बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

पूरबाधित 49 हजार 414 कुटुंबांना 24 कोटी 70 लाख 70 हजाराचे सानुग्रह वाटप - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 21 (जि.मा.का) : सांगली जिल्ह्यात महापूराने  104 गावे बाधित झाली आहेत. बाधित पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामीण भागात 10 हजार आणि शहरी भागात 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. त्यापैकी 5 हजार रुपयांचे रोख वाटप करण्यात येत आहे. दिनांक 20 ऑगस्ट अखेर 49 हजार 414 कुटुंबाना यामध्ये ग्रामीण भागातील 34 हजार 687 आणि शहरी भागातील 14 हजार 727 कुटुंबाना रोखीने एकूण 24 कोटी 70 लाख 70 हजाराचे सानुग्रह अनुदान पूरग्रस्त कुटुंबाना वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित कुटुंबांनाही अनुदान वाटप सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
            सांगली जिल्ह्यात 104 गावे पूरबाधित असून यामध्ये अंदाजे ग्रामीण भागातील 45 हजार 293 तर शहरी भागातील 42 हजार 646 कुटूंबे बाधित आहेत. यापैकी मिरज तालुक्यातील 20 गावे बाधित असून यातील ग्रामीण भागातील 10 हजार 728 तर शहरी भागातील 14 हजार 712 कुटुंबाना 12 कोटी 72 लाख रूपये, वाळवा-इस्लामपूर तालुक्यातील 38 गावे बाधित असून यातील 10 हजार 684 कुटुंबाना 5 कोटी 34 लाख 20 हजार रूपये, शिराळा तालुक्यातील 21 गावे बाधित असून यातील 590 कुटुंबाना 29 लाख 50 हजार रूपये आणि पलूस तालुक्यातील 25 गावे बाधित असून यातील 12 हजार 685 ग्रामीण तर 15 शहरी कुटुंबाना 6 कोटी 35 लाख रूपयाचे सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात आले आहे.        .
            वाळवा-इस्लामपूर तालुक्यातील 1 हजार 433 कुटुंबाना 5 हजार रूपयांची रक्कम वजा जाता उर्वरित 71 लाख 65 हजाराची रक्कम धनादेशाव्दारे बँकेत जमा करण्यात आली आहे. तर शिराळा तालुक्यातील 570 कुटुंबाना 28 लाख 50 लाख रूपये रक्कम बँकेत धनादेशाव्दारे जमा करण्यात आली आहे. अशी एकूण 2 हजार 3 कुटुंबांना 1 कोटी 15 हजार रूपयांची रक्कम बँकेत धनादेशाव्दारे जमा करण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबांनाही सानुग्रह अनुदान वितरण व बँकेत जमा करण्याचे काम सुरू आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा