सोमवार, २६ ऑगस्ट, २०१९

महामार्गावर जड, अवजड वाहनांनी डाव्या मार्गिकेमधून मार्गक्रमण करावे - अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगांवकर

सांगली, दि. 26 (जि.मा.का) : राज्यातील महामार्गावर अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी जड अवजड वाहनांनी प्रत्येक मार्गाच्या डाव्या मार्गिकेमधून जाणे व महामार्गावरील वाहतूकीची कोंडी टाळणे, चालकांनी मार्गिकेच्या शिस्तीचे पालन करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगांवकर यांनी मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये राज्यामध्ये सर्व पोलीस आयुक्तालये व पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रामधील सर्व महामार्गावर जड / अवजड वाहनांची वाहतूक प्रत्येक मार्गाच्या डाव्या मार्गिकेमधून मार्गक्रमण करण्यासाठी निर्बंधाबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
या अधिसूचनेनुसार राज्यातील ज्या महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग / राज्य महामार्ग / महानगरपालिका अथवा नगरपालिका क्षेत्रांतर्गत रस्ते) येण्या - जाण्याच्या दोन्ही मार्गावर दोन मार्गिका आहेत. अशा सर्व महामार्गावर व रस्त्यांवर जड / अवजड वाहनांनी मार्गक्रमण करण्यासाठी प्रत्येक मार्गाच्या डावीकडील मार्गिका निश्चित केली आहे. राज्यातील ज्या महामार्गावर व रस्त्यांवर येण्या - जाण्याच्या दोन्ही मार्गावर दोन मार्गिका आहेत अशा महामार्गावर व रस्त्यांवर जड / अवजड वाहनांना प्रत्येक मार्गाच्या उजवीकडील मार्गिकेमधून (दुभाजकाच्या बाजूची पहिली मार्गिका) सतत मार्गक्रमण करण्यास मनाई केली आहे. राज्यातील ज्या महामार्गावर व रस्त्यांवर येण्या - जाण्याच्या दोन्ही मार्गावर दोन मार्गिका आहेत अशा महामार्गावर व रस्त्यांवर जड / अवजड वाहनांना प्रत्येक मार्गाच्या (दिशेने) वाहतुकीची परिस्थिती पाहून उजव्या मार्गिकेतून ओव्हरटेक करता येईल. अपवादात्मक परिस्थितीमध्ये व ओव्हरटेक करण्यासाठी उजवीकडील मार्गिकेमध्ये आल्यावर सदर मार्गिकेमधून सतत मार्गक्रमण करण्यास मनाई केली आहे.
राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रामधील ज्या रस्त्यांवर येण्या - जाण्याच्या दोन्ही मार्गावर दोन पेक्षा अधिक मार्गिका आहेत अशा सर्व मार्गावर जड / अवजड वाहनांनी मार्गक्रमण करण्यासाठी प्रत्येक मार्गाच्या सर्वात डावीकडील मार्गिका निश्चित केली आहे. राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रामधील ज्या रस्त्यांवर येण्या - जाण्याच्या दोन्ही मार्गावर दोन पेक्षा अधिक मार्गिका आहेत अशा मार्गावर जड / अवजड वाहनांनर प्रत्येक मार्गाच्या सर्वात उजवीकडील मार्गिकेमधून (दुभाजकाच्या बाजूची पहिली मार्गिका) मार्गक्रमण करण्यास मनाई केली आहे. जड / अवजड वाहनांना प्रत्येक मार्गाच्या (दिशेने) डावीकडील मार्गिकेच्या लगतच्या मार्गिकेतून वाहतुकीची परिस्थिती पाहून ओव्हरटेक करता येईल. राज्यातील सर्व महामार्गावर व रस्त्यांचर विहीत केलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणी वाहने थांबविण्यास मनाई करण्यात आली आहे.     यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावर जड / अवजड वाहनांनी उजवीकडील मार्गिकेमधून मार्गक्रमण करण्यासाठी मनाई करण्याबाबतची अधिसूचना दिनांक 15 जुलै 2019 रोजी निर्गमित करण्यात आल्याने या अधिसूचनेमधून नमूद दोन्ही मार्ग वगळण्यात आले आहेत.
या निर्बंधातून अत्यावश्यक सेवा वाहने / रूग्णवाहिका / अग्निशमन वाहने / पोलीस व शासकीय वाहने / अतिमहत्वाच्या व्यक्तींची वाहने (व्हिआयपी) यांना वगळण्यात आले आहे.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा