शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

केंद्रीय पथकाने ब्रम्हनाळ, भिलवडी परिसराला भेट देवून नुकसानीची केली पाहणी

सांगली, दि. 30 (जिमाका) :   सांगली शहर व जिल्ह्यातील 104 गावांना महापूराचा जबर फटका बसला आहे. व्यापार, शेती, घरे, पशुधन यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक दोन दिवस जिल्ह्यात दाखल होते. आज या पथकाने ब्रम्हनाळ, भिलवडी, भुवनेश्वरवाडी या परिसराला भेट देवून पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला.
डॉ. व्ही. थिरुपुगाज, सहसचिव (पी ॲण्ड पी) नवी दिल्ली यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने या गावांची पाहणी केली. त्यांच्या समवेत संजय जयस्वाल अधिक्षक अभियंता, नवी मुंबई  हे होते. या पथकासमवेत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. व्ही. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखालील पथक ब्रम्हनाळ येथे दाखल झाले. त्यांनी तेथील दलित वस्ती, कुटुंब कल्याण केंद्र, पोस्ट ऑफिस, अंगणवाडी या ठिकाणी भेट दिली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ब्रम्हनाळ दुर्घटना कशी घडली याबाबत जाणून घेतले. तसेच तेथील शेतकऱ्यांचे शेतीचे किती नुकसान झाले आहे, पशुधनाचे किती नुकसान झाले आहे याचीही माहिती घेतली. यावेळी गावकऱ्यांनी भिलवडी, ब्रम्हनाळ, खटाव या भागात प्रामुख्याने ऊसाचे पिक असून त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे 240 हून अधिक पशुधन वाहून गेले आहे असे सांगून मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणारा मोठा पूल व्हावा, अशी विनंती केली. तसेच गावचे पुनर्वसन व्हावे, अशीही मागणी केली. यावेळी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने पूरपश्चात उपाययोजना, मदतकार्य अत्यंत उत्तमरित्या राबविल्याचे नमूद केले.
 या पथकाने भिलवडी येथे पडझड झालेली घरे, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, जनावरांचा गोठा आदिंची पाहणी केली. तर भुवनेश्वरवाडी येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

हरिपूर येथे केंद्रीय पथकाची भेट
तसेच हरिपूर येथे केंद्रीय पथकातील आर. पी. सिंग संचालक, कृषी मंत्रालय, नवी दिल्ली व व्ही. पी. राजवेदी, अवर सचिव, ग्रामविकास विभाग, नवी दिल्ली या सदस्यांनी भेट दिली. या ठिकाणी पडझड झालेली घरे, हळदीचे पेव यांची पाहणी करून केळी, भुईमुग, ऊस आदि नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तसेच मयत झालेल्या जनावरांच्या गोठ्यास भेट दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार शरद पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
00000








कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान

सांगली, दि. 30 (जि. मा. का.) :  विविध आंदोलने, सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अन्वये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पुढीलप्रमाणे अधिकार प्रदान केले आहेत.      
यानुसार सडकांवरील व सडकेने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व त्यांची वर्तवणुक कशी असावी या विषयी निर्देश देणे, मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेच्या आसपास, उपासनेच्यावेळी कोणत्याही सडकेवरून किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा वेळी अडथळा होवू न देणे, मिरवणूका ज्या मार्गाने जाव्यात अथवा जावू नयेत, त्यांची वेळ व मार्ग ठरवून देणे, सार्वजनिक सडकांवर व सडकेमध्ये घाटात किंवा घाटावर मार्ग असल्यास किंवा धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक लोकांच्या स्नानाच्या ठिकाणी, जागेमध्ये, जत्रा, देवालय, आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जाण्या येणाच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखणे, कोणत्याही सडकेत किंवा सडकेजवळ, सार्वजनिक जागेत वाद्य वाजविणे किंवा ढोल, ताशे, इतर वाद्ये वाजविणे यांचे नियमन करणे, कोणत्याही सार्वजनिक जागी किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक उपहाराच्या जागेत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याचे नियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, सक्षम प्राधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 33, 36, 37 ते 40, 42, 43 अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या अधिन असलेल्या व त्यास पुष्ठी देणारे योग्य ते आदेश काढणे, असे अधिकार प्रदान केले आहेत. हा आदेश दिनांक 31 ऑगस्ट 2019 रोजीच्या 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.
या दरम्यान वरील पोलीस ठाणे स्थलसिमा हद्दीत कोणालाही मोर्चे, निदर्शने, मिरवणुका, सभा इत्यादी आयोजित करावयाच्या असल्यास त्यांनी संबधीत पोलीस ठाणे अधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून वेळ, मार्ग, घोषणा, सभेचे ठिकाण इत्यादी बाबी ठरवून घेवून परवानगी घेतली पाहिजे. या आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 134 प्रमाणे कारवाईस पात्र राहील, असे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.


00000

गणेशोत्सवानिमित्त सांगली व मिरज शहरात मनाई आदेश जारी

सांगली, दि. 30 (जि. मा. का.) :  सांगली जिल्ह्यात दिनांक 2 ते 12 सप्टेंबर 2019 अखेर गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात देखावे व गणेश विसर्जन मिरवणूका पाहण्यासाठी सांगली व मिरज शहरात बहुसंख्य लहान मुले, स्त्रिया, पुरुष गर्दी करीत असतात. नागरीकांना व्यवस्थीत देखावे व विसर्जन मिरवणूका पाहता याव्यात तसेच कोणतेही वाहन गर्दीत घुसुन नागरीकांच्या जिवीतास धोका पोहोचू नये याकरिता सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 34 अन्वये सांगली व मिरज शहरातील खालील मार्गावर मिरवणुकीचे वाहने, पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड, महानगरपालिकेची स्वच्छता करणारी वाहने या वाहनांखेरीज सर्व वाहनांना मनाई आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार सांगली शहरात  दिनांक 6, 8 व 10 सप्टेंबर 2019 रोजी  दुपारी 2 ते रात्री 12 या वेळेत तसेच दिनांक 12 सप्टेंबर 2019 रोजीेचे दुपारी 2 वाजल्यापासून ते दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजीचे रात्री 12 या वेळेत, टिळक चौक ते गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता, जोग ज्वेलर्स ते सराफ कट्टयाकडे जाणारा रस्ता, गारमेंट सेंटर ते मारुती चौकाकडे जाणारा रस्ता व बालाजी चौकाकडे जाणारा रस्ता, मैत्रिण कॉर्नर ते करमरकर चौकाकडे जाणारा रस्ता, सांगली शहर पोलीस ठाणे ते करमरकर चौकाकडे जाणारा रस्ता, राजवाडा चौक ते पटेल चौकाकडे जाणारा रस्ता, स्टेशन चौक ते टेलीफोन ऑफिसकडे जाणारा रस्ता, जुना बुधगांव रोड ते बायपास कडून वखारभागाकडे जाणारा रस्ता, जामवाडी कॉर्नर ते पटेल चौकाकडे जाणारा रस्ता, कर्नाळ पोलीस चौकी ते तानाजी चौकाकडे जाणारा रस्ता, गवळी गल्ली ते झांशी चौकाकडे जाणारा रस्ता, मगरमच्छ कॉलनी (क्रॉस रोड) ते सराफ कट्टयाकडे जाणारा रस्ता, वसंतदादा समाधी स्थळ (क्रॉस रोड) ते गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता, नवसंदेश कार्यालय ते आनंद टॉकीजकडे जाणारा रस्ता, कामगार भवन ते आमराईकडे जाणारा रस्ता, देशपांडे बिल्डींग (वखारभाग) ते पटेल चौकाकडे जाणारा रस्ता व वखारभाग ते गवळी गल्लीकडून हायस्कूल रोड व गणपती पेठेस मिळणारे सर्व रस्ते या मार्गावर उपरोक्त कालावधीसाठी मनाई आदेश लागू राहील.
तर मिरज शहरात दिनांक 10 सप्टेंबर 2019 रोजीचे 9 वाजल्यापासून ते 11 सप्टेंबर 2019 रोजीचे 8 वाजेपर्यंत व दिनांक 12 सप्टेंबर 2019 रोजीचे 8 वाजल्यापासून ते  13 सप्टेंबर 2019 रोजीचे 15.00 वाजेपर्यंत, श्रीकांत चौक ते श्रीकांत चौकात येणारे रस्ते, स्टेशन चौक ते मिरासो दर्ग्याकडे जाणारा रस्ता, हिरा हॉटेल ते मिरज शहर पोलीस ठाणेकडून जाणारा रस्ता, फुलारी कॉर्नर ते फुलारी कॉर्नरकडे येणारे सर्व रस्ते, बॉम्बे बेकरी ते बॉम्बे बेकरीकडे येणारे सर्व रस्ते, किसान चौक ते श्रीेकांत चौक व पोलीस ठाणे कडे जाणारा रस्ता, दत्त चौक ते श्रीकांत चौकाकडे जाणारा रस्ता, जवाहर चौक ते किसान चौकाकडे जाणारा रस्ता, भोसले चौक ते पाटील हौदाकडून भोसले चौकोकडे जाणारा रस्ता, झारी मस्जिद कॉर्नर ते बॉम्बे बेकरीकडे जाणारा रस्ता व श्रीकांत चौक ते गणेश तलाव या मार्गावर येणारे सर्व रस्ते या मार्गावर उपरोक्त कालावधीसाठी मनाई आदेश लागू राहील.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
पर्यायी वाहतूक, गणपती विसर्जन मार्ग व पार्किंग व्यवस्था
सांगली शहर येथील पर्यायी वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे - मिरजकडून येणारी व कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी - पुष्पराज चौक-सिव्हील हॉस्पीटल-झुलेलाल चौक-पत्रकार नगर कॉर्नर-आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील), इस्लामपूरकडून येणारी व कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी - इस्लामपूर टोलनाका-बायपास-कॉलेज कॉर्नर-आपटा चौकी-पुष्पराज चौक-सिव्हील हॉस्पीटल - झुलेलाल चौक - पत्रकारनगर कॉर्नर - आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील). तासगाव, विटा कडून सांगलीकडे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी - कॉलेज कॉर्नर-आपटा चौकी - पुष्पराज चौक - सिव्हील हॉस्पीटल - झुलेलाल चौक - पत्रकार नगर कॉर्नर - आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील).
सांगली शहर गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग - विश्रामबाग चौकाकडून येणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - विश्रामबाग - पुष्पराज चौक - राममंदिर - काँग्रेस भवन - कामगार भवन - स्टेशन चौक - राजवाडा चौक - पटेल चौक - तानाजी चौक - गणपती मंदीर - टिळक चौक - कृष्णा घाट. रिसाला रोडकडून येणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - रिसाला रोड - शिवाजी पुतळा - मारूती चौक - गारमेंट सेंटर चौक - बालाजी चौक येथून वेगवेगळे मार्ग, बालाजी चौक - करमरकर चौक - राजवाडा चौक - पटेल चौक - तानाजी चौक - गणपती मंदिर - टिळक चौक - कृष्णा घाट, बालाजी चौक - झांशी चौक - गणपती मंदिर - टिळक चौक - कृष्णा घाट. टिंबर एरियाकडून येणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - कॉलेज कॉर्नर - सांगली हायस्कूल - पुष्पराज चौक - पटेल चौक - तानाजी चौक - गणपती मंदिर - टिळक चौक - कृष्णा घाट. गणपती विसर्जन झालेल्या मंडळाचा परतीचा मार्ग - टिळक चौक - हरभट रोड - गारमेंट सेंटर चौक मार्गे.
सांगली शहर पार्किंग व्यवस्था - जनावर बाजार (टिळक मार्ग) - इस्लामपूर व सांगलीकडून येणाऱ्या वाहनांच्यासाठी, जूनी जयश्री टॉकीजच्या मागे (हरभट रोड) - चारचाकी वाहनांसाठी (पे पार्कींग), शिवनेरी हॉटेलच्या पाठीमागे (भावे नाट्यगृहालगत) - दूचाकी व चारचाकी वाहनांसाठी, वैरण बाजार (तरूण भारत स्टेडियम समोर) - कोल्हापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी, राजवाडा पटांगण - पलूस नांद्रेकडून येणाऱ्या वाहनांसाठी, कोर्ट आवार - दूचाकी वाहनांसाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम - तासगाव किंवा मिरजकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पीटल - तासगावकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, श्री छत्रपती शिवाजी स्टेडीयम - दूचाकी पार्किंगसाठी, सांगली हायस्कूल सांगली (आमराईजवळ) -टिंबर एरियाकडून येणाऱ्या दूचाकी वाहनांसाठी, कर्नाळ पोलीस चौकीच्या मागील पटांगण (जामवाडी) - कर्नाळकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, पटेल चौक क्रीडा मंडळ - कर्नाळकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी.
मिरज येथील पर्यायी वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे - सोलापूरकडून म्हैशाळकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी-तासगाव फाटा-सुभाषनगर-विजयनगर मार्गे-म्हैशाळ/कागवाड, म्हैशाळ व कर्नाटककडून पंढरपूर सोलापूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी - म्हैशाळ- विजयनगर - सुभाषनगर - तासगाव फाटा - पंढरपूर, सोलापूर. सोलापूर, पंढरपूरहून मिरज मार्गे कोल्हापूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी - पंढरपूर रोड, गांधी चौक, वंटमुरे कॉर्नर, विजयनगर, विश्रामबाग, धामणी, अंकली, कोल्हापूरकडे जातील. कोल्हापूरहून पंढरपूर, सोलापूरकडे जाणारी वाहने - अंकली फाटा, धामणी, विश्रामबाग, विजयनगर, वंटमुरे कॉर्नर, गांधी चौक, पंढरपूर, सोलापूरकडे जातील. कर्नाटकातून म्हैशाळ मार्गे कोल्हापूरला जाणारी वाहने - म्हैशाळ, शास्त्री चौक, महात्मा फुले चौक, रेल्वे ब्रीज मार्गे कोल्हापूरकडे जातील. कोल्हापूरकडून म्हैशाळ मार्गे कर्नाटकात जाणारी वाहने - अंकली फाटा, रेल्वे ब्रीज, महात्मा फुले चौक, शास्त्री चौक, म्हैशाळ मार्गे कर्नाटकात जातील. कृष्णाघाट मार्गे शिरोळ तालुक्याकडेजाणारी वाहने - शास्त्री चौक, महात्मा फुले चौक, रेल्वे ब्रीज, अंकली फाटा, उदगाव मार्गे शिरोळ कोल्हापूरकडेजातील. कृष्णा घाट मार्गे मिरजकडे येणारी वाहने कृष्णा नदीच्या पलीकडून उदगाव, अंकली मार्गे मिरजकडे जातील. सुभाषनगरकडून मिरजकडेयेणारी वाहने सुभाषनगर, गाडवे चौक, वखार भाग, पंचशील चौक मार्गे जवाहर चौक, शास्त्री चौक, मार्गाचा वापर करतील. सुभाषनगरकडून सांगली, एमआयडीसीकडे जाणारी वाहने दिंडीवेस, आळतेकर हॉल, शिंदेबंगला, कर्मवीर भाऊराव चौक, बसाप्पा हलवाई कॉर्नर, मिशन हॉस्पीटलच्या मार्गे सांगलीकडेजातील.
मिरज शहर गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग - गणेश तलावामध्ये विसर्जन होणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - पंढरपूर रोडकडून येणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - गांधी चौक - शिवाजी रोड -स्टेशन चौक - मिरासो दर्गा - किसान चौक - श्रीकांत चौक - नागोबा कट्टा - गणेश तलाव. सुभाषनगर/मालगावकडून येणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - सुभाषनगर - मालगाव रोड - दिंडीवेस - विजापूर वेस - श्रीकांत चौक - नागोबा कट्टा - गणेश तलाव. हीरा हॉटेलकडून येणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - गांधी चौक - शिवाजी रोड -  हीरा हॉटेल - गुरूवार पेठ -  किसान चौक - श्रीकांत चौक - नागोबा कट्टा - गणेश तलाव. कृष्णा घाट मिरज येथे विसर्जन होणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - गांधी चौक -शिवाजी रोड - स्टेशन चौक - शास्त्री चौक - नदीवेस - कृष्णा घाट.
मिरज शहर पार्किंग व्यवस्था - छ. शिवाजी स्टेडीयम - कोल्हापूर, सांगली कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, महात्मा फुले चौक - कर्नाटक, म्हैशाळकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. न्यू इंग्लीश स्कूल - कवठेमहांकाळ, मालगाव, सुभाषनगरकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, मिरज हायस्कूल - आरग, बेडगकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, एमआयडीसी हायस्कूल - टाकळी, बोलवाड, एरंडोली कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, साठे पुतळ्याच्या पाठीमागील बाजूस - वाहनांची गर्दी झाल्यास पर्यायी पार्किंग व्यवस्था.
00000




पूरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने केली पाहणी

सांगली, दि. 29 (जिमाका) :   पूरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने आज वाळवा तालुक्यातील वाळवा, शिरगाव , मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे भेट देवून प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली.
डॉ. व्ही. थिरुपुगाज, सहसचिव (पी ॲण्ड पी) नवी दिल्ली यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने या गावांची पाहणी केली. त्यांचे समवेत आर. पी. सिंग, संचालक, कृषी मंत्रालय, नवी दिल्ली, संजय जयस्वाल अधिक्षक अभियंता, नवी मुंबई व व्ही. पी. राजवेदी, अवर सचिव, ग्रामविकास विभाग, नवी दिल्ली हे होते. या पथकासमवेत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी  अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय पथकाने पूरबाधीत गावातील ऊस, केळी, द्राक्ष, सोयाबिन, आदी पिकांची, पडझड झालेल्या घरांची, पाणी किती वाढले होते याची पाहणी करुन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पिकांची पहाणी केली.  सानुग्रह अनुदान मिळाले का, स्थलांतर कसे झाले आदी बाबतही त्यांनी विचारणा केली.
 सांगली येथे  रेसिडेंसी क्लब येथे अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात पूरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्राचे पंचनामे अंतीम टप्प्यात असल्याचे सांगितले. तसेच शाळा, रस्ते, पशुधन नुकसानीबाबत माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानीची माहिती उद्या जिल्हाधिकारी दौलत देसाई देणार आहेत.
या बैठकीला महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, कोल्हापूरचे मल्लीनाथ कलशेट्टी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, सार्वजनिक बांधकाम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
0000





गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९

52 हजाराहून अधिक पशुधनावर लसीकरण 26 हजाराहून अधिक पशुधनावर उपचार

सांगली, दि. 29 (जि.मा.का) : जिल्ह्यात पूरबाधित कुटूंबातील आजअखेर 52 हजार 185 पशुधनावर लसीकरण व 27 हजार 43 पशुधनावर उपचार करण्यात आले आहेत. तर 13 हजार 883 जनावरांच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्यात येवून 93 लाख 71 हजार 200 एवढे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
बाधित कुटुंबातील गाय व म्हैस वर्गीय 379 जनावरे, मेंढी, बकरी, डुक्कर 119 जनावरे, उंट, घोडा व बैल वर्गीय 7 जनावरे, वासरू, गाढव, शिंगरू, खेचर वर्गीय 131 जनावरे, कोंबड्या व इतर पक्षी 62 हजार 145 अशा पशुधनाचे नुकसान झाले आहे. नुकसानीची अंदाजित रक्कम 1 कोटी 42 लाख 52 हजार 400 इतकी आहे.
जिल्हाभरातील 290 दुधाळ जनावरांचे 74 लाख 31 हजार, ओढकाम करणाऱ्या 112 जनावरांचे 18 लाख 30 हजार व 13 हजार 481 कोंबड्या व कुक्कुट वर्गीय प्राण्यांचे 1 लाख 10 हजार 200 असे आतापर्यंत एकूण 13 हजार 883 जनावरांच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्यात येवून 93 लाख 71 हजार 200 एवढे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
पूरबाधित जनावरांसाठी स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याकडून 2 हजार 274 मे. टन चारा प्राप्त झाला आहे. सांगली जिल्हाकरिता 208.75 मे. टन पशुखाद्य प्राप्त झाले असून सदरचा चारा व पशुखाद्य आवश्यकतेप्रमाणे बाधित गावांमध्ये वाटप करण्यात आले आहे.
000000


पूरबाधित कुटूंबाना 50 कोटीहून अधिक सानुग्रह अनुदान वितरीत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

- 26 हजार 594 घरांची पडझड
- जीवनावश्यक वस्तूंचे 23 हजार 351 किट वितरीत
-  पूरबाधित 69 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप

सांगली, दि. 29 (जि.मा.का) : सांगली जिल्ह्यात पूरपश्चात उपाययोजना प्रशासन गतीने राबवित आहे. जिल्ह्यातील 104 गावातील ग्रामीण भागातील 45 हजार 195 कुटुंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटुंबे बाधीत झाली होती. त्यापैकी ग्रामीण भागातील 43 हजार 351 व शहरी भागातील 36 हजार 63 कुटूंबांना 39 कोटी 70 लाख 70 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील 19 हजार 109 व शहरी भागातील 1280 कुटुंबाना 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 10 कोटी 83 लाख 45 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित पंचनामे व अनुदान वाटप सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

26 हजार 594 घरांची पडझड
पूरामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत 8 हजार 898 घरांची पूर्णत: पडझड झाली आहे तर 17 हजार 696 घरांची अंशत: पडझड झाली आहे. शिवाय 958 गोठ्यांना पुराची झळ बसली असून 146 झोपड्या पडझड / नष्ट झाल्या आहेत. या सर्वांचे पंचनामे सुरू असून शहरी भागातही मालमत्तांच्या नुकसानीचे पंचनामे, वाणिज्यिक पंचनामे सुरू झाले आहेत. पूरबाधित वाणिज्य मिळकतीची नुकसान झालेली 88 गावे बाधित असून 16 हजार 162 मिळकती आहेत. त्यापैकी 11 हजार 329 पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे गतीने सुरू आहेत.

पूरबाधित 69 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप
दिनांक 28 ऑगस्ट अखेर 69 हजार 971 कुटुंबांना एकूण 6997.1 क्विंटल गहू व 6997.1 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच एकूण 51 हजार 973 इतक्या बाधित कुटूबांना 5 लिटर प्रमाणे 2 लाख 59 हजार 865 लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे.

50319.23 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा
पुरामुळे जिल्ह्यातील एकूण 249 गावांतील 1 लाख 20 हजार 231 बाधित शेतकऱ्यांचे नजरअंदाजे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी 97 हजार 701 शेतकऱ्यांच्या 50319.23 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. उर्वरित क्षेत्राचा पंचनामा गतीने सुरू आहे.

97 पाणीपुरवठा योजना सुरू
जिल्ह्यातील 125 गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी 98 पाणीपुरवठा योजना पूरपरिस्थितीमुळे बंद होत्या. त्यापैकी सध्या 97 पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाभरात 19 गावांसाठी एकूण 21 टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 13 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे 23 हजार 351 किट वितरीत
राज्यभरातून जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या विविध मदतीचे वितरण महानगरपालिका व पूरबाधित तालुक्यांना करण्यात आले आहे. आतापर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे 23 हजार 351 किटचे वितरण करण्यात आले आहे. अजूनही किट बनविण्याचे काम सुरू असून जसजसे किट तयार होतील तसे त्याचे वितरण करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील 329 एटीएम पैकी 24 एटीएम कार्यरत नसून कार्यरत असलेल्या एटीएमची संख्या 305 आहे. त्यामध्ये उपलब्ध निधी अंदाजे 56.37 कोटी इतका आहे.
000000






बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

परवडणाऱ्या घरांचा कर दर एक टक्का झाल्याने घरे स्वस्त -सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 28: महानगरातील 60 चौ.मी चटई क्षेत्र असणाऱ्या घरांसाठी आणि महानगराव्यतिरिक्त इतर शहरे आणि गावांमधील 90 चौ.मी चटई क्षेत्राच्या घरांसाठी जीएसटीचा दर 8 टक्क्यांवरून एक टक्का करण्यात आल्याने अल्प उत्पन्न गटातील लोकांना हक्काचे घर कमी किंमतीत मिळणे शक्य झाले असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
वस्तू आणि सेवा कर परिषदेने गृहनिर्माण क्षेत्रावरचा कराचा भार कमी केल्याने सर्वसामान्य माणसाचे हक्काचे घर असण्याचे स्वप्नं प्रत्यक्षात येण्यास मदत झाली आहे. गृहनिर्माण क्षेत्रामध्ये जीएसटी आधी वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर व्हॅट आणि सेवाकर आकारला जात असे. वस्तू आणि सेवा कर अस्तित्वात आल्यानंतर या क्षेत्रासाठी पूर्वीच्या करांचा एकत्रित भार घेऊन नवीन दर निश्चित करण्यात आला होता. परंतु सर्वसामान्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्नं आणि या क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन गृहनिर्माण क्षेत्रावरील कराचा बोजा कमी करण्यात आला.
गृहनिर्माण क्षेत्रासाठी कराचा बोजा कमी करण्याचा शासनाने वस्तू आणि सेवा कर परिषदेने प्रयत्न केला आहे. याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे, असेही अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.
परवडणाऱ्या घरांव्यतिरिक्त बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील कराचा दर 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला. त्यामुळे ग्राहकांना घर खरेदीसाठी कमी किंमत मोजावी  लागेल. सरकारच्या या निर्णयामुळे घर खरेदी स्वस्त झाली असून या क्षेत्राच्या वाढीसाठी चालना मिळाली  असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
निवासी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी
निवासी सोसायटींना पूर्वी 5 हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक देखभाल शुल्क (मेंटेनन्स) आकारल्यास वस्तू आणि सेवा कर द्यावा लागत असे. आता नवीन बदलामुळे 7500 रुपये किंवा त्यापेक्षा कमी मासिक देखभाल शुल्क असलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना वस्तु आणि सेवाकर माफ करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जमीन मालकाने टीडीआर, एफएसआय किंवा लाँग टर्म लिज द्वारे  संबंधित हक्क हस्तांतरीत करून या जमीनीवर बांधण्यात आलेली घरे जर बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी विक्री करून त्यावरील कर भरला असेल तर टीडीआर, एफएसआय अथवा दीर्घकालीन भाडे करारांवर वस्तु आणि सेवा कर माफ करण्यात आला आहे. त्यामुळे ही घरांच्या किंमती कमी होण्यास मदत होत असल्याचे वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

0000