शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

7/12 संगणकीकरणाच्या कामास प्राधान्य द्या - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात



सांगली, दि. 14, (जि. मा. का.) :  7/12 संगणकीकरणाच्या कामास अधिक प्राधान्य देण्याची सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे बोलतांना केली.
            कडेगांव येथील शासकीय विश्रामगृहामध्ये जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरविंद लाटकर, प्रांताधिकारी गणेश मरकड, कडेगांवच्या तहसिलदार शैलजा पाटील, पलूसचे तहसिलदार राजेंद्र पोळ यांच्यासह कडेगांव आणि पलूस तालुक्याचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
7/12 संगणकीकरणाच्या कामात सांगली जिल्हा राज्यात आघाडीवर राहील यादृष्टीने  या कामास प्राधान्य देण्याची सूचना करुन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकऱ्याला होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी सर्व जमिनींच्या अभिलेखाचे संगणकीकरणासही प्राधान्य दिले असून  7/12 ची ऑनलाईन उपलब्धता करण्याच्या कामासही गती दिली असल्याचे ते म्हणाले.
महसूल विभागामार्फत जनतेला लागणारे विविध प्रकारचे दाखले गावातच उपलब्ध व्हावेत, यासाठी गावागावात शिबिरे घेऊन दाखल्याचे वाटप करावे, विशेषत: विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले वेळेत देण्यासाठी जिल्ह्यात गावोगावी शिबिरे घेण्याची विशेष मोहिम राबविण्याची सूचनाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी बोलतांना केली. जिल्ह्यात वाळू चोरी करणाऱ्यांवर कडक निर्बंध घाला, वाळू चोरी करणाऱ्यांची कसल्याही प्रकारे गय करु नका, असे निर्देशही त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिले.
आर्थिकदृष्टया अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करण्याच्या निर्धाराने शासनाने पीक कर्ज माफ करणारी "महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना" आणली आहे. ही योजना साधी, सोपी, सरळ आणि सुलभ असून या योजनेची जिल्ह्यात गतीने अंमलबजावणी करण्याची सूचनाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. या योजनेपासून जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, अशा पध्दतीने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, अशा  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान वाटपाच्या कामाचा तसेच जिल्हयातील पुनर्वसनाच्या कामाचाही यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आढावा घेतला. प्रकल्पग्रस्तांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या कामास प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली. याबरोबरच जिल्ह्यातील महसूल विभागाचा विभागनिहाय कामाचाही त्यांनी आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना केल्या. संभाव्य काळात जाणवणारी टंचाई परिस्थिती विचारात घेऊन आतापासूनच नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात जिल्हयातील महसूल विभागामार्फत सुरु असलेल्या उपाययोजना तसेच अन्य सर्व योजनांची माहिती दिली. शेवटी अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी आभार मानले.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा