गुरुवार, ३१ मार्च, २०२२

मतदार नोंदणी पंधरवड्यात अधिकाधिक तृतीयपंथीयांची मतदार नोंदणी करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : तृतीय पंथीयांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती व्हावी त्याचबरोबर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तृतीय पंथीयांच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने आरोग्य, राहण्यासाठी स्वत:चे हक्काचे घर, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तृतीय पंथीसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांनी मागणीबाबतचे सविस्तर प्रस्ताव प्रशासनास सादर करावेत. त्याचबरोबर त्यांच्याबाबतचा समाजातील दृष्टीकोन बदलण्यासाठी शालेय स्तरावर व्याख्यान मालांचे आयोजन करण्यावर भर देण्यात यावा. तृतीय पंथी ओळख दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात दि. २७ मार्च ते १० एप्रिल २०२२ हा तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यात तृतीय पंथीयांसाठी कार्यरत सामाजिक संस्थांनी आणि व्यक्तींनी या मोहिमेला सहकार्य करून अधिकाधिक तृतीय पंथीयांची मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) एम. बी. बोरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकूल, समाज कल्याण निरीक्षक कल्याणी दैठणकर, मुस्कान संस्थेचे सचिव सुधीर पाटील आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, तृतीयपंथी यांना आत्मनिर्भर करण्यासाठी व त्यांना स्वत:चा व्यवसाय करता यावा यास्तव कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून ट्रेनिंग देण्यासाठी कोर्सचे आयोजन करण्यात येईल. यासाठी डीपीसीच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. त्याचबरोबर व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासाठीही बँकांबरोबर समन्वय साधण्यात येईल. शहरी व ग्रामीण भागातील तृतीय पंथीयांची संख्या निश्चित करून त्यांना हक्काचे घरकूल मिळावे यासाठी शासनाच्या विविध घरकूल योजनांच्या माध्यमातून घर देण्याबाबत प्रयत्न केला जाईल. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभही व धान्यही उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न केला जाईल. तृतीय पंथी हे समाजातील एक घटक असून त्यानांही मतदानाचा अधिकार लोकशाहीत आहे. ३१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिनानिमित्त शुभेच्छा देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, नोव्हेंबर 2021 मधील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेमध्ये सांगली जिल्ह्यात सांगली शहर व मिरज शहर येथे तृतीयपंथी मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित केली होती. या मोहिमेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये 27 मतदारांची नोंदणी केली आहे. या नोंदणीसाठी सांगली मधील मुस्कान संस्थेने महत्वाची भूमिका पार पाडली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये मतदार यादीमध्ये एकूण 93 तृतीयपंथी व्यक्तींची नोंदणी झाली आहे. मुस्कान संस्थेच्या माहितीप्रमाणे संस्थेच्या पोर्टलवर 114 व्यक्तींची नोंदणी आहे. तर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडे 172 व्यक्तींची माहिती आहे. उर्वरीत पात्र मतदारांची नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी एम. बी. बोरकर म्हणाले, तृतीय पंथीयांकडे मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची कमतरता लक्षात घेवून भारत निवडणूक आयोगाने त्यांना कागदपत्रांबाबत सवलत दिली आहे. 18 ते 21 वयोगटातील ज्या तृतीय पंथीव्यक्तीकडे वयाचा कोणताही पुरावा नसेल, तर त्यांच्या गुरु माँ ने दिलेले प्रमाणपत्रही नमुना पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. 21 वर्षावरील तृतीय पंथीयाने वयाचा पुरावा म्हणून स्वतःच वय सांगणारे प्रमाणपत्र दिल्यास अधिकृत मानले जाते. पत्त्याचा पुरावा म्हणून संबंधीत व्यक्तीच्या सध्याच्या निवासस्थानी आलेले टपालसुद्धा पुरावा ग्राह्य धरला जातो. जिल्ह्यातील सर्व पात्र तृतीय पंथीय नागरिकांची मतदार यादीत नोंदणी करणे हे जिल्हा निवडणूक कार्यालयाचे उद्दिष्ट आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते राखी घोंगडे, सारा वनखंडे, श्रीराम मलमे, सागर रेपे, विनायक कांबळे, विकास कांबळे, गायत्री गडकरी यांना मतदान ईपीक कार्डाचे वितरण करण्यात आले. तर जॉनी पीटर, ज्योती घोंगडे, दिपा माने यांना नविन मतदार नोंदणी फॉर्म क्रमांक 6 चे वितरण करण्यात आले. यावेळी मुस्कान संस्थेचे सचिव राजेंद्र उर्फ सुधीर पाटील यांनी तृतीय पंथी यांच्या समस्या मांडल्या. तर तृतीय पंथी न्यूज रिपोर्टर सोनल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. आभार जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी मानले. 00000

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार टेंभु उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू

सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यातील अनुक्रमे कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, कराड, सांगोला तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या टेंभु उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार टेंभु उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन दि. ३१ मार्च पासून सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. उन्हाळ्याची तीव्रता आणि लाभधारकांची होणारी मागणी लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आले आहे. टेंभु बॅरेजचे मुख्य दरवाजे बंद करुन अपेक्षित पाणीसाठा करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने व प्राधान्याने जोड कालवा १ व २ अंतर्गत कडेगाव तालुक्यातील लाभक्षेत्र तसेच टप्पा क्र. ३, ४ व ५ अंतर्गत खानापूर, तासगाव, आटपाडी आणि सांगोला या तालुक्यात तसेच पुणदी विसापूर उपसा सिंचन योजना कार्यान्वित केली आहे. साधारणपणे एप्रिल ते जून २०२२ अखेर ६ टीएमसी पाणी उचलण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे. 000000

पलुस तालुक्यातील सहा पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 15 कोटीचा निधी साडेचार कोटी ‍निधी वितरीत - सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना कार्यरत आहे. या योजनेंतर्गत सन 2021-22 वर्षासाठी पलुस तालुक्यातील 6 पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 15 कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. यातील 4 कोटी 50 लाख इतका निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथील आनंदमूर्ती मठ परिसरात रस्ता, उद्यान, कृष्णा घाट, भक्त निवास इतर सोई-सुविधा पुरविण्यासाठी 4 कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी 1 कोटी 20 लाख इतका निधी वितरीत केला आहे. बुर्ली येथील बंचाप्पा मंदिर परिसरात रस्ता, उद्यान, कृष्णा घाट, भक्त निवास इतर सोई-सुविधा पुरविण्यासाठी 3 कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी 90 लाख इतका निधी वितरीत केला आहे. बुरूंगवाडी येथील ब्रम्हानंद महाराज मठ परिसरात रस्ता, भक्त निवास, सभागृह, पार्किंग सुविधा पुरविण्यासाठी 2 कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी 60 लाख इतका निधी वितरीत केला आहे. कुंडल येथील दत्त मंदिर परिसरात रस्ता व इतर सोई-सुविधा पुरविण्यासाठी 1 कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी 30 लाख इतका निधी वितरीत केला आहे. पुणदी येथील लक्ष्मी मंदिर परिसरात भक्त निवास, सभापंडप, टॉयलेट, रस्ता काँक्रीटीकरण, नदी घाट बांधकाम करण्यासाठी 2 कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी 60 लाख इतका निधी वितरीत केला आहे. सांडगेवाडी लक्ष्मी मंदिर परिसरात भक्त निवास, सभागृह, जोडरस्ता, संरक्षण भिंत, पार्किंग, जमीन सुधारणा करण्यासाठी 3 कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून 90 लाख इतका निधी वितरीत केला आहे. 00000

शनिवार, २६ मार्च, २०२२

ड्रायपोर्ट, सॅटेलाईट पोर्ट, एअरपोर्टमुळे सांगलीचा चौफेर विकास होणार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ‍नितीन गडकरी

जिल्ह्याच्या विकासासाठी ड्रायपोर्ट महत्वाचे यासाठी राज्यसरकारकडून जी आवश्यकता आहे त्याची जबाबदारी घेणार - पालकमंत्री जयंत पाटील - सांगली येथे 2 हजार 334 कोटी किंमतीच्या 96.78 कि. मी. लांबीच्या दोन महामार्ग प्रकल्पांचे डिजीटल पध्दतीने लोकार्पण - पुणे ते बेंगलोर नविन 699 कि. मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गासाठी 40 हजार कोटी निधी प्रस्तावित - पेठ ते सांगली या महामार्गाचे काम येत्या तीन ते चार महिन्यात सुरू होणार - सांगलीसाठी आणखी एक महामार्ग सिन्नर, अहमदनगर, दौंड, बारामती, फलटण, दहिवडी, विटा, चिकोडी प्रस्तावित - सांगली जिल्ह्यात ड्रायपोर्ट, एअरपोर्ट, लॉजिस्टीक पार्क, प्रि कुलींग प्लँट, कोल्ड स्टोअरेज थेट आयात निर्यात व्यवस्था निर्माण होणार सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्याची द्राक्षे, उद्योगातून तयार होणार माल, हळद, साखर थेट परदेशात निर्यात होवू लागल्यास सांगलीची आर्थिक स्थिती बदलेल व सांगली हा महाराष्ट्रातील समृध्द व संपन्न जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यामध्ये पाण्याची, रस्त्यांची, उर्जेची सोय झाली आता ड्रायपोर्ट सॅटेलाईट पोर्टही येणार आहे. त्या ठिकाणी एअरपोर्टही येईल, त्यामुळे सांगलीचा चौफेर विकास होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ‍नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. राजमती मैदान, नेमिनाथ नगर, विश्रामबाग सांगली येथे 2 हजार 334 कोटी किंमतीच्या 96.78 कि. मी. लांबीच्या दोन महामार्ग प्रकल्पांचे डिजीटल पध्दतीने लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ‍नितीन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, खासदार संजय पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अरूण लाड, माजी महसूल मंत्री व आमदार चंद्रकांत पाटील, माजी सहकार मंत्री व आमदार सुभाष देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रम सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, राष्ट्रीय महामार्गाचे रिजनल मॅनेंजर अंशुमन श्रीवास्तव, नॅशनल हायवे चे मुख्य अभियंता संतोष शेलार, अधिक्षक अभियंता संभाजी धोत्रे, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, दिपक शिंदे, सत्यजित देशमुख, शेखर इनामदार, नगरसेवक आदि मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ‍नितीन गडकरी म्हणाले, पुणे ते बेंगलोर हा नविन राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित असून याची लांबी 699 कि. मी. आहे. हा पूर्ण ग्रीन हायवे असून याचा प्रस्ताव पूर्ण झालेला आहे. हा महामार्ग पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील दुष्काळी भागातून जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव व कवठेमहांकाळ या दुष्काळी भागातून हा महामार्ग जाणार आहे. यामुळे या दुष्काळी भागाचाही कायापालट होईल. यासाठी जवळपास 40 हजार कोटी रूपयांचा निधी प्रस्तावित आहे. त्याचबरोबर सांगलीसाठी आणखी एक महामार्ग प्रस्तावित आहे तो म्हणजे सिन्नर, अहमदनगर, दौंड, बारामती, फलटण, दहिवडी, विटा, चिकोडी. हा महामार्गही तयार करण्यात येईल. यालाही 160 राष्ट्रीय महामार्ग घोषीत करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असणारा पेठ ते सांगली या महामार्गाचे काम येत्या तीन ते चार महिन्यात सुरू होईल. त्याबाबतचे टेंडर तातडीने निघेल. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या सात वर्षात जी रस्त्यांची लांबी होती ती जवळपास साडेतीन पटीने वाढली आहे. तशीच ती महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी आत्तापर्यंत 5 लाख कोटी रूपयांची कामे महाराष्ट्रात करण्यात आली आहेत. सांगलीमध्ये प्रामुख्याने तयार होणारी साखर, हळद, द्राक्ष तसेच बेदाणे थेट पदरेशात पाठविण्यासाठी सांगली येथे सॅटेलाईट ड्रायपोर्ट उभा करण्यात येईल असे सांगून केंद्रीय मंत्री ‍नितीन गडकरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्टच्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण होईल व सील झालेले कंटेनर्स थेट परदेशी बाजारपेठेत पाठविण्यात येतील. असा सुविधायुक्त लॉजिस्टीक पार्क, सॅटेलाईट ड्रायपोर्ट तयार होईल. यासाठी आवश्यक असणारी जमीन तातडीने उपलब्ध करून द्यावी. या उभारणीसाठी देशात 2 लाख कोटी इतकी तरतूद आहे. आत्तापर्यंत जालना, वर्धा, नाशिक या ठिकाणी ड्रायपोर्ट तयार झाले आहेत. आता सांगलीचाही ड्रायपोर्ट लवकर तयार होईल. राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू होईल. यामध्ये केंद्राचा व राज्याचा प्रत्येकी 50 टक्के निधी असेल, असे सांगून केंद्रीय मंत्री ‍नितीन गडकरी म्हणाले, सांगलीमध्ये उभारण्यात येणाऱ्या लॉजिस्टीक पार्कमध्ये साडेतीन कि.मी. चा सिमेंट क्राँक्रीटचा रोड असा बांधण्यात येईल की ज्यावर कोणतेही मोठे विमान उतरू शकेल. यामुळे सांगलीमध्ये एअरपोर्ट लॉजिस्टीक पार्क, प्रि कुलींग प्लँट, कोल्ड स्टोअरेज थेट आयात निर्यात व्यवस्था जिल्ह्यासाठी निर्माण होईल. त्यामुळे सांगलीचा आर्थिक विकास होईल. यासाठी राज्य शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पुणे ते बेंगलोर हा नविन महामार्ग प्रस्तावित असून याची लांबी 699 कि. मी. आहे. हा पूर्ण ग्रीन हायवे आहे. याचा प्रस्ताव पूर्ण झालेला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील दुष्काळी भागातून हा महामार्ग जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव व कवठेमहांकाळ या दुष्काळी भागातून हायवे जाणार आहे. यामुळे या दुष्काळी भागाचाही कायापालट होईल. यासाठी जवळपास 40 हजार कोटी रूपयांचा निधी प्रस्तावित आहे. त्याचबरोबर सांगलीसाठी आणखी एक महामार्ग प्रस्तावित आहे तो म्हणजे सिन्नर, अहमदनगर, दौंड, बारामती, फलटण, दहिवडी, विटा, चिकोडी. हा महामार्गही तयार करण्यात येईल. यालाही 160 राष्ट्रीय महामार्ग घोषीत करण्यात आला आहे. या महामार्गासाठी बायपासही प्रस्तावित करण्यात आले आहेत. हे ही काम मंजूर करून लवकरात लवकर सुरू करू. या रस्त्यांचे कामही सिमेंट क्राँक्रिटचे असल्याचे केंद्रीय मंत्री ‍नितीन गडकरी यांनी सांगितले. ऊसाच्या चिपाडापासून व बायोमास पासून बिटूमिन तयार केले आहे. याचा वापर यापुढे राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न राहता उर्जादाता बनले पाहिजे. येणाऱ्या काळात बिटूमिनची आवश्यकता राहील हे बिटूमिन महामार्गाच्या कामांमध्ये वापरण्याची सक्ती करण्यात येणार असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री ‍नितीन गडकरी म्हणाले, दुष्काळी भागातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या ठिकाणी केंद्र शासनाकडून शेततळे शेतकऱ्यांसाठी मोफत बांधून देण्यात येईल. रूंदीकरण व खोलीकरणात जो कच्चा माल निघेल तो महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येईल. त्याचबरोबर रेल्वेच्या क्रॉसिंगसाठी असणारी जेवढी फाटके आहेत त्या ठिकाणी अंडरब्रिज किंवा ओव्हरब्रिज आवश्यकतेप्रमाणे दिले जातील. त्यासाठीही प्रस्ताव पाठवावेत. त्यासाठी खात्यांतर्गत 10 हजार कोटी रूपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. यामुळे संपूर्ण देशात रेल्वे सेवा व रस्ते सेवा फाटकमुक्त होईल. सांगली सोलापूर हा 185 कि.मी. चा रस्ता असून हे अंतर केवळ दीड ते दोन तासात पूर्ण होईल असा विश्वास आहे. देशांतर्गत रस्त्यांच्या रूंदीकरणामुळे लागणाऱ्या प्रवासाची वेळ ही जवळपास अर्ध्यावर आली असल्याचे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा सुखी, समृध्द व संपन्न झाला पाहिजे यासाठी व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री म्हणून महाराष्ट्राचा ॲम्बेसिडर म्हणून काम करत आहे. एक मराठी माणूस म्हणून मला नेहमी अभिमान राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हे राज्य देशात नंबर एक चे झाले पाहिजे असे मला वाटते असे सांगून केंद्रीय मंत्री ‍नितीन गडकरी म्हणाले, महाराष्ट्राला एक सांस्कृतिक वारसा व इतिहास आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्याबरोबर महाराष्ट्रात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत गजानन, संत गाडगे महाराज अशी संतांची परंपरा आहे. पर्यटन हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रात आता रोप वे, केबल कार ही अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जगातील सर्वच उत्कृष्ट टेक्नॉलॉजी देशात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. सांगली, कोल्हापूर, सातारा या सर्वच ठिकाणी मेट्रो सुरू होणे शक्य नाही यामुळे या ठिकाणी हवेतून चालणारी बस चालू करण्याचा विचार आहे. यासाठी रोप वे, केबल कार अशांसाठी प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करावेत. आत्तापर्यंत अशा प्रकारचे 60 प्रकल्प देशामध्ये मंजूर केले आहेत. यामध्ये उत्तराखंड, काश्मिर, हिमाचल प्रदेश यांचा प्रामुख्याने समावेश आहे. येत्या काळात सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे असे सांगून केंद्रीय मंत्री ‍नितीन गडकरी म्हणाले, रस्ते बांधकामाबरोबरच जलसंवर्धनाच्या कामावरही भर देणार आहे. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातील पाणी गावात, शेतातील पाणी शेतात आणि घरातील पाणी घरात अशी ही संकल्पना आहे. सध्या सांगली - सोलापूर रस्त्याचे काम पूर्णत्वास येत आहे. या रस्त्याच्या बांधकामात जेवढ्या नदी, नाले, ओढे येतील त्या सर्वांचे रूंदीकरण व खोलीकरण करण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये 1995 मध्ये बांधकाम मंत्री असताना सांगलीमध्ये येण्याचा योग आला. त्यावेळी एकाच वेळी चार पुलांचे भुमिपूजन केले होते. त्यानंतर बऱ्याच वेळा येण्याची संधी मिळाली. पण आज महाराष्ट्रात सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे. विदर्भाच्या अनुशेषाबद्दल यासाठी बराच प्रयत्न केला. त्यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी मोलाची साथ दिली. यावेळी दुष्काळी भागात पाण्याच्या सिंचन योजना राबविण्याचे ठरविले. त्यासाठी पैसाही उभा करण्याचे काम केले आणि दुष्काळी भागात सिंचन योजनांचे काम सुरू केले. यासाठी सिंचन महामंडळाची निर्मिती केली. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्र यामधील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुरूवात केली. सांगली, सातारा, सोलापूर या भागातील सिंचनांच्या योजना मोठ्या प्रमाणात होत्या. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी थोडा उशीर झाला यामुळे यांची निर्मिती किंमत वाढली. याचवेळी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना म्हैसाळचे पाणी दुष्काळी भागात कशा प्रकारे घेवून जाता येईल यासाठी प्रयत्न केले. यासाठी बळीराजा योजना तयार केली आणि यामध्ये 50 टक्केपेक्षा जास्त कामे झाली आहेत. त्या सर्व योजनांकरिता प्रधानमंत्री सिंचन योजनेतून पश्चिम महाराष्ट्राकरिता 6 हजार कोटी रूपये मंजूर केले. यामुळे सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भाग सिंचनाखाली आला याचा आनंद असल्याचेही ते यावेळी म्हणाले. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यातील महामार्गावरूनर ज्यावेळी आम्ही जातो त्यावेळी आम्ही वेगळ्या प्रदेशात, देशात आलो आहे, एवढ्या उत्तम दर्जाचे रस्ते केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी केले आहेत. हा कार्यक्रम भारताच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारा आहे. अमेरिका व युरोप ची प्रगती होण्यामागे मूळ कारण तेथील रस्ते व रेल्वे आहे. रस्ते या विषयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्रात मंत्री असताना त्यांनी अतिशय प्रभावी काम केले आहे. त्यांनी ज्या ठिकाणी हात घातला तिथे प्रकल्प वेगात पूर्ण केले. सांगली जिल्ह्यामध्ये रस्त्यांचे चांगले काम झाले आहे त्याचे सर्व श्रेय श्री. गडकरी यांना जाते. एखादा मंत्री धाडसाने नियमाला वळण देवून कसे काम पूर्ण करू शकतो, झपाट्याने कसा रिझल्ट देवू शकतो तो आदर्श भारतामध्ये श्री. गडकरी यांनी घालून दिला आहे. रस्त्याचा दर्जा आज सर्व भारतामध्ये समान आहे. सर्व ठिकाणी समान क्वालिटीचे रस्ते होणे हे काम सोपे नाही. अतिवेगाने रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न श्री. गडकरी यांनी सुरू केला आहे. पेठ नाका ते सांगली व कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे या रस्त्यांचे काम प्राधान्याने घ्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. जिल्ह्याच्या विकासासाठी ड्रायपोर्ट होणे महत्वाचे आहे. यासाठी राज्यसरकारची जी आवश्यकता आहे त्याची जबाबदारी मी घेत असून या जिल्ह्याच्या विकासाला नवे होणारे महामार्ग चालना देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्रातील अनेक रस्ते जे राष्ट्रीय महामार्ग आहेत त्यासाठी हजारो कोटी रूपये देण्याचे काम श्री. गडकरी यांनी केले असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते 96.78 कि. मी. लांबीच्या दोन महामार्ग प्रकल्पांचे डिजीटल पध्दतीने लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविकात राष्ट्रीय महामार्गाचे रिजनल मॅनेंजर अंशुमन श्रीवास्तव म्हणाले, लोकार्पण करण्यात आलेल्या बोरगाव - वाटंबरे राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 कि.मी. 224/000 ते कि.मी. 276/000 लांबीचे चौपदरीकरण करणे (पॅकेज क्र. २) या कामाची लांबी 52 कि.मी. असून किंमत 2 हजार 76 कोटी 63 लाख व महामार्ग क्र. 965 जी सांगोला - सोनंद - जत साखळी क्र. कि.मी. 0.000 ते 44.784 मध्ये पुर्नवसन व उन्नतीकरण करणे या कामाची लांबी 44.78 कि.मी असून किंमत 257 कोटी 38 लाख रूपये इतकी आहे. अशी या दोन्ही प्रकल्पाची एकूण 96.78 इतकी लांबी असून ‍किंमत 2 हजार 334 कोटी रूपये इतकी आहे. यामुळे सांगली जिल्ह्याच्या दळणवळणाला चालना मिळेल तसेच सोलापूर - सांगली प्रवासाचा वेळ कमी होईल, असे ते म्हणाले. 000000

गुरुवार, २४ मार्च, २०२२

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात संचारबंदी लागू

सांगली दि. 24 (जि.मा.का.) : सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. 8 मधील रघुवंशी कॉलनी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात आलेले आहे. या स्मारकाच्या लोर्कापण सोहळ्याच्या कारणावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) अन्वये सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 8 मधील रघुवंशी कॉलनी, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक आणि स्मारकाच्या कंपाउंड पासून चारही बाजूस सभोवताली 100 मीटर परिसरात दि. 25 मार्च 2022 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 2 एप्रिल 2022 रोजीचे 10 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144(1) अन्वये संचारबंदी लागू करून खालील कृत्यांना मनाई केली आहे. स्मारक परिसरात लोकांनी विनाकारण जमण्यास व गटागटाने फिरण्यास मनाई केली आहे. स्मारक परिसरात कोणताही दाहक पदार्थ, कोणताही स्फोटक पदार्थ व अन्य धोकादायक साधने सोबत नेण्यास मनाई केली आहे. स्मारक परिसरात घोषणा देणे, वाद्ये वाजविण्यास वा फलक लावण्यास अथवा प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. स्मारक परिसरात सभा घेणे तसेच लाठी, काठी, शस्त्र घेवून प्रवेश करण्यास मनाई केली आहे. शासकीय परवानगी शिवाय स्मारक परिसरात कोणताही मंडप घालण्यास मनाई केली आहे. स्मारक परिसराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्ण बॅरिकेटींग करण्याच्या दृष्टीने आणि स्मारकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांनी पोलीस प्रशासनाशी समन्वये साधून कार्यवाही करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. 000000

रोगापेक्षा रूग्णअवस्थेवर लक्ष केंद्रित केल्यास वैद्यकिय सेवा घडेल - अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर

सांगली दि. 24 (जि.मा.का.) : सामाजिक क्षेत्रात आरोग्य विषयक काम करताना सामाजिक जाणीव, बांधिलकी, प्रामाणिकपणा, समन्वय आणि सकारत्मकता ठेवून सातत्याने काम केल्यास यश निश्चितच मिळते आणि त्यामुळे आरोग्य सेवाही चांगली घडते. रोगापेक्षा रूग्णअवस्थेवर लक्ष केंद्रित केल्यास खऱ्या अर्थाने वैद्यकिय सेवा घडेल, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी केले. 24 मार्च, जागतिक क्षयरोग दिनानिमित्त राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम हॉटेल कॅपिटल किचन सांगली येथे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सप्ना कुपेकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकिय अधिक्षक बालरोगतज्ज्ञ डॉ. शिशीर मिरगुंडे, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी डॉ. सचिन पाटणकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी आदि उपस्थित होते. राज्यामध्ये अनेक ठिकाणी वैद्यकिय सेवा करण्याचा योग आला पण सांगली जिल्ह्यात वैद्यकिय सेवा करण्यामध्ये अधिक आनंद आला. सांगली जिल्हा वैद्यकिय क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहील असे सांगून अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर म्हणाले, क्षयरोग हा उपचाराने हमखास बरा होतो पण 1852 मध्ये जर्मन चिकित्सक रॉबर्ट कोच यांनी टी.बी. चा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस या जीवाणूचा शोध लावला. त्यांचा हा शोध मानवजातीवर फार मोठे उपकार आहेत. क्षयरोग समूळ नष्ट करण्यासाठी देशपातळीवरही मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. सन 2025 पर्यंत क्षयरोग देशातून समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आरोग्य यंत्रणेने काम करावे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील रूग्णसेवा अधिक चांगल्या पध्दतीने देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सपना कुपेकर म्हणाल्या, क्षयरोग संपविण्यासाठी ज्यांना लक्षणे जाणवत असतील त्यांनी तातडीने तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच क्षयरोग शोध मोहिम प्रभावीपणे राबवून क्षयमुक्त जिल्हा करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडूनही संपूर्ण मदत केली जाईल. क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी आपण सर्वजण मिळून अधिक जोमाने काम करू असे त्या म्हणाल्या. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी म्हणाल्या, सांगली जिल्ह्यात क्षयरोग शोध मोहिम तीन महिन्यात जवळपास 80 टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. तर जिल्ह्यात क्षयरोग बरे होण्याचे प्रमाण 86 टक्के इतके आहे. क्षयरोग तपास मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यात 24 मार्च ते 13 एप्रिल पर्यंत तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये क्षयरोग जनजागृतीसाठी 330 समुदाय अधिकारी कार्यरत आहेत. ज्यांच्या घरात टी.बी. रूग्ण आढळतील त्या घरातील सर्वच व्यक्तींना औषधोपचार केले जातात. सांगली जिल्ह्यामध्ये 2021 मध्ये Drug Sensitive TB (औषधाना दाद देणारा) शासकीय आरोग्य संस्थेमध्ये 1 हजार 505 क्षयरूग्ण आणि खाजगी आरोग्य संस्थेमध्ये 1 हजार 6 क्षयरूग्ण नोंदणी झाले आहेत तर Drug Registance TB (औषधाना दाद न देणारा) 124 इतके क्षयरूग्ण नोंदणी झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. शिशीर मिरगुंडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थितांनी क्षयरोग नियंत्रण प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रम प्रसंगी उत्कृष्ट काम केल्याबद्दल क्षयरोग पथक विटा चे डॉ. अनिल लोखंडे, ग्रामीण रूग्णालय विटा वैद्यकिय अधिक्षक डॉ. विशाल ठोंबरे, तासगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव व शिराळा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चरण व कोकरूड, शरद कुंभार, महादेव हडपद, विनायक जोशी, श्री. जयंत, खाजगी वैद्यकिय व्यवसायिक डॉ. पी. ए. पवार, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सपना कुपेकर यांचा सत्कार करण्यात आला. तर रांगोळी स्पर्धेत अनिता फाळके, अमरज्योती, अस्मिता काशीद, ऋतिका जाधव, निबंध स्पर्धेत समर्थ साळुंखे, कोमल पाटील, पोस्टर स्पर्धेत मनिषा कारंडे, विद्या, प्रतिक्षा तटपुजे, पुजा चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन पी. एन. काळे व सतिश सवदे यांनी केले. आभार वैद्यकिय अधिक्षक डॉ. संतोष राचोटकर यांनी मानले. 00000

बाईक टॅक्सी व अवैधरित्या प्रवाशी वाहतूक देणाऱ्या दुचाकी वाहनांमधून नागरिकांनी प्रवास करू नये - उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे

सांगली दि. 24 (जि.मा.का.) : राज्यातील रिक्षा संघटना, नागरिक तसेच विविध माध्यमांतून बाईक टॅक्सी संदर्भाने तक्रारी प्राप्त झालेल्या असून राज्यात खाजगी दुचाकीचा बेकायदेशीर वापर काही संस्था ॲप आधारीत प्रणालीमधून करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रवाशांची फसवणूक होवू नये तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून "बाईक टॅक्सी" व अवैधरित्या प्रवाशी वाहतूक देणाऱ्या दुचाकी वाहनांमधून नागरिकांनी प्रवास करू नये. तसेच अशा ॲपचा वापर करू नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने अथवा राज्य परिवहन प्राधिकरणाने बाईक टॅक्सी अशा प्रकारचा कोणताही परवाना कोणालाही अद्याप जारी केलेला नाही. अशा वाहनांचा वापर मोटार वाहन कायद्याप्रमाणे बेकायदेशीर असून अशा वाहनांविरूध्द कारवाई करण्याच्या सुचना राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आलेल्या असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले. 00000

सांगली येथील सैनिक मुलां-मुलींच्या वसतिगृहात प्रवेशासाठी 31 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सांगली दि. 24 (जि.मा.का.) : सैनिक मुलां-मुलींचे वसतिगृह सांगली येथे शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता सेवारत/माजी सैनिक, विधवा, सिव्हिलियन यांच्या पुढील वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलां-मुलींना गुणवत्तेच्या आधारावर सवलतीच्या दरात प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुकांनी संबंधित वसतिगृहातून प्रवेश अर्ज प्राप्त करून भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रासह दि. 31 मार्च 2022 पर्यंत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले (निवृत्त) यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली दूरध्वनी क्रमांक 0233-2990712, अधिक्षक सैनिकी मुलांचे वसतिगृह सांगली मो.नं. 9657259073, अधिक्षीका सैनिकी मुलींचे वसतिगृह सांगली 9960190991 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. ढोले यांनी केले आहे. 00000

बुधवार, २३ मार्च, २०२२

मतदान प्रक्रियेत विद्यार्थी आणि महाविद्यालयांचा सहभाग वाढवा - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

- स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवा - मतदार प्रक्रियेचा बीएलओ कणा; त्यांना प्रोत्साहन द्या - ट्रांसजेंडर सप्ताहाच्या निमित्ताने मतदान विषयक जनजागृती करा सांगली दि. 23 (जि.मा.का.) : मतदान प्रक्रियेत विद्यार्थी आणि महाविद्यालयांचा सहभाग वाढवावा. महाराष्ट्रात 18 ते 19 व 20 ते 21 या वयोगटातील युवा वर्गाची संख्या जास्त आहे पण तुलनेने त्यांची मतदार नोंदणी कमी आहे. हा गॅप भरून काढणे व लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेमध्ये युवा वर्गाचा महत्वपूर्ण सहभाग घेणे आवश्यक आहे. स्वीप कार्यक्रमांसाठी नाविण्यगपूर्ण संकल्पनांबरोबरच जाणीवपूर्वक आखणी झाली पाहिजे. त्यामध्ये विद्यार्थी आणि महाविद्यालयांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी एम. बी. बोरकर, सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी लोकशाही बळकटीकरणात महत्वपूर्ण योगदान द्यावे यासाठी निवडणूक आयोग जाणीवपूर्वक विविधांगी प्रयत्न करीत आहे. निवडणूक प्रक्रियेबाबतची ओळख विद्यार्थ्यांना असावी यासाठी अशा पध्दतीचा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे. शिवाजी विद्यापीठातही तो लवकरच सुरू होईल, असे सांगून मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप प्रोग्रॅमबाबतही विचार सुरू असल्याचे सांगितले. या धर्तीवरच जिल्हास्तरावही इलेक्ट्रोल लिट्रसी क्लब सारखे महत्वपूर्ण प्लॅटफॉर्म अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. विद्यार्थ्यांना एकूणच मतदार प्रक्रियेमध्ये सहभागी ठेवण्यासाठी महाविद्यालये, विश्वविद्यालये यांच्यासोबत सातत्याने संवाद साधावा. विद्यार्थ्यांसाठी निरनिराळे कॅम्प, परिसंवाद आदि नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. मतदार नोंदणी उपक्रमामध्ये बीएलओ हा या यंत्रणेचा कणा आहे. त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहीत करावे. त्यांच्या कामांना अधिकाधिक गती देण्यासाठी यंत्रणेकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जावेत, असेही आग्रही प्रतिपादन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. 31 मार्च हा आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर दिवस म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहात या घटकांमध्ये मतदान प्रक्रियेविषयक जनजागृती करावी. त्यांच्या नोंदणीसाठी कार्यशाळा, परिसंवाद घ्यावेत व निवडणूक यंत्रणा ही त्यांच्या सोबत आहे असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करावा. यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव असणे हा निवडणूक विषयक गंभीर गुन्हा असून अशा प्रकरणांमध्ये संबंधीतांना त्वरीत नोटीस जारी करावी व अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले. जिल्ह्यातील निवडणूक विषयक कामकाजाचा सविस्तर आढावा घेत असताना मतदान ओळखपत्रासाठी मतदारांचे रंगीत फोटो संकलनाचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे याबद्दल यंत्रणेचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. फॉर्म 6, 7, 8, 8अ बाबत आढावा घेत असताना या संबंधित 12 हजार 59 प्रकरणे असून यातील 2 हजार 329 प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. यातील 30 दिवसांपेक्षा जास्त प्रलंबित असणारी प्रकरणे मतदार नोंदणी अधिकारी यांनी अधिक लक्ष घालून त्वरीत निपटारा करावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मतदार यादीत एकसारखे फोटो असणारी 83 हजार 361 प्रकरणे असून याबाबीचा आढावा घेत असताना यातील त्रुटींच्या कारणांची विचारणा केली. अशा प्रकरणांमध्ये गरजेनुरूप फॉर्म ७ व फॉर्म 8 भरून घ्यावा व त्रुटींचा निपटारा त्वरीत करावा, असे त्यांनी निर्देशित केले. यावेळी जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेकडील विविध कामांचा सविस्तर आढावा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध कामकाजांचा सविस्तर आढावा सादर केला. ०००००

मंगळवार, २२ मार्च, २०२२

शिष्यवृत्ती प्रस्ताव सादर करूनही लाभ न मिळालेल्यांना संबंधित शाळांशी त्वरीत संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : समाज कल्याण विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरीता विविध शिष्यवृत्ती योजना राबविल्या जात आहेत. समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद सांगली कडून सांगली जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविली जात आहे. ज्यांच्या पाल्यांना सन 2015-16 ते सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती प्रस्ताव सादर करूनही लाभ मिळालेला नसेल त्यांनी संबंधित शाळांशी त्वरीत संपर्क साधून शाळांना बँक खाते पासबुकाबाबत अद्ययावत माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांनी केले आहे. सन 2015-16 ते सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यतवृत्ती योजनांसाठी प्रस्ताव सादर केलेल्या काही विद्यार्थ्यांचे खाते तपशील शाळा स्तरावरून चुकीचे प्राप्त झाल्याने तसेच विद्यार्थ्यांची खाती बंद स्थितीत असल्याने अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम प्राप्त झालेली नाही. अशा विद्यार्थ्यांची योजनानिहाय यादी पंचायत स्तरावरून संबंधित शाळांना उपलब्ध करून दिली आहे. सन 2015-16 ते सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती प्रस्ताव सादर करूनही लाभ मिळालेला नसेल त्यांनी संबंधित शाळांशी त्वरीत संपर्क साधून शाळांना बँक खाते पासबुकाबाबत अद्ययावत माहिती द्यावी. याकरिता समाजकल्याण जिल्हा परिषद सांगली कार्यालयात दि. 9 ते 11 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सर्व शाळा मुख्याध्यापकांनी या कालावधीत माहिती जमा करावयाची असल्याचे श्री. कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

दस्त नोंदणी दस्त निष्पादन केलेच्या दिनांकापासून चार महिन्याच्या कालावधीपर्यंत जुन्या मुल्यांकनावर करता येणार

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : गेल्या काही दिवसापासून दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची नोंदणी कार्यालयांमध्ये गर्दी वाढत असल्यामुळे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सर्व्हरवर ताण येत आहे. यामुळे सर्व्हरची गती कमी होवून दस्त नोंदणी करण्यास वेळ लागत आहे. ही स्थिती पाहता शासकिय चलनाचा भरणा दिनांक ३१ मार्च २०२२ पुर्वी करून दस्तऐवजावर स्वाक्षरी (निष्पादन) केली असेल तर अशा दस्ताची नोंदणी दस्त निष्पादन केलेच्या दिनांकापासून पुढील ४ महिन्याच्या कालावधीपर्यंत जुन्या मुल्यांकनावर करता येईल. ३१ मार्च २०२२ नंतर मुल्यांकन वाढणार असल्यामुळे दस्त नोंदणीसाठी कार्यालयात गर्दी होणार आहे, ती गर्दी होवू नये यासाठी सदर कायद्यातील तरतूदीचा जनतेने लाभ घ्यावा व गर्दी टाळावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांनी केले आहे. 00000

सोमवार, २१ मार्च, २०२२

व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर निवडचाचणीसाठी 24 मार्चला उपस्थित रहाण्याचे आवाहन

व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर निवडचाचणीसाठी 24 मार्चला उपस्थित रहाण्याचे आवाहन सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : व्हॉलीबॉल खेळ व खेळाडू यांच्या भविष्याचा विचार करून खेळाडू शोध प्रक्रियेतून १६ वर्षाखालील ३० मुलांसाठी २० दिवसाच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे एप्रिल / मे २०२२ मध्ये करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबीरासाठी सांगली जिल्ह्यातून एकूण ५ खेळाडू (मुले) यांची निवड केली जाणार आहे. अटींची पूर्तता करत असलेल्या खेळाडूंनी प्रशिक्षण शिबीराच्या निवडचाचणीसाठी जिल्हा क्रीडा संकुल, सांगली-मिरज रोड, सांगली येथे दि. 24 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित रहावे. तसेच तत्पूर्वी अधिक माहिती करिता व्हॉलीबॉल राज्य क्रीडा मार्गदर्शक जमीर अत्तार यांच्या ९८२३९२०२१८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी केले आहे. सदर प्रशिक्षण शिबीरासाठी तामिळनाडू चे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पी. सी. पांडियन मार्गदर्शन करणार आहेत. निवड चाचणीसाठी खेळाडू दि. ०१ जानेवारी २००७ नंतर जन्मलेला व दि. 1 जानेवारी 2023 रोजी १६ वर्षाखालील असावा व त्याची सरासरी उंची ६ फूट असावी. सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रामीण व शहरी भागातील असलेल्या शाळा, क्रीडा मंडळे, क्रीडा संस्थामधील व्हॉलीबॉल या खेळाचे कौशल्यप्राप्त असणारे खेळाडू तसेच सन २०१९-२० मध्ये सांगली जिल्ह्यात शालेय व एकविध कीडा संघटनेच्या जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकामधील खेळाडू (मुले) हे वरील अट पूर्ण करत असल्यास त्यांना प्रशिक्षण शिबीरासाठीच्या निवडचाचणीसाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन श्री. वाघमारे यांनी केले आहे. 00000

बुधवार, १६ मार्च, २०२२

दस्त नोंदणीचे कामकाज शनिवार व रविवारी सुरू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा - मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव

सांगली दि. 16 (जि.मा.का.) : खरेदी विक्री व्यवहारामध्ये वाढ होत असल्याने तसेच वार्षिक बाजारमुल्य दर तक्त्यातील होणाऱ्या बदलामुळे दि. 31 मार्च 2022 पुर्वी जास्तीत जास्त दस्त नोंदणी होतील अशी धारणा आहे. त्याअनुषंगाने सांगली जिल्ह्यातील सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग २ / दुय्यम निबंधक श्रेणी-१ ही कार्यालये दर शनिवार, रविवार म्हणजे दि. 19, 20, 26 व 27 मार्च 2022 या शासकीय सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणीच्या कामकाजासाठी सुरू ठेवण्यात येत आहेत. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांनी केले आहे. 00000

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 21 मार्चला

सांगली दि. 16 (जि.मा.का.) : जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. माहे मार्च 2022 या महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 21 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. जी. पवार यांनी दिली. 00000

सैनिक दरबार 12 एप्रिलला अडीअडचणीचे अर्ज 25 मार्च पर्यंत सादर करा - कर्नल प्रदीप ढोले (निवृत्त)

सांगली दि. 16 (जि.मा.का.) : सेवारत सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व शहीद जवानांचे अवलंबित यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी, एप्रिल, जुलै व ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सैनिक दरबार आयोजित करण्यात येतो. एप्रिल 2022 महिन्यातील सैनिक दरबार दि. 12 एप्रिल रोजी नियोजित आहे. ज्या सैनिक, विधवांच्या अडीअडचणी स्थानिक प्रशासनाकडे प्रलंबित आहेत व ते त्यांच्या अडचणी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष मांडू इच्छितात त्यांनी सर्व कागदपत्रासह अर्ज दि. 25 मार्च 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले (निवृत्त) यांनी केले आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यकतेनुसार ते सैनिक दरबारामध्ये जिल्हाधिकारी यांच्या विचारार्थ सादर करण्यात येतील. अधिक माहितीसाठी 0233-2990712 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. ढोले यांनी केले आहे. 00000

कोरोना लसीकरणांतर्गत 12 ते 14 वयोगटाच्या लसीकरणासाठी नियोजन करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील 93 हजार 477 लाभार्थी सांगली दि. 16 (जि.मा.का.) : कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने आता 12 ते 14 वयोगटासाठीही लसीकरण करण्याची मोहिम हाती घेतली असून सांगली जिल्ह्यात या वयोगटात 93 हजार 477 इतके लाभार्थी प्रस्तावित आहेत. या सर्वांना कोरोना लसीचा पहिला डोस तातडीने देवून 28 दिवसानंतर दुसरा डोसही देण्यासाठी तातडीने नियोजन करावे. तसेच कोरोना लसीचा दुसरा डोस प्रलंबित असणाऱ्या 3 लाख 36 हजार 144 जणांना तातडीने लस देण्याचे नियोजन करावे, असे आदेश देवून ज्यांचा लसीचा दुसरा डोस प्रलंबित आहे त्यांनी तो तातडीने घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात कोविड-19 लसीकरण मोहिम जिल्हा समन्वय समितीची सभा व विविध आरोग्य योजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींदे पोरे, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, ग्रामीण रूग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोनाचा प्रभाव सद्यस्थितीत कमी आला असला तरी लसीकरण मोहिम अधिक गतीने राबविली पाहिजे. जिल्ह्यामध्ये 22 लाख 36 हजार 665 इतक्या लाभार्थीना पहिला डोस दिला असून 19 लाख 63 हजार 283 जणांना दुसरा डोस दिला आहे. अद्यापही 3 लाख 36 हजार 144 जणांचा दुसरा डोस प्रलंबित आहे. त्यामुळे दुसरा डोस तातडीने देण्यासाठी महालसीकरण अभियान राबविण्यात यावे. तसेच 61 हजार 803 जणांना प्रिकॉशन डोस देण्याचेही नियोजन करावे. जिल्ह्यात सद्या सर्व शाळा सुरू असून 12 ते 14 वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. दिर्घकालीन सुट्टी लागण्याच्या अगोदर 12 ते 14 वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याबाबत तातडीने आरोग्य विभागाने नियोजन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, लसीकरणामध्ये जी गावे मागे होती त्या ठिकाणी हर घर दस्तक लसीकरण मोहिम राबवावी. कमी लसीकरण असलेली 90 गावे निश्चित केली होती, यापैकी 35 गावांमध्ये लसीकरण पूर्णत्वास आले असून उर्वरीत 35 गावांमध्येही तातडीने लसीकरण करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. ज्या तालुक्यांमध्ये लसीकरणाचा दुसरा डोस अधिक प्रलंबित आहे त्या तालुक्यांनी गतीने कामकाज करून लसीकरण पूर्ण करावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, शासनाने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी भर दिला आहे. आरोग्य यंत्रणेकडे येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला सर्वोपचार देणे हे आरोग्य यंत्रणेचे कामच आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक श्रम घ्यावे. जिल्ह्यामध्ये या पुढील काळात प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये यांच्या कामाचे मुल्यमापन केले जाईल. या मुल्यमापनात जे उत्कृष्ट कामगिरी करतील त्यांना गौरविण्यात येईल. तर जे कामकाजात हजगर्जीपणा करतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात कोरोनाची साथ कमी झाली असून आता आरोग्य यंत्रणेने ओपीडी वाढविण्यावर भर दिला पाहिजे. त्याचबरोबर कुटुंब नियोजन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन करायला हवे. जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या लॅप्रॉस्कोपी मशिनसाठी तातडीने प्रस्ताव पाठवावा. त्यासाठी डीपीसीच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. जिल्ह्यात 0 ते 8 वयोगटातील बालकांच्या आरोग्य तपासणीची मोहिमही राबविण्यात यावी. यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांच्या व्याधीनुसार उपचार उपलब्ध केले जातील. जिल्ह्यामध्ये ज्या उपकेंद्रांमध्ये प्रसृतीच्या केसेस जास्त असतील त्या ठिकाणी प्रसृतीगृह तयार करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. त्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच कायाकल्प योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे व आपली कामगिरी उंचवावी असे सांगून त्यांनी यावेळी प्रधानमंत्री मातृवंदना योजना, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियान आदि योजनांचा सविस्तर आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, जिल्ह्यात शहरी व ग्रामीण अशा एकूण 443 सेंटर्सव्दारे लसीकरणाचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत कोरोना लसीचा 98 टक्के जणांना पहिला डोस तर 75 टक्के जणांना दुसरा डोस दिला आहे. त्याचबरोबर 12 ते 14 वयोगटातील लाभार्थ्यांसाठीही लसीकरण सुरू झाले आहे. त्याचेही सुक्ष्म पध्दतीने नियोजन केले आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 40 हजार 563 जणांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे. यामध्ये हेल्थ वर्कर 7 हजार 214, फ्रंटलाईन वर्कर 5 हजार 242 तर 28 हजार 107 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याचे सांगून विविध योजनांचा आढावा त्यांनी यावेळी सादर केला. 00000

मंगळवार, १५ मार्च, २०२२

बालसुधारगृहात अद्ययावत स्वयंपाकगृह व भोजनालयासाठी सीएसआर निधीमधून सढळहस्ते मदत करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 15 (जि.मा.का.) : बालसुधारगृह सांगली संस्था 1952 पासून कार्यरत असून सद्यस्थितीत या संस्थेस 100 मुले आणि 50 मुलींच्या प्रवेशास मंजुरी आहे. बालसुधारगृहामध्ये असलेल्या मुला-मुलींसाठी अद्ययावत स्वयंपाकगृह व भोजनालय यांची गरज असून त्यासाठी सुमारे 40 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. या कार्यासाठी समाजातील उद्योजक, दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी पुढे येवून सामाजिक उत्तरदायित्व निधी मधून (CSR) भरीव सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. सन 1952 मध्ये अजानता गुन्ह्याला प्रवृत्त झालेल्या मुला-मुलींना तसेच अनाथ, निराधार, निराश्रीत मुला-मुलींसाठी कै. राजाभाऊ देसाई व डॉ. आशाराणी देसाई यांच्या पुढाकाराने गणेशदुर्ग राजवाड्यात बालसुधारगृह सांगली ची सुरूवात झाली. या कार्याचा हेतू व गरज लक्षात घेवून कै. राजेसाहेब चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी संस्थेस सांगली मिरज रोडवरील अडीच एकर जागा दिली. या संस्थेत 6 ते 18 वयोगटातील अजानता गुन्ह्याला प्रवृत्त झालेली बालके, अनाथ, निराधार, निराश्रीत यांना दाखल करून घेण्यात येते. बाल अधिनियम 2015 नुसार दाखल करण्यात आलेल्या बालकांची प्रारंभिक चौकशी करून त्यांना सुधारण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येते. संस्था निवासी असून दाखल प्रवेशितांना संपूर्ण निवासासह सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या ठिकाणी राहणाऱ्या मुला-मुलींना निसर्गाच्या सानिध्यात एकत्र भोजन करता यावे यासाठी अद्ययावत स्वयंपाकगृह व भोजनालय यांची गरज असून समाजातील उद्योजक, दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 000000

डिजीटली साक्षर होणे काळाची गरज - अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख

सांगली दि. 15 (जि.मा.का.) : आधुनिक युगात चलन देवाणघेवाण करून व्यवहार पूर्ण करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून संगणकाव्दारे, स्मार्ट फोनव्दारे ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रमाण वाढत आहे. भविष्यात आभासी चलनही उदयास येत असून याचा वापर सजगपणे करणे त्याचबरोबर डिजीटली साक्षर होणे ही काळाची गरज झाली आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, सांगली अर्बन बँकेच्या आयटी सेलचे प्रमुख जयदीप दळवी उपस्थित होते. बुध्दीमत्तेचा वापर करून अनेक लोक ऑनलाईन पेमेंट करताना लोकांना फसवून लूट करतात. स्वत:ची फसवणूक व लूट थांबविण्यासाठी प्रत्येकाने ऑनलाईन किंवा कोणतेही व्यवहार करताना ते सजगतेपणे केले पाहिजेत, असे सांगून अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख म्हणाल्या, डिजीटल पेमेंट करताना आपली गोपनीय माहिती जसे की आपल्या बँकेचा अकॉऊंट नंबर, ओटीपी, पिन कोड, सीव्हीव्ही, क्रेडिट/डेबिट कार्डचा व्हीपीआय कोड कोणासही सांगू नये अथवा शेअर करू नये. ऑनलाईन पेमेंट करताना स्वत:ची पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत व्यवहार पूर्ण करू नयेत. ज्या ठिकाणी स्वत:ला शंका वाटत असतील अथवा काही समस्या निर्माण झाल्यास थेट बँकेशी संपर्क साधावा. यावर्षीचे ग्राहक दिनानिमित्तचे फेअर डिजीटल फायनान्स हे घोषवाक्य आहे. या घोषवाक्याचा सर्वांनीच समर्पकपणे विचार करून त्याप्रमाणे ऑनलाईन व्यवहार करावेत व स्वत:ची फसवणूक टाळावी आणि स्वत:चे संरक्षण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रारंभी दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यशाळेत सांगली अर्बन बँकेच्या आयटी सेलचे प्रमुख जयदीप दळवी यांचे डिजीटल पेमेंट साक्षरता व ऑनलाईन फसवणूक कशी टाळावी या विषयावर सविस्तर व्याख्यान झाले. ०००००

शनिवार, १२ मार्च, २०२२

माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे काम सुरू- पालकमंत्री जयंत पाटील

वाळवा पंचायत समिती आवारात लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते अनावरण - पंचायत समिती वाळवा यांनी तयार केलेल्या ई-लर्निंग डिजीटल स्टुडिओचे उद्घाटन सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : ‍वाळवा तालुक्याने स्वातंत्र्याच्या संग्रामात खूप मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिकांचा तालुका म्हणून वाळवा तालुक्याची ओळख आहे. त्याचबरोबर आधुनिक विकासाचा तालुका म्हणूनही ओळख निर्माण केली आहे. आरोग्य, शिक्षण, दळणवळण, सिंचन, कृषि या क्षेत्रात हा तालुका नेहमीच अग्रेसर राहिला. यामध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. याचप्रमाणे सांगली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्रिसुत्री तयार करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमांतर्गत शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे काम सुरू असून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 173 व दुसऱ्या टप्प्यात 163 मॉडेल स्कूल विकसीत करण्यात येत आहेत. उर्वरीत सर्व शाळा मॉडेल स्कूल करण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. वाळवा पंचायत समिती इस्लामपूर येथील आवारात लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण व पंचायत समिती वाळवा यांनी तयार केलेल्या ई-लर्निंग डिजीटल स्टुडिओचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील व ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार अरूण लाड, आमदार मानसिंगराव नाईक, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रातांधिकारी डॉ. संपत खिलारी, पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तहसिलदार प्रदीप उबाळे, ‍शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती आजी माजी सदस्य, महिला बचतगटाच्या सदस्या उपस्थित होत्या. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमाच्या अंमलबजावणीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा आदर्श होत चाचल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत असून यावर्षी 7 हजार विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांकडे आले आहेत. ही या उपक्रमाची यशस्वीता असून हा उपक्रम अधिक व्यापकपणे राबविण्यावर भर देण्यात येईल. तसेच पुढील काळात लवकरच 11 वी व 12 वी च्या शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शाळेतच जात पडताळणीचे प्रमाणपत्र देण्याबाबतची योजना तयार करून त्याचीही अंमलबजावणी करण्यात येईल. महिला बचत गटातील महिला मोठ्या प्रमाणात वस्तुंचे उत्पादन करीत असतात. या वस्तुंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठीही यंत्रणा उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे महिला बचतगटानांही आर्थिक बळ मिळेल. जिल्ह्यामध्ये शासकीय कामांसाठी येणाऱ्या व्यक्तींना त्यांची कामे तातडीने व्हावीत यासाठी प्रशासन गतीमान व पारदर्शी कारभार करण्यासाठी प्रयत्न करून जनतेला चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न पुढील काळात राहील. राज्य शासनही जनतेला चांगल्या सुविधा देण्यासाठी अनेक योजना राबवित आहे. सन 2022-23 मध्ये मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सर्वसमावेशकपणे विचार होवून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, असेही ते म्हणाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, वाळवा तालुक्याने सर्वांगीण विकास साधला असून हा विकास अल्पकाळाचा नाही. यामागे लोकनेते राजारामबापू पाटील यांचा दुरदर्शीपणाचा दृष्टीकोन आहे. लोकनेते राजारामबापू पाटील यांनी दुष्काळी भागात प्रामुख्याने पाणी मिळावे यासाठी अनेक पदयात्रा काढल्या म्हणून ते पदयात्री ठरले. लोकनेते राजारामबापूंच्या दृष्टीकोनातून विकास साधला गेला. त्याचपध्दतीने ग्रामविकास खात्याच्या माध्यमातूनही विकास करण्याचे काम सुरू आहे. राज्यामध्ये 34 जिल्हा परिषदा, 530 पंचायत समिती तर 38 हजार ग्रामपंचायती आहेत. या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मिळणाऱ्या निधीचे ग्रामपंचायतींना 80 टक्के तर पंचायत समिती व जिल्हा परिषदांना प्रत्येकी 10 टक्के अनुदान विकासकामांसाठी वितरीत करण्यात येते. त्याचबरोबर महाआवास अभियानांतर्गत आत्तापर्यंत 7 लाख इतकी घरे बांधून तयार झाली आहेत. तीन महिन्यात 5 लाख घरे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतींना बांधकाम परवाने देण्याचे अधिकारही वाढविण्यात आले आहेत. राज्य शासनाने मांडलेल्या अर्थसंकल्पात ग्रामीण विकासाला झुकते माप दिले आहे. ग्रामविकास खात्याने ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर महिला बचतगटांचे सक्षमीकरण करण्यावरही भर दिला आहे. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, लोकनेते राजारामबापू यांच्या विकासाच्या दृष्टीकोनातून टाकलेल्या पाऊलांमुळे वाळवा भागाचा सर्वांगीण विकास झाला. वाळवा पंचायत समितीच्या आवारातील लोकनेते राजारामबापूंचा अर्धकृती पुतळा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. बापूंनी केलेले शैक्षणिक काम असो अथवा दुष्काळी भागासाठी केलेला संघर्ष असो हा नेहमी लक्षात राहील. राज्य शासनही अशाच लोककल्याणकारी योजना राबवित असून यातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचे काम सुरू आहे. शासन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबरीने नियमितपणे कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. हा निर्णय क्रांतीकारक आहे. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी महिलांसाठी असलेल्या धोरणांची माहिती मनोगतात दिली. पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील यांनी गेल्या पाच वर्षात पंचायत समितीने राबविलेल्या विविध उपक्रमाचा सविस्तर आढावा मनोगतात सादर केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमामुळे जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या बदलांची माहिती सांगून या उपक्रमास लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी योगदान द्यावे, असे आवाहन करून ही चळवळ अधिक गतीमान व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी ई-लर्निंग डिजीटल स्टुडीओ व्दारे चालणाऱ्या कामांची व शैक्षणिक उपयुक्तता यावेळी विशद केली. आभार पंचायत समितीचे उपसभापती तानाजी पाटील यांनी मानले. 00000

बुधवार, ९ मार्च, २०२२

शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा जिल्ह्यात लोककलांव्दारे जागर सुरू

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : ‍महाविकास आघाडी शासनाला दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्षात कोरोना सारख्या महामारीला तोंड देत राज्य शासनाने अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले. या लोककल्याणकारी निर्णयांचा लोककलाकारांच्या माध्यमातून आज जागर सुरू झाला. सांगली चे प्रसिध्द शाहीर बजरंग आंबी, देवानंद माळी, रामचंद्र नायकू जाधव यांनी आपल्या विविध कलांव्दारे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जागर केला. यास जनतेनेही भरभरून प्रतिसाद दिला. शाहीर बजरंग आंबी यांनी पलूस तालुक्यातील कुंडल, रामानंदनगर व किर्लोस्करवाडी येथे, शाहीर देवानंद माळी यांनी मिरज तालुक्यातील नांद्रे, दुधगाव व सांगली येथे तर शाहीर रामचंद्र नायकू जाधव यांनी जत तालुक्यातील शेगाव, डफळापूर व जत येथे आपल्या बहारदार कार्यक्रमांव्दारे शासनाच्या योजनांची प्रसिध्दी केली. जिल्ह्यात दि. 10 मार्च रोजी शाहीर बजरंग आंबी पलूस तालुक्यात सकाळी बांबवडे, दुपारी भिलवडी व सायंकाळी अंकलखोप येथे, शाहीर देवानंद माळी वाळवा तालुक्यात सकाळी आष्टाध दुपारी इस्लातमपूर व सायंकाळी वाळवा येथे तर शाहीर रामचंद्र नायकू जाधव जत तालुक्यात सकाळी माडग्‌याळ, दुपारी गुड्डापूर व सायंकाळी संख येथे आपल्या पथकाव्दांरे कार्यक्रम सादर करणार आहेत. याचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 000000

पाणीपुरवठा योजनांसाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी मार्च अखेर खर्च करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : पाण्यावाचून कोणतेही कुटुंब वंचित राहू नये यासाठी नळजोडणी तातडीने करून घ्या. त्याचबरोबर ज्या कामांच्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत ती पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने सुरू करण्यात यावीत. पाणीपुरवठा योजनांसाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी मार्च अखेर खर्च करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) विजयसिंह जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता एस. एम. कदम, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे नोडल अधिकारी शितल उपाध्ये, ग्रामीण पुरवठा योजना (ग्रामीण) उपअभियंता डी. जे. सोनवणे, कनिष्ठ भूवैज्ञानिक जे. बी. वरूटे, डी. ए. मुल्ला तसेच सर्व तालुक्याचे उपअभियंता ऑनलाईन उपस्थित होते. पाण्यापासून कोणतेही गाव वंचित राहू नये यासाठी रखडलेल्या योजनांचा सर्व्हे करण्यात यावा. त्याचबरोबर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पाणीपुरवठा योजनांचे कामकाज पूर्ण करावे. जिल्ह्यामध्ये सन 2021-22 मध्ये 533 नळपाणीपुरवठा योजनांचे डीपीआर तयार करण्यात आले आहेत. यापैकी 477 योजनांना तांत्रिंक मंजुरी मिळाली असून 427 योजनांची प्रशासकीय मंजुरी झाली आहे. आत्तापर्यंत 407 यांच्या निविदा प्रक्रिया झालेल्या आहेत. तर आत्तापर्यंत 194 कामांच्या वर्कस्‍ ऑर्डर देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 155 कामे प्रगतीपथावर आहेत. आज जिल्ह्यातील नविन 17 डीपीआर तयार झालेल्या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याची अंदाजपत्रकीय रक्कम 22 कोटी 10 लाख 82 हजार इतकी आहे. यामधून 3 हजार 799 नळजोडण्या करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यामध्ये 706 योजना असून यामध्ये आटपाडी तालुक्यातील 55, जत 129, कडेगाव 55, कवठेमहांकाळ 63, खानापूर 64, मिरज 60, पलूस 30, शिराळा 88, तासगाव 69 व वाळवा तालुक्यात 93 योजना आहेत. अशी माहिती देवून मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, पाणीपुरवठा योजनांचा निधी 31 मार्च अखेर पर्यंत खर्च करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वर्क ऑर्डर झालेली कामे सुरू करण्यासाठी कंत्राटदारांची बैठक बोलावण्यात आली असून ही कामे तातडीने सुरू करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. 00000

बांधकाम कामगारांनी आयकॉनीक सप्ताहाचा लाभ घ्यावा - सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत आयकॉनीक सप्ताहाचे आयोजन दि. 7 मार्च 2022 पासून करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये दि. 11 मार्च 2022 पर्यंत बांधकाम कामगारांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व विविध योजनांच्या लाभासंबंधी कामगारांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अ-नोंदीत बांधकाम कामगारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे. जिल्ह्यातील अ-नोंदीत बांधकाम कामगारांची नोंदणी कामगारांच्या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून करण्यात येणार आहे. तसेच मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनांच्या माहितीबाबत शिबीराचे आयोजन कामगार सुविधा केंद्र सांगली येथे करण्यात येणार असल्याचे श्री. गुरव यांनी सांगितले. 00000

सोमवार, ७ मार्च, २०२२

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत दुसऱ्या व ‍तिसऱ्या तिमाहीतील गरोदर मातांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत. यामध्ये प्रयोगशाळा चाचण्या, सोनोग्राफी तपासणी, तंत्राव्दारे आरोग्य तपासणी, अतिजोखमीच्या मातांचे निदान, समुपदेशन व योग्य संस्थामध्ये संदर्भ सेवा यांचे योगदान हे या अभियानाचे प्रमुख घटक आहेत. या अनुषंगाने प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेस हे अभियान शासकिय संस्थामध्ये राबविण्यात येत आहे. सर्व गरोदर मातांनी दि. 9 मार्च 2022 रोजी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जावून प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रामध्ये दि. 9 मार्च रोजी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी पथकाद्वारे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सत्र भेट मोहिम आयोजित केली आहे. याअंतर्गत जिल्ह्यामधील प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सत्रांची प्रभावीपणे अंमलबजावणी, अडीअडचणी व सत्राठिकाणी देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा व माहिती विषयक अभ्यासातून पुढील दृष्टीकोनातून प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सत्रामार्फत प्रभावी व यशस्वी आरोग्य सेवा व माहिती ग्रामस्तरापर्यंत पोहचविण्याच्या अनुषंगाने मोहिमेचे आयोजन करण्यात आले. सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामीण कार्यक्षेत्रातील ३ हजार ५४४ गरोदर मातांकरिता दि. 9 मार्च रोजी एकूण ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सत्र आयोजीत केले आहे. यापैकी १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सत्रांच्या भेटीकरीता 19 जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यादरम्यान प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान पर्यवेक्षण चेकलिस्टचा वापर करून बावनिहाय सर्व वस्तुनिष्ठ पाहणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले. 00000

महिलांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार

सांगली दि. 7 (जि.मा.का.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील महिलांना यशस्वी उद्योजिका बनण्यासाठी दि. 8 मार्च रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार आयोजित केला आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी दिली. या सेमिनारमध्ये प्रमुख मार्गदर्शिका म्हणून डॉ. सुनीता कैलास पाटील नवउद्योग उभारणीबाबत महिलांना माहिती व मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या सेमिनारमध्ये सहायक आयुक्त ज. बा. करीम व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आ. बा. तांबोळी यांचा सहभाग असणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी meet.google.com/wvr-uigg-yvm या लिंकवर विहीत वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर सेमिनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे. 00000

पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा सोमवारी

सांगली दि. 7 (जि.मा.का.) : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक मार्च महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दि. 14 मार्च 2022 रोजी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर सकाळी 11.30 वाजता सभागृह क्र. 1, विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत येथे आयोजित केली आहे. अशी माहिती पुणे विभागाचे उपायुक्त (महसूल) तथा विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती पुणे चे सदस्य सचिव यांनी दिली. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक दि. 4 फेब्रुवारी 2011 मधील परिच्छेद क्र. 6(ब) अन्वये प्रत्येक तीन महिन्यातून एकदा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक आयोजित केली जाते. तीन महिन्यात आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची आढावा बैठक नियमितपणे घेण्यात येते. ही बैठक सर्वसाधारणपणे तीन महिन्यानंतरच्या पुढील महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर आयोजित करण्यात येते. 000000

पक्षकारांना 12 मार्चच्या राष्ट्रीय लोकअदालतीत जास्तीत जास्त प्रकरणे ठेवण्याचे आवाहन

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवार, दि. १२ मार्च २०२२ रोजी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आलेले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सांगली अजेय राजंदेकर व सचिव प्रविण नरडेले यांनी केले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबीक प्रकरणे, विज वितरण कंपनीची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३२० नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, धनादेश अनादर झालेली प्रकरणे, प्रलंबीत प्रकरणे, बँक व मोटार वाहन तसेच विज कंपनीचे दाखलपुर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच महानगरपालिका व ग्रामपंचायतीची करवसुली प्रकरणे देखील ठेवण्यात आलेली आहेत. याबरोबरच प्रलंबित असणाऱ्या अन्य प्रकरणांबरोबरच ग्राहक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ही आता राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवली जाणार आहेत. लोकअदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते. ज्या नागरिकांना आपली प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधीत न्यायालयात किंवा सांगली न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. तसेच पक्षकारांना प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास ८५९१९०३६१०, ०२३३-२६००९२८ या क्रमांकावर व sanglidlsa@gmail.com ई-मेलवर संपर्क साधावा. लोकन्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबीत प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकीलांशी देखील संपर्क साधु शकतात. लोकन्यायालयाचे अनेक फायदे आहेत. केसचा झटपट निकाल लागतो. तोंडी पुरावा, उलटतपासणी, दिर्घयुक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. लोकन्यायालयाच्या निवाड्याविरुध्द अपील नाही. लोकन्यायालयात होणारा निवाडा हा आपापसात समजुतीने होत असल्याने ना कोणाची जीत ना कोणाची हार. लोकन्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. परस्पर संबंधीने निकाल होत असल्याने एकमेकांत व्देष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. लोकन्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. वेळ व पैसे दोघांचीही बचत होते. लोक न्यायालयामध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते. 00000

शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा जिल्ह्यात बुधवारपासून लोककलांव्दारे जागर

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : ‍राज्याच्या महाविकास आघाडी शासनाला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा जिल्ह्यात लोककलांच्या माध्यमातून बुधवार, दि. 9 मार्च 2022 पासून जागर सुरु होत आहे. यामध्ये शाहीर बजरंग आंबी, शाहीर देवानंद माळी व शाहीर नायकू जाधव यांच्या पथकामार्फत विविध गावांमध्ये होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तीन सर्वोकृष्ठ पथकांची निवड करुन राज्यात आपला महाराष्ट्र आपले सरकार, दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची या संकल्पनेअंतर्गत विविध योजना संकल्प उपक्रम मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यत पोहचविण्यात येत आहेत. यामध्ये कोरोना काळात शासनाने दिलेले आरोग्यासाठी प्राधान्य, पर्यटनाच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेले संकल्प, जलद वाहतूकीसाठी गती देण्यात येत असलेले, सागरी मार्ग, समृध्दी महामार्ग आणि मेट्रो प्रकल्प, शासनाचे पर्यावरण पूर्वक उपक्रम, महिला बालके यांच्यासाठीच्या विविध योजना आदींचा समावेश आहे.जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकूण 60 हून अधिक गावांमध्ये लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यात येणार आहे. याचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 00000

गुरुवार, ३ मार्च, २०२२

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी 6 एप्रिल पर्यंत प्रस्ताव सादर करा - जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. ए. धकाते

सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेसाठी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, जत व विटा या महसुली उपविभागातून पात्र गोशाळांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक पात्र गोशाळांनी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्यामार्फत दि. 6 एप्रिल 2022 पर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,सांगली (मु.मिरज) कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. ए. धकाते यांनी केले आहे. या योजनेचा उद्देश, लाभार्थी गोशाळेच्या निवडीच्या अटी व शर्ती, लाभार्थी निवडीची प्रक्रिया तसेच योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज व अनुषंगिक कागदपत्रे इत्यादी बाबतची सविस्तर माहिती www.ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे डॉ. धकाते यांनी सांगितले. 00000

सांगलीत धान्य व फळ महोत्सव - मनोजकुमार वेताळ

सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : सांगली मुख्यालयी महाराष्ट्र शासन कृषि विभाग व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या कृषि उत्पादीत धान्याला थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व नागरीकांना चांगल्या दर्जाचे सेंद्रीय धान्य बाजार भावापेक्षा कमी दरामध्ये उपलब्ध व्हावे या उद्देशाने धान्य व फळ महोत्सवाचे दि. ५, ६ व ७ मार्च २०२२ रोजी आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी दिली. या महोत्सवात शेतकऱ्यांनी पिकवलेला तांदूळ, ज्वारी, बाजरी, खपली गहू इत्यादी तृण धान्यांची तसेच मटकी, मूग, उडीद या कडधान्यांचे व डाळींचे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री तसेच फळे व भाजीपाला माफक दरात शेतकऱ्यांकडून ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या महोत्सवात तांदळाचे १४ प्रकार, गव्हाचे ३ प्रकार, सेंद्रीय उत्पादनांचे स्वतंत्र दालन, गुळ उत्पादन या प्रकारात प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी १०० च्या वर स्टॉल ठेवण्यात येणार आहेत. महोत्सवात जतची गुळ पोळी, कडक भाकरी या सारख्या पदार्थांची विक्री होणार आहे. तरुणांसाठी धान्य व इतर पदार्थांपासून प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हा आरोग्य विभागामार्फत तृण धान्याचे आहारातील महत्व या विषयाची माहिती देखील देण्यात येणार आहे. दि. ०७ मार्च २०२२ रोजी खरेदीदार व विक्रेते संमेलन घेऊन, सांगली जिल्ह्यातील विक्रेते व खरेदीदार यांचे करार केले जाणार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने फळ पिकांची स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धेत द्राक्ष, डाळींब व इतर फळ पिकांच्या उत्कृष्ठ नमुन्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत ओल्या कचऱ्यापासुन निर्माण होणाऱ्या खताची विक्री केली जाणार आहे. या अभियानांतर्गत पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश यांबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे श्री. वेताळ यांनी सांगितले. 00000