सोमवार, २६ ऑगस्ट, २०१९

ध्वनी प्रदूषण टाळा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा - पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा

सांगली, दि. 26, (जि.मा.का.) : मोहरम दिनांक 1 ते 10 सप्टेंबर व गणेश उत्सव दिनांक 2 ते 12 सप्टेंबर या कालावधीत हे सण व उत्सव साजरे होणार आहेत. सण व उत्सव साजरे करताना ध्वनी प्रदूषणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी ध्वनी प्रदुषण नियमांची कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केले आहे.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, सण, उत्सव साजरा करताना मिरवणुकांमध्ये व अन्य कार्यक्रमा दरम्यान डॉल्बी या ध्वनीक्षेपक वाद्यवृंदाचा वापर केला जातो. डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे सामान्य जनतेस विशेषत: वयोवृध्द व्यक्ती, आजारी व्यक्ती, लहान मुले यांना त्रास सहन करावा लागतो. सर्वसाधारणत: डॉल्बीच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण  (विनियमन आणि नियंत्रण) नियम 2000 मधील डेसीबल मर्यादेचे अनेकवेळा उल्लंघन होताना दिसून येते.
ध्वनी प्रदूषणाचा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम होतो. शारीरिक व मानसिक ताण वाढतो, मनुष्य चिडचिडा आणि आक्रमक होतो, विस्मृती, गंभीर नैराश्य, निद्रानाश, कर्णबधिरता, रक्तदाब वाढतो, गर्भवती स्त्रियांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यासह अनेक गंभीर बाबींना आमंत्रण मिळते.
महाराष्ट्र शासन, पर्यावरण मंत्रालय, शासन निर्णय दिनांक 16 ऑगस्ट 2000 अन्वये  ध्वनीवर्धक वापरण्यावर विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या 3(1) व 4(1) अन्वये सभोवतालच्या हवेच्या दर्जाची ध्वनीची (प्रदुषणाची) मानके (प्रमाण) अनुक्रमे क्षेत्राचा प्रवर्ग, क्षेत्राची/झोनची वर्गवारी, डेसीबल्स (ए) एलइक्यू मधील मर्यादा पुढीलप्रमाणे आहे. अ प्रवर्ग - औद्योगिक क्षेत्र, दिवसा 75, रात्री 70, ब प्रवर्ग - वाणिज्यिक क्षेत्र, दिवसा 65, रात्री 55, क प्रवर्ग - निवासी क्षेत्र, दिवसा 55, रात्री 45, ड प्रवर्ग - शांतता झोन, दिवसा 50, रात्री 40. (दिवसा म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत, रात्री म्हणजे रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत)
शांतता झोनमध्ये रूग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये, धार्मिक ठिकाणे किंवा सक्षम प्राधिकरणाने अशी क्षेत्रे म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही क्षेत्रे यांच्या सभोवतालच्या 100 मीटर पर्यंतच्या क्षेत्राचा समावेश असलेली क्षेत्रे. या अधिनियमाच्या तरतूदी आणि नियम, आदेश आणि निर्देश यांच्या उल्लंघनाबाबत 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासची किंवा 1 लाख रूपये पर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा या दोन्ही शिक्षा, या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषणाच्या उल्लंघनाबाबत नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्ष सांगली दूरध्वनी क्रमांक 100 व व्हॉटसअप क्रमांक 7875714883 वर माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा