मंगळवार, २१ मार्च, २०२३

कृषी महोत्सवानिमित्त स्मार्ट प्रकल्पांतर्गत घेतलेल्या प्रशिक्षणास उदंड प्रतिसाद

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : सांगली जिल्हा कृषी महोत्सवाच्यानिमित्त बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट अंतर्गत घेतलेल्या प्रशिक्षणास उदंड प्रतिसाद मिळाला. नेमिनाथ नगर, कल्पद्रुम मैदान सांगली येथे 17 ते 21 मार्च 2023 अखेर सांगली जिल्हा कृषी महोत्सव आयोजित केला होता. यानिमित्त स्मार्ट प्रकल्पांतर्गत घेतलेल्या प्रशिक्षण प्रसंगी आयोजित कार्यक्रमास स्मार्ट प्रकल्प कोल्हापूर विभागीय नोडल अधिकारी उमेश पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा प्रकाश सूर्यवंशी, प्रकल्प उपसंचालक आत्मा बाळासाहेब लांडगे, कृषी उपसंचालक प्रियंका भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी जत मनोज वेताळ, उपविभागीय कृषी अधिकारी विटा सागर खटकाळे, मयुरा काळे व सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. स्मार्ट प्रकल्प कोल्हापूर विभागीय नोडल अधिकारी उमेश पाटील यांनी दोन सीबीओचे काम सुरू असल्याचे सांगून याच धर्तीवर इतर सीबीओंनी काम करण्याचे आवाहन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांनी सांगली जिल्ह्यामध्ये आजअखेर 26 कंपन्यांना प्राथमिक मान्यता तर 14 कंपन्यांना प्रकल्प मंजुरी मिळाली असल्याचे सांगितले. तसेच 6 कंपन्यांना 4 कोटी 63 लाख अनुदान वितरित झालेले असून त्यांची संपादन प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगितले. समुदाय आधारित संस्थांची स्थापना संस्थात्मक संरचना आणि त्याचे व्यवस्थापन तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे नियामक अनुपालन या विषयी कोल्हापूर आणि पुणे विभागाचे कंपनी सेक्रेटरी अमित पाटील यांनी माहिती दिली. कृषी विकास प्रतिष्ठान बारामती चे वैभव पाटील यांनी नाबसंरक्षण आणि केंद्र शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प 10000 एफपीओ बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. एचडीएफसी बँक शाखा प्रबंधक कुलभूषण यादव यांनी मूल्य साखळीचे तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या बँकेबल सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करणे याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या सुरुवातीस स्मार्ट प्रकल्पाचे उपसंचालक भगवान माने यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण करून साध्या सोप्या भाषेत त्यातील विविध उपप्रकल्पांची माहिती दिली व प्रत्यक्ष काम करताना आलेल्या अनुभवाचे कथन केले. कृषी महोत्सवाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील स्मार्ट प्रकल्पातील समुदाय आधारित संस्था (cbo) व कृषी विभागाचे सांगली जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. स्मार्ट प्रकल्पाची सविस्तर तोंड ओळख व्हावी आणि ती प्रत्यक्ष राबवताना येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण व्हावे या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली होती. सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी वाळवा संजय खारगे यांनी केले. आभार मिलिंद निंबाळकर यांनी मानले. प्रशिक्षणास सांगली जिल्ह्यातील समुदाय आधारित संस्थांचे प्रतिनिधी, सांगली जिल्ह्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी, शेतकरी आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी विचारलेल्या सर्व शंकांचे समर्पक उत्तरे देऊन निरसन केले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा