शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

सानुग्रह अनुदान वितरण प्रक्रिया त्वरीत पूर्ण करा - अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम


सांगली, दि. 23 (जि.मा.का.) : महापुरामुळे सांगली शहर व जिल्ह्यातील विविध भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाधित लोकांना तातडीची मदत म्हणून शासन शहरी भागात 15 हजार तर ग्रामीण भागात 10 हजार रूपये सानुग्रह अनुदान वाटप करीत आहे. यातील 5 हजार रूपये रोखीने वितरीत करण्यात येत आहेत. 22 ऑगस्ट अखेर 60 हजार 356 कुटुंबाना 30 कोटी 17 लाख 80 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. कोणत्याही स्थितीत सानुग्रह अनुदान वितरण प्रक्रिया त्वरीत पूर्ण करा. बाधित कोणतेही कुटुंब वंचित राहणार नाही याची काटेकोर दक्षता घ्या, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिले.
अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी मिरज तहसील कार्यालयामध्ये सानुग्रह अनुदान वितरणामध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार शरद पाटील, शिल्पा ठोकडे, कल्पना ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम म्हणाले, महापुरामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेकांची घरे, संसार उध्वस्त झाले आहेत. महसूल विभागाशी संबंधित सर्व पंचनामे तातडीने पूर्ण करा. यंत्रणा अधिक गतीमान करा. सकाळी लवकर कामाला सुरूवात करा व रात्री उशिरापर्यंत कामे सुरू ठेवा. प्रत्येक पूरबाधिताला लवकरात लवकर मदत मिळेल यासाठी कसोसीने प्रयत्न करा. ज्या ठिकाणी गरीब वस्त्या आहेत त्या ठिकाणी सानुग्रह अनुदान वितरणाला प्राधान्य द्या.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा