मंगळवार, २१ मार्च, २०२३

सांगली जिल्ह्यात कृषी महोत्सवातील पौष्टिक तृणधान्य दालन केंद्रस्थानी - कृषी उपसंचालक प्रियांका भोसले

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : कृषी विभागाने जिल्हा कृषी महोत्सवात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चा प्रचार आणि प्रसिद्धी व्हावी यासाठी पौष्टिक तृणधान्याचे स्वतंत्र आणि आकर्षक दालन उभे केले होते. पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धीच्या माध्यम म्हणून सेल्फी पॉईंट ठेवला होता. पौष्टिक तृणधान्याचे दालन आणि सेल्फी पॉईंट कृषी महोत्सवाचे आकर्षण ठरले. पौष्टिक तृणधान्याचा प्रचार व प्रसिद्धीसाठी महोत्सवामध्ये पाककला स्पर्धा, सेल्फी पॉइंट, स्वतंत्र दालन, कार्यशाळा इत्यादीचा वापर करुन यश आल्याचे कृषी उपसंचालक प्रियांका भोसले यांनी सांगितले. प्रभारी अधिकारी तथा नाचणी पैदासकार, नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प विभागीय कृषि संशोधन केंद्र शेंडापार्क कोल्हापूर योगेश बन यांनी २१ मार्च २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षाच्या अनुषंघाने पौष्टिक तृणधान्य लागवड, उत्पादन वाढ व प्रक्रिया प्रशिक्षण उपस्थित शेतकऱ्यांना दिले. तसेच आहाराविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आहारतज्ज्ञ डॉ. योगेश माईनकर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष अनुषंगाने पाककला स्पर्धा व वेगवेगळ्या विषयांचे परिसंवाद आयोजित केले होते. या परिसंवादाचे आभार तंत्र सल्लागार श्रीकांत निकम यांनी मानले. यावेळी सांगली जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान व खरीप हंगाम सन 2021 पिक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान स्मार्ट प्रकल्प कोल्हापूर विभागीय नोडल अधिकारी उमेश पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा