शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

पूरबाधित 53 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 24 (जि.मा.का) : सांगली शहरासह जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज व शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पुरामुळे सुमारे 104 गावे बाधित झाली. मदत व पुनर्वसनासाठी पूरपश्चात उपाययोजना अत्यंत गतीने सुरू आहेत. 23 ऑगस्ट अखेर 53 हजार 608 कुटुंबांना एकूण 5360.8 क्विंटल गहू व 5360.8 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच एकूण 31 हजार 623 इतक्या बाधित कुटूबांना 5 लिटर प्रमाणे 1 लाख 58  हजार 115 लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे. 292 एटीएम कार्यरत असून 37 एटीएमची दुरूस्ती सुरू आहे. सुरू असलेल्या एटीएम मधून अंदाजे 55 कोटी 37 लाखाची रक्कम उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
17 हजार 688 घरांची  पडझड
 पुरामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत पूर्णत: पडझड झालेल्या घरांची एकूण संख्या 5827 आढळून आली असून अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या 11 हजार 861 आढळून आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील एकूण 174 गोठ्यांना पण पुराची बाधा झाली आहे. तसेच पडझड / नष्ट झालेल्या झोपड्या 146 आहेत.

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा