गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

पूरग्रस्त भागात मदत व पुनर्वसनाच्या कामाबरोबरच स्वच्छतेचे काम युध्दपातळीवर - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 22 (जि.मा.का) : सांगली जिल्ह्यामध्ये उदभवलेल्या अभूतपूर्व पूरस्थितीनंतर प्रशासनाच्या वतीने मदत व पुर्नवसनाच्या कामाबरोबरच पूरग्रस्त भागात स्वच्छतेचे काम  युध्दपातळीवर सुरू आहे. या कामात प्रशासनास स्वयंसेवी संस्था व इतर नागरिकांचेही सहकार्य लाभत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले, सांगली शहरासह जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज व शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पुरामुळे सुमारे १०४ गावे बाधित झाली. बाधित गावातील काही व्यक्तींनी नातेवाईक किंवा अन्य ठिकाणी स्थलांतर केले होते. तर उर्वरित सर्व कुटूंबांना प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कॅम्पमध्ये राहण्याची सोय करण्यात आली. या कॅम्पमधील व्यक्तींना कपडे, अन्न, पाणी, सॅनिटरी नॅपकिन, औषधे, टॉयलेटची सोय उपलब्ध करून देण्यात आली. ‍शिवाय त्यांना दैनंदिन वापराचे साहित्य जनावरांना चारा, प्रशासन व इतर संस्थांच्या माध्यमातून पुरविण्यात आले. सद्यस्थितीत शहरी भागात १ निवारा केंद्र सुरू असून त्यामध्ये ८ कुटुंबातील ३९ व्यक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
महापुरामुळे एकूण २८ व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यापैकी १९ मयत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख सानुग्रह अनुदान व मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी १ लाख असे एकूण ५ लाख प्रमाणे ९५ लाख आणि आजअखेर अन्य ६ मयत व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान प्रत्येकी ४ लाख रूपये  प्रमाणे २४ लाख असे एकूण १ कोटी १९ लाख रूपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तसेच ६ मयत व्यक्तींच्या वारसांना १ लाख प्रमाणे मुख्यमंत्री सहायत निधीतून अनुदान मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, पुरामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत पूर्णत: पडझड झालेल्या घरांची एकूण संख्या ३८७७ आढळून आली असून अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या ७ हजार ९३२ आढळून आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील एकूण १०१ गोठ्यांना पण पुराची बाधा झाली आहे. तसेच पडझड / नष्ट झालेल्या झोपड्या १४६ आहेत.
जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार या प्रमाणे आतापर्यंत २७ कोटी ७२ लाख ९५ हजार एवढी रक्कम वाटप करण्यात आली आहे. पुरबाधित कुटूंबांना तातडीची मदत म्हणून प्रत्येक कुटूंबास ५ हजार रूपये रोख रक्कम देण्यात येत असून उर्वरित रक्कम त्यांच्या बँकेचया खात्यात जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील १०४ गावातील ग्रामीण भागातील ४५ हजार २९३ कुटूंबे व शहरी भागातील ४२ हजार ६४६ कुटूंबे बाधित झाली होती. त्यापैकी ग्रामीण भागातील ३८ हजार १३७ व शहरी भागातील १७ हजार ३२२ कुटूंबांना एकूण २७ कोटी ७२ लाख ९५ हजार एवढे अनुदान वाटप करण्यात आले असून ग्रामीण भागातील २ हजार ३ कुटुंबाना ५ हजार रूपये वजा जाता उर्वरित १ कोटी १५ हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित पंचनामे व अनुदान वाटप सुरू आहे. पूरबाधित सर्व गावांमध्ये वाटप करण्यात येत असून त्याकामी मदत वाटपाचे काम सर्व गावात युध्दपातळीवर सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यासह इतर तालुक्यातून व जिल्ह्यातूनही अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.
पुरबाधित कुटूंबांचा सर्व्हे करून त्यांना धान्य वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पूरबाधित कुटूंबांना शासन निर्णयानुसार प्रत्येक कुटूंबाला १० किलो गहू व १० किलो तांदूळ आणि ५ लिटर केरोसीन मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत ४५ हजार ९६९ कुटूंबांना एकूण ४५९६.९ क्विंटल गहू व ४५९६.९ क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच एकूण १९ हजार २९८ इतक्या बाधित कुटूबांना ५ लिटर प्रमाणे ९६ हजार ४९० लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे.
डॉ. चौधरी यांनी सांगितले, जिल्ह्यातील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असून जिल्हाधिकारी कार्यालयात ही मदत स्वीकारण्यासाठी मदत स्वीकृती केंद्र व वितरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या कक्षामध्ये २ अप्पर जिल्हाधिकारी, ३ उपजिल्हाधिकारी, ५ तहसिलदार, १४ नायब तहसिलदार व इतर कर्मचारी २४ तास कार्यरत असून मदत स्विकार व वितरण करण्याचे काम करत आहेत. या कामामध्ये एनएसएस चे १५० विद्यार्थी, एनसीसी चे १०० विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचे ५० स्वयंसेवक यांच्या मदतीने एकूण ३० वस्तूंचे किट बनविण्याचे काम चालू आहे. यामध्ये जितो संस्था मुंबई यांच्याकडून ८ हजार भांड्याची किट प्राप्त झाली असून त्याला पूरक अशा इतर वस्तूंचे ८ हजार किट बनविण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. आवश्यकतेनुसार किट बनविण्याचे काम सुरू असून ७५० जादा किट तयार करून त्यांचे पुरबाधित कुटूंबांना वाटप करण्यात येत आहे. तसेच हे किट जसजसे तयार होतील तसे ते पुरबाधित कुटुंबाना वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पूरबाधित कुटूंबातील गाय व म्हैस जनावरे ३३२, मेंढी, बकरी डुक्कर १०८, उंट, घोडा, बैल ५, वासरू, गाढव, शेंगरू, खेचर ११३ आणि ३१ हजार १७२ कोंबड्या व इतर पक्षी यांचे नुकसान झाले असून नुकसानीची अंदाजित रक्कम १ कोटी १८ लाख ९८ हजार १५० रूपये इतकी आहे. पुरबाधित जनावरांसाठी जिल्ह्यात आजअखेर स्वयंसेवी संस्था, दानशुर व्यक्ती यांच्याकडून २२३८.५ मे. टन चारा प्राप्त झाला आहे. २०२.७५ मे. टन पशुखाद्य प्राप्त झाले असून चारा व पशुखाद्य आवश्यकतेप्रमाणे बाधित गावांमध्ये वाटप करण्यात येत आहे. आजअखेर ४९ हजार ९४२ पशुधनावर लसीकरण व २४ हजार ४२ पशुधनावर उपचार करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
जिल्हाभरातील २२० दुधाळ जनावरांचे ५६ लाख २८ हजार, ओढकाम करणाऱ्या ८४ जनावरांचे १३ लाख ६४ हजार व १३ हजार १२७ कोंबड्या व कुक्कुट वर्गीय प्राण्यांचे ९२ हजार ५०० असे आतापर्यंत एकूण १३ हजार ४३१ जनावरांच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्यात येवून एकूण ७० लाख ८४ हजार ५०० एवढे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील १२५ गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी ९८ पाणीपुरवठा योजना पुरपरिस्थितीमुळे बंद होत्या. त्यापैकी सद्या ९० पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पुरग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाभरात ४२ गावांसाठी एकूण ४७ टँकर उपलब्ध करून देण्यात आले असून २ खाजगी बोअर / विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तसेच महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ३८ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पुरामुळे जिल्ह्यातील एकूण २४८ गावांतील ६६०९८.५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी ३५३०५.०६ हेक्टर क्षेत्रांचा पंचनामा करण्यात आला आहे. बाधित शेतकऱ्यांची १ लाख २० हजार २३१ इतकी संख्या असून त्यापैकी ६९ हजार ४२२ शेतकऱ्यांच्या क्षेत्राचा पंचनामा पूर्ण झाला आहे. उर्वरित क्षेत्राचा पंचनामा सुरू आहे. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ६६०९८.५० हेक्टर क्षेत्रातील केळी, हळद इतर खरीप पिके, चारा, पपई, द्राक्ष, पेरू या पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील महापूराची परिस्थिती ओसरत असताना नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू नये व साथीच्या आजारांचा फैलाव होवू नये यासाठी जिल्ह्याभरात एकूण १८६ वैद्यकीय पथके स्थापन करण्यात आली असून त्यापैकी महानगरपालिका क्षेत्रात ५२ व ग्रामीण भागात १३४ पथके कार्यरत आहेत. त्यापैकी महानगरपालिका क्षेत्रातील पुरग्रस्त लोक परत गेल्याने त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली वैद्यकीय पथके स्थलांतरीत करून मनपा कार्यक्षेत्रतील कार्यरत २२ केंद्रा व्यतिरिक्त पुरग्रस्त भागामध्ये नविन २६ ठिकाणी तात्पूरती वैद्यकीय उपचार केंद्र व ४ मोबाईल युनिट सुरू करण्यात आली आहेत.
पुरपरिस्थितीमुळे पंचनामे व इतर कार्यासाठी जिल्हा बाहेरील २ अप्पर जिल्हाधिकारी, ५ उपजिल्हाधिकारी, ९ तहसिलदार, १६ नायब तहसिलदार, १६ मंडळ अधिकारी, ४६ तलाठी, ४ लिपीक व २० अभियंते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पुरामुळे निर्माण झालेला चिखल व गाळ काढण्यासाठी आणि स्वच्छता करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडून १, पंढरपूर नगरपरिषदेकडून १ अशा २ जेटींग मशिन उपलब्ध झाल्या असून त्याव्दारे स्वच्छतेचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा