शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा - प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील

सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : अल्पसंख्याक हक्क दिनाचे औचित्य साधून दि. 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील यांनी आज येथे केले. अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे, समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पोलिस उपअधीक्षक श्री. बेन, तहसिलदार लीना खरात, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे नोडल अधिकारी सलिम नदाफ आदि उपस्थित होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील व महानगरपालिका आयुक्त सुनील पवार यांनी अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणिव तथा माहिती होण्याच्या दृष्टीने तसेच, अल्पसंख्याक नागरिकांचे हक्क व त्यांच्या संरक्षणासाठी असणारे कायदे, त्यांच्यासाठी असणाऱ्या ‍विविध योजनांची माहिती देण्याच्या दृष्टीने कार्यक्रम आखण्याच्या सूचना केल्या. दिनांक 18 डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत माहिती देताना सहायक आयुक्त जयंत चाचरकर म्हणाले, दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर सकाळी 11.30 ते 2 या वेळेत अल्पसंख्याक समाजाची स्थिती, गती व प्रगती या विषयावर सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख, अल्पसंख्याक नागरिकांचे हक्क व त्यांच्या संरक्षणासाठीचे कायदे या विषयावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे पॅनेल विधीज्ञ ॲड. मोहन कुलकर्णी, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडील योजनांबाबत नोडल अधिकारी सलिम नदाफ, अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या भारतीय संविधानातील तरतुदी व त्यांचे फायदे या विषयावर डॉ. अजित पाटील माहिती तथा मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर विविध शासकीय विभागामार्फत अल्पसंख्याक समुदायाकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांचा आढावाही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा