सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

पूरपश्चात उपाययोजनांसाठी यंत्रणांची प्रयत्नांची शिकस्त - विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

- सांगली नगरवाचनालयासाठी 5 लाख रूपयांची मदत
- अंकली हे गाव दत्तक घेणार

     सांगली, दि.19, (जि.मा.का.) : पूरपश्चात उपाययोजनांसाठी सर्व यंत्रणा प्रयत्नांची शिकस्त करत असल्याचे सांगून शासकीय मदत वाटपात दिव्यांग, एकल महिला, ज्येष्ठ नागरिक यांना  प्राधान्य द्या. त्यांना घरी जावून मदतीचे वाटप करा. विविध महामंडळांच्या माध्यमातून आवश्यक मदत उपलब्ध करून घ्या, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी दिले. यावेळी त्यांनी सांगली नगरवाचनालयासाठी त्यांच्या फंडातून 5 लाख रूपयांची मदत करत असल्याचे तसेच उभारी देण्यासाठी अंकली हे गाव दत्तक घेत असल्याचे सांगितले.
      जिल्ह्यातील सांगलीवाडी, अंकली, हरिपूर रोड, रामनगर, जुनी धामणी आदि विविध ठिकाणी भेटी देवून, लोकांशी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी संवाद साधला. त्यांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पूरस्थिती व पूरपश्चात करण्यात येणाऱ्या उपाययोजना यामध्ये धान्य वाटप, मदत, सानुग्रह अनुदान आदिंबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, विशेष कार्य अधिकारी रविंद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. तेली यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
     यावेळी मदत व पुनर्वसन कार्याचा आढावा घेऊन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  म्हणाल्या, ज्या ठिकाणी दिव्यांग, एकल महिला, ज्येष्ठ नागरिक पुरबाधित आहेत त्यांना घरी जावून मदतीचे वाटप करा. आज ग्रामीण भागामध्ये भेटी देत असताना महिलांच्या कपड्याची उपलब्धता होणे आवश्यक असल्याचे सांगून दानशूर व्यक्तींनी प्राधान्याने ही मदत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन केले. जी विविध महामंडळे कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून मदत निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पुरबाधित भाडेकरू वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या. नुकसानग्रस्त पशुबाधितांना शासनाकडून उपलब्ध होणारे पशुधन पती पत्नी या दोहोंच्या नावावर देण्यात यावे असे सांगून शासकीय पंचनामे, सर्व्हे अथवा अनुदान वाटप यासाठी ज्या भागामध्ये अधिकारी, कर्मचारी जाणार आहेत त्याची माहिती लोकांना कळवावी. शेतकऱ्यांना अडचण निर्माण होवू नये यासाठी लागणारी छोटी औजारेही त्वरीत उपलब्ध करून द्यावीत. महिलांमधील अशक्तपणाची तक्रार दूर करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने आवश्यक उपाययोजना कराव्यात. साथीचे रोग पसरू नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असे सांगितले. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जास्त काळ पाणी व चिखल यामध्ये रहावे लागते त्यांना लेप्टोपायरासेस पासून संरक्षणासाठी गमबूट उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश देवून गोऱ्हे यांनी पुरबाधितांना मदतीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणारे प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
     यावेळी निलम गोऱ्हे यांनी सांगली नगरवाचनालयाचे महाप्रलयामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना त्यांच्या फंडातून 5 लाख रूपयांची मदत जाहीर केली. तसेच जिल्ह्यातील जी वाचनालये पुरबाधित झाली असतील त्यांनीही प्रशासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव दाखल करावेत असे सांगितले. यावेळी सांगली महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेले अन्नछत्र अत्यंत चांगले असल्याबद्दल महापालिकेचे कौतुक केले. तसेच जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तुंचे जे किट तयार केलेले आहे त्याबध्दलही प्रशंसा व्यक्त केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी महापूराच्या पार्श्वभूमीवर झालेले नुकसान, पूरपश्चात करण्यात येत असलेल्या उपाययोजना, मदत स्वीकृती व वितरण आदिंबाबत सविस्तर आढावा सादर केला. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी पाणीपुरवठा, आरोग्य यंत्रणा आदिंबाबत माहिती दिली.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा