गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत विहीत मुदतीत सहभागी होण्याचे आवाहन

सांगली दि. 24 (जि. मा. का.) : प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम ज्वारी (बागायत, जिरायत) पिकासाठी दि. ३० नोव्हेंबर २०२२, गहू (बागायत), हरभरा पिकासाठी १५ डिसेंबर २०२२ व उन्हाळी भुईमूग पिकासाठी ३१ मार्च २०२३ अशी विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम तारीख आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या विमा योजनेत विहीत मुदतीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांनी केले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड/ आधार नोंदणीची प्रत, सातबारा उतारा, भाडे करार असलेल्या शेतकऱ्यांसाठी करारनामा/ सहमती पत्र, पेरणी स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक प्रत या आवश्यक कागदपत्रासह खाते कार्यरत असणारी बँक/ शाखा प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, संबंधित विमा कंपनी कार्यालय, आपले सहकार सेवा सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करूनही शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी /कर्मचारी अथवा संबंधित विमा कंपनी प्रतिनिधीशी (संदिप पाटील ९७३०१९७७७१) संपर्क साधावा. प्रधानमंत्री पिक विमा योजना सर्व शेतकऱ्यांसाठी (कर्जदार/ बिगर कर्जदार) ऐच्छिक असून खातेदार शेतकरी, व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी सुद्धा या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र राहतील. योजनेतील सर्व अधिसूचित पिकासाठी जोखीम स्तर 70 टक्के इतका राहणार असून, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रब्बी हंगामातील पिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या १.५ टक्के तर नगदी पिकासाठी ५ टक्के इतका आहे. पिक निहाय विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर व कंसात शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम पुढीलप्रमाणे आहे. गहू बा. 30 हजार रूपये (450 रू.), ज्वारी बा. 35 हजार रूपये (525 रू.), ज्वारी जि. 25 हजार रूपये (375 रू.), हरभरा 35 हजार रूपये (525 रू.), उ. भुईमूग 40 हजार रूपये (600 रू.). 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा