शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

जिल्ह्यात 30 कोटी 17 लाखाहून अधिक सानुग्रह अनुदान वितरीत

सांगली, दि. 23 (जि.मा.का) : जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे 22 ऑगस्ट अखेर 30 कोटी 17 लाख 80 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. पुरबाधित कुटुंबांना तातडीची मदत म्हणून प्रत्येक कुटूंबास 5 हजार रूपये रोख रक्कम देण्यात येत असून उर्वरित रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्ह्यातील 104 गावातील ग्रामीण भागातील 45 हजार 195 कुटूंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटूंबे बाधित झाली होती. त्यापैकी ग्रामीण भागातील 39 हजार 913 व शहरी भागातील 20 हजार 443 कुटूंबांना 5 हजार रूपये या प्रमाणे रोखीने रक्कम वितरीत करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील 2 हजार 3 कुटुंबाना 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 1 कोटी 15 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित पंचनामे व अनुदान वाटप सुरू आहे. पूरबाधित सर्व गावांमध्ये वाटप करण्यात येत असून त्याकामी मदत वाटपाचे काम सर्व गावात युध्दपातळीवर सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यासह इतर तालुक्यातून व जिल्ह्यातूनही अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा