सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

सांगलीकरांच्या मदतीसाठी सरसावले कौशल्य विकासाचे हात

सांगली (जि.मा.का) दि. 19 : सांगली जिल्ह्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटावर मात करण्याचे बळ बाधित कुटुंबांना मिळावे आणि त्यामध्ये आपला खारीचा का होईना पण वाटा असावा असे खरेतर प्रत्येकाला वाटते. परंतु ती संधी प्रत्येकालाच मिळते असे नाही, कुणी आर्थिक स्वरूपात, कुणी वस्तू स्वरूपात मदत करत आहे. मात्र सोबतच पूर स्थिती निवळल्या नंतर जी बाधित कुटुंबे आपल्या घरी राहायला जात आहेत त्यांच्या प्राथमिक गरजा म्हणजे सुरळीत आणि सुरक्षित वीज पुरवठा आणि कौशल्याची इतर अनुषंगिक कामे. जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खाजगी आयटीआय, एमसीव्हीसी आणि टेक्निकल हायस्कूलचे प्रशिक्षणार्थी तज्ञ निदेशकांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे मोफत करून देत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले जात आहे.
चार पूरग्रस्त तालुक्यातील एकूण 105 गावे त्यातील 23 हजार 976 कुटुंबे यांना भेट देवून त्यांची इलेक्ट्रिक तपासणी, दुरुस्ती, नळजोडण्या, किरकोळ सुतारकाम तसेच वेल्डिंग, आणि फ्रीज दुरुस्ती अशी कामे या माध्यमातून केली जात आहेत. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील एकूण 10 शासकीय संस्था, आणि 15 खाजगी संस्था अशा एकूण 25 संस्थांमधून साधारणतः 6 ते 7 मुलांची एक टीम त्यात टीम प्रमुख म्हणून निदेशक  अशा एकूण 90 टीम्स बनविल्या आहेत, त्याचसोबत आयटीआय सांगली येथून आतापर्यंत दूरध्वनी वर घेतलेल्या 110 तक्रारी निवारण करून, 10 इलेक्ट्रिक मोटारी दुरूस्त करून दिल्या गेल्या आहेत. अशी माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यतिन पारगांवकर यांनी दिली.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा