मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

साधेपणाने व मांगल्याने उत्सव साजरे करून स्वयंशिस्त पाळा
सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : पर्यावरणातील बदलाचा फटका किती मोठ्या प्रमाणात बसतो याचा अनुभव आपण नुकताच घेतला आहे. त्यातून बोध घेवून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा. महापूराच्या पार्श्वभूमीवर उंच उंच कमानी, रोषणाई, देखावे यांना फाटा देवून उत्सव साधेपणाने व मांगल्याने साजरे करून स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सव व मोहरम 2019 च्या नियोजनाबाबत कृष्णा मॅरेज हॉल पोलीस मुख्यालय सांगली येथे शांतता समिती सदस्य  व विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी संदिपसिंह गिल, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह विविध पोलीस अधिकारी, विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी महापूराच्या काळात सांगली व मिरज शहरातील नागरिक उत्स्फूर्तपणे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाच्या सोबत आले याचा अभिमान वाटतो, असे सांगून महापूराच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव व मोहरम हे सण सर्व समाज शांततेत पार पाडेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी महापूराने अनेकांचे नुकसान केले आहे अशा गरजवंताना आयुष्यात नवीन उभारी देण्यासाठी उत्सव काळातील सकारात्मक उर्जा वापरूया. केवळ तोंडदेखली मदत न करता दीर्घकालीन मदतीचा दृष्टीकोन ठेवूया. एक गाव एक गणपती या संकल्पनेप्रमाणेच एक वॉर्ड एक गणपती ही संकल्पना राबवूया. उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत स्वयंशिस्त पाळून उत्सव साजरे करूया. यावेळी त्यांनी गणपती सुखकर्ता व दु:खहर्ता आहे. गणपतीच्या आगमनानंतर महापूराने आलेले दु:ख नष्ट होईल व पुन्हा आनंदाने आपले आयुष्य उजळून निघेल असा विश्वास व्यक्त करून चांगले काम करणाऱ्या मंडळासाठी उत्सवानंतर कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगली शहर आणि जिल्ह्याला महापूराचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षी अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करूया. परंपरेचे पालन करत असताना साधेपणा जपावा. कोणाकडेही सक्तीने वर्गणी मागू नये, असे आवाहन केले.
आसमानी संकटाला सामोरे जात असताना हजारोंचे हात मदतीला धावून आले याबद्दल महापौर संगीता खोत यांनी महापूराच्या काळात मदतीला धावणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. शासन, महानगरपालिका, पूरपश्चात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्याव्दारे पूरग्रस्तांना उभारी देत असल्याचे सांगून पूरबाधित गरजू व्यक्ती, विद्यार्थी यांना मदत करण्यासाठी देखावे, कमानी, रोषणाई यांना फाटा द्या असे आवाहन केले. रस्ते, विद्युत, पार्किंग याबद्दल आवश्यक ती कार्यवाही महानगरपालिकेतर्फे करण्यात येईल असे सांगितले.
महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी एका गणेश मंडळाने एक पूरबाधित घर दत्तक घेऊन त्याला लागणारी सर्व अनुषंगित मदत करावी व गणेशोत्सवाचा सांगली पॅटर्न सुरू करावा, असे आवाहन केले.

यावर्षी माणूसकीचा कायदा पाळा - पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, यावर्षी पोलीसांपेक्षा माणूसकीचा कायदा पाळा. आपण काय करावे व काय करू नये हे स्वत:ला विचारा. तुमची सद्सदविवेक बुध्दीच तुम्हाला मार्ग दाखवेल. इतिहासात प्रथमच यावर्षी सर्वात मोठा पाऊस झाला आहे. अनेकांचे घरे दारे, आयुष्य उध्वस्त झाले आहे. अशावेळी मानवता दाखवून दुसऱ्याला मदतीचा हात देण्यासाठी पुढे या. मंडळांनी एकमेकांशी स्पर्धा न करता मुर्ती लहान ठेवून माणूसकी मोठी करावी. राज्यभरातून पूरबाधितांसाठी मदतीचा ओघ सुरू असतानाच आपणही आपले गाव, जिल्हा यासाठी पुढे यावे. खरी गरज कोठे आहे ती जाणून मदत करा. एक गाव एक गणपती बसवा. कुंभार समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी त्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुढील वर्षीच्या मुर्तीसाठी आताच बुकींग करून आगाऊ पैसे द्या. त्यातून त्यांना आर्थिक मदत उपलब्ध होवून व्यवसायाला हातभार लागेल. यावेळी त्यांनी स्पेशल पोलीस ऑफिसर्सची नियुक्ती करण्यात येणार असून सीसीटीव्ही बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकरच पूर्ण होवून त्यालाही गती मिळेल असे सांगितले.
पूरबाधित पत्रकार दिपक चव्हाण यांची पूरग्रस्तांना 5 हजार रूपयांची मदत
जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी व दैनिक युथ लिडरचे संपादक दिपक चव्हाण हे हरिपूर येथे रहात असून महापूराचा फटका त्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. अशावेळी स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून त्यांनी शासनातर्फे त्यांना देण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानाची रोख रक्कम 5 हजार रूपये जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुपूर्द करून एक आदर्श निर्माण केला.
याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले यांनी प्रास्ताविक केले. मिरज उपविभागीय अधिकारी संदिपसिंह यांनी आभार मानले. यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव व मोहरम साधेपणाने, पूरग्रस्तांना मदतीची बांधिलकी जपत शांततेत पार पाडण्याबद्दल आपली मते मांडली. यावेळी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस दलातील अधिकारी, संबंधित शासकीय विभाग, शांतता समितीचे सन्माननीय सदस्य, सदस्या तसेच शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, मुस्लीम बांधव उपस्थित होते.
00000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा