गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत लाभार्थींची नोंदणी दिनांक ९ ऑगस्ट 2019 पासून सुरु करण्यात आलेली आहे. ही ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी तालुकास्तरावर दिनांक २४ ते २७ ऑगस्ट कालावधीमध्ये कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. या योजनेत दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे यांनी केले आहे.
            प्रधानमंत्री किसान मानधन योजना भु-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वृध्दावस्थेतील निर्वाहासाठी अत्यंत अल्प बचत केलेली असते किंवा बहुतांशी शेतकऱ्यांची कोणतीही बचत नसते आणि उत्पन्नाचा इतर स्त्रोत उपलब्ध नसतो अशा शेतकऱ्यांना त्यांचे वृध्दापकाळात आरोग्यपुर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेअंतर्गत सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रूपये निश्चित पेन्शन देण्यात येईल. प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजना आहे.
      या योजनेअंतर्गत भारतीय जीवन विमा निगम (एल.आय.सी.) द्वारा प्रबंधित (Managed) पेन्शन फंडाद्वारे नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांना पेन्शन देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार 18 ते 40 वर्षे या वयोगटातील अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी नोंदणीकरण्यासाठी पात्र आहेत. या योजनेअंतर्गत पात्र नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांचे 1 ऑगस्ट 2019 रोजीच्या वयानुसार रक्कम रु. 55 ते रु. 200/- प्रती माह मासिक हप्ता वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत पेन्शन फंडामध्ये जमा करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना पेन्शन फंडामध्ये जमा केलेल्या मासिक हप्त्याइतकीच मासिक रक्कम केंद्र शासन संबंधित शेतकऱ्यांनाच्या पेन्शन फंडामध्ये जमा करणार आहे.
            या योजनेत अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी पती / पत्नी स्वतंत्रपणे योजनेमध्ये भाग घेऊ शकतात. त्यांच्या स्वतंत्र नोंदणीनुसार वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे ३ हजार रूपये मासिक पेन्शन मिळणार आहे. ज्या पात्र अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांनी योजनेमध्ये भाग घेतलेला असून काही कारणामुळे त्यांना योजनेतून बाहेर पडावयाचे असल्यास त्यांची पेन्शन फंडामध्ये जमा केलेली रक्कम व्याजासह त्यांना परत करण्यात येईल. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्याचे सेवानिवृत्ती तारखेपुर्वी (म्हणजेच वय 60 वर्षे पुर्ण होण्यापुर्वी) आकस्मिक निधन झाल्यास त्या व्यक्तीचे 60 वर्षे वयापर्यंतचे उर्वरीत मासिक हप्ते पती/पत्नी हे पेन्शन फंडामध्ये जमा करून त्या व्यक्तीचे पेन्शन खाते चालू ठेवू शकतात.
            सेवानिवृत्ती तारखेपुर्वी निधन झालेल्या पती/पत्नी शेतकऱ्याचे पेन्शन खाते बंद करावयाचे असल्यास त्या पती/पत्नी शेतकऱ्याने पेन्शन फंडामध्ये अंशदायी जमा केलेली रक्कम व्याजासह वारसदार पती/पत्नी शेतकऱ्यास मिळेल. सेवानिवृत्ती तारखेपुर्वी निधन झालेल्या शेतकऱ्यास पती / पत्नी नसल्यास त्या शेतकऱ्याने पेन्शन फंडामध्ये अंशदायी जमा केलेली रक्कम व्याजासह वारसदारास मिळेल. सेवानिवृत्ती तारखेपुर्वी निधन झालेल्या शेतकऱ्याच्या पती / पत्नीस दर महा 50 टक्के म्हणजेच  1500 रूपये परिवारीक मासिक पेन्शन मिळेल.
            या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकरी पी.एम.किसान योजनेचा लाभार्थी असल्यास त्याच्या संमतीनुसार पी.एम.किसान योजनेच्या लाभातून प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची अंशदायी हप्ता रक्कम कपात करण्यात येईल. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सामाईक सुविधा केंद्र (CSC - Common Service Centre) मार्फत https://www.pmkmy. gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावयाची असून या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. केंद्र शासनाकडून लाभार्थी नोंदणी फी रक्कम 30 रूपये (प्रति शेतकरी) सामाईक सुविधा केंद्रास अदा करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी लाभार्थी शेतकरी यांनी मार्गदर्शक सुचनेनूसार आवश्यक असणारी कागदपत्रे (आधारकार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर इ.) सामाईक सुविधा केंद्रात घेऊन जाणे आवश्यक आहे.
            राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एन.पी.एस.), कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनायझेशन स्किम, यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत लाभ घेणारे अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी या योजनेस अपात्र असतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (पी.एम.एस.वाय.एम.) मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेस अपात्र असतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री लघू व्यापारी मानधन योजना (पी.एम.एल.व्ही.एम.) मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेस अपात्र असतील.
उच्च आर्थिक स्थितीतील शेतकरी लाभार्थीं पुढीलप्रमाणे प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र नसतील. जमीन धारण करणारी संस्था, संवैधानिक पद धारण करणारी/केलेली आजी/माजी व्यक्ती,  आजी/माजी मंत्री, खासदार, आमदार, महापालिकेचे महापौर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,  केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/कर्मचारी, शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी/कर्मचारी (चतुर्थ श्रेणी/ गट-ड वर्ग कर्मचारी वगळून), मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, नोंदणीकृत व्यवसायीक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (सी.ए.), वास्तुशास्त्रज्ञ (आर्कीटेक्ट) इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा