शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

सण, उत्सव साजरे करताना उच्च न्यायालयाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : जिल्ह्यात दिनांक २ ते १२ सप्टेंबर या काळात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव सण साजरा होत आहे. या काळात उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, ध्वनी प्रदूषण नियम 2000 मधील नियम 7 नुसार नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात ध्वनीप्रदूषण नियमाच्या उल्लंघनाच्या तक्रारी संदर्भात तक्रार निवारण यंत्रणा सुरू करावी. अनुज्ञप्ती विषयक संस्थांनी ध्वनी प्रदूषण उल्लंघनाबाबत प्रत्येक तक्रारीची दखल घ्यावी. तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाहीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या, महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करावी. उत्सव साजरे करणाऱ्या महत्त्वाच्या संघटनांची बैठक घेवून ध्वनी प्रदूषण कायदेविषयक आणि पदपथावर तात्पुरत्या स्वरूपात मंडप उभारण्याबाबत, ध्वनी प्रदूषणाबाबत नियमांची माहिती द्यावी. ध्वनी प्रदूषण नियमांचे सक्त पालन होईल याबाबत महानगरपालिका व नगरपालिका यांनी आवश्यक कार्यवाही करावी.
ध्वनी प्रदूषण नियमांच्या तक्रारींची दखल घेण्याकरिता प्रभागनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.  तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर, पदपथावर रचना उभारण्यासाठी परवानगी देताना ते नागरिकांना अडथळाविरहित राहतील याची खबरदारी घ्यावी. ध्वनी प्रदूषण नियमांच्या पालनासाठी व अनधिकृत मंडप, रचनांबाबत कार्यवाही करतेवेळी आवश्यकतेनुसार स्थानिक पोलीसांची मदत घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
     पूर्व परवानगीशिवाय ध्वनीक्षेपक यंत्रणा वापरण्यात येणार नाही याबाबत दक्षता घेवून जाहिरात फलक, फ्लेक्स, तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या मंडप व तत्सम रचनाजवळ व त्या ठिकाणी पूर्वपरवानगी शिवाय लावण्यात येवू नयेत. विहीत पध्दतीने उत्सव काळात सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून सुचनांनुसार कार्यवाही करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त व नगरपालिका क्षेत्रासाठी जिल्हाधिकारी यांच्यावतीने संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक सण, उत्सवापूर्वी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा भंग होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित कार्यालय प्रमुखांनी आपल्या अख्त्यारीतील कामे पार पाडताना घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा