शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

पूरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने केली पाहणी

सांगली, दि. 29 (जिमाका) :   पूरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने आज वाळवा तालुक्यातील वाळवा, शिरगाव , मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे भेट देवून प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली.
डॉ. व्ही. थिरुपुगाज, सहसचिव (पी ॲण्ड पी) नवी दिल्ली यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने या गावांची पाहणी केली. त्यांचे समवेत आर. पी. सिंग, संचालक, कृषी मंत्रालय, नवी दिल्ली, संजय जयस्वाल अधिक्षक अभियंता, नवी मुंबई व व्ही. पी. राजवेदी, अवर सचिव, ग्रामविकास विभाग, नवी दिल्ली हे होते. या पथकासमवेत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी  अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय पथकाने पूरबाधीत गावातील ऊस, केळी, द्राक्ष, सोयाबिन, आदी पिकांची, पडझड झालेल्या घरांची, पाणी किती वाढले होते याची पाहणी करुन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पिकांची पहाणी केली.  सानुग्रह अनुदान मिळाले का, स्थलांतर कसे झाले आदी बाबतही त्यांनी विचारणा केली.
 सांगली येथे  रेसिडेंसी क्लब येथे अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात पूरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्राचे पंचनामे अंतीम टप्प्यात असल्याचे सांगितले. तसेच शाळा, रस्ते, पशुधन नुकसानीबाबत माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानीची माहिती उद्या जिल्हाधिकारी दौलत देसाई देणार आहेत.
या बैठकीला महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, कोल्हापूरचे मल्लीनाथ कलशेट्टी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, सार्वजनिक बांधकाम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
0000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा