शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत १०५ बालकांची मोफत नेत्ररोग तपासणी

सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या लाभार्थींपैकी नेत्ररोग संदर्भित लाभार्थींकरिता डीईआयसी विभागांतर्गत आयोजित मोफत नेत्ररोग तपासणी शिबीरात 105 लाभार्थ्यांची मोफत नेत्ररोग तपासणी करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी ही माहिती दिली. शिबिरांतर्गत ० ते १८ वयोगटातील महानगरपालिका कार्यक्षेत्र, आष्टा - इस्लामपूर - तासगाव - विटा नगरपालिका कार्यक्षेत्र, मिरज, कडेगाव, शिराळा, वाळवा या तालुक्यांतील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित 105लाभार्थींच्या नेत्र तपासण्या डॉ. मिलिंद किल्लेदार व त्यांच्या अधिनस्त पथकांमार्फत पूर्ण करण्यात आल्या. पैकी 41 लाभार्थी हे पुढील शस्त्रक्रियेकरिता पात्र ठरले असून त्यांच्या शस्त्रक्रियेचे नियोजन सुरु आहे. शस्त्रक्रिया अनुराधा आय हॉस्पिटल, सांगली यांच्यामार्फत पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच संदर्भित लाभार्थींच्या आवश्यक लॅब तपासण्या महालॅब सांगली यांच्यामार्फत मोफत करण्यात आल्या. उर्वरित तालुक्यांकरिता नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन हे लवकरच करण्यात येणार असून ० ते 18 वयोगटातील लाभार्थींनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे वेळोवेळी कार्यक्रमाकरिता मार्गदर्शन लाभत आहे. शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, बालरोगतज्ज्ञ डॉ. उत्कर्ष भोसले, व्यवस्थापक कविता पाटील, ऑप्टोमेट्रिस्ट रोहित चौगुले व डीईआयसी अंतर्गत इतर कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा