सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

कर्जमुक्ती योजनेंतर्गत म्हैसाळ व बनपुरी येथे आधार प्रमाणिकरणास प्रारंभ


जिल्ह्यातील 90 हजार 107 शेतकऱ्यांच्या याद्या 28 पर्यंत उपलब्ध
                                                                             - जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे

- म्हैसाळ बनपुरी येथे आधार प्रमाणिकरणाच्या पथदर्शी योजनेचा शुभारंभ

सांगली, दि. 24 (जिमाका) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील म्हैसाळ येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ जिल्हा उपनिबंधक यांच्याहस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील 90 हजार 107 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
          महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ आणि आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले. म्हैसाळ येथील वसंत विकास सोसायटीमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमास उपनिबंधक मिरज आदीनाथ दगडे तसेच संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
          महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आज जिल्ह्यात म्हैसाळ आणि बनपुरी येथील आधार प्रमाणिकरणाचे कामाचा पथदर्शी योजना हाती घेतली असून या दोन गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या असून त्यांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा शुभारंभ आज झाला. म्हैसाळ येथील 375 बनपुरी येथील 221 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या याद्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर निर्गती केली जाईल, असे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा उपनिबंधक यांनी आधार प्रमाणिकरणाच्या कामाची पाहणी केली तसेच आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांना पोच पावत्यांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
          महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट करून जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहु नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून जिल्ह्यातील 90 हजार 107 थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास 528 कोटी रूपयांची कर्जमाफी होवून हे शेतकरी कर्जमुक्त होतील. या सर्व शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली असून 28 तारखेपर्यंत याद्या उपलब्ध होतील. या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जातील, असेही ते म्हणाले. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कर्जमाफीमुळे दिलासा - संजय बापू पाटील
          महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे माझे 1 लाख 53 हजार 551 रूपयांचे कर्ज माफ होवून यामुळे दिलासा मिळाला असल्याचे समाधान म्हैसाळ येथील शेतकरी संजय बापू पाटील यांनी आधार प्रमाणीकरणानंतर व्यक्त केले. आजारपणामुळे द्राक्ष बागेकडे लक्ष देता आल्याने वसंत विकास सोसायटी लि. म्हैसाळ कडील 1 लाख 53 हजार 551 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले असताना शासनाच्या या कर्जमुक्तीमुळे कुटुंबाला दिलासा मिळाला असून हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सर्वात आनंदाचा क्षण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
          समारंभास उपनिबंधक मिरज आदिनाथ दगडे, वसंत विकास सोसायटीचे चेअरमन धनराज शिंदे, सचिव भरत माळी, ग्रामपंचायत सदस्य दौलत शिंदे यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
000000


रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

आर. आर. पाटील यांचे निर्मलस्थळ लवकरच विकसीत करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : कै. आर. आर. (आबा) पाटील हे लोकांच्या मनातील नेते होते. त्यांनी सामान्य माणसांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. अशा या थोर नेत्याचे  समाधीस्थळ असलेल्या निर्मलस्थळाची प्रलंबित कामे येत्या वर्षभरात पूर्ण करून ते विकसीत केले जाईल. या कामासाठी आवश्यक असणारा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
कै. रावसाहेब उर्फ आर. आर. (आबा) पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमीत्त अंजनी येथील त्यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, माजी आमदार सदाशिव पाटील, अंजनी च्या सरपंच स्वाती पाटील यांच्यासह मान्यवर पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कै. आर. आर. पाटील हे समाजाच्या प्रश्नांची जाण असणारे नेते होते. सामान्य माणासाचे हित जोेपासून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते नेहमी तत्पर असत. दुष्काळी भागातील शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यावर सोपविलेल्या खात्यांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळून त्या खात्यांची उंची वाढविली. आर. आर. आबा यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राज्यात यशस्वीपणे राबविले असल्याचे ते म्हणाले. राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या स्मार्ट व्हिलेज पुरस्काराचे कै. आर. आर. (आबा) पाटील स्मार्ट व्हिलेज पुरस्कार असे नामकरण करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून हे पुरस्कार आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथी दिनी वितरीत करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आर. आर. पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
उपमुख्यमंत्री म्हणाले, कै. आर. आर. पाटील यांच्या सांगली येथील स्मारक सभागृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 8 कोटी 70 लाखांचा निधी यंदाच्या अर्थसंकल्पात उपलब्ध करून दिला जाईल. सांगली जिल्ह्यातील सर्वच विकास कामांना निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील ज्या गावांना सिंचन योजनेचे पाणी पोहोचलेले नाही त्या गावांत पाणी देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आमदार सुमनताई पाटील यांनी सुचविलेली सर्व कामे मंजूर केली जातील. या कामांना आवश्यक असणारा निधी प्राधान्याने दिला जाईल असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले. जिल्ह्यात टेंभू, ताकारी आणि म्हैशाळ योजनेच्या कामांना आवश्यक निधी उपलब्ध व्हावा यासाठी जलसंपदा विभागाला भरघोस निधी दिला जाईल.
उपमुख्यमंत्री म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कृषि कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. याबरोबरच 2 लाखांवरील पीक  कर्ज नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही निर्णय घेतला जाईल.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कै. आर. आर. (आबा) पाटील यांनी दुष्काळी भागात पाणी नेऊन शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. यामुळे या भागातील शेतकरी सुखी आणि समाधानी झाला असल्याचे दिसत आहे. दुष्काळी भागात पाणी पोहोचण्यासाठी आर. आर. पाटील यांनी केलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील ज्या गावांना पाणी पोहोचले नाही त्या गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करू. आर. आर. पाटील यांना अपेक्षित असलेला विकास घडविणे हीच त्यांना श्रध्दांजली ठरेल असेही ते म्हणाले.
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, दुष्काळी भागात जन्मलेल्या या नेत्याने लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यांना मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने करून खऱ्या अर्थाने ग्राम विकासाचे काम केले आहे. ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव या योजनांमध्ये केलेले काम हे आदर्शवत असल्याचे ते म्हणाले.
सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले, आर. आर. पाटील यांचे अंजनी येथील समाधीस्थळ स्फूर्तीस्थळ व्हावे. सामान्यांच्या हिताचा विचार करून आबांनी घेतलेल्या निर्णयामुळे या भागाचा विकास झालेला दिसून येत आहे. दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती झाली असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आमदार अनिल बाबर, अरूण लाड, सुरेश पाटील, अविनाश पाटील, सचिन खरात यांनी आपल्या मनोगतात आर. आर. पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला. 
यावेळी उपस्थित मान्यवर, लोकप्रतिनिधी ग्रामस्थांनी समाधीस्थळावर पुष्प अर्पण करून आर. आर. पाटील यांना अभिवादन केले.
00000