मंगळवार, २१ मार्च, २०२३

कृषी महोत्सवात पाककला स्पर्धा संपन्न

सांगली दि.19 (जिमाका) : सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी महोत्सव - 2023 दिनांक १७ ते २१ मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेला असून त्या निमित्ताने विविध चर्चासत्र व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून दिनांक 19 मार्च 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे औचित्य साधून जिल्हास्तरीय पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील शेतकरी महिला, अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी विविध प्रकारच्या पाककृति सादर केल्या. नाचणी, ज्वारी, बाजरी, वरई, राळा, राजगिरा इत्यादी तृणधान्यांपासून बनविलेल्या पदार्थांचा समावेश होता. या पदार्थांमध्ये नाचणीचे आंबील, राजगिरा खीर, बाजरीची खिचडी, नाचणीचा केक, बाजरीचा केक, तृणधान्य कटलेट, ज्वारी बाजरी व नाचणी पासून बनवलेली बिस्किटे, बाजरीच्या खारोड्या, नाचणीचे मोदक, पौष्टिक तृणधान्य थाळी या विशेष स्वादिष्ट पाककृती होत्या. सदर स्पर्धेमध्ये श्रीमती अपर्णा कोडलकर यांच्या पौष्टिक तृणधान्य थाळी ला प्रथम क्रमांक, श्रीमती मीना चौगुले यांनी नाचणी पासून बनवलेल्या मोदक, केक व लाडू यांना द्वितीय क्रमांक तर डॉक्टर वैशाली माने यांनी बनवलेल्या नाचणीचे इडली, हलवा, पुरी व थालीपीठ यांना तृतीय क्रमांक घोषित करण्यात आला. या स्पर्धेसाठी श्री संजीव कोल्हार व संजय वजरीनकर, संचालक एलेंटा ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड, सांगली हे प्रायोजक म्हणून लाभले. सदर स्पर्धेचे परीक्षण राजर्षी शाहू कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय सांगली च्या प्राचार्या डॉक्टर अर्चना शिंदे, प्राध्यापिका अश्विनी कांबळे व प्राध्यापिका अबोली पिंजरकर यांनी केले.अशाप्रकारे अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात जिल्हास्तरीय पाककला स्पर्धा 2023 पार पडल्या. यावेळी माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली श्री.प्रकाश सूर्यवंशी यांनी पौष्टिक तृणधान्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाककला एक उत्तम कला असून ती महिलांशी निगडित असल्याने गाव पातळीपर्यंत प्रसार करण्यासाठी उपयुक्त आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आहारामध्ये तृणधान्यांचा वापर वाढविण्याचे आवाहन यावेळी केले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा