शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

- १०० व्या नाट्य संमेलनाची मान्यवरांच्या हस्ते मुहुर्तमेढ - राज्यात ७५ अत्याधुनिक चित्र नाट्य मंदिरे उभारणार - नाट्यसंस्कृती जनतेच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याची अपेक्षा सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव मोठे आहे. मराठी नाट्यपरंपरा प्रगल्भ आहे. १०० व्या नाट्य संमेलनासाठी शासनाने ९ कोटी, ३३ लाख रूपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला असून, या माध्यमातून जिल्हास्तरावर नाट्यसंस्कृती जोपासावी. मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य तथा वने, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. १०० व्या नाट्य संमेलनाच्या मुहुर्तमेढ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, खासदार संजय पाटील, १०० वे नाट्य संमेलन स्वागत समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुधीर गाडगीळ, प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे अध्यक्ष प्रशांत दामले, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, मराठी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, नाट्य परिषद सांगली शाखाध्यक्ष मुकुंद पटवर्धन आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. १०० व्या नाट्य संमेलनासाठी शुभेच्छा व्यक्त करून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राला प्रगल्भ नाट्यपरंपरा आहे. ही नाट्यसंस्कृती रसिकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावी, हा नाट्यसंमेलनाचा उद्देश आहे. मराठी रंगभूमी, नाट्यसंस्कृती जनतेच्या हृदयाच्या सिंहासनापर्यंत पूर्ण शक्तीने पोहोचवावी. शासन नाट्यकर्मींच्या पाठीशी आहे. दर्दी रसिकांच्या पाठिंब्यावर मराठी रंगभूमी एक हजाराव्या नाट्यसंमेलनाचा टप्पा गाठेल. याच विचाराने संबंधित सर्वांनी कृती करावी, असे ते म्हणाले. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाटक हृदयापर्यंत आशयभाव पोहोचवते. नाटकामध्ये मेडिटेशन म्हणजेच एकाग्रता करण्याची ताकद आहे. २१ व्या शतकात विविध आव्हानांवर मात करून नाटककार, कलावंत आणि रसिकांनी नाट्यसंस्कृती पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत. नाट्यसंमेलनामध्ये रंगभूमीपुढील आव्हाने व त्यावर मात करण्याबाबत चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात ८६ नाट्यगृहे असून त्यापैकी ५२ स्थानिक स्वराज्य संस्थांची आहेत. नगर विकास विभागाकडून सदर ५२ नाट्यगृहांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नरत आहे. त्याचबरोबर राज्यात नवीन ७५ सौर ऊर्जा वापरणारी अत्याधुनिक चित्र नाट्य मंदिरे उभारण्यासाठी मंजुरी प्राप्त असून, नाट्यगृहांमध्ये कलाकार व रसिक प्रेक्षकांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच ही नाट्यगृहे अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येतील, असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून राज्यातील सर्व जिल्ह्यात त्यांच्या जीवनावरील महानाट्य दाखवण्यात येणार आहे. तसेच, महासंस्कृती अभियानातून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, याअंतर्गत नाटके प्रायोजित करावीत, असे त्यांनी सूचित केले. तसेच नाट्यप्रयोगांसाठी अनुदान देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सांगलीची नाट्यपंढरी अशी ओळख असून, १०० व्या नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ असल्याबद्दल स्वागत व शुभेच्छा व्यक्त करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सध्या रंगभूमीसमोर इलेक्ट्रॉनिक व अन्य माध्यमांचे आव्हान उभे आहे. मात्र, नाटकांची क्रेझ पुन्हा निर्माण होणे आवश्यक आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून नाट्य संमेलनासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर आपणही सांगलीचे पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीमधून १० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच, विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिरास सी.एस.आर. मधून वातानुकुलित यंत्रणेची सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले. प्रेमानंद गज्वी यांनी मार्गदर्शन केले. १०० व्या नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ सांगलीत होत असल्याबद्दल अभिमानाची भावना व्यक्त करून स्वागत समिती अध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, समस्त सांगलीकर आणि नाट्यप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आद्य नाटककार विष्णुदास भावे, गोविंद बल्लाळ देवल व कृष्णाजी प्रभाजी खाडिलकर यांच्यामुळे सांगलीची ओळख नाट्यपंढरी म्हणून निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले. सध्या नाटकांच्या प्रयोगांमुळे सर्व कलाकारांना एकत्र येणे शक्य होतेच असे नाही. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या माध्यमातून एकत्र यायला मिळते, असे सांगून ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी नाट्यगृहांची देखभाल, अद्ययावत नाट्यगृहांमध्ये सोलर सिस्टीम व नवोदित कलाकारांची मुंबईत निवास व्यवस्था व्हावी, अशा अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच, कलाकार म्हणून आम्हीही आमची जबाबदारी पार पाडू, असे ते म्हणाले. अजित भुरे यांनी मनोगत व्यक्त केले मुकुंद पटवर्धन म्हणाले, दिग्गज कलावंत सांगलीत घडले. सांगलीत हे पाचवे नाट्य संमेलन होत आहे. १०० वे नाट्य संमेलन विभागवार ६ ठिकाणी होणार आहे. या माध्यमातून विविध सांस्कृतिक संस्थांचे प्रमुख एकच व्यासपीठावर आले आहेत. यातून रंगभूमीला नवी दिशा, विचार व नजर मिळेल. सांगलीची आलौकिक नाट्यपरंपरा पुन्हा प्रकाशमय होत असल्याचे ते म्हणाले. नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर, कोषाध्यक्ष सतीश लोटके, संमेलन समिती प्रमुख विजय चौगुले, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्यासह नाट्यकर्मी, नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नटराजपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. नांदी सादर करण्यात आली. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शमी, आंबा व उंबराच्या फांद्यांना मुहुर्तमेढ बांधण्यात आली. तसेच संहितापूजन करण्यात आले. प्रशांत दामले यांच्या हस्ते घंटा वाजवून मुहुर्तमेढ करण्यात आली. सदर घंटा ६ विभागीय संमेलनात वाजवली जाणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार राजेंद्र पोळ यांच्या १० नाट्यकृतींच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध पुरस्कारप्राप्त डॉ. तारा भवाळकर, सदानंद कदम, पंडित हृषिकेश बोडस, शाहीर देवानंद माळी यांचा श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 00000

शारीरिक तंदुरूस्तीसाठी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश गरजेचा -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

जिल्हास्तरीय कृषि महोत्सव उत्साहात संपन्न सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : शारीरिक तंदुरूस्तीसाठी व आरोग्याचे सौख्य राखण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करावा, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले. जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ॲग्री मॉल परिसर (फळरोपवाटिका कुपवाड प्रक्षेत्र), विजयनगर सांगली येथे आयोजित या कृषि महोत्सव उद्‌घाटन प्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, कृषि उपसंचालक प्रियांका भोसले, प्रकल्प संचालक (आत्मा) जांबूवंत घोडके, उपविभागीय कृषि अधिकारी जत मनोज वेताळ, उपविभागीय कृषि अधिकारी विटा प्रकाश कुंभार, उपविभागीय कृषि अधिकारी मिरज रमाकांत भजनावळे, प्रकल्प उपसंचालक श्री. खरात, सर्व तालुका कृषि अधिकारी यांच्यासह क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी नागरिक उपस्थित होते. जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे उद्‌घाटन करून व या महोत्सवास शुभेच्छा देऊन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, आपला देश जगातील सर्वात मोठा पौष्टिक तृणधान्य उत्पादक देश आहे. बदलत्या व धकाधकीच्या जीवनात तंदुरूस्त राहण्यासाठी तृणधान्यांचा उपयोग मोठा आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा अशा तृणधान्यांचा आपल्या आहारातील समावेश वाढविणे आवश्यक आहे. तृणधान्यांचे सेवन केल्याने शारीरिक व मानसिक तंदुरूस्ती मिळते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तसेच, तृणधान्यांवर प्रक्रिया करून युवा पिढीला आवडतील असे विविध पदार्थ केले जात आहेत. त्यामुळे सशक्त पिढीसाठी व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दैनंदिन आहारात तृणधान्यांच्या पदार्थांचा समावेश करण्याची गरज करून त्यांनी याबाबत जनजागृती करण्याचे मत व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2023-24 महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियानांतर्गत हा एकदिवसीय जिल्हास्तरीय कृषि महोत्सव घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय व उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय मिरज यांच्या समन्वयाने याचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकांची ओळख, आहारातील महत्त्व याबाबत प्रचार प्रसिध्दी, व्याख्यान, विविध नमुने, विविध पदार्थांचे 35 स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ व प्रक्रिया संयत्र स्टॉलचा समावेश होता. पौष्टिक तृणधान्य रॅली दरम्यान, कृषि महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, शेतकरी व नागरिक यांच्या समवेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने रॅली काढण्यात आली. ही रॅली विलिंग्डन कॉलेज ते विजयनगर चौक मार्गे ॲग्री मॉल परिसर अशी काढण्यात आली. या रॅलीमध्ये जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, कृषि उपसंचालक प्रियांका भोसले, तालुका कृषि अधिकारी, कृषि विभागाचे कर्मचारी, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय सांगली व राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि व्यवसाय व्यवस्थापन व्यवस्थापन महाविद्यालय सांगली महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या महोत्सवास शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट व स्थानिक नागरिक यांनी भेट देवून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 00000

बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या सुधारित कार्यक्रमानुसार मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी 22 जानेवारीला

सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी करण्याचा दिनांक 5 जानेवारी 2024 असा होता. मात्र शिल्लक असलेल्या प्रलंबित अर्जावर निर्णय घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमात सुधारणा केली असून आता मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. सुधारित कार्यक्रमानुसार दावे व हरकती निकाली काढण्याचा सध्याचा दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत असून सुधारित दिनांक 12 जानेवारी 2024 असा आहे. मतदार यादीचे Health Parameter तपासणे आणि अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी घेणे तसेच डेटा बेस अद्ययावत करणे व पुरवणी छपाई करण्याचा सध्याचा कालावधी 1 जानेवारी 2024 पर्यंत असून सुधारित कालावधी 17 जानेवारी 2024 असा आहे. तर अंतिम प्रसिध्दीचा सध्याचा दिनांक 5 जानेवारी 2024 असून सुधारित दिनांक 22 जानेवारी 2024 असा असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांचा 24 डिसेंबरला सन्मान सोहळा व कार्यशाळा

सांगली, दि. 21 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यातील दिव्यांग सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहनासाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई-३२, शाखा सांगली यांच्या वतीने दिव्यांग अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान सोहळा व कार्यशाळेचे आयोजन दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता पाटबंधारे भवन, सांगली येथे केले आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आहेत. महानगरपालिका उपायुक्त सुनिल पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सुनिल भोकरे, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्यध्यक्ष साईनाथ पवार व राज्य समन्वयक महादेव शिंदे हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष इलियास बागवान व जिल्हा सचिव अंकुर यादव यांनी केले आहे. 00000

पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : कृषि विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहु, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. पीकस्पर्धेतील ज्वारी, गहु, हरभरा, करडई व जवस ही पाच रब्बी पिके आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत ही कागदपत्रे आवश्यक आहेत. स्पर्धेसाठी पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी 300 रूपये प्रवेश शुल्क राहील. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी स्पर्धा पातळीनुसार पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस अनुक्रमे पुढीलप्रमाणे. तालुका पातळी- 5 हजार रूपये, 3 हजार रूपये व 2 हजार रूपये. जिल्हा पातळी - 10 हजार रूपये, 7 हजार रूपये व 5 हजार रूपये. राज्य पातळी - 50 हजार रूपये, 40 हजार रूपये व 30 हजार रूपये. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासन कृषि विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी, असे आवाहनही श्री. कुंभार यांनी केले आहे. 00000

विकसित भारत संकल्प यात्रेचा आगामी मार्ग

सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्ह्यात 24 नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. या रथयात्रेचा दि. 22 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंतचा मार्ग पुढीलप्रमाणे. शिराळा तालुका - दि. 22 डिसेंबर - सोनवडे व आरळा, पाचगणी व शिरसटवाडी, दि. 23 डिसेंबर - करूंगली व मराठेवाडी, सावंतवाडी व रांजणवाडी, दि. 24 डिसेंबर – पणुंब्रे तर्फ वारूण व काळुंद्रे, मेणी व येळापूर, दि. 25 डिसेंबर - कुसळेवाडी व किनरेवाडी, गवळेवाडी व हातेगाव, दि. 26 डिसेंबर – कदमवाडी व वाकाईवाडी, खिरवडे व खुजगाव, दि. 27 डिसेंबर - खराळे व चिंचेवाडी, मोरेवाडी व चिंचोली, दि. 28 डिसेंबर - चरण व मोहरे, कोकरूड व माळेवाडी, दि. 2‍9 डिसेंबर - नाठवडे व शेडगेवाडी, बिळाशी व कुसाईवाडी, 30 डिसेंबर - गुढे व मानेवाडी, धसवाडी. मिरज तालुका - दि. 22 डिसेंबर - ढवळी व बेडग, दि. 23 डिसेंबर - नरवाड व आरग, दि. 24 डिसेंबर - लक्ष्मीवाडी व शिंदेवाडी, दि. 25 डिसेंबर - लिंगनूर व खटाव, 5 जानेवारी 2024 - कवलापूर. जत तालुका - दि. 22 डिसेंबर – सुसलाद व सोनलगी, अंत्राळ व बनाळी, दि. 23 डिसेंबर – उमदी व निगडी बु., आवंढी व लोहगाव, दि. 24 डिसेंबर – उटगी व लमाणतांडा उ., सिंगनहळ्ळी व बागलवाडी, दि. 25 डिसेंबर – अंकलगी व संख, शेगाव व रेवनाळ, दि. 26 डिसेंबर – खंडनाळ व लमाणतांडा द.,‍ तिपेहळ्ळी व अचकनहळ्ळी, दि. 27 डिसेंबर – गोंधळेवाडी व आसंगी जत, कंठी व बागेवाडी, दि. 28 डिसेंबर – दरीबडची व तिल्याळ, बिरनाळ व कुंभारी, दि. 2‍9 डिसेंबर – कुलाळवाडी व सोन्याळ, हिवरे व धावडवाडी, 30 डिसेंबर – जाडरबोबलाद व लकडेवाडी, प्रतापूर व गुळवंची, 31 डिसेंबर – माडग्याळ व कुणीकोणूर, बेवनूर व नवाळवाडी, दि. 1 जानेवारी 2024 – खैराव व टोणेवाडी, वाळेखिंडी व कोसारी दि. 2 जानेवारी 2024 – येळवी व घोलेश्वर, कासलिंगवाडी व मोकाशेवाडी, 3 जानेवारी – सनमडी व कोळगिरी, व्हसपेठ व गुलगुंजनाळ. विटा (खानापूर) तालुका – दि. 22 डिसेंबर – तांदळगांव व बलवडी भा., दि. 23 डिसेंबर – जाधवनगर व कमळापूर, दि. 24 डिसेंबर – भाळवणी व पंचलिंगनगर, दि. 25 डिसेंबर – कळंबी व ढवळेश्वर. कवठेमहांकाळ तालुका – दि. 22 डिसेंबर – झुरेवाडी व विठुरायाचीवाडी, दि. 23 डिसेंबर – आगळगाव. वाळवा तालुका - दि. 22 डिसेंबर – बागणी व शिगाव, जक्राईवाडी व शिवपुरी, दि. 23 डिसेंबर – पोखर्णी व फार्णेवाडी, वाघवाडी व जांभुळवाडी, दि. 24 डिसेंबर – ढवळी व नागांव, फाळकेवाडी व नायकलवाडी, दि. 25 डिसेंबर – भडकंबे व कोरेगाव, ओझर्डे व सुरूल, दि. 26 डिसेंबर – बहादूरवाडी व तांदूळवाडी, महादेववाडी व घबकवाडी, दि. 27 डिसेंबर – मालेवाडी व इटकरे, माणिकवाडी व काळामवाडी, दि. 28 डिसेंबर – येडेनिपाणी व कामेरी, मरळनाथपूर व रेठरेधरण, दि. 2‍9 डिसेंबर – कणेगाव व भरतवाडी, भाटवाडी व शेणे, 30 डिसेंबर – येलूर व विठ्ठलवाडी, वाटेगाव व कासेगाव, 31 डिसेंबर – वशी व लाडेगाव, केदारवाडी व येवलेवाडी, दि. 1 जानेवारी 2024 – कुरळप व कुंडलवाडी, तांबवे व धोत्रेवाडी, दि. 2 जानेवारी 2024 – ऐतवडे खुर्द व देवर्डे, नेर्ले व कापूसखेड, 3 जानेवारी –चिकुर्डे व ठाणापुडे, साखराळे व हुबालवाडी, 4 जानेवारी – डोंगरवाडी व करंजवडे, बहे व खरातवाडी, 5 जानेवारी – ऐतवडे बु. व शेखरवाडी. आटपाडी तालुका – दि. 22 डिसेंबर – झरे व पडळकरवाडी, दि. 23 डिसेंबर – पिंपरी बु. व घरनिकी, दि. 24 डिसेंबर – जांभुळणी व घाणंद, दि. 25 डिसेंबर – कामथ व मुढेवाडी, दि. 26 डिसेंबर – वाक्षेवाडी व निंबवडे, दि. 27 डिसेंबर – गळवेवाडी व आवळाई, दि. 28 डिसेंबर – पळसखेल व दिघंची, दि. 29 डिसेंबर – लिंगीवरे व राजेवाडी, दि. 30 डिसेंबर – पुजारवाडी (दि.) व उंबरगांव, 31 डिसेंबर – विठलापूर. तासगाव तालुका – दि. 22 डिसेंबर – हातनूर व हातनोली, दि. 23 डिसेंबर – वासुंबे व वंजारवाडी, दि. 24 डिसेंबर – शिरगाव क. व बेंद्री, नेहरूनगर व जुळेवाडी, दि. 25 डिसेंबर – पाडळी व धामणी, नागाव नि. व निमणी, दि. 26 डिसेंबर – विजयनगर व किंदरवाडी, चिंचणी व सावर्डे, दि. 27 डिसेंबर – नरसेवाडी व कचरेवाडी, पुणदी व भैरववाडी, दि. 28 डिसेंबर – तुरची व ढवळी, आळते व पानमळेवाडी, दि. 29 डिसेंबर – राजापूर व येळावी, बोरगाव व लिंब, दि. 30 डिसेंबर – विसापूर व शिरगाव वि., गोटेवाडी व धोंडेवाडी, दि. 31 डिसेंबर – निंबळक व चिखलगोठण. 00000

मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३

विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली 413 गावात, 83 हजाराहून अधिक व्यक्तिंचा सहभाग

सांगली, दि. 19 (जि. मा. का.) : विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत दि. 18 डिसेंबरपर्यंत सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यात 413 ग्रामपंचायतींमध्ये शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. या रथयात्रेत 83 हजार 712 व्यक्तिंनी सहभाग घेतला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत कवठेमहांकाळ तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीमधील 3 हजार 598, कडेगाव तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीमधील 1 हजार 502, पलूस तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीमधील 5 हजार 885, तासगाव तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीमधील 1 हजार 609, वाळवा तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीमधील 2 हजार 576, जत तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीमधील 9 हजार 584, आटपाडी तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीमधील 3 हजार 213, मिरज तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीमधील 18 हजार 768, शिराळा तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीमधील 7 हजार 312, खानापूर तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीमधील 29 हजार 665 व्यक्तिंनी या रथयात्रेत सहभाग घेतला. विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या देशव्यापी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावागावातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती होऊन, त्यांना त्यांचा लाभ घेण्यास मदत होत आहे. ही रथयात्रा जिल्ह्यातील ग्रामीण भागात 8 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, किसान सन्मान, सुरक्षित मातृत्त्व, मातृवंदना, सुकन्या समृद्धी अशा केंद्र शासनाच्या जवळपास 50 हून अधिक योजना आहेत. या योजनांचा लाभ घेऊन पात्र वंचित गरजू व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. या अनुषंगाने विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीत व्हॅनच्या माध्यमातून उपस्थितांना शासकीय योजनांची माहिती देण्यात येत आहे. गरजू पात्र लाभार्थींनी नोंदणी करून, योजनांचा लाभ घेणे अपेक्षित आहे. 00000

शनिवार, १६ डिसेंबर, २०२३

विकसित भारत संकल्प यात्रा : शासकीय योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी जीवनमान उंचवावे - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे जीवनमान उंचवावे, असे आवाहन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले. विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील निवडक जिल्ह्यातील लाभार्थींना दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. याचे प्रसारण मिरज तालुक्यातील बेळंकी येथे झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ग्रामपंचायत कार्यालय आवारात झालेल्या या कार्यक्रमास सरपंचा सारिका शिंदे, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, मिरज तहसीलदार अर्चना मोरे-धुमाळ, मिरजच्या गटविकास अधिकारी डॉ. संध्या जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सुशांत खाडे, मोहन व्हनखंडे, सहायक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके आदि उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे संबोधन प्रसारित यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रसारित करण्यात आले. या संबोधनात त्यांनी केंद्र शासनाच्या वतीने नागरिकांच्या मूलभूत गरजा, आरोग्य, पोषण, दर्जेदार प्राथमिक सोयी सुविधा यासह अन्य बाबींसाठी केंद्र शासनाच्या अनेकविध कल्याणकारी योजनांतून युवा व महिला वर्गाचे सबलीकरण करण्यात येत असल्याचे सांगितले. या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी इतरांपर्यंत या योजनांचा प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रा हे देशव्यापी अभियान जिल्ह्यात 24 नोव्हेंबरपासून सुरू असून, ग्रामीण भागात 8 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 696 ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. या माध्यमातून गावागावात शासन व प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. केंद्र शासनाच्या जवळपास 50 हून अधिक योजनांबाबत जागृती व प्रबोधन या माध्यमातून केले जात आहे. या योजनांसाठी पात्र वंचित लाभार्थींनी नोंदणी करावी. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा व इतरांनीही त्यासाठी प्रेरित करावे, असे ते म्हणाले. कामगार विभागाच्याही इमारत बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आहेत. त्याचा लाभ कामगारांना दिला जात असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 354 ग्रामपंचायतींमध्ये 10 व्हॅनच्या माध्यमातून 70 हजारहून अधिक नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. केंद्र शासनाच्या जवळपास 50 हून अधिक कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत व वंचितांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम सुरू आहे. आतापर्यंत 20 हजारपेक्षा अधिक आयुष्मान कार्ड वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या महत्वाकांक्षी उपक्रमाबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत ऋणनिर्देश व्यक्त केले. स्वागत डॉ. शिंदे यांनी केले. प्रास्ताविकात शशिकांत शिंदे यांनी या अभियानाचा हेतू व माहिती विषद केली. या कार्यक्रमास जिल्हा परिषद, आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रथयात्रेंतर्गत विविध विभागांच्या स्टॉलना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतीत रथयात्रा बेळंकीसह आज जिल्ह्यातील भाटशिरगाव, कांदे (ता. शिराळा), ताडाचीवाडी, बाणुरगड (ता. विटा खानापूर), जानराववाडी (ता. मिरज), भिवर्गी, पांडोझरी (ता. जत), मोहिते वडगाव, अंबक (ता. कडेगाव), कुकटोळी, म्हैसाळ एम. (ता. कवठेमहांकाळ), पडवळवाडी, अहिरवाडी (ता. वाळवा), धावडवाडी, नेलकरजी (ता. आटपाडी), पुणदी (वा), रामानंदनगर (ता. पलूस) आणि कवठेएकंद, नागाव क. (ता. तासगाव) येथे विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत रथयात्रा पार पडली. 00000

ग्रामसेवकांनी गावाच्या विकासासाठी गतीने काम करावे - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 16 (जि.मा.का.) : ग्रामसेवक हा ग्रामस्तरीय प्रशासनाचा महत्वाचा खांब असतो. शासनाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. त्यांचे सांगली जिल्ह्यात उत्कृष्ट काम सुरू आहे. ग्रामसेवकांनी सर्वांच्या बरोबर राहून गावाच्या विकासासाठी गतीने काम करून प्राप्त निधी विहीत मुदतीत खर्च करावा, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले. सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालय येथे आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, सहायक गट विकास अधिकारी अविनाश पाटील यांच्यासह गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी आयोजित करावा त्यामध्ये विविध प्रकारच्या पुरस्कारांचा समावेश करावा, असे सूचित करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, विकसीत भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी एक वाहन असून या माध्यमातून प्रत्येक गावागावात शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे. याचा लाभ तळागाळातील व्यक्तिपर्यंत पोहोचवावा. ग्रामसेवकांनी त्यांच्याकडील सर्व प्रलंबित कामे पूर्ण करावीत, त्यांना काही अडचणी असतील तर त्या मांडाव्यात, शासन दरबारी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी जिल्हा परिषदेचा कणा आहे. त्यांनी तळागाळापर्यंत काम केले तरच पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच शासनाच्या ग्राम विकासाच्या योजनांची योग्य अंमलबावणी होण्यासाठी मदत होवू शकते. शासनाच्या योजनांची योग्य अंमलबजावणी करणे हे प्राथमिक कर्तव्य असून ग्राम विकास अधिकारी मोठ्या उत्साहाने पुढेही काम करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली व पुरस्कारार्थीं व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय गायकवाड, प्रविण देसाई व धनश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामसेवकांच्या जबाबदाऱ्या व ते करत असलेली विविध प्रकारची कामे याबद्दल विवेचन केले. यावेळी सन 2010-11 ते 2022-23 या पुरस्कार वर्षातील आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन वृषभ आकिवाटे यांनी केले. 00000

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत १०५ बालकांची मोफत नेत्ररोग तपासणी

सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या लाभार्थींपैकी नेत्ररोग संदर्भित लाभार्थींकरिता डीईआयसी विभागांतर्गत आयोजित मोफत नेत्ररोग तपासणी शिबीरात 105 लाभार्थ्यांची मोफत नेत्ररोग तपासणी करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी ही माहिती दिली. शिबिरांतर्गत ० ते १८ वयोगटातील महानगरपालिका कार्यक्षेत्र, आष्टा - इस्लामपूर - तासगाव - विटा नगरपालिका कार्यक्षेत्र, मिरज, कडेगाव, शिराळा, वाळवा या तालुक्यांतील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित 105लाभार्थींच्या नेत्र तपासण्या डॉ. मिलिंद किल्लेदार व त्यांच्या अधिनस्त पथकांमार्फत पूर्ण करण्यात आल्या. पैकी 41 लाभार्थी हे पुढील शस्त्रक्रियेकरिता पात्र ठरले असून त्यांच्या शस्त्रक्रियेचे नियोजन सुरु आहे. शस्त्रक्रिया अनुराधा आय हॉस्पिटल, सांगली यांच्यामार्फत पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच संदर्भित लाभार्थींच्या आवश्यक लॅब तपासण्या महालॅब सांगली यांच्यामार्फत मोफत करण्यात आल्या. उर्वरित तालुक्यांकरिता नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन हे लवकरच करण्यात येणार असून ० ते 18 वयोगटातील लाभार्थींनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे वेळोवेळी कार्यक्रमाकरिता मार्गदर्शन लाभत आहे. शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, बालरोगतज्ज्ञ डॉ. उत्कर्ष भोसले, व्यवस्थापक कविता पाटील, ऑप्टोमेट्रिस्ट रोहित चौगुले व डीईआयसी अंतर्गत इतर कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले. 00000

अभय योजनेचा लाभ घ्यावा - प्र. मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी

सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना २०२३ दोन टप्प्यात लागू केलेली आहे. या योजनेमध्ये १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० या कालावधीत नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत दस्ताबाबतीत शासनास देय होणाऱ्या तथा वसुली पात्र संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये सुट तथा सवलत लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी यांनी केले आहे. प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी म्हणाले, योजनेच्या पहिल्या टप्यात १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत देय होणारी मुद्रांक शुल्क रक्कम १ लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्क व दंडाच्या रकमेस माफी, मुद्रांक शुल्क १ लाखाच्या वर असल्यास मुद्रांक शुल्कात ५० टक्के व दंडाची संपूर्ण सूट देण्यात आली आहे. मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटीपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात २५ टक्के माफी व दंडामध्ये ९० टक्के सुट, मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटीपेक्षा जास्त असल्यास २० टक्के माफी तसेच १ कोटी रूपये रक्कम दंड स्वीकारुन उर्वरित दंडाच्या रकमेत सूट देण्यात आली आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२४ पर्यंत देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात व दंडामध्ये ८० टक्के सूट, तसेच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाखाच्या वर असल्यास मुद्रांक शुल्कात ४० टक्के व दंडामध्ये ७० टक्के माफी, तसेच मुद्रांक शुल्काची २५ कोटीपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात २० टक्के माफी व दंडामध्ये ८० टक्के सूट, मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटीपेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्कात १० टक्के माफी तसेच २ कोटी रूपये रक्कम दंड म्हणून स्वीकारुन उर्वरित दंडाच्या रकमेची सूट असेल. ज्यांना मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नोटीस प्राप्त झाली आहे, त्यांनी अभय योजना २०२३ योजनेचा लाभ घेण्याकरिता आपला अर्ज सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, सांगली यांचे कार्यालय राजवाडा कंपौंड सांगली या कार्यालयास सादर करावा अथवा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी यांनी केले आहे. 00000

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा - प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील

सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : अल्पसंख्याक हक्क दिनाचे औचित्य साधून दि. 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील यांनी आज येथे केले. अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे, समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पोलिस उपअधीक्षक श्री. बेन, तहसिलदार लीना खरात, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे नोडल अधिकारी सलिम नदाफ आदि उपस्थित होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील व महानगरपालिका आयुक्त सुनील पवार यांनी अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणिव तथा माहिती होण्याच्या दृष्टीने तसेच, अल्पसंख्याक नागरिकांचे हक्क व त्यांच्या संरक्षणासाठी असणारे कायदे, त्यांच्यासाठी असणाऱ्या ‍विविध योजनांची माहिती देण्याच्या दृष्टीने कार्यक्रम आखण्याच्या सूचना केल्या. दिनांक 18 डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत माहिती देताना सहायक आयुक्त जयंत चाचरकर म्हणाले, दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर सकाळी 11.30 ते 2 या वेळेत अल्पसंख्याक समाजाची स्थिती, गती व प्रगती या विषयावर सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख, अल्पसंख्याक नागरिकांचे हक्क व त्यांच्या संरक्षणासाठीचे कायदे या विषयावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे पॅनेल विधीज्ञ ॲड. मोहन कुलकर्णी, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडील योजनांबाबत नोडल अधिकारी सलिम नदाफ, अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या भारतीय संविधानातील तरतुदी व त्यांचे फायदे या विषयावर डॉ. अजित पाटील माहिती तथा मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर विविध शासकीय विभागामार्फत अल्पसंख्याक समुदायाकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांचा आढावाही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 00000

जिल्ह्यात आतापर्यंत सव्वासात लाख आयुष्मान कार्ड तयार - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम

सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : देशातील सामान्य नागरिकांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत 1356 उपचारांकरिता प्रति कुटुंब, प्रति वर्ष रु. 5 लाखांचे वैद्यकीय संरक्षण दिले जाते. या योजनेतून जिल्ह्यात आतापर्यंत सात लाख, 27 हजार 352 आयुष्मान कार्ड काढले आहेत. ही माहिती योजनेचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली. डॉ. कदम म्हणाले, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड (ई-कार्ड ), फोटो ओळखपत्र (आधार कार्ड) ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेंतर्गत आयुष्मान कार्ड काढण्याची संपूर्ण कार्यवाही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा अथकपणे करत आहे. या योजनेंतर्गत फक्त गोल्डन कार्डसाठी 2011 च्या सर्वेक्षणानुसार सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय (SECC) जनगणनेनुसार जिल्ह्यात एकूण 18 लाख 44 हजार 24 कार्ड काढणे अपेक्षित आहे. त्यापैकी आतापर्यंत 7,27,352 कार्ड काढली आहेत. डॉ. कदम म्हणाले, आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आयुष्मान कार्ड निर्माणाची व वितरणाची गती वाढविण्याकरिता सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील 1331 आशांना लॉगिन आय डी दिले आहेत तसेच आपले सरकार सेवा केंद्र यांच्या आतापर्यंत 1000 लॉगिन आय डी मिळाल्या आहेत. शहरी भागातील 263 लॉगिन आय डी तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. डॉ. कदम म्हणाले, दि. 23 जुलै 2023 च्या राज्य शासन निर्णयानुसार सर्व नागरिकांना प्रति कुटुंब 5 लक्ष रुपये विमा संरक्षण देण्यात आले आहे. आता एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजनेमध्ये एकूण 1357 आजार समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याचा लाभ घेण्याकरिता आयुष्मान कार्ड (गोल्डन कार्ड) असणे आवश्यक आहे. अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्यमित्र आयुष्मान कार्ड काढून देतात. तसेच आशा व सर्व आपले सरकार सेवा केंद्रात विनामूल्य कार्ड काढून देण्याचे काम चालू आहे. आयुष्मान कार्ड प्राप्त करण्यासाठी शिधापत्रिका / मा. प्रधानमंत्री महोदयांचे पत्र व आधार कार्ड घेऊन नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, आशा वर्कर्स आणि योजनेच्या मान्यता प्राप्त रुग्णालयास भेट द्यावी. तिथे आपली EKYC करून आयुष्मान-कार्ड निर्माण केले जाईल. त्यानंतर हे कार्ड आशा वर्कर मार्फत आपल्या घरी पोहोच केले जाईल. हे कार्ड मिळाल्यानंतर आपण योजनेच्या मान्यता प्राप्त रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकता. योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे काम पाहत आहेत. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 39 रूग्णालये सूचिबद्ध करण्यात आली आहेत. त्यापैकी दोन शासकीय रूग्णालये आहेत. या योजनेंतर्गत कॅन्सर, हृदयरोग शस्त्रक्रिया, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार शस्त्रक्रिया, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग, जठर व आतडे शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, जळीत, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, नेत्रशस्त्रक्रिया (मोतीबिंदू वगळून), कृत्रिम अवयव, फुफ्फुस, आजारावरील उपचार, सांधे प्रत्यारोपण (गुडघा व खुबा), मूत्रपिंड विकार, मानसिक आजार इत्यादी 1356 उपचारांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच, आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी आहात कि नाही हे जाणून घेण्यासाठी beneficiary.nha.gov.in या संकेत स्थळावर भेट द्या किंवा प्ले स्टोअर मधून Ayushman ॲप डाउनलोड करावे. रुग्णालयात कोणतीही समस्या असल्यास आरोग्यमित्रास भेट द्यावी किंवा निःशुल्क दूरध्वनी क्रमांक - 155388/18002332200 वर संपर्क साधू शकता. एकूणच गरजू कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही उपयुक्त अशी योजना आहे. 00000

गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त सोमवारी कार्यक्रम

सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : अल्पसंख्याक हक्क दिनाचे औचित्य साधून दि. 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार असून, यामध्ये अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्काबाबत जाणिव, माहिती करून देण्यात येणार आहे. तसेच, केंद्र व राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व प्रधानमंत्री यांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा अल्पसंख्याक समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील व समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. 00000

विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत 26 हजार व्यक्तिंची आरोग्य तपासणी - प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे

सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावागावातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती होऊन, त्यांना त्यांचा लाभ घेण्यास मदत होत आहे. या रथयात्रेमध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तपासणी, मोफत औषधोपचार व संदर्भ सेवा यासह आयुष्मान कार्ड व आभा कार्ड वाटपही केले जात आहे. मोफत आरोग्य तपासणी ‍शिबिरामध्ये 14 डिसेंबरअखेर 26051 व्यक्तिंची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली. डॉ. मिलिंद पोरे म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आयुष्मान भारत, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्त्व अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री टी बी मुक्त भारत अभियान यासह आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे. मोफत आरोग्य तपासणी ‍शिबिरामध्ये दि. 14 डिसेंबरअखेर 26051 व्यक्तिंची आरोग्य तपासणी करण्यात येवून मोफत औषधोपचार व संदर्भ सेवा देण्यात आली. यामध्ये 1100 व्यक्तिंची उच्च रक्तदाब, 1943 व्यक्तिंची मधुमेह, 1331 व्यक्तिंची क्षयरूग्ण तपासणी करण्यात आलेली आहे. 517 रुग्णांना फुड बास्केट देण्यात आलेले आहे व क्षयरूग्णांसाठी 102 जण हे निक्षय मित्र म्हणून नोंदणी केलेली आहे. आयुष्मान कार्ड व आभा कार्ड काढण्यात येत असून, सदर कालावधीमध्ये 16307 लाभार्थींचे आयुष्मान कार्ड काढण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. याबद्दल ठिकठिकाणचे लाभार्थी आभार व्यक्त करताना दिसत आहेत. दरम्यान, विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या देशव्यापी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावागावातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती होऊन, त्यांना त्यांचा लाभ घेण्यास मदत होत आहे. या यात्रेंतर्गत दि. 24 नोव्हेंबरपासून 14 डिसेंबरपर्यंत सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 302 ग्रामपंचायतींमध्ये 10 व्हॅनच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली आहे. 00000

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रभावी कामकाज करावे - विभागीय आयुक्त सौरभ राव सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याची मतदार यादी अचूक, निर्दोष होण्यासाठी सजगतेने प्रभावी काम करावे, तसेच युवा नवमतदारांची अधिकाधिक प्रमाणात नोंदणी होण्याच्या दृष्टीने मोहीम आखावी, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज येथे दिले. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, विभागीय कार्यालय, पुणेच्या उपायुक्त (पुरवठा) समीक्षा चंद्राकार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत-शिंदे, सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार उपस्थित होते. मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्दी पर्यंत चालणार आहे. त्यामुळे जिल्ह्‌याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मतदानासाठी पात्र लोकसंख्येची जास्तीत जास्त अचूक नोंद होण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे सूचित करून विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील दुबार व मयत, नावे, पत्ता व छायाचित्रे समान असलेली नावे कमी करण्याची प्रक्रिया राबवावी. मतदार यादीतील तपशीलातील दुरुस्ती करुन ती कटाक्षाने अद्ययावत करावी, असे त्यांनी सांगितले. मतदार यादीत नवमतदारांचा समावेश व्हावा, यासाठी यंत्रणांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे स्पष्ट करून श्री. राव म्हणाले, महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के मतदार नोंदणी करण्यावर भर देण्यात यावा. त्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. जिल्ह्याचे ब्रँड अँम्बॅसिडर, युथ आयकॉन यांच्यामार्फत नवमतदारांना लोकशाही बळकटीकरणामध्ये त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी. मतदार यादीमध्ये नावनोंदणीसाठी प्रवृत्त करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी सांगली जिल्ह्याचे सादरीकरण केले. यामध्ये प्राप्त अर्ज, कार्यवाही केलेले अर्ज, स्वीकृत व नाकारण्यात आलेले अर्ज, प्रलंबित अर्ज, कार्यवाहीमध्ये येणाऱ्या अडचणी, घर ते घर सर्वेक्षण, नवमतदार नोंदणीसाठी केलेले प्रयत्न यांची माहिती त्यांनी सादर केली. 00000
पंचशीलनगर रेल्वे गेट दुरुस्तीसाठी 23 डिसेंबरपर्यंत वाहतूक मार्गात बदल सांगली, दि. 13 ‍(जि. मा. का.) : पंचशीलनगर रेल्वे गेट क्र. 129 च्या दुरुस्तीच्या कामासाठी दि. 14 ते 23 डिसेंबर 2023 या कालावधीत बंद ठेवले जाणार असल्याने मोटर वाहन कायदा 1988 च्या कलम 115 व 116 अन्वये पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी निर्गमित केले आहेत. सदर वाहतूक पुढील मार्गावरून वळविण्यात येत आहे. तासगांवकडून सांगली शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठीचा मार्ग पुढीलप्रमाणे - माधवनगर रोड साखर कारखाना चौक, संपत चौकामधून डावीकडे (पूर्वेकडे) वळण घेऊन औद्यो गिक वसाहत मार्गे संजयनगर 100 फुटी रोड, अहिल्यादेवी होळकर चौकातून उजवीकडे पश्चिमेकडे शिंदे मळा रेल्वे ब्रिज खालून सांगली शहरात येता व जाता येईल. अहिल्यादेवी होळकर चौकातून डावीकडे पूर्वेस वळण घेऊन कुपवाड रोड - मंगळवार बाजार चौक - गांधी कॉलनी - सह्याद्रीनगर ओव्हर ब्रिज मार्गे शहरात जाता व येता येईल. शिवशंभो चौक - बायपास रोड - कर्नाळ रोड – भोरा म्हसोबा – रजपूत मंगल कार्यालय मार्गे उजवीकडे वळण घेवून रेल्वे गेट क्रमांक 128 माधवनगर जकात नाका मार्गे शहरात जाता व येता येईल. 00000

शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

विकसित भारत संकल्प यात्रेत आतापर्यंत 15 हजारहून अधिक लाभार्थींचा सहभाग – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे - प्रधानमंत्री यांचे मार्गदर्शन 10 ग्रामपंचायतींमध्ये प्रसारित - जिल्ह्यात लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली, दि. 9 (जि. मा. का.) : विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील निवडक जिल्ह्यातील लाभार्थींना दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. याचा सांगली जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम नांद्रे येथे झाला. जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे होते. तसेच, जिल्ह्यातील अस्वलवाडी (ता. शिराळा), बलवडी (खा.) (ता. खानापूर), नांद्रे (ता. मिरज), सिद्धनाथ (ता. जत), कान्हरवाडी (ता. कडेगाव), इरली (ता. कवठेमहांकाळ), रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा), माडगुळे (ता. आटपाडी), हजारवाडी (ता. पलूस) आणि वडगाव (ता. तासगाव) या ग्रामपंचायतींमध्येही प्रधानमंत्री यांचे संबोधन दूरदृष्यप्रणालीद्वारे प्रसारित करण्यात आले. या कार्यक्रमास लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विकसित भारत संकल्प यात्रेला देशभरात मिळत असलेल्या अद्भूत व उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल प्रशंसा व्यक्त करत दूरदृष्य प्रणालीद्वारे केलेल्या मार्गदर्शनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, नागरिकांच्या मूलभूत गरजा, आरोग्य, पोषण यासह अन्य बाबींसाठी केंद्र शासनाच्या अनेकविध कल्याणकारी योजनांतून लाभ देण्यात येत आहे. हा लाभ घेण्यासाठी या यात्रेमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात जावे लागत नाही. या माध्यमातून जनतेमध्ये विश्वास निर्माण होत आहे. त्यांना जीवन जगण्यासाठी नवे बळ, नवी उमेद मिळत आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी विकसित भारताकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगून त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा देशभरातील आढावा व आगामी संकल्प व्यक्त केला. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात 15 दिवस सुरू असून, 26 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 697 ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. आतापर्यंत 216 ग्रामपंचायतींमध्ये 10 व्हॅनच्या माध्यमातून 15 हजारहून अधिक लाभार्थींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत व वंचितांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये घरकुल, उज्ज्वला गॅस, मुद्रा, किसान सन्मान, सुरक्षित मातृत्त्व, मातृवंदना, सुकन्या समृद्धी अशा केंद्र शासनाच्या अनेक योजनांचा समावेश आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत 3 तास ही व्हॅन थांबेल. योजनांची माहिती उपस्थितांना देईल. त्यासाठी गरजू पात्र लाभार्थींनी नोंदणी करावी. योजनांचा लाभ घेऊन आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवावा, तसेच इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या महत्वाकांक्षी उपक्रमाबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत ऋणनिर्देश व्यक्त केले. नांद्रे येथील मुख्य कार्यक्रमास सरपंचा पूजा भोरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, मिरजच्या गटविकास अधिकारी संध्या जगताप, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार अर्चना पाटील, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. सय्यद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, निशिकांत भोसले - पाटील, दीपक शिंदे म्हैसाळकर, स्वाती शिंदे, शेखर इनामदार, उपसरपंच अमित पाटील, यांच्यासह विविध यंत्रणाचे वरिष्ठ अधिकारी व लाभार्थी, ग्रामस्थ, महिला आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित लाभार्थींना दिली. लाभार्थींनी मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यक्रमानंतर प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थींना लाभ वाटप करण्यात आले. ०००००

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत आज प्रधानमंत्री करणार लाभार्थींना मार्गदर्शन

सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृष्यप्रणालीद्वारे पहिल्या टप्प्यात आज देशभरातील निवडक जिल्ह्यातील लाभार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. याचा सांगली जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम मिरज तालुक्यातील नांद्रे येथे होणार असून, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेचा वंचित नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे केले. नांद्रे येथील कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात दि. 24 नोव्हेंबरपासून ही संकल्प यात्रा सुरू आहे. या मोहिमेंतर्गत 7 डिसेंबरपर्यंत 10 व्हॅनद्वारे 194 ग्रामपंचायतींमध्ये शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात आला आहे. 14 हजार 197 लाभार्थींपर्यंत ही यात्रा पोहोचली आहे. विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद - वैयक्तिक यशकथा / अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थींची नोंदणी करणे, ही या विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे आहेत. दि. ९ डिसेंबर रोजी पुढील गावात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन दूरदृष्यप्रणालीद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे. अस्वलवाडी (ता. शिराळा), बलवडी (खा.) (ता. खानापूर), नांद्रे (ता. मिरज), सिद्धनाथ व माडग्याळ (ता. जत), कान्हरवाडी (ता. कडेगाव), इरली (ता. कवठेमहांकाळ), रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा), माडगुळे (ता . आटपाडी), हजारवाडी (ता. पलूस), वडगाव (ता. तासगाव) 00000

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

नवमतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष अभियान राबवा - विभागीय आयुक्त सौरभ राव

सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्दी पर्यंत चालणार आहे. 18-19 वर्षे वयोगटातील मतदानासाठी पात्र झालेल्या युवकांची मतदार नोंदणी करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष अभियान घ्यावे. यामध्ये प्रसार माध्यमे व राजकीय पक्षांचा सक्रिय सहभाग घ्यावा. युथ आयकॉन यांचे कार्यक्रम महाविद्यालयांमध्ये घ्यावेत, अशा सूचना मतदार यादी निरीक्षक तथा पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज येथे दिल्या. दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत-शिंदे, सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष / प्रतिनिधी उपस्थित होते. विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, राजकीय पक्षांसोबत समन्वय साधून त्यांच्या सूचना, काही आक्षेप असतील तर ते विचारात घ्यावेत. मतदार यादीमध्ये नावे जोडणे, कमी करणे व सुधारणा करत असताना पारदर्शकता व निष्पक्षपणे काम करावे. कोणत्याही यंत्रणेविरूध्द तक्रार येवू नये याची काळजी घ्यावी. या अनुषंगाने एक मोठी जबाबदारी ERO व त्यांच्या अधिनस्त यंत्रणांची आहे. त्यासोबत राजकीय पक्षांचेही दायित्व महत्वाचे असून, कामाला गती देण्यासाठी व पारदर्शकतेसाठी त्यांनी बुथ लेव्हल असिस्टंटची नियुक्ती अपेक्षित संख्येमध्ये तात्काळ करावी. बुथ लेव्हल असिस्टंट बरेचसे प्रश्न सोडविण्यासाठी मदत करू शकतो, असे ते म्हणाले. यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यांचे काही प्रश्न मांडले. यावर अनुषंगिक कार्यवाही करण्याच्या सूचना विभागीय आुयक्त सौरभ राव यांनी दिल्या. खासदार संजय पाटील यांनी नवमतदार नोंदणीसाठी सेलिब्रेटी किंवा क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंकडून आवाहन करावे, असे मत व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत आत्तापर्यंत केलेल्या कार्यवाहीबाबत तसेच नवमतदार नोंदणीसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात 24 लाख 12 हजार 811 मतदार असून यामध्ये पुरूष मतदार 12 लाख 38 हजार 450, स्त्री मतदार 11 लाख 74 हजार 250 व तृतीयपंथी 111 आहेत. जिल्ह्यात एकूण 2 हजार 421 मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर राजकीय पक्षांनी बुथ लेव्हल एजंट नियुक्त करावा. काही मदत हवी असल्यास बीएलओ यांच्याशी संपर्क साधावा. दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्दी अखेर जिल्ह्यात 38 हजार 984 मतदारांची नोंदणी व 48 हजार 881 मतदारांची वगळणी झाली असल्याचे सांगून नवमतदार नोंदणीसाठी आवश्यक प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी आभार मानले. 00000