मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

विद्यार्थ्यांना आधार देणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

     राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या अनुसुचित जाती नवबौध्द घटकातील मागासवर्गीय विदयार्थ्यांची वाढत असलेली संख्या, यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना शासकिय वसतिगृह सुविधेचा जागेची मर्यादा लक्षात घेता त्यांना वसतिगृह प्रवेश देणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. या योजनेंंतर्गत अनुसुचित जाती नवबौध्द घटकातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्याना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते.
 या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा या  उद्देशाने सुधारीत शासन निर्णयानुसार योजनेची नव्याने अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानुसार सांगली जिल्ह्यात सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीतील तसेच हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये / शैक्षणिक संस्था या ठिकाणी भोजन भत्ता 25 हजार रूपये, निवास भत्ता 12 हजार रूपये, निर्वाह भत्ता 6 हजार रूपये असे एकूण 43 हजार रूपये रक्कम प्रति विद्यार्थी देण्यात येते. या रक्कमेव्यतिरीक्त वैद्यकीय अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 5 हजार रूपये  अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रूपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी शर्ती तसेच निकष पुढील प्रमाणे आहेत.
·        विद्यार्थी अनुसुचित जाती नवबौध्द या प्रवर्गाचा असावा त्याने जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकारी यांचे सादर करणे अनिवार्य आहे.
·        विद्यार्थी शासकिय वसतीगृह प्रवेश घेण्यास पात्र असावा.
·        विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याने वय /अधीवास राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (डोमीसाईल) सादर करणे बंधनकारक असेल (सक्षम प्राधिकारी यांचे).
·        या योजनेमध्ये दिव्यांग (अनु.जाती नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल. दिव्यांग (अनु.जाती नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील.
·        विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
·        विद्यार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत / शेड्युल्ड बँकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे.
·        विद्यार्थी स्थानिक नसावा (ज्या महाविद्यालय / शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी ते महाविद्यालय / शैक्षणिक संस्था ज्या महानगरपालिका/ नगरपालिका/ ग्रामपंचायत/ कटक मंडळे यांच्या हद्दीत आहेत त्या महानगरपालिका/ नगरपालिका/ ग्रामपंचायत/ कटक मंडळे येथील रहिवासी नसावा).
·        सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीतील हद्दीपासुन 05 कि.मी. परिसरातील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थीसुध्दा या योजनेचा लाभ मिळवण्यास पात्र आहेत.
·        विद्यार्थी इयत्ता 11वी, 12वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.
·        12वी मध्ये विद्यार्थ्यास किमान 50 टक्के गुण असल्यावरच या योजनेचा पुढे पदवी- पदव्युत्तर शिक्षणासाठी लाभ घेता येईल.
·        12 वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा तसेच पदवीनंतर पदव्युत्तर पदवी/ पदवीका अभ्यासक्रमाचा कालावधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा (संबधित अभ्यासक्रम शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळवण्यासाठी अनुज्ञेय असावा).
·        विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.
·        विद्यार्थ्यांना  सदर योजनेचा लाभ पात्र अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत अनुज्ञेय असेल तसेच त्यास प्रत्येक वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवुण उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल.
·        विद्यार्थ्याने महाविद्यालयीन उपस्थिती विहित नमुन्यात प्रत्येक सहामाहीस सत्र परिक्षेच्या निकालाची प्रत (Sem Result) सादर करणे बंधनकारक असून ती सादर केल्यानंतरच लाभाची रक्कम वर्ग करण्यात येते.
·        विद्यार्थी ज्या जिल्ह्यात शिकत आहे त्याच जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामध्ये स्वत: अथवा टपालाव्दारे/ ई-मेलव्दारे अर्ज करणे.
·        अपूर्ण भरलेल्या अपूर्ण कागदपत्रांसह सादर केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
     अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत - स्वाधार योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज कागदपत्रांच्या साक्षांकित सत्यप्रतीसह परिपूर्ण अर्ज, जातीचे प्रमाणपत्र (सक्षम प्राधिकारी यांनी वितरीत केलेले),  महाराष्ट्राचा रहिवासी असलेचा पुरावा. वय /अधिवास राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र(डोमासाईल सर्टिफिकेट), आधार कार्डाची प्रत, बँक पासबुकाची प्रत, उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचा) किंवा वडील नोकरीत असल्यास फॉर्म नं. 16, विद्यार्थी  दिव्यांग असल्यास त्याबाबतचे वैद्यकिय प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचे गतवर्षाचे इ.10 वी, 11 वी, 12 वी  किंवा पदवी परिक्षेचे गुणपत्रके, महाविद्यालयाचे प्रवेशित वर्षाचे बोनाफाईड सर्टिफिकेट, विद्यार्थीनी  विवाहित असल्यास पतीच्या उत्पन्नाचा दाखला, बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याचा संबधित बॅकेचा दाखला/पुरावा, विद्यार्थ्याने कोणत्याही शासकिय वस्तीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे विद्यार्थी स्थानिक रहिवाशी  नसल्याबाबतचे शपथपत्र (प्रतिज्ञापत्र), विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा (खाजगी वसतीगृह, भाडे करारनामा नोटरी / प्रतिज्ञा पत्रावरती इ.)
अधिक माहिती संपर्कासाठी विद्यार्थी सध्या शिकत असलेल्या संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य / मुख्याध्यापक,  अधिक्षीका मुलींचे शासकीय वसतिगृह, विश्रामबाग, सांगली  फोन नं. 0233-2304367, अधिक्षक मुलांचे शासकीय वसतिगृह, विश्रामबाग, सांगली  फोन. नं. 0233-2301414, सहायक आयुक्त, समाज कल्याण सांगली, सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, फोन नं. -  0233-2374739 E-mail - acsangli2016@gmail.com येथे संपर्क करावा. 

                             संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली
                                     
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा