मंगळवार, २१ मार्च, २०२३

सांगली जिल्हात कृषी महोत्सवाचा सुगंध दरवळला - प्रकल्प संचालक आत्मा प्रकाश सूर्यवंशी

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्याचा जिल्हा कृषी महोत्सव नेमिनाथनगर सांगली येथे 17 ते 21 मार्च अखेर आयोजित केला होता. या कृषी महोत्सवास सांगली व जिल्ह्यातील दररोज अंदाजे पाच ते सहा हजार शेतकरी, नागरिकांनी व मान्यवरांनी भेट दिली. खाद्यपदार्थ, गृहपयोगी वस्तू, कृषी अवजारे यंत्रसामग्री, धान्य व कृषी निविष्ठा यांची चांगल्या प्रकारे विक्री झाली. कृषी महोत्सवामध्ये सर्वसमावेशक माहिती सर्वदूर सर्वांना मिळाल्याने कृषी महोत्सवाचा सुगंध चांगल्या पद्धतीने दरवळल्याचे दिसून आल्याचे प्रकल्प संचालक आत्मा प्रकाश सूर्यवंशी यांनी सांगितले. कृषी महोत्सवात शासकीय यंत्रणा, कृषी निविष्ठा, आधुनिक मशिनरी, कृषी सिंचन व अवजारे, खाद्य व गृहपयोगी इत्यादींनी आपल्या नावाची नोंदणी करून स्टॉल बुक केले होते. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चा प्रचार आणि प्रसिद्धी व्हावी यासाठी पौष्टिक तृणधान्याचे स्वतंत्र आणि आकर्षक दालन उभा केले होते, तसेच सेल्फी पॉईंट ठेवला होता. पौष्टिक तृणधान्याचे दालन आणि सेल्फी पॉईंट कृषी महोत्सवाचे आकर्षण ठरले. कृषी विभागामार्फत फळ महोत्सव, फुल महोत्सव व धान्य महोत्सव आयोजित केला होता. पाककला स्पर्धा व वेगवेगळ्या विषयांचे परिसंवाद आयोजित केले होते. कृषि महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शेतकरी सन्मान व समारोप सोहळा विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. सांगली जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान श्री उमेश पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी नेमण्यात आलेले सेवा पुरवठादार राजेश शहा रिसोर्सेस सांगली यांचा सत्कारही करण्यात आला. कृषी महोत्सवाच्या आकर्षक मांडणी संदर्भात श्री. उमेश पाटील यांनी सांगली जिल्हा कृषी विभागाचे कौतुक केले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा