शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

पूरग्रस्तांना मदत पोहचलीच पाहिजे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या यंत्रणांना सूचना

- पूर ओसरला सर्व गावांचा संपर्क सुरू
- पशुधनाचे सुमारे 73 लाख 76 हजार नुकसान
- 7 कोटी 21 लाखाचे सानुग्रह अनुदान वाटप
- पूरबाधित रेशन दुकानांतूनही वितरण सुरू
- घरांची तपासणी केल्याशिवाय राहायला जावू नका
- पंचनामे सर्वत्र सुरू
- शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या

सांगली, दि. 16 (जि.मा.का) : पूर ओसरला असून पुरामुळे संपर्क तुटलेल्या गावांचा संपर्क सुरू झाला आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून शनिवार पर्यंत पूरग्रस्तांच्या याद्या निश्चित होतील. पूरग्रस्तांना शहरी भागात 15 हजार तर ग्रामीण भागात 10 हजार सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात येत असून त्यामधील 5 हजार रूपये रोखीने वाटप सुरू आहे. आतापर्यंत 14 हजार 425 पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार रूपये या प्रमाणे 7 कोटी 21 लाख 25 हजार रूपयांचा निधी सानुग्रह अनुदान म्हणून वाटप करण्यात आला आहे. असे सांगून जनजीवन पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रशासन सर्व बाजूंनी प्रयत्न करीत आहे. यंत्रणांनी अनावश्यक कागदपत्रे न मागता पूरबाधितांना मदत पोहचलीच पाहिजे यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

पुरामुळे 3 लाख 5 हजार 957 व्यक्ती स्थानांतरीत
ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात निर्माण झालेल्या महापूराच्या स्थितीमुळे सांगली जिल्ह्यात चार तालुके बाधित झाले. 104 गावे व महानगरपालिका क्षेत्र यामधून 64 हजार 646 कुटुंबे स्थानांतरीत झाली. कुटुंबे व त्यातील 3 लाख 5 हजार 957 व्यक्ती स्थानांतरीत झाल्या. यांची सोय 64 तात्पुरत्या निवारण केंद्रामधून करण्यात आली.

26 व्यक्ती मयत 1 बेपत्ता
    या पुरामुळे 26 व्यक्ती मयत झाल्या असून 1 व्यक्ती आजअखेर बेपत्ता आहे.

पशुधनाचे 73 लाख 76 हजार रूपये नुकसान
    जिल्ह्यात गाय व म्हैस वर्गातील 201 जनावरे, मेंढी, बकरी, डुक्कर अशी 64 जनावरे, घोडा, उंट व बैल अशी 3 जनावरे, वासरू, गाढव, शिंगरू, खेचर अशी 78 जनावरे आणि 21 हजार 19 कोंबड्या व इतर पक्षी यांचे नुकसान झाले आहे. पशुधनाच्या नुकसानीची अंदाजित रक्कम 73 लाख 76 हजार 450 रूपये आहे. मृत जनावरांची विल्हेवाट शास्त्रशुध्द पध्दतीने लावण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

घरांची पडझड
    महापूरामुळे 433 घरे पूर्णत: तर 2 हजार 997 घरे अंशत: अशा 3 हजार 430 घरांचे नुकसान झाले आहे. 99 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. यांचे पंचनामे सुरू आहेत.

कृषि क्षेत्राचे नुकसान
    सांगली जिल्ह्यात पुरामुळे कृषि क्षेत्राचे अंदाजे नुकसान 66 हजार 98 हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. यामध्ये सुमार 1 लाख 19 हजार 724 शेतकरी बाधित झाले आहेत. यात मुख्यत: ऊस, सोयाबीन, हळद या पिकांचा समावेश आहे.
    एनडीआरएफ, एसडीआरएफ, टेरिटोरियल आर्मि, नेव्ही, एनजीओ व जिल्हा प्रशासन यांच्याकडून सध्या 8 पथके 20 बोटी व 176 जवान कार्यरत आहेत.

वैद्यकीय पथके
    जिल्ह्यात 237 वैद्यकीय पथके कार्यरत असून महानगरपालिका क्षेत्रात 103 व ग्रामीण भागात 134 पथके कार्यरत असून पूरग्रस्तांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहे. औषधांचा साठाही पुरेसा आहे.

अन्नधान्य वितरण
    अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबाना मोफत अन्नधानय वाटप करण्यात येत असून 1 हजार 419 पूरग्रस्त कुटुंबांना 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ असे गहू 141.9 क्विंटल व तांदूळ 141.9 क्विंटल वितरीत करण्यात आले असून उर्वरित कुटुंबांनाही वितरण सुरू आहे.
   
मदत साहित्याचे वाटप
8 हजार 316 बिस्कीटांची पाकीटे, 6 लाख 50 हजार 583 पिण्याच्या पाणी बॉटल, 100 किलो दूध पावडर, 75 डझन मेणबत्या, 45 हजार 450 फूड पाकिटे असे मदत साहित्य वितरीत करण्यात आले असून 3 स्थलांतरीतांच्या कॅम्पच्या ठिकाणी जनरल वाटपांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंची यादी तयार केलेली असून पूरग्रस्तांना त्याचे कीट तयार करून वाटप करण्यात येणार आहे. मदत करणाऱ्यांनी या कीटमधील वस्तू मदत स्वीकृती व वितरण केंद्राकडे जमा कराव्यात जेणेकरून प्रत्येक पूरबाधिताला मदतीचे वितरण व्यवस्थीत होईल. पूरबाधितांना मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली - श्रीमती  शिल्पा ओसवाल - 8007547333, तहसिल कार्यालय, मिरज - सुनील कानडे - 7709286873, तहसिल कार्यालय, वाळवा - श्रीमती शर्वरी पवार - 9422763562, तहसिल कार्यालय, शिराळा - श्री. सिद - 9421177627, तहसिल कार्यालय, पलूस - श्रीमती पाटील - 9404419378 या क्रमांकावर  संपर्क साधावा.
   
विद्यार्थ्यांची सर्वतोपरी काळजी घ्या
    जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पूरामुळे बाधित झालेल्या शाळा चालकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता, औषध फवारणी, स्वच्छ पाणी पुरवठा याबाबत खबरदारी घेवून विद्यार्थ्यांची सर्वतोपरी काळजी घ्यावी, असे सांगून शासकीय शाळा, अंगणवाडी यांच्या विशेष स्वच्छता, स्वच्छ पाणी पुरवठा यावर भर देत असल्याचे यावेळी सांगितले. 
    सांगली शहर व अन्य पूरग्रस्त भागात स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा, मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्वच्छतेचे काम रात्रदिवस सुरू राहणार आहे.

एटीएम त्वरीत सुरू करा - पुरेशी रक्कम उपलब्ध ठेवा
जवळपास 100 एटीएम पाण्याखाली गेलेली होती. या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करून ती तात्काळ सुरू करून घ्यावीत व या ठिकाणी पुरेशी रक्कम उपलब्ध करून देण्याचे बँकाना निर्देश दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.

धोकादायक घरांमध्ये राहण्यास जावू नका
    जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, महापूरामुळे मातीची, कच्ची अशी अनेक घरे धोकादायक बनली आहेत. पूर ओसरल्याने लोक घराकडे परतू लागले आहेत. तथापि सदरची घरे सुरक्षित असल्याबाबत तपासणी करूनच घरांमध्ये जावे. धोकादायक घरांमध्ये कृपया परतू नका. ज्या ठिकाणी घरे धोकादायक बनली आहेत त्यांच्यासाठी तात्पुरता निवारा सुविधा प्रशासन उपलब्ध करून देत आहे.


00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा