शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

पूरग्रस्त भागात मदत व पुनर्वसनाचे काम युध्दपातळीवर स्वयंसेवी संस्था व इतर नागरिकांचेही सहकार्य - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 24 (जि.मा.का) : सांगली जिल्ह्यामध्ये उदभवलेल्या अभूतपूर्व पूरस्थितीनंतर प्रशासनाच्या वतीने मदत व पुर्नवसनाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या कामात प्रशासनास स्वयंसेवी संस्था व इतर नागरिकांचेही सहकार्य लाभत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात सांगली शहरासह जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज व शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये सांगली शहरासह चार तालुक्यातील जवळपास 104 गावे बाधित झाली. जिल्ह्यात पूरबाधित कुटूंबातील गाय व म्हैस जनावरे 351, मेंढी, बकरी डुक्कर 111, उंट, घोडा, बैल 6, वासरू, गाढव, शेंगरू, खेचर 117 आणि 56 हजार 430 कोंबड्या व इतर पक्षी यांचे नुकसान झाले असून नुकसानीची अंदाजित रक्कम 1 कोटी 26 लाख 91 हजार 150 रूपये इतकी आहे.
जिल्हाभरातील 266 दुधाळ जनावरांचे 67 लाख 65 हजार, ओढकाम करणाऱ्या 104 जनावरांचे 16 लाख 93 हजार व 13 हजार 381 कोंबड्या व कुक्कुट वर्गीय प्राण्यांचे 1 लाख 5 हजार 200 असे आतापर्यंत एकूण 13 हजार 751 जनावरांच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्यात येवून एकूण 85 लाख 63 हजार 200 एवढे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
पुरबाधित जनावरांसाठी जिल्ह्यात आजअखेर स्वयंसेवी संस्था, दानशुर व्यक्ती यांच्याकडून 2271.05 मे. टन चारा प्राप्त झाला आहे. 203.75 मे. टन पशुखाद्य प्राप्त झाले असून चारा व पशुखाद्य आवश्यकतेप्रमाणे बाधित गावांमध्ये वाटप करण्यात येत आहे. आजअखेर 51 हजार 506 पशुधनावर लसीकरण व 25 हजार 244 पशुधनावर उपचार करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
पुरग्रस्त बाधित वाणिज्य मिळकतीचे नुकसान झालेली बाधित गावे 88 असून बाधित मिळकतीची संख्या 15 हजार 850 आहे. त्यापैकी 2 हजार 647 पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली.
0000000






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा