गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

सर्व्हेअरची संख्या वाढवा, सुलभरित्या विमाधारकांना लाभ द्या - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

तक्रार, अनियमितता, दिरंगाई झाल्यास कारवाई

सांगली, दि. २२, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात महापूरामुळे अनेक घटकांना फटका बसला आहे. उद्योग, व्यापार, वाहने यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा स्थितीत विमा कंपन्यांनी सकारात्मक भूमिका घेवून स्वत:हून पुढाकार घेवून विमा प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत. विमा पंचनाम्यासाठी आवश्यक सर्व्हेअर अन्य जिल्ह्यातून तात्काळ उपलब्ध करून घ्यावेत. विमाधारकांना विम्याचे पैसे सहज, सुलभ, सोप्या पध्दतीने उपलब्ध करून द्यावेत. यामध्ये कोणतीही अनियमितता, दिरंगाई, कुचराई होणार नाही, विमा धारकांना नाहक त्रास होणार नाही याबाबत काटेकोर दक्षता घ्यावी. विमा कंपन्याबाबत कोणतीही तक्रार आल्यास प्रशासन कठोर कारवाई करेल, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
          विमा कंपन्यांचे विविध प्रतिनिधी व जिल्हा प्रशासन यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
          जिल्हा प्रशासनाकडे विमा कंपन्यांबाबत तक्रारी प्राप्त होत असून त्या अनुषंगाने मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी विमा कंपन्यांच्या प्रतिनिंधी सोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विमा धारकांना विम्याचे दावे निकाली काढताना नाहक त्रास होणार नाही याची दक्ष्‍ाता घ्या, असे सांगून प्रत्येक विमा कंपनीने सर्व्हेअरची संख्या वाढवावी व तात्काळ पंचनामे पूर्ण करावेत. विमा उतरवत असताना ज्या सौहार्दाने विमा उतरवला जातो त्याच सौहार्दाने विम्याचे दावेही निकाली काढावेत. मानवतेच्या दृष्टीकोनातून लोकांना मदत करावी. पूरबाधित क्षेत्राबाबत विमा कंपन्यांकडे माहिती आहे. त्यांच्या यंत्रणाकडे जो डाटा उपलब्ध आहे त्यानुसार स्वत:हून पुढाकार घेत विमा धारकांना विमा रकमा उपलब्ध करून द्याव्यात. यावेळी त्यांनी विमा धारकांची विमा कंपन्यांबाबत कोणतीही तक्रार असल्यास आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षास 9370333932 / 8208689681 तसेच टोल फ्री क्रमांक 1077 यावर संपर्क साधावा.
          या बैठकीस दि न्यू इंडिया, नॅशनल इन्शुरन्स को. लि., लाईफ इन्शुरन्स को. ऑफ इंडिया, युनायटेड इंडिया इन्शुरन्स को. लि., ओरियंटल इन्शुरन्स को. लि., बजाज अलायन्स, इफको टोकिओ जीआयसी लि. आदि विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा