शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

केंद्रीय पथकाने ब्रम्हनाळ, भिलवडी परिसराला भेट देवून नुकसानीची केली पाहणी

सांगली, दि. 30 (जिमाका) :   सांगली शहर व जिल्ह्यातील 104 गावांना महापूराचा जबर फटका बसला आहे. व्यापार, शेती, घरे, पशुधन यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक दोन दिवस जिल्ह्यात दाखल होते. आज या पथकाने ब्रम्हनाळ, भिलवडी, भुवनेश्वरवाडी या परिसराला भेट देवून पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला.
डॉ. व्ही. थिरुपुगाज, सहसचिव (पी ॲण्ड पी) नवी दिल्ली यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने या गावांची पाहणी केली. त्यांच्या समवेत संजय जयस्वाल अधिक्षक अभियंता, नवी मुंबई  हे होते. या पथकासमवेत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. व्ही. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखालील पथक ब्रम्हनाळ येथे दाखल झाले. त्यांनी तेथील दलित वस्ती, कुटुंब कल्याण केंद्र, पोस्ट ऑफिस, अंगणवाडी या ठिकाणी भेट दिली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ब्रम्हनाळ दुर्घटना कशी घडली याबाबत जाणून घेतले. तसेच तेथील शेतकऱ्यांचे शेतीचे किती नुकसान झाले आहे, पशुधनाचे किती नुकसान झाले आहे याचीही माहिती घेतली. यावेळी गावकऱ्यांनी भिलवडी, ब्रम्हनाळ, खटाव या भागात प्रामुख्याने ऊसाचे पिक असून त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे 240 हून अधिक पशुधन वाहून गेले आहे असे सांगून मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणारा मोठा पूल व्हावा, अशी विनंती केली. तसेच गावचे पुनर्वसन व्हावे, अशीही मागणी केली. यावेळी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने पूरपश्चात उपाययोजना, मदतकार्य अत्यंत उत्तमरित्या राबविल्याचे नमूद केले.
 या पथकाने भिलवडी येथे पडझड झालेली घरे, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, जनावरांचा गोठा आदिंची पाहणी केली. तर भुवनेश्वरवाडी येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

हरिपूर येथे केंद्रीय पथकाची भेट
तसेच हरिपूर येथे केंद्रीय पथकातील आर. पी. सिंग संचालक, कृषी मंत्रालय, नवी दिल्ली व व्ही. पी. राजवेदी, अवर सचिव, ग्रामविकास विभाग, नवी दिल्ली या सदस्यांनी भेट दिली. या ठिकाणी पडझड झालेली घरे, हळदीचे पेव यांची पाहणी करून केळी, भुईमुग, ऊस आदि नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तसेच मयत झालेल्या जनावरांच्या गोठ्यास भेट दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार शरद पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
00000








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा