंबर रोजी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात आधार जोडणीचे 100 टक्के काम पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांनी आभार मानले. 00000