शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत आज प्रधानमंत्री करणार लाभार्थींना मार्गदर्शन

सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृष्यप्रणालीद्वारे पहिल्या टप्प्यात आज देशभरातील निवडक जिल्ह्यातील लाभार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. याचा सांगली जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम मिरज तालुक्यातील नांद्रे येथे होणार असून, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेचा वंचित नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे केले. नांद्रे येथील कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात दि. 24 नोव्हेंबरपासून ही संकल्प यात्रा सुरू आहे. या मोहिमेंतर्गत 7 डिसेंबरपर्यंत 10 व्हॅनद्वारे 194 ग्रामपंचायतींमध्ये शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात आला आहे. 14 हजार 197 लाभार्थींपर्यंत ही यात्रा पोहोचली आहे. विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद - वैयक्तिक यशकथा / अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थींची नोंदणी करणे, ही या विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे आहेत. दि. ९ डिसेंबर रोजी पुढील गावात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन दूरदृष्यप्रणालीद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे. अस्वलवाडी (ता. शिराळा), बलवडी (खा.) (ता. खानापूर), नांद्रे (ता. मिरज), सिद्धनाथ व माडग्याळ (ता. जत), कान्हरवाडी (ता. कडेगाव), इरली (ता. कवठेमहांकाळ), रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा), माडगुळे (ता . आटपाडी), हजारवाडी (ता. पलूस), वडगाव (ता. तासगाव) 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा