मंगळवार, २८ मार्च, २०२३

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते वितरण

सांगली दि. 28 (जि.मा.का.) :- महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांच्यासह महिला व बाल विकास क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उपस्थित होत्या. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते लता विष्णू पाटील (विश्रामबाग सांगली), शोभाताई निवृर्ती होनमाने (देवराष्ट्रे), सविता विश्वनाथ डांगे (उरूण इस्लामपूर) आणि डॉ. निर्मला सुधीर पाटील (उत्तर शिवाजीनगर सांगली) या महिलांचा सन्मान करण्यात आला. 10 हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमात सांगली जिल्हा कृषी महोत्सवात घेण्यात आलेल्या पौष्टीक तृणधान्य पाककला स्पर्धेतील विजेत्या अपर्णा कोडलकर, मीना हेमंत चौगुले, डॉ. वैशाली दिलीप माने यांनाही पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच कोरोनामध्ये दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना 10 लाख रूपये त्यांच्या नावे बँकेत जमा केल्याबाबतच्या पासबुकाचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. ००००००

प्रतिक्षा बागडीने जिल्ह्याचा क्रीडा लौकिक वाढविला - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 28 (जि.मा.का.) :- सांगली जिल्ह्याची कन्या प्रतिक्षा बागडी हिने पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजयश्री मिळवून मानाची गदा पटकावून क्रीडा क्षेत्रात सांगली जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी तिला वैयक्तिक एक लाखाचा धनादेश देऊन गौरविले. ‍ ऑलम्पिक स्पर्धेस व भावी कारकिर्दीस पालकमंत्री डॉ. खाडे यांनी प्रतिक्षा बागडीला शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार उपस्थित होते. ०००००

सामान्य माणसाला आनंद देणारा आनंदाचा शिधा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 28 (जि.मा.का.) :- राज्य शासन सर्व सामान्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेत असून आनंदाचा शिधा वितरण या निर्णयामुळे सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे, असा विश्वास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री डॉ. खाडे यांच्याहस्ते 100 फुटी रोड येथील शासनमान्य रास्त भाव दुकान येथे पात्र लाभार्थीना आनंदाचा शिधा संचाचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी महापालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थींना आनंदाचा शिधा वितरीत केला जाणार आहे. आनंदाचा शिधा संचात एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेलाचा समावेश असून प्रतिसंच मात्र 100 रूपये या सवलतीच्या दराने पात्र मिळणार आहे. शिधा गुढी पाडव्यापासून एक महिन्यात वितरीत केला जाणार आहे. 00000

मिरज दर्गा येथे आवश्यक सुविधांसाठी सर्व समावेशक आराखडा सादर करा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 28 (जि.मा.का.) : मिरज येथील ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब दर्गा या ठिकाणी येणाऱ्या भाविक व पर्यटकांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दर्ग्याचा आणि मिरज येथील सर्व अल्पसंख्यांक समाजाच्या धार्मिक स्थळांच्या विकासासाठी सर्व समावेशक विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिल्या. मिरज येथील ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब दर्गा हा सुमारे 600 वर्षापूर्वीचा असून दर्ग्याच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल न करता सौंदर्य व पावित्र्य याचा समतोल राखत नवीन विकास आराखडा येत्या दोन आठवड्यात सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब दर्गा व अल्पसंख्यांक समाजाच्या धार्मिक स्थळे विकसित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस पालकमंत्री डॉ. खाडे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, विकास आराखडा करताना दर्ग्याकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांच्या कामाचा दर्जा सुधारावा. दर्ग्यासमोरील अतिक्रमणे काढावीत. आराखड्यामध्ये वाहनतळ, सर्व सोयीयुक्त यात्री निवास, नगारखाना, प्रवेशव्दार व कमान, फायर फायटिंग, सोलर सिस्टिम, अंडरग्राउंड वायरिंग, चौक सुशोभिकरण व दर्ग्याच्या शेजारी असणाऱ्या सरपंच कार्यालयाचे नूतनीकरण या बाबीनाही प्राधान्य द्यावे. याबरोबरच इदगाह मैदान, खासबाग परिसर, अनुभव मंडप, तंतूवाद्य भवन, चर्मकार समाज भवन आदी बाबींचा सर्व समावेशक विकास आराखडा समावेश करावा. जैन समाजाच्या मुलांसाठी असलेल्या वस्तीगृहाची दुरुस्ती व दीपस्तंभ, ख्रिचन समाज स्मशान भूमी व पंढरपूर रोडवर असणाऱ्या चर्च परिसरातील दुरुस्तीची कामे आराखड्यात प्राधान्याने समाविष्ट करावीत, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या. 00000

नद्यांमध्ये सांडपाणी मिसळून प्रदूषण करणाऱ्या कारखाने, कंपन्या, यंत्रणांवर कठोर कारवाई करणार - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 28 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील नद्यांमध्ये सांडपाणी मिसळून प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या कारखाने, कंपन्या, यंत्रणा यांची कोणत्याही स्थितीत गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. कृष्णा नदीत 10 मार्च 2023 रोजी मोठ्या प्रमाणावर मासे मृत्यूमुखी पडले, या घटनेला जबाबदार असणाऱ्या घटकांचा व त्यावरील केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रदूषण नियंत्रण महामंडळ व प्रशासकीय यंत्रणा यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री. औताडे यांच्यासह सबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. कृष्णा नदीत सोडण्यात येत असलेल्या प्रदूषीत पाण्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, महानगरपालिकेच्या पंपहाऊसमधील पंप वारंवार बंद पडत असल्याने प्रदूषित पाणी थेट नदीत सोडले जाते. परिणामी गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर नदीतील मासे मृत्यूमुखी पडले. ही अत्यंत दुर्देवी घटना असून नागरिकांच्या आरोग्यालाही यातून मोठ्या प्रमाणावर धोका संभवू शकतो. त्यामुळे या प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या यंत्रणा, वरिष्ठ अधिकारी यांच्यावरच कठोर कारवाई करण्यात यावी. गेल्या अनेक वर्षापासून शेरीनाल्यावरील एसटीपी प्लाँट चे काम सुरू आहे. सदरचा प्लाँट तात्काळ पूर्ण करून सांडपाणी नदीत मिसळण्याचा प्रश्न गांर्भियाने सोडविणे आवश्यक आहे. प्रदूषित पाणी नदीत मिसळू नये यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना त्वरीत करा. सन 2022-23 आणि 2023-24 मध्ये प्रदूषण टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल महानगरपालिकेकडील यंत्रणांनी तात्काळ सादर करावा. महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सदैव सज्ज असणे आवश्यक आहे. नदी प्रदूषणासाठी जबाबदाऱ्या असणाऱ्या घटकांना प्रदूषण नियंत्रण मंडळासह जिल्हा प्रशासनानेही नोटीसा बजावाव्यात. यावेळी त्यांनी सावळी येथील भूजल प्रदूषणाबाबतही चर्चा केली. जिल्ह्यात नदी प्रदूषण करणाऱ्या तसेच हवा प्रदूषण करणाऱ्या घटकांचा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने स्पेशल ड्राईव्ह घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 00000

सोमवार, २७ मार्च, २०२३

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मालगाव येथे आनंदाचा शिधा संचाचे वितरण

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : राज्य शासनाने गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थींना आनंदाचा शिधा वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने ‍मिरज तालुक्यातील मालगाव येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते आनंदाचा शिधा संचाचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील पात्र लाभार्थींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी केले. आनंदाचा शिधा संच वितरण कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, मिरज प्रांताधिकारी डॉ. समीर शिंगटे, तहसिलदार डी. एस. कुंभार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांच्यासह मालगाव व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, गेल्या वर्षी दिवाळी सणानिमित्त शासनाने अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थींना आनंदाचा शिधा संच वितरीत केला. याच धर्तीवर गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वितरीत करण्याचा शासन निर्णय घेतला आहे. या आनंदाच्या शिधामध्ये एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेल या बाबींचा समावेश आहे. आनंदाचा शिधा प्रतिसंच मात्र 100 रूपये या सवलतीच्या दराने पात्र लाभार्थींना मिळणार आहे. शिधा गुडीपाडव्यापासून एक महिन्यात वितरीत करावयाचा असल्याचे ते यावेळी म्हणाले. सांगली जिल्ह्यासाठी 3 लाख 98 हजार 946 आनंदाचा शिधा संच मंजूर झाले आहेत. यामध्ये सांगली 52 हजार 205, मिरज 45 हजार 310, कवठेमहांकाळ 23 हजार 85, जत 50 हजार 365, आटपाडी 22 हजार 756, कडेगाव 24 हजार 793, खानापूर-विटा 27 हजार 294, तासगाव 40 हजार 203, पलूस 27 हजार 94, वाळवा 46 हजार 952, आष्टा 13 हजार 216 व शिराळा तालुक्यासाठी 25 हजार 673 शिधा संचाचा समावेश आहे. ०००००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जात आहे. या योजनेच्या लाभामुळे या घटकातील शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत सिंचनाची सोय होऊन त्यांची आर्थिक उन्नती साधली जाईल. या योजनेविषयी थोडक्यात..... योजनेच्या लाभासाठी पात्रता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतकरी पात्र आहेत. (लाभार्थी जवळ जातीचे प्रमाणपत्र आवश्यक). लाभार्थी शेतकऱ्यांजवळ 7/12 व 8-अ चा उतारा आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजाराच्या मर्यादेत असावे (उत्पन्नाचा दाखला आवश्यक). लाभार्थीची जमीन धारणा 0.20 हेक्टर ते सहा हेक्टर पर्यंत असावी (नवीन विहिरीच्या लाभासाठी किमान 0.40 हेक्टर क्षेत्र आवश्यक) आणि सामूहिक क्षेत्र जमीन किमान 0.40 हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब नवीन विहीर या घटकाचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील. अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर या बाबीसाठी 2 लाख 50 हजार, जुनी विहीर दुरुस्ती 50 हजार, इन वेल बोअरिंग 20 हजार, पंप संच 20 हजार, वीज जोडणी आकार 10 हजार, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण 1 लाख, सूक्ष्म सिंचन संच मध्ये ठिबकसाठी 50 हजार किंवा तुषारसाठी 25 हजार रुपये अनुदान अनुज्ञेय आहे. नवीन विहीर पंप संच, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक यासाठी एकूण 3 लाख 5 हजार ते 3 लाख 30 हजार इतके पॅकेज तर जुनी विहीर दुरुस्ती, पंपसंच, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक यासाठी 1 लाख 5 हजार ते 1 लाख 30 हजाराचे पॅकेज. शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण यामध्ये शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, पंपसंच, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक यासाठी एकूण एक लाख 55 हजार ते एक लाख 80 हजार इतके पॅकेज. तसेच यामध्ये अर्जदाराकडे जर काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ विहित मर्यादेत देण्यात येईल. या घटकांचा लाभ घेतल्यानंतरही लाभार्थ्याने इनवेल बोअरिंग या घटकाची मागणी केल्यास या घटकासाठी अतिरिक्त लाभ देण्यात येईल. या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा https://mahadbtmahiti.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कृषी विभाग यांच्याकडे संपर्क साधावा. जिल्हा माहिती कार्यालय, सांगली. 000000

मंगळवार, २१ मार्च, २०२३

सांगली जिल्हात कृषी महोत्सवाचा सुगंध दरवळला - प्रकल्प संचालक आत्मा प्रकाश सूर्यवंशी

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्याचा जिल्हा कृषी महोत्सव नेमिनाथनगर सांगली येथे 17 ते 21 मार्च अखेर आयोजित केला होता. या कृषी महोत्सवास सांगली व जिल्ह्यातील दररोज अंदाजे पाच ते सहा हजार शेतकरी, नागरिकांनी व मान्यवरांनी भेट दिली. खाद्यपदार्थ, गृहपयोगी वस्तू, कृषी अवजारे यंत्रसामग्री, धान्य व कृषी निविष्ठा यांची चांगल्या प्रकारे विक्री झाली. कृषी महोत्सवामध्ये सर्वसमावेशक माहिती सर्वदूर सर्वांना मिळाल्याने कृषी महोत्सवाचा सुगंध चांगल्या पद्धतीने दरवळल्याचे दिसून आल्याचे प्रकल्प संचालक आत्मा प्रकाश सूर्यवंशी यांनी सांगितले. कृषी महोत्सवात शासकीय यंत्रणा, कृषी निविष्ठा, आधुनिक मशिनरी, कृषी सिंचन व अवजारे, खाद्य व गृहपयोगी इत्यादींनी आपल्या नावाची नोंदणी करून स्टॉल बुक केले होते. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चा प्रचार आणि प्रसिद्धी व्हावी यासाठी पौष्टिक तृणधान्याचे स्वतंत्र आणि आकर्षक दालन उभा केले होते, तसेच सेल्फी पॉईंट ठेवला होता. पौष्टिक तृणधान्याचे दालन आणि सेल्फी पॉईंट कृषी महोत्सवाचे आकर्षण ठरले. कृषी विभागामार्फत फळ महोत्सव, फुल महोत्सव व धान्य महोत्सव आयोजित केला होता. पाककला स्पर्धा व वेगवेगळ्या विषयांचे परिसंवाद आयोजित केले होते. कृषि महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शेतकरी सन्मान व समारोप सोहळा विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. सांगली जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान श्री उमेश पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी नेमण्यात आलेले सेवा पुरवठादार राजेश शहा रिसोर्सेस सांगली यांचा सत्कारही करण्यात आला. कृषी महोत्सवाच्या आकर्षक मांडणी संदर्भात श्री. उमेश पाटील यांनी सांगली जिल्हा कृषी विभागाचे कौतुक केले. 00000

सांगली जिल्ह्यात कृषी महोत्सवातील पौष्टिक तृणधान्य दालन केंद्रस्थानी - कृषी उपसंचालक प्रियांका भोसले

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : कृषी विभागाने जिल्हा कृषी महोत्सवात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चा प्रचार आणि प्रसिद्धी व्हावी यासाठी पौष्टिक तृणधान्याचे स्वतंत्र आणि आकर्षक दालन उभे केले होते. पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धीच्या माध्यम म्हणून सेल्फी पॉईंट ठेवला होता. पौष्टिक तृणधान्याचे दालन आणि सेल्फी पॉईंट कृषी महोत्सवाचे आकर्षण ठरले. पौष्टिक तृणधान्याचा प्रचार व प्रसिद्धीसाठी महोत्सवामध्ये पाककला स्पर्धा, सेल्फी पॉइंट, स्वतंत्र दालन, कार्यशाळा इत्यादीचा वापर करुन यश आल्याचे कृषी उपसंचालक प्रियांका भोसले यांनी सांगितले. प्रभारी अधिकारी तथा नाचणी पैदासकार, नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प विभागीय कृषि संशोधन केंद्र शेंडापार्क कोल्हापूर योगेश बन यांनी २१ मार्च २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षाच्या अनुषंघाने पौष्टिक तृणधान्य लागवड, उत्पादन वाढ व प्रक्रिया प्रशिक्षण उपस्थित शेतकऱ्यांना दिले. तसेच आहाराविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आहारतज्ज्ञ डॉ. योगेश माईनकर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष अनुषंगाने पाककला स्पर्धा व वेगवेगळ्या विषयांचे परिसंवाद आयोजित केले होते. या परिसंवादाचे आभार तंत्र सल्लागार श्रीकांत निकम यांनी मानले. यावेळी सांगली जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान व खरीप हंगाम सन 2021 पिक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान स्मार्ट प्रकल्प कोल्हापूर विभागीय नोडल अधिकारी उमेश पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 00000

कृषी महोत्सवानिमित्त स्मार्ट प्रकल्पांतर्गत घेतलेल्या प्रशिक्षणास उदंड प्रतिसाद

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : सांगली जिल्हा कृषी महोत्सवाच्यानिमित्त बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट अंतर्गत घेतलेल्या प्रशिक्षणास उदंड प्रतिसाद मिळाला. नेमिनाथ नगर, कल्पद्रुम मैदान सांगली येथे 17 ते 21 मार्च 2023 अखेर सांगली जिल्हा कृषी महोत्सव आयोजित केला होता. यानिमित्त स्मार्ट प्रकल्पांतर्गत घेतलेल्या प्रशिक्षण प्रसंगी आयोजित कार्यक्रमास स्मार्ट प्रकल्प कोल्हापूर विभागीय नोडल अधिकारी उमेश पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा प्रकाश सूर्यवंशी, प्रकल्प उपसंचालक आत्मा बाळासाहेब लांडगे, कृषी उपसंचालक प्रियंका भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी जत मनोज वेताळ, उपविभागीय कृषी अधिकारी विटा सागर खटकाळे, मयुरा काळे व सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. स्मार्ट प्रकल्प कोल्हापूर विभागीय नोडल अधिकारी उमेश पाटील यांनी दोन सीबीओचे काम सुरू असल्याचे सांगून याच धर्तीवर इतर सीबीओंनी काम करण्याचे आवाहन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांनी सांगली जिल्ह्यामध्ये आजअखेर 26 कंपन्यांना प्राथमिक मान्यता तर 14 कंपन्यांना प्रकल्प मंजुरी मिळाली असल्याचे सांगितले. तसेच 6 कंपन्यांना 4 कोटी 63 लाख अनुदान वितरित झालेले असून त्यांची संपादन प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगितले. समुदाय आधारित संस्थांची स्थापना संस्थात्मक संरचना आणि त्याचे व्यवस्थापन तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे नियामक अनुपालन या विषयी कोल्हापूर आणि पुणे विभागाचे कंपनी सेक्रेटरी अमित पाटील यांनी माहिती दिली. कृषी विकास प्रतिष्ठान बारामती चे वैभव पाटील यांनी नाबसंरक्षण आणि केंद्र शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प 10000 एफपीओ बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. एचडीएफसी बँक शाखा प्रबंधक कुलभूषण यादव यांनी मूल्य साखळीचे तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या बँकेबल सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करणे याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या सुरुवातीस स्मार्ट प्रकल्पाचे उपसंचालक भगवान माने यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण करून साध्या सोप्या भाषेत त्यातील विविध उपप्रकल्पांची माहिती दिली व प्रत्यक्ष काम करताना आलेल्या अनुभवाचे कथन केले. कृषी महोत्सवाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील स्मार्ट प्रकल्पातील समुदाय आधारित संस्था (cbo) व कृषी विभागाचे सांगली जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. स्मार्ट प्रकल्पाची सविस्तर तोंड ओळख व्हावी आणि ती प्रत्यक्ष राबवताना येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण व्हावे या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली होती. सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी वाळवा संजय खारगे यांनी केले. आभार मिलिंद निंबाळकर यांनी मानले. प्रशिक्षणास सांगली जिल्ह्यातील समुदाय आधारित संस्थांचे प्रतिनिधी, सांगली जिल्ह्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी, शेतकरी आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी विचारलेल्या सर्व शंकांचे समर्पक उत्तरे देऊन निरसन केले. 00000
जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : विविध आंदोलने, आगामी यात्रा, सण उत्सव, जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 22 मार्च 2023 ते 4 एप्रिल 2023 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे. या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 22 मार्च 2023 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 4 एप्रिल 2023 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. 00000

शिर्डी येथील महापशुधन एक्स्पो 2023 पशु प्रदर्शनास आवश्य भेट द्या - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 21 (जि. मा. का.) : देशातील सर्वात मोठे 'महापशुधन एक्स्पो 2023' शिर्डीच्या शेती महामंडळाच्या 46 एकर विस्तीर्ण जागेत भरणार असून देशभरातील 5 हजार पेक्षा जास्त पशु-जनावरे या प्रदर्शनास असणार आहेत. 10 लाखांपेक्षा जास्त पशुप्रेमी या प्रदर्शनास भेट देण्याची शक्यता आहे. 500 हून अधिक स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत. शेतकरी, पशुपालक व होतकरू तरूणांसाठी हे महा एक्स्पो पाहणे म्हणजे पर्वणीच ठरणार आहे. या प्रदर्शनाचे 24 ते 26 मार्च 2023 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पोसाठी येणाऱ्या पशुपालक पशुप्रेमींच्या वाहन पार्किंगसाठी 100 एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. या महापशुधन एक्स्पो 2023 या प्रदर्शनास सांगली जिल्ह्यातील पशुपालक, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. महाएक्स्पोमध्ये सहभागी होण्यासाठी 13 राज्यातील पशुपक्षी व पशुपालक या मेळाव्यास सहभाग नोंदविणार आहेत. 18 विविध प्रकारच्या चारा-पिके बियाणांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकार या प्रदर्शनात सादर केले जाणार आहेत. मुरघास, ॲझोला, हायड्रोपोनिक्स चाऱ्याचे नविन तंत्रज्ञानाव्दारे उत्पादन करून जनावरांना सकस हिरवा चारा कसा उपलब्ध करून देता येईल याचे प्रात्यक्षिक या प्रदर्शनात असणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचे सादरीकरण केले जाणार आहे. महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांच्या स्टॉलच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याचे पशुसंवर्धन विषयक वैशिष्ट्यांची माहिती सर्वसामान्य जनतेसाठी खुली असणार आहे. त्या त्या राज्यातील व जिल्ह्यातील प्रसिद्ध असणारे वैशिष्ट्यपूर्ण पशुधन या प्रदर्शनात प्रत्यक्ष सहभागी असणार आहे. गाय, म्हैस, शेळी-मेंढी, कोंबडी, श्वान, वराह व अश्व अशा विविध प्राण्यांचे सर्वोत्कृष्ट प्रजातीय प्रकार, सांगली जिल्ह्यातील उत्कृष्ट प्रजातीची माडग्याळ मेंढी व खिल्लार जातीची वैशिष्ट्यपूर्ण जातिवंत आटपाडी खिलार जनावरे महाएक्स्पो मध्ये पहावयास मिळणार आहेत. शेतकरी व पशुपालकांसाठी उपयुक्त ठरणारे वैरण विकास, दुग्ध व्यवसायातील आव्हाने, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन या विषयावरील तांत्रिक चर्चासत्रे या ठिकाणी होणार आहेत. चर्चासत्रांमध्ये पशुपालक व शेतकरी सहभाग घेऊ शकतात. पशुसंवर्धन विषयक आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात येणार आहे. मुक्त संचार गोठा कसा असावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच पारंपारिक लोककलांच्या माध्यमातून शासकीय योजनांचे सादरीकरण केले जाणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त अजय थोरे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी दिली. महा एक्स्पोमध्ये डॉग व कॅट शो आयोजित केले आहे. ‍विविध जातीचे अश्व यामध्ये सहभागी होणार आहेत. नागपूर येथील महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचा या प्रदर्शनात सक्रिय सहभाग राहणार आहे. महापशुधन एक्स्पो म्हणजे पशुसंवर्धन क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्त्रोक्त पद्धतीने पशुपक्षी पालन व वैरण उत्पादन करण्यासाठी शेतकरी व पशुपालक यांच्यासाठी पर्वनीच ठरणार आहे. याचा सांगली जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक व युवकांनी लाभ घ्यावा व जिल्ह्याची उत्पादकता वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

बँकांनी कर्ज प्रकरणांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावेत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे निर्देश

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : कृषी पत पुरवठ्यासह अन्य कर्ज प्रकरणाची प्रकरणे बँकांनी प्राधान्याने निकाली काढून त्यांना देण्यात आलेले कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस खासदार संजय पाटील, बँक ऑफ इंडिया कोल्हापूर झोनलचे उपअंचलिक प्रबंधक किरण पाठक, अग्रणी जिल्हा प्रबंधक महेश हरणे, आरबीआयचे अग्रणी जिल्हा अधिकारी नरेंद्रकुमार कोकरे, नाबार्डचे डीडीएम निलेश चौधरी, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, केव्हीआयबी सांगलीचे राजेश मिरजकर यांच्यासह महामंडळांचे व्यवस्थापक व जिल्ह्यातील बँकांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, रिझर्व बँकेच्या नियमानुसार जिल्ह्यातील बँकांनी कर्ज प्रकरणे प्राधान्याने निकाली काढावीत. ज्या बँकांनी कृषी कर्ज वाटप कमी केले आहे, त्यांनी उद्दिष्ट पूर्ण करावे. कर्ज वाटपामध्ये काही समस्या अडचणी येत असल्यास त्याची माहिती प्रशासनास द्यावी. शासनाच्या व महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांनी वार्षिक पतपुरवठा आराखड्याबरोबरच शासकीय व महामंडळांच्या योजनांची उद्दिष्टपूर्ती करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान (RSETI) मध्ये युवकांना विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर हे युवक व्यवसायासाठी बँकेकडे मुद्रा योजनेतून कर्ज मिळण्यासाठी अर्ज सादर करतात. अशा युवकांचे अर्ज बँकांनी तातडीने मंजूर करणे आवश्यक आहे. या योजनेतून कर्ज मिळण्यासाठी प्राप्त झालेले 272 कर्ज प्रकरणांचे अर्ज बँकांनी येत्या दोन-तीन दिवसात मार्गी लावावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी बँकांना दिल्या. जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक महेश हरणे यांनी जिल्हा वार्षिक पतपुरवठा योजना 2022-2023 मध्ये जिल्ह्याने केलेल्या उद्दिष्टपूर्तीची माहिती दिली. कृषी व तत्सम क्षेत्रासाठी डिसेंबर 22 अखेर 3 हजार 747 कोटी रुपये, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासाठी 2 हजार 666 कोटी एकूण प्राथमिक क्षेत्राकरिता 6 हजार 820 कोटी तसेच एकूण प्राथमिक क्षेत्राकरिता 6 हजार 257 कोटी असे 13 हजार 77 कोटीचे कर्ज बँकांनी वितरित केले आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांनी 15 मार्च 2023 पर्यंत 2 हजार 318 कोटी रुपये पीक कर्ज वाटप केले आहे. पीक कर्ज वाटपाची टक्केवारी 81 टक्के इतकी आहे. तर पी. एम. एफ.एम.ई. या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील सर्व बँकांनी 350 कर्ज प्रकरणे मंजूर केली असून राज्यात जिल्ह्याने यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे, अशी माहितीही श्री. हरणे यांनी यावेळी दिली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान योजना, महिला आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, वसंतराव नाईक भ.ज. वि.जाती विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय विकास महामंडळ, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणे आणि पीक कर्ज वितरण, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, पी.एम.एफ.एम. ई. योजना, ए. आय. एफ. योजना, आरसेटी, वित्तीय साक्षरता केंद्र आणि बँक शाखा उघडणेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. ००००००

कृषी योजनांच्या यशस्वीतेसाठी वित्तीय संस्था व बँकांचा सहभाग महत्त्वाचा - मेघनाथ कांबळे

सांगली दि. 20 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यामध्ये कृषी पायाभूत सुविधा योजना राबवण्यासाठी खूप वाव असून सर्व संलग्न संस्थाने एकत्र येऊन काम केल्यास दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकचे काम होऊ शकते. योजना राबवत असताना जिल्ह्यातील वित्तीय संस्था व बँकांची भूमिका व सहभाग फार महत्त्वाचा आहे. संबंधित वित्तीय संस्था व बँकांनी लाभार्थ्यांच्या प्राप्त प्रस्तावांना वेळेत व गरजेनुसार कर्ज रक्कम मंजूर करणे व वाटप करणे क्रमप्राप्त आहे, असे प्रतिपादन कृषी आयुक्तालय पुणे चे राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे यांनी केले. सांगली येथे जिल्हा कृषी महोत्सवाचे औचित्य साधून कृषी पायाभूत सुविधा निधी कृतीसंगम कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक महेश हरणे, नाबार्डचे व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या उर्मिला राजमाने, तासगाव तालुका कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर आदि उपस्थित होते. राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे म्हणाले, लाभार्थीने त्यांचे परिपूर्ण कर्ज प्रस्ताव बँकांकडे संबंधित कागदपत्रांसहित जमा केल्यास बँकांच्या माध्यमातून लवकरात लवकर कर्ज प्रस्ताव निकाली काढले जाऊ शकतात. योजनेतील पात्र प्रकल्पांविषयी बोलताना ते म्हणाले, भविष्यांमध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीमध्ये मोठी क्रांती होऊ शकते. कृतीसंगम कार्यशाळेमध्ये उर्वरित तीन वर्षांमध्ये जिल्ह्यातील विविध बँकांच्या 530 शाखांनी कमीत कमी एक शाखा एक प्रकरण राबवण्याविषयी संकल्प घेण्यात आला. जेणेकरून जिल्ह्यांमध्ये पुढील तीन वर्षात कमी कमी पंधराशे कोटी पर्यंतचा लाभ आपण जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देऊ शकतो. प्रास्ताविकात श्री. सुर्यवंशी यांनी कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या विविध लाभांविषयी माहिती देऊन जिल्हामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल असे सांगितले. तालुका कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर यांनी कृती संगम कार्यशाळेची पार्श्वभूमी सांगितली. या कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्र, कांचनपूर, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, कृषी संशोधन केंद्र, सहकार व पणन मंडळ, पशुसंवर्धन विभाग व इतर शासकीय विभागांनी सहभाग घेतला. 00000

कृषी महोत्सवात पाककला स्पर्धा संपन्न

सांगली दि.19 (जिमाका) : सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी महोत्सव - 2023 दिनांक १७ ते २१ मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेला असून त्या निमित्ताने विविध चर्चासत्र व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून दिनांक 19 मार्च 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे औचित्य साधून जिल्हास्तरीय पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील शेतकरी महिला, अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी विविध प्रकारच्या पाककृति सादर केल्या. नाचणी, ज्वारी, बाजरी, वरई, राळा, राजगिरा इत्यादी तृणधान्यांपासून बनविलेल्या पदार्थांचा समावेश होता. या पदार्थांमध्ये नाचणीचे आंबील, राजगिरा खीर, बाजरीची खिचडी, नाचणीचा केक, बाजरीचा केक, तृणधान्य कटलेट, ज्वारी बाजरी व नाचणी पासून बनवलेली बिस्किटे, बाजरीच्या खारोड्या, नाचणीचे मोदक, पौष्टिक तृणधान्य थाळी या विशेष स्वादिष्ट पाककृती होत्या. सदर स्पर्धेमध्ये श्रीमती अपर्णा कोडलकर यांच्या पौष्टिक तृणधान्य थाळी ला प्रथम क्रमांक, श्रीमती मीना चौगुले यांनी नाचणी पासून बनवलेल्या मोदक, केक व लाडू यांना द्वितीय क्रमांक तर डॉक्टर वैशाली माने यांनी बनवलेल्या नाचणीचे इडली, हलवा, पुरी व थालीपीठ यांना तृतीय क्रमांक घोषित करण्यात आला. या स्पर्धेसाठी श्री संजीव कोल्हार व संजय वजरीनकर, संचालक एलेंटा ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड, सांगली हे प्रायोजक म्हणून लाभले. सदर स्पर्धेचे परीक्षण राजर्षी शाहू कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय सांगली च्या प्राचार्या डॉक्टर अर्चना शिंदे, प्राध्यापिका अश्विनी कांबळे व प्राध्यापिका अबोली पिंजरकर यांनी केले.अशाप्रकारे अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात जिल्हास्तरीय पाककला स्पर्धा 2023 पार पडल्या. यावेळी माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली श्री.प्रकाश सूर्यवंशी यांनी पौष्टिक तृणधान्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाककला एक उत्तम कला असून ती महिलांशी निगडित असल्याने गाव पातळीपर्यंत प्रसार करण्यासाठी उपयुक्त आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आहारामध्ये तृणधान्यांचा वापर वाढविण्याचे आवाहन यावेळी केले. 00000

कृषी महोत्सवामध्ये ऊस पिकावर परिसंवाद

सांगली दि.19 (जिमाका) : सांगली जिल्हा कृषी महोत्सव 2023 मध्ये दिनांक 19 मार्च 2023 रोजी परिसंवाद व चर्चासत्र या कार्यक्रमात कृषिरत्न डॉ. संजीव माने यांनी उपस्थिताना एकरी दीडशे टन ऊस उत्पादन या विषयी सविस्तर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. संजीव माने म्हणाले, ऊस शेती करत असताना जमिनी कसदार असणे आवश्यक आहे. ऊसामध्ये एकरी चाळीस हजार उसाची संख्या आवश्यक आहे. त्याच्यासाठी फुटव्यांची संख्या निर्धारित करणे फार गरजेचा आहे. सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खताचा संतुलित वापर होणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापन करत असताना जमिनीमध्ये वापसा टिकवने अत्यंत महत्त्वाचा असते त्यामुळे पिकांना आवश्यक असणारे सर्व घटक जमिनी मध्ये मुळांना उपलब्ध होतात. पिकाच्या वाढीसाठी त्याचा वापर होतो. भरपूर पाणी न देता थोडं -थोडं पाणी, सारखं देणे आवश्यक आहे .त्यासाठी ऊस शेतामध्ये ठिबक सिंचन आवश्यक आहे.याप्रमाणे ऊस शेतीचे नियोजन केल्यास हेक्टरी दीडशे टन ऊस उत्पादन शक्य होऊ शकते असे ते म्हणाले . यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी व शेतकरी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कुमार खारगे यांनी केले तर आभार कडेगाव तालुका कृषी अधिकारी बाळकृष्ण कदम यांनी मानले. 000000

सोमवार, १३ मार्च, २०२३

कृषी प्रदर्शनात जनहिताच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी करा शासकीय यंत्रणांना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या सूचना

सांगली दि. 13 (जि.मा.का.) : शासन शेती आणि शेतकऱ्यांसाठी कृषी विकासाच्या अनेक योजना राबवित आहे. या योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरत असून सांगली येथे 17 ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणाऱ्या कृषी प्रदर्शनात जिल्ह्यातील कार्यान्वयीन यंत्रणांनी शासनाच्या जनहिताच्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावून योजनांची प्रचार व प्रसिद्धी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका व जिल्हा परिषद सांगली यांच्या सहकार्याने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली व प्रकल्प संचालक आत्मा सांगली यांच्यावतीने कल्पद्रुम ग्राउंड, नेमिनाथ नगर, विश्रामबाग सांगली येथे दि. 17 ते 21 मार्च 2023 या पाच दिवसाच्या कालावधीत आयोजित कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी विनामुल्य असून सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. या कृषी प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखालील बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँकचे प्रबंधक महेश हरणे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले, यांच्यासह कृषी विभाग व जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देणे, प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपापसातील विचारांची देवाण-घेवाण करणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे, आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांना अर्थिकदृष्ट्या उन्नत करणे तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विषयक अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करणे, दुर्लक्षित झालेल्या पौष्टिक तृणधान्य पिकांचे महत्व ग्राहकांना पटवून देऊन या पिकाखालील क्षेत्रात वाढ करणे, विविध चर्चासत्र व परिसंवादाच्या माध्यमातून अद्यावत तंत्रज्ञान / कृषि व संलग्र विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. कृषी प्रदर्शनात 200 पेक्षा जास्त स्टॉल असून 40 स्टॉल शासकीय विभागांसाठी आहेत. शासकीय कार्यालयांना स्टॉल वाटपासाठी कृषी विभागाने समिती गठीत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. कृषी प्रदर्शनाबाबत माहिती देताना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले, कृषी प्रदर्शनात धान्य व फळ महोत्सव आणि विविध विषयावरील परिसंवाद / चर्चासत्राचे आयोजन केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषीत केले आहे. पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांच्या आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करून लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे या प्रमुख उद्देशाने महोत्सवामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकासाठी स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. यामध्ये पौष्टिक तृणधान्य उपपदार्थांचे प्रदर्शन व विक्री, पौष्टिक तृणधान्ये रेसिपी व पौष्टिक तृणधान्य सेल्फी पॉईंट इ. चा समावेश राहणार आहे. त्याचबरोबर महोत्सवामध्ये धान्य व फळ महोत्सव, उत्पादन ग्राहक थेट विक्री, विक्रेता खरेदीदार संमेलन, प्रगतशील शेतकरी सन्मान, कृषी निविष्ठा, कृषी तंत्रज्ञान, सिंचन, गृहउपयोगी वस्तू, विविध खाद्यपदार्थ, कृषी यांत्रिकीकरण, सुधारित औजारे, धान्य फळपिके, फुल पिके यांचे नमुने, महिला बचत गटांच्या पाककृती व फळ पिकाची कलमे / रोपे इत्यादी दालनांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी दिली. कृषी प्रदर्शनामध्ये खते, बियाणे, कीटकनाशके, ट्रॅक्टर व सुधारित औजारे, सिंचन साधने, फळे भाजीपाला कलमे/ रोपे उत्पादक/ वितरक यांना प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन स्टॉल बुकींग करावयाचे असल्यास कृषि विभागाचे संदीप खरमाटे, कृषि सहाय्यक मो.क्र. ७९७२६५१४७१/ ९८५०९०३४६५ व श्री. अमित चव्हाण तंत्रज्ञान व्यवस्थापक मो. क्र. ९८९०३२१९८३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000

शुक्रवार, ३ मार्च, २०२३

शेतकऱ्यांनी नैसर्गिक, सेंद्रिय व ऑरगॅनिक शेतीकडे वळावे - कृषी मंत्री अब्दुल सत्तार

कृषी विभागाचा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा सांगली दि. 3 (जिमाका) : रासायनिक खते, पाण्याचा अतिवापर यामुळे शेतीत नापिकतेचे प्रमाण वाढत आहे. यामुळे आता नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, ऑरगॅनिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे. कृषी विभागाने यासाठी नियोजन करावे, त्यास शासनस्तरावरून आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. कृषी विभागाच्या कोल्हापूर विभागाची आढावा बैठक सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात संपन्न झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, विभागीय कृषी सह संचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, कोल्हापूरचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अधिकारी जालिंदर पांगरे, सातारा जिल्ह्याचे कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, पाण्याच्या अतिवापरामुळे जमिन नापिक होत असून याचे दुष्परीणाम आता दिसू लागले आहेत. नापिक जमिन सुपीक बविण्यासाठी कृषि विद्यापीठांनी संशोधन करुन या जमिनीवर पिके घेण्यासाठी नवनवीन वाणांचे संशोधन करावे. तसेच शेतीमध्ये नवीन उपक्रम राबविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. सन 2023 हे वर्ष आंतरराष्रीय य पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असून तृणधान्य हा सकस आहार आहे. याचा आहारात अधिक वापर व्हावा यासाठी प्रचार आणि प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात करावी. तृणधान्याचे मार्केटींग करून हॉटेल्स व रूग्णालयात रूग्णास देण्यात येणाऱ्या आहारामध्ये तृणधान्याचा वापर करण्यासाठी प्रयत्न करावेत. शेती आणि शेतकरी हा मुख्य घटक मानून राज्य शासन कृषी विषयक योजना आखते. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाने कटिबध्द राहवे. कृषी विभागाच्या योजनांपासून शेतकरी लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. सांगली जिल्हा हा सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेला जिल्हा असल्याचे सांगून कृषि मंत्री श्री. सत्तार म्हणाले, जिल्ह्याने द्राक्ष, हळद यामध्ये आपले वेगळेपणे सिद्ध केले आहे. येथील शेतकरी विविध समस्यांवर मात करुन जिल्ह्यात हरित क्रांती घडवित असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांना घरपोच सातबारा देण्याचा महसूल यंत्रणेचा प्रयत्न आहे. याबरोबरच नवीन तंत्रज्ञानानुसार बी-बियाणे देण्यासाठी, तसेच बोगस बियाणे व खते विक्री करणाऱ्यावर कारवाई करणे, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना हवे ते देण्यासाठी महसूल विभागामार्फत प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांनी सांगली जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि उपक्रम याची माहिती दिली. सातारा जिल्ह्याचे कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत यांनी सातारा व कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. विभागीय कृषी सह संचालक बसवराज बिराजदार यांनी आभार मानले. 0000

विषमुक्त शेतीला चालना देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील -‍ कृषी मंत्री अब्दुल सत्तार

सांगली दि. 3 (जि. मा. का.) : रासायनिक खते, औषधे यांच्या अतिवापरामुळे अनेक राज्यात कॅन्सरसारख्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. याचा गांर्भियाने विचार करण्याची वेळ आता आली असून रासायनिक शेतीचे वाढलेले क्षेत्र व होत असलेले दुष्परिणाम ही चिंतेची आणि चिंतनाची बाब झाली आहे. त्यामुळे 25 लाख हेक्टर जमिनीवर यावर्षी विषमुक्त शेती करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यादृष्टीने राज्यात विषमुक्त शेतीला राज्य शासन चालना देत असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. विजयनगर सांगली येथे कृषी विभागाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या पुढारी ॲग्री पंढरी सिजन ३ प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, पुढारी पब्लीकेशनचे समुह सरव्यवस्थापक अनिल पाटील, कार्यकारी संपादक विजय जाधव, ऑरबिट क्रॉप न्युट्रीयंट्स संचालक दिपक राजमाने, डॉ. रवींद्र आरळी, रॉनिक स्मार्ट कोल्हापूर चे संचालक तानाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. रशिया-युक्रेन युध्दामुळे जागतिक स्तरावर मंदीचे सावट आहे. अशा काळात शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगून कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, शेतकरी आत्महऱ्या महाराष्ट्रात होवू नयेत यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 12 हजार कोटी रूपयांची मदत केली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असणाऱ्या एनडीआरएफच्या निकषामध्ये बदल करण्यात आला आहे. अशावेळी महाराष्ट्रातील गोरगरीब, कोरडवाहू शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि विषमुक्त शेतीबाबत अचूक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारची कृषि प्रदर्शने महत्वपूर्ण ठरतील. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर याचा लाभ घ्यावा. जिल्ह्यात बोगस बी-बियाणे, खते, औषधे येणार नाहीत व शेतकऱ्यंचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही यादृष्टीने कृषी विभागाने दक्षता घ्यावी, असे सांगून कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, सातत्याने हवामानात होत असलेल्या बदलामुळे पिकांवर अचानक येणाऱ्या वेगवेगळ्या रोगांच्या निवारणासाठी कृषि विद्यापीठांनी संशोधन करून शेतकऱ्यांना अचूक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे. पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर क्षेत्र क्षारपड झाले आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. नापिकीची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यात येत असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी कृषि प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या काकडी, मिरची, घेवडा, मका, वटाणा, झेंडू, झुकिनी अशा विविध पिकांच्या प्लॉटसवर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट देवून पहाणी केली, माहिती घेतली. त्याचा बाजारभाव, पिकावर पडणारे रोग याबाबत सविस्तर चर्चा केली. या कार्यक्रमात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष, ऊस आदिंचे चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रदर्शनात 200 पेक्षा अधिक कृषि विषयक स्टॉल्स उभारण्यात आले असून हे प्रदर्शन पाच दिवस चालणार आहे. याचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा, असे आवाहन कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पुढारी पब्लीकेशनचे समुह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी केले. तर आभार कार्यकारी संपादक विजय जाधव यांनी मानले. 000000